राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

पाऊलखुणा..

नेहमीप्रमाणेच मावळतीकडे तोंड करून तो समुद्रकिना-यावरुन चालत होता. त्याच्या मनात कसला तरी कल्लोळ चालू असतानाच त्याची नजर खाली वाळूकडे गेली. त्या सोनेरी वाळूत त्याच्याच पावलांच्या बाजूने काही नाजूक पाऊलं उमटली होती…त्याच्यासारखीच पुढे जात असलेली. त्या पावलांचा मागोवा घेत तो एका खडकाजवळ पोहचला. ती तिथेच बसली होती. गालावर एक हात ठेवून बसलेली आणि तिच्या केसांची एक चुकार बट हळूच तिच्या गालांना स्पर्श करत होती. त्या खडकावर बसून जसं काही ती त्या सूर्याशी हितगूज करत होती…तिच्याकडे निरखून पाहताना त्याला जाणवले की तिचे डोळे खूप सुंदर आहेत. मावळतीच्या सूर्याला आपल्यात सामावून घेणा-या त्या अथांग समुद्रासारखेच गहिरे आहेत. पण त्याच्या असण्यानसण्याचं कसलंच भान तिला नव्हतं. ती तशीच त्या पाण्यात विरघळत जाणा-या सूर्याकडे पाहत बसून होती. पाहताक्षणीच त्याला तिचे ते निष्पाप, स्वप्नील डोळे आणि त्या डोळ्यांतून व्यक्त होणारी ती खूप आवडली.

वाळूवरची त्याची नीरव पावलं तो अगदी जवळ आला तशी तिला जाणवली बहुतेक. तिने आपली नजर त्याच्याकडे वळवली व हलकेच हसली. तसा तोही उत्तरादाखल तसाच हसला. तिने त्याला बाजूच्या खडकावर बसण्याची खूण केली तसा तो यंत्रवत त्या खडकावर जाऊन बसला व समोर सूर्याकडे पाहू लागला. त्याचे तेज आता त्याला जाणवू लागले होते. त्याने हलकेच आपली नजर पुन्हा तिच्याकडे वळवली आणि असाच नि:शब्दपणे खिळल्यासारखा तिच्याकडे पहातच राहिला. तिलादेखील ते कळलं असावं म्हणून ती त्याच्याकडे वळली. त्या तिच्या नजरेतच स्पर्शाचा भास होता. त्याच्या शरीरावर एकदम रोमांच उभे राहीले. कुणीतरी हळूवारपणे मोरपीस फिरवावं तसं वाटलं. थोडयावेळापूर्वी मनात चालू असलेला कल्लोळ एकदम शांत झाला. त्याला हवं असलेलं ते काहीतरी आता त्याला आपसूक मिळालेलं होतं.

आपली भावना तिला कशी सांगावी हे त्याला समजत नव्हतं. इकडे तिकडे नजर फिरवल्यावर त्याला त्याच्या बाजूलाच उगवलेले एक छोटेसे निळे तीन पाकळ्यांचं फूल दिसलं. त्याने अलगदपणे ते खुडलं आणि तिच्यासमोर धरलं. ती हसली. तिने त्याच नाजुकपणाने ते फूल हातात घेतलं आणि आपल्या केसांमध्ये त्या फुलाला जागा दिली. तिचं सौंदर्य अजून खुललं. सूर्यप्रकाश तिच्या चेह-याला आपले तेज देत होताच. त्याने तिची गोरी कांती अजून खुलत होती. आता मावळतीच्या वेळचा आकाशाचा रक्तिमा तिच्या गालांवर उतरून आला होता. ती त्या खडकावरुन खाली उतरली.

तो तिच्याबरोबर चालू लागला. उद्या परत भेटू ह्या बोलीवर ते विलग झाले. ती परतली. पण तो मात्र वाळूत उमटलेली तिची पाऊले पाहत तसाच तिथे उभा राहीला… कितीतरी वेळ त्याला सगळं स्वप्नासारखं वाटत होतं.

दिवसामागून दिवस जात होते. एका कळीचे फुलामध्ये रुपांतर व्हावे तशी ह्यांची कहाणी पुढे चालू होती. ॠतु मागून ऋतु जात होते. ज्या खडकावर ते प्रथम भेटले होते तिथेच आता ती त्याच्या खांद्यावर डोके ठेवून विसावलेली होती. तिच्या टपो-या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या. तिचा तो नेहमीचा प्राजक्तासारखा फुललेला चेहरा कोमजला होता. सगळे बांध तोडून तिचे डोळे झरत होते. त्याने हलक्याच हाताने तिच्या गालावरील ते थेंब दूर करत, तिचा चेहरा आपल्या ओंजळीत घेऊन तिच्या नजरेला नजर भिडवली. काही न बोलताच डोळ्यांनी ती खूप काही बोलत होती. त्याला सर्व कळत होतं, पण काय सांगावं हेच उमजत नव्हतं. राजकुमारीच्या प्रेमामध्ये असलेल्या दासासारखी त्याची अवस्था. काय बोलू व काय करु असेच प्रतिप्रश्न त्याचे डोळे तिला विचारत होते. तिला त्याचं मन वाचता येत होतं. कारण तिच्या श्वासाश्वासातून नियतीमुळे होणारी ताटातूट नकळत व्यक्त करत होती. त्याने निश्चयाने हात तिच्यापुढे केला. तिने काहीच हालचाल केली नाही. एका जागीच एखाद्या मूर्तीसारखी खिळून राहिली होती. त्याने भरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहीले. तिच्या डोळ्यातून वाहत असलेले अश्रू पाहिले. त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. बोलायची गरजच नव्हती. आपला थरथरता हात त्याने मागे घेतला व उठून चालू लागला. आपल्या परतीच्या मार्गावर, मान खाली घालून, येताना उमटलेली पाऊले पाहत. त्याचे शब्द आजकाल असेच अबोल होऊन जातात आणि डोळ्याच्या कडा किंचित ओलावतात.

दूरवर कुठेतरी शब्दांच्या पलीकडेही एक सुंदर जग असतं. हे समजेउमजेपर्यंतच विषमतेच्या वादळात सर्वकाही नष्ट होऊन जातं. अमूर्त स्वप्नंदेखील त्या वादळात भरकटत जातात. उभं राहू पाहणारं त्या दोघांचं एक छोटेखानी घरही असंच अधुरं राहतं. त्याच्या उरल्यासुरल्या भिंती खिंडारासारख्या नकळत दोघांच्या मनातच कुठेतरी उभ्या राहातात. स्वप्नांची सतत बोचरी जाणीव करुन देतात. कधीतरी त्याच्या हातात गुंफलेले तिचे हात होते. आज मात्र तो मोकळ्या हातांनी नियतीचे दरवाजे ठोठावत फिरतो आहे. रस्ते कधी कसे का बदलून गेले हेच त्याला माहित नाही. समुद्राला साक्षी ठेवून जन्मभर साथ देण्याची वचनं, समुद्राकाठच्या मऊ वाळूतली त्यांची पाऊलं हे सारंच एका अनामिक लाटेमुळे वाहून गेलंय. मावळत्या सूर्याला शेवटाचा सलाम करुन तो त्या एकाकी अंधाराला चिरत दूरवर निघून गेला आहे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: