राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

हरवलेली पानं…. भाग – १

प्रस्तावना :- मनोगत :- जे काही म्हणायचे आहे ते :-

मागील आठवड्यात निखिल देशपांडे ह्यांनी माझ्या एका जुन्या लेखाचा हरवलेला धागा मला समोर आणून दिला व आज मी तो लेख ” एक सोडून…. ” लेख लिहला. जेवढे लेखन मी आजपर्यंत मराठी महाजालावर केले असेल त्यात कुठे ना कुठे सत्याचा अंश होता. माझी सफर ही लेखमाला वाचून चतुरंग ह्या सदस्यांने मला प्रतिसाद दिला होता त्याचा पुर्ण भाग आठवत नाही पण एक वाक्य नक्कीच होते, जीवन हे सफरचंदासारखं नसतं ! कुठून ही सुरवात करा.. गोडवाच मिळेल… असे नक्कीच नसते…. अशीच काही पानं मागे राहीली होती.. माझी सफरची सुरवात अशीच कुठेतरी मागे राहीली होती.. कारण काही पानं अशीचं हरवली होती.. काही पाने मुद्दाम मी झाकून ठेवली होती तर काही काळाच्या आड नकळत गेली होती.. ती आज अशीच मनावर ठसठसीत होती म्हणून हे सर्व काही… भाग किती, क्रमशः किती.. मला नाही माहीत, माझे सफरचे २० भाग झाले होते ते देखील अगदी अजाणतेपणे.. हे तर मी जाणूनबूजून लिहीत आहे त्यामुळे नक्की माहीत नाही कधी व कुठे थांबेन ते.. पण सुरवात आज नक्की करायला हवी आहे, उद्या जाताना मनात शल्य नको… !

काही जणांना वाटतं हे सगळे असे का ? हा राजे उर्फ राज जैन जो आज आपल्या समोर उभा आहे तो असा नसावा, माझी सफर लिहली मी तेव्हा मी वेगळा होतो व आज आहे त्यापेक्षा नक्कीच वेगळा होतो, एक तप पुर्ण झाले आहे. एखाद्या गोष्टीकडे तटस्थपणे पाहण्याची नजर मला कर्मामुळे, नशीबामुळे वयाच्या हिशोबाप्रमाणे जरा लवकरच मिळाली. ज्यांनी माझी सफर वाचली नाही त्यांना शक्यतो काही संदर्भ लागणार नाहीत पण ठीक आहे कधी ना कधी वाचतील व त्यांना मी काय म्हणतो आहे हे कळेल. असे नाही आहे मी सर्व जागी एकदम बरोबर आहे कुठे कुठे नक्की मी चुकत असेन चुकलो असेन नाही असे नाही पण हे जीवन मला असेच कळले व जसे कळले त्या शब्दात मी येथे लिहीत आहे, आईने कधी मध्ये रागामध्ये, प्रेमामध्ये ह्या गोष्टी सांगितल्या व मी तश्याच जगत आलो त्यामुळे शक्यतो कुणाची मने दुखावतील कोणाच्या हदयास घाव होईल, पण जेव्हा मुक्त होणे ठरवले आहेच तर सर्व गोष्टींना सामोरे जाणे हे माझे कर्तव्य आहे. म्हणून जे सत्य आहे तेच लिहीत आहे.. परवा पाय तुटला म्हणून घरी पडून होतो.. कधी कळून नये त्या गोष्टी कळाल्या.. तिळतिळ तुटावे असा हाल झाला… त्याचा परिणाम समजा अथवा आत्म्याची हाक…

*************

कधीतरी डोळे उघडले असतील जेव्हा मी जन्मायला आलो तेव्हा, विश्व म्हणजे काय हे डोळे उघडून पाहण्याचा प्रयत्न केला असेल तेव्हा माझ्यासमोर माझी आई, मावशी व मावशीचा नवरा सोडून कोणीच नव्हते. कुठेतरी इंचलकरंजी सारख्या खेडेगाव वजा शहरामध्ये मी जन्मलो. ते ही मावशीच्या घरी. एका खोलीत संसार तेथे एक जीव नवा. सांगायला व वाचायला सोपं वाटतं पण जगणे म्हणजे नरक हे समजणे खरोखर अशक्य हे समजणे थोडे फार नक्कीच अवघड आहे.

माझी आई, कधीतरी बालविवाह कायदा जुमानत नव्हता तेव्हा लग्न झालेलं, घरात जास्त कोणी शिकले नसेलले तरी रुढारुढ परंपरेपासून दुर असे माझे अजोळ पण कसे काय त्या विवाहास तयार झाले देव जाणे, जेथे लग्न ठरवले होते तेथे मानपानावरुन कसल्याश्या गोष्टीवरुन वाद झाला व वादाचे रुपांतर लग्न मोडण्यापर्यंत झाले, आजोबानीं देखील रागाच्या भरात लग्न तोडले. कुठेतरी कोल्हापुरामध्ये एका कपड्याच्या दुकानामध्ये काम करणारा घरदार सोडून दुरवर राहणारा कोणीतरी सांगितला म्हणून त्याला जावई करुन घेतला, घर काय, घराची अवस्था काय, घरात आहे काय, मागे कोण, पुढे कोण, काय नाही आहे काय, काय आहे, मुलगी जगणार कशी, राहणार कुठे ह्याचा सारासार विचार न करता रागाच्या भरात लग्न लावून दिले. लग्नाच्या पहिल्याच दिवशी महाशय तर्र होऊन घरी परतले होते व तो दिवस व शेवटचा दिवस ना ती दारु सुटली ना आईच्या मागच्या दारुची पिंडा… लग्नानंतर काही दिवसामध्येच दारुपायी मंगळसुत्र विकले गेले..

लग्नानंतर घर म्हणजे विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर, असे दिवस काढले तीने, कधी ही खोली कधी ती खोली, कधी शिवाजी पेठ, कधी मंगळवार पेठ कधी बुधवार पेठ तर कधी शुक्रवार पेठ. पण समाधान नाही तीच्या जीवाला, एकाचे दोन जीव झाले तरी साहेब काय सुधरावयास तयार नाहीत, शेवटी कसे बसे मावशीच्या नवर्‍याने इचलकरंजीमध्ये नोकरी लावली व आमचे शब्दश: घर… नाही उरलेले जपलेले, चार तांबे, दोन ताटे, एक स्टो, दोन सतरंजी, व दोन-तीन चादरी अक्षरशः गोळा करुन आपला वाड्यात एक खोली टाकले व त्यांचा संसार उभा केला, तेव्हा आईला दिवस गेलेले व महाराज नेहमी नशेमध्ये चुर, पगार मधल्यामध्ये कुठे गायब होत असे ते देखील कोणास कळायचे नाही. दुसर्‍याच्या घरादारची भांडी व कपडे-धुणे करुन काबाड कष्ट करुन आईने पोटात मला वाढवले. कसेबसे मी दोन वर्षाचे झालो तोच ताई पण घरात आली ते पण जीव घेणे दुखणे घेऊन, कसेबसे देवाची कृपा होती म्हणून वाचली व दोन महिन्यानंतर घरी आली, माझ्या पाठची पण सगळेच ताई म्हणायचे तिला म्हणून मी पण.

आई गावभर लोणी व तुप गोळा करायची व आठवडी बाजारासाठी ते तुप व लोणी डोक्यावर ठेऊन चालत १६ किलोमीटर दुरवर असलेल्या सदलगा ह्या गावी विकायला घेऊन जायची. काखेत ताई व चालत मी ! किती चालणार मी पण.. शेवटी रडारड, मग एका बाजूला अक्का व एका बाजूला मी वर डोक्यावर कपड्यांचा गठ्ठा व त्यात कुठेतरी तुप व लोणी. कपडे विकणे व त्याच बरोबर लोणी व तुप विकणे हा जोड धंदा. आठवड्यातून एकदाच पण तीची बिचारीची फरफट व्हायची ह्यामध्ये, दोघे लहान कधी ताईचे रडणे कधी माझे, हट्टी लहानपणापासूनच मी त्यामुळे प्रचंड त्रास. चार पाऊले चालले नाही की मला उचलून घे हा घोष. व राहीले बाबा, त्यांचे भावविश्वच वेगळे, ते कुठे असायचे व कुठे नाही देवाला माहीत. कधी मन केले तर दारुच्या दुकानात कामाला तर कधी हातमागावर….

हळुहळु मी देखील मोठा झालो, बाबा व आई परत कोल्हापुरला आले राहण्यासाठी. शिवाजी पेठेत. काय झाले काय माहीत पण माझे आजोबा म्हणजे माझ्या आईचे वडिल कधी आमच्या घरी आलेच नाहीत. पोरीला चुकीच्या हातात दिले ह्याचे शल्य की काय देव जाणे पण ते कधी फिरकलेच नाहीत कोल्हापुरकडे.. मरे पर्यंत ! माझी शाळा जवळच, मंगळवार पेठेत. केजी बीजी काय नव्हतं त्यावेळी. सरळ पाच वर्षांनी पहिलीत प्रवेश. मला जास्त नाही आठवत पण कधी कधी आई सांगायची एकदा प्रवेश घेण्यासाठी बाबा शाळेत गेले होते ते परत कधीच गेलेले नाहीत शाळेत. बाबांना मदत व्हावी म्हणून आईने घरी शिवण मशीन आणले तेव्हा असेन मी ४-५ वर्षाचा ते मशीन सरळ पाठीचा मणका दुखावला तेव्हाच बंद झाले नाही तर आहोरात्र चालूच होते… !

काही गोष्टी मला हळूहळू कळत होत्या पण अक्का पाठची तिला काहीच कळत नसे व तिला काही हवे नको ते मला व माझ्या ताकतीबाहेरचे असेल तर आईला सांगणे… एवढंच तिला कळायचे. आज तिला आठवत ही नसेल, कीती वेळा तिला सफरचंद हवेत म्हणून मी अंबाबाईच्या मंदिरासमोरील मार्केट मधून फेरीवाल्यांच्याकडून चोरली असतील व किती वेळा मला हवे म्हणून चिक्कू चोरले असतील. शाळेत प्रवेश झाला त्या दिवशी शक्यतो माझे आई-वडील एकत्र शाळेत आले असतील त्यानंतर कधीच नाही बाहूबली हॉस्टेलपर्यंत..तर नक्कीच नाही.. कारण मी गायब होतो म्हणून आले होते मी नसताना.

एक खोली, त्यातच किचन त्यातच बेडरुम व त्यातच बाजूला दोन-तीन फुट उंच भिंत बांधून केलेली बाथरुम. संडास कुठेतरी खाली नाहीतर सार्वजनिक. हे असे आमचे घर. चुल ठेवायला परवानगी नाही म्हणून स्टोव्ह. अल्युमिलियमची भांडी व स्टिलची दोन-चार ताटं.. आज नवल वाटतं तीने तो संसार कसा निभावला असेल.. कशी ती जगली असेल.. ती त्यावेळी.

शाळेतील सहली व शाळेतील जगणे हेच भावविश्व तेव्हा देखील व नंतर देखील. आम्ही कोठे ही गेलो तर माझी ताई माझ्याबरोबर असे. शाळेत हुषार, पहिले ते सहावी पर्यंत कधीच एक नंबर सोडला नाही कधी तरी दोन नंबर पण पहिल्या दोनात मी नक्कीच असे. शाळेतील शिक्षकांचे, मॅडमचे तेवढेच प्रेम… पण माझ्या एवढा दंगेखोर व टवाळखोर दुसरा कोणीच नव्हता शाळेत. त्यामुळे रोज मार व रोज ओरडणे. घरी आले तर गल्ली भर मस्ती करुन झालेली असायची. कधी बाबांनी माझा अभ्यास घेतला असावा असे आठवत देखील नाही, ना मला ना ताईला. हा पण मार मात्र प्रचंड खल्ला असेल, ताईने कमीच, शक्यतो नाहीच, पण मी मात्र… हिशोब नाही !

आधी शिवाजी पेठ ते मंगळवार पेठ व नंतर काही दिवसानंतर बुधवार पेठ ते मंगळवार पेठ, आम्ही चालत शाळेत यायचो, मी ताईचा हात पकडायचो व शाळेत आल्यावर सोडायचे. आमची रुपा खुप हुषार, माझ्यापेक्षा ही खुप हुषार अनेक पट्टीने, तिला चांगले काय वाईट काय लगेच समजायचे, खुप गोड.. पण माझ्या मनात नेहमी गोंधळ चाले, मी दंगा केला असो वा नसो बाईनीं बोलवले असो वा नसो माझे बाबा कधी शाळेत आलेच नाहीत. मात्र घरी मात्र मार कधी चुकायचा नाही, काही करो वा न करो, त्यांचा राग कुठेतरी नक्कीच निघायचा… त्यांची माझी काय दुश्मनी होती देवास ठाऊक. पण कधी जवळ घेणे नाही ना कधी प्रेमाने डोक्यावर हात फिरवणे नाही, नाही म्हणायला कसे काय कोण जाणे मी लहान असेन तेव्हा किती ते पण आठवत नाही व ताईला देखील आज आठवणार नाही, कधीतरी असे अचानक आम्हाला सहपरिवार आई, मी व अक्काला गोव्याला घेऊन गोव्याला आले, शक्यतो बाबांच्या बरोबर ह्या जन्मातील ती पहिली व शेवटची ट्रिप असावी ती आमची, त्यामुळे असेल नक्की माहीत नाही, पण मला ती ट्रिप नक्की पुर्ण आठवते, ते बीच, ते चर्च व तो दोना-पावला बीच जेथे बाबांनी त्यांची गोष्ट सांगितली होती व नंतर मोठे झाल्यावर कळाले होते की एक दुजें के लिए हा चित्रपट त्याच गोष्टीवर बेतला होता. ह्या नंतर असंख्य वेळा गोव्याला गेलो असेन पण दोना-पावला बीचवर कधी चुकून पण पाऊल नाही ठेवले आज देखील.

दहावी बारावीला मी टॉप करेन असा आत्मविश्वास माझ्या शाळेतील सरांना, मॅडमना देखील होता, आत्मस्तुती नाही पण जवळ जवळ प्रत्येक प्रश्नाचे उत्तरासाठी माझा हात वर असे व परिक्षेत देखील मी नेहमीच वरचढ असे… जवळ जवळ पहिली ते पाचवी-सहावी पर्यंत तरी नक्कीच… सायन्स असो वा ईतिहास.. नाहीतर भुगोल नाहीतर गणीत.. व्याकरण व इंग्रजी ह्यामध्ये जरा तडफडायचो पण कच्चा नक्कीच नव्हतो. नुतन मराठी विद्यालय सुटले व कधी जाउन बाहुबली हॉस्टेल मध्ये पडलो ते कळालेच नाही, आईचे शिलाई मशीन कधी थांबलेच नाही, रोज बाहेर असलेली सवत, ती दारु कुठल्या अंगाने घरात शिरली ते देखील आईला कळालेच नाही. रोज बाहेर घेणारे बाबा आजकाल घरात बसूनच बाटलीवर बाटली गटकवू लागले.कष्टाचे दिवस कमी झाले असे मनात येऊपर्यंत अपार कष्ट समोर येऊन पडले. लोकांच्या परकर व पिकोफॉल करण्याच्या कामावर घर चालणार नाही हे आईला लवकरच उमजले व तीने खानावळ चालू केली, हॉस्टेलमध्ये माझी पळापळ, घरात आई सोडून कुणालाच मी नको आहे ही भावना ह्यामुळे प्रचंड तगमग व त्यावर उपाय म्हणून रोज सकाळी उठून हॉस्टेल मधून पळण्याचा प्लॉन, फसला की मार, परत दुसरा दिवस परत दुसर प्लॉन.. ! आई जवळ जाणे हा एकच ध्यास, त्यावेळी कोणास ठाऊक कोणाला समजला नाही किंवा उमजला नाही, आई शिवाय राहणे शक्यच नव्हते ना.. रोज तीचीच सवय सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपूपर्यंत.

पण ते माझे भाव विश्व कोणास समजलेच नाही मी रोजच्या रोज निगरगट्ट होत गेलो, एकदा तर हॉस्टेल मधून चांगले चार दिवस पळून गेलो ना घरी गेलो ना हॉस्टेलमध्ये परतलो… पाचव्या दिवशी आईचीच आठवण जीवावर आली म्हणून परत ग़ंगावेशेत येऊन उभा राहीलो, पण ते चार दिवस दाजीपुरच्या जंगलात एका १२-१३ वर्षाच्या पोराने कसे काढले असतील ते येथे लिहणे शक्यपण नाही व मला लिहणे देखील. त्यानंतर आमचे जीवन जसे ढवळून निघाले, हॉस्टेल मधून मी परत कोल्हापुरात आलो व बाबांनी पण नोकरी सोडून कपड्याचा स्टॉल महाद्वार रोडवर घातला होता, आईचे काम देखील चालूच होते, दिवसभर मशीनवर परकर शिवणे, पिकोफॉल करणे… व सकाळ संध्याकाळ पिसीआर हॉस्पिटलच्या शिकाऊ डॉक्टर ना डब्बा पोहचवणे.. कधी ते जेवायला याचे तर कधी आम्ही डब्बा पोहचवायचो. असेच एक दिवस प्रचंड पाऊस पडत होता, जेवण तयार होते पण कोणीच पोहचू शकत नाही अशी अवस्था. नऊ वाजत आले होते शेवटी आईने शेजारच्या मुलाची सायकल मागून घेतली व मला डब्बे पोहचवण्यास सांगितले. त्याआधी कधी डब्बे पोहचवले नव्हते असे नाही पण एवढ्या रात्री आईने मला एकट्याला बाहेर पाठवण्याची पहिलीच वेळ. हो ना करत मी डब्बा घेऊन निघालो व परतुं येताना टाऊनहॉलच्या पाठीमागे असलेल्या सोन्यामारुती चौकामध्ये पाऊसामुळे रस्त्यात अडव्या पडलेल्या झाडाच्या फांदीला धडकून माझा अपघात झाला व मी मोकळे डब्बे व सायकल घेऊन उत्ताणा पडलो. जिवनात पहिला झालेला अपघात. जास्त काही लागले नाही पण.. बाबांच्या शिव्या व मार.. दुसर्‍याच्या मुलाची सायकल तुटली ह्याचा राग प्रचंड, पण स्वतःचा मुलगा सहिसलामत आहे ह्याची त्यांना फिकर नक्कीच नव्हती त्यावेळी.. काय करणार अक्कामाई पोटात गेली होती व ती बोलत व मारत होती…

क्रमशः

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: