राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

सय…..

असेच काहीतरी आठवले म्हणून…..

खुप दिवसानंतर फेसबुक लॉगईन केले, काहीतरी हरवल्यासारखं वाटलं म्हणून बसून पुन्हा पुन्हा सगळे चेक केले, सर्व काही जसेच्या तसेच होते २-३ नवीन मित्र झाले होते, माझा वॉल मित्रांच्या मॅसेजने भरुन वाहत होता, पण नक्कीच कुठेतरी काहीतरी हरवले होते म्हणून परत एकदा चेक केले तर एक नाव मिसिंग निघाले. काहीच वाटले नाही, अपेक्षित नव्हते पण धक्कादायक ही नक्कीच नव्हते. मनात आले एकदा जीमेल तरी चेक करु, माहीत आहे एखादा फॉरवर्ड मेल, एखादी अ‍ॅड मेल व इतर फालतू मेल हे सोडून त्या आयडीवर काहीच येत नाही तरी न चुकता दररोज चेक करतोच. का ? माहीत नाही, बोटांना सवय झाली आहे शक्यतो. पण,

काही क्षण काहीच वाटले नाही, जवळ जवळ सगळे मेल डिलिट केले व ज्या निर्विकार मनाने लॉगईन केले होते त्याच निर्विकार मनाने लॉग ऑफ केले. मन निर्विकार होते, एकदम शांत जसे दुरवर परसरलेले वाळवंट. दुरदुर पर्यंत कसलीच छाया नाही ना कसला गोंधळ, सर्वकाही शांत. एक अनामिक चिर शांतेतेच हुडपलेल्या त्या वाळवंटासारखे माझे मन देखील असेच शांत होते.

एखादा चलचित्रपट समोर चालत असावा व आपण फक्त दर्शक होऊन त्याच्याकडे पहात रहावे व समोर झरझर गोष्टी घडत रहाव्या व त्यापासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करावा हदयाने. एवढेच काहीतरी चालू होते बाकी सगळे शांत, त्या काही काळ आधी असलेल्या निरभ्र आकाशासारखे.

तुच तुच तुच… आठवतात त्या ओळी अजून मला, कित्येक दिवस समजवले होते की नको वेड्या पाऊसाच्या मागे लागू, पण नाही तुला समजवण्यात अर्थच नव्हता, तुझ्याबरोबर वाहत वाहत कुठवर आलो बघ ना, ना पुढे कोणी आपले ना मागे कोणी, फक्त एक अशांत अशी शांतता जशी वाळवंटात असते, एकदम अबोल, पण आत प्रचंड उलाघाल चालू असते तशीच. नको नको म्हणत असताना देखील सर्वकाही दिलेस मला. कधीकाळी हसणे विसरुन गेलो होतो व ध्येय नावाची कुठलीतरी भावना असते हे देखील. पण तुझ्या अस्तित्वामुळे कुठेतरी भरकटलेला हा जीव, मार्गस्थ झाला, जिवनाला नवीन दिशा मिळाली म्हणूपर्यंत काळरात्र आली व होत्याचे नव्हते झाले. माझ्यावरच अशी का वेळ येते प्रत्येक वेळी असा विचार करत बसलो, शुन्यासारखा.

किती वेळ, कुठे, का ? असले प्रश्न आमच्या सारख्या मुर्खांना कधीच पडत नाहीत. तळपता सुर्य असो व वेड्या सारखा कोसळणारा पाऊस अथवा रम्य चांदणी रात्र, सगळेच सारखे. मग ते रखरखते उंन्ह व तेवढ्याच त्वेषाने कोसळणारा तो पाऊस दोन्ही सारखेच. त्या समोर असलेल्या सरोवरासारखे आम्ही एकदम तटस्थ. भावनाच मेल्या तेथे बाकीच्या गोष्टींची काय तमा ? होते असे कधी कधी. प्रेमाने जवळ घेतलेले व आपल्या हदयाजवळ ठेवलेल्या फुलाचे काटे आपलेच हात करतात कधी कधी रक्तबंबाळ. चालायचेच जगाचा नियम.

उभ्या असलेल्या बाईकला किक मारणे व रस्ता दिसेल तसे हवे सारखे भरकटणे. वाटलेच थांबावे तर थांबायचे, बाईक कडेला उभी करुन कधी डोंगरमाथ्यावर तर कधी एखाद्या तळाच्या समोर वेड्यासारखं शुन्यात बघत उभे राहायचे व एखादी वेडी झुळूक आतपर्यंत स्पर्श करुन गेली तर भानावर आल्या सारखं इकडे तिकडे पाहायचे व कळत नकळत डोळ्याचा ओल्या कडा पुसत स्वतःशीच हसायचे, ते देखील चोरुन, मनमोकळेपणाने हसून देखील खुप दिवस झाले. किती दिवस झाले ह्याचा हिशोब पण नाही, व त्याची काळजीपण नाही.

एकदम संधीप्रकाशासारखी तु गायब झालीस.. आहेस आहेस म्हणूपर्यंत गायब. का कुठे, कशी ? काही माहीत नाही, छोटी मोठी वादळे आली होती पण ती वादळे तुला असे नजरेआड करतील असे मला आज ही वाट नाही. कारण नक्कीच काहीतरी वेगळे असेल अशी भाबडी आशा मनास होती. पण काही दिवसांनी ती पण चकनाचूर झाली, तु समोर येतेस पण एक ही शब्द न बोलता निघून जातेस, बाकी जगाशी बोलतेस, हसतेस पण मी ? तुझ्या त्या विश्वात कुठेच नाही ? तुझी वाट पाहत डोळ्यांना कधी स्वप्नांची सवय लागली तेच कळाले नाही, तुला आठवत असेल मी म्हणत असे तुला मला स्वप्ने कधीच येत नाहीत, माझे डोळे स्वप्न पाहूच शकत नाहीत.. ते पण बेचारे आता थकले म्हणून आजकाल मला स्वप्नात ही तुच दिसतेस. तुझ्या असतील नसतील त्या खाणाखुणा मी पुसून टाकल्या माझ्या जिवनातून पण हदयातून अजून तुला काढणे जमलेच नाही.

काळ रात्री येतात जातात माणसे बदलतात, मित्र बदलतात रात्री गणिक नाती बदलतात, पण तुझे व माझे नाते देखील बदलेल असे खरोखर कधीच वाटले नव्हते. दुखः कश्याचे करावे तेच कळत नाही म्हणून माझी जास्त ओढताण होत असावी, तु अचानक न सांगता गायब झालीस ह्याचे ? मी कुठे चुकलो हेच कळाले नाही ह्याचे ? की जे नियतीत होते ते अचानक नकळत घडले त्याचे ? तुटका फुटका ग्लास देखील चालत नाही लोकांना वापरायला तेथे जिवंत माणसाची कथा काय ! व जर हेच कारण असेल तर जा केले माफ तुला. वादळासारखी आलीस जिवनामध्ये व वादळासारखी गेलीस ही. काय बोलावे ? वादळे कधी कोणाचे भले करत नाहीत असा समज होता तो तुझ्यामुळे काहीकाळ तरी खोट ठरला होता. काही गोष्टी आपल्या हातात नसतात हे मात्र नक्कीच समजले. कुवती बाहेर कधीच उडी मारु नये ही एक खुणगाठ बांधली गेली तुझ्यामुळे, भले किती ही समोरील देखावा तुम्हाला भुरळ पाडत असला तरी.

काय आहे माहीत आहे का, रणरणत्या उन्हामध्ये अचानक पावसाचा शिडकाव झाला व तो सुगंधीत मृदगंध सर्वत्र पसरला तर पाऊस सर्वांनाच हवा हवासा वाटतो, त्याच्या बरोबर आपण ही मनसोक्त भिजावे अशी आशा पल्वित होऊ लागते पण तोच जर पाऊस वेड्या सारखा कोसळू लागला व सर्वत्र चिखल व पाण्याचे साम्राज्य उभे करु पाहू लागला की लगेच त्याचा तिटकारा येतो.. किळसवाणा वाटतो, नकोसा होतो. होतं असे कधी कधी पण हेच सत्य आहे.

तरी ही, काही नावे माझ्या बरोबर जिवनभर माझ्या श्वासाबरोबर माझ्यासोबतीला असतील त्यातीलच एक तुझे देखील असेल, कृष्णाने म्हणे द्वारकेमध्ये सोपान बांधले होते त्याच्या जिवनात प्रत्येक्ष अप्रत्येक्षपणे त्याला घडवण्यात ज्याचा ज्याचा हात होता त्यांच्या नावाने. त्यात राधा ही होती व त्यात रुक्मणी देखील तसेच जरासंध देखील व तसाच कंस देखील. माहीत नाही स्वतःची कधी वीट देखील असेल की नाही ते पण माझ्या मनात एक सोपान तयार नक्कीच आहे त्यामध्ये एका पायरीवर तुझे नाव एखाद्या माझ्या आवडत्या फुलासारखं अढळ आहे.

दिवा मिणमिणतो आहे ह्याचा अर्थ तो विझला असा नाही, कधीतरी पुन्हा तेजाने झळाळू लागेल अथवा एकदम त्वेषाने जळून काही क्षणामध्ये बंद देखील होईल पण त्याचे अस्तित्व संपेल असे नाही, कुठे तरी तुझ्या मनामध्ये नक्कीच जळत राहील व तु त्याला कधी विझवू शकणार नाहीस व कधी विसरुपण.. तेवढे खरं प्रेम मी तुझ्यावर नक्कीच केले आहे. तुझा स्वभाव मला माहीत आहे, तु कधीच मागे वळून पाहणार नाहीस हे देखील तरी ही कुठेतरी असाच जिवनाच्या एखाद्या वळणावर भेटलोच तर, तुझे ते हास्य परत पहावयास मिळो हीच प्रार्थना त्या ईश्वराचरणी ज्याच्या इच्छेमुळे हे सगळे घडत गेले.

कधी तरी असेच आठवले म्हणून… हे वेड्यागत लिहीत गेलो… हे तुझ्यापर्यंत पोहचेल की नाही माहीत नाही तुझ्या मनात माझ्याबद्दल असलेल्या प्रेमाला पुन्हा साद घालेल की नाही ते ही माहीत नाही, पण असे वेडे मेघ जागा बघून बरसतात का गं ? कुठेतरी हदयात कळ आली म्हणून हे शब्द उमटत गेले, अर्थ वेगळे संदर्भ वेगळे, तु वेगळी व ही कहानी वेगळी तरी कुठेतरी तुला स्पर्श करेल सुदुरवर पसरलेल्या त्या समुद्राच्या पाण्याच्या थेंबला मी केलेला स्पर्श, तुझ्या स्पर्शाला आसुसलेल्याप्रमाणे असाच अशांत वाहत राहील… ह्या किनार्‍यावरून त्या किनार्‍यावर.. तुझा स्पर्श झालाच तर वेड्यासारखा बरसेल माझ्या आश्रुतुन नाहीतर त्या वेड्या मेघातून व असाच एखाद दिवशी मुक्त होईल… कुणाच्या ही नकळत लाखो अरब थेंबाप्रमाणे….

( काल्पनीक : – नेहमी प्रमाणेच एक कशीच कथा, सुचली म्हणून लिहीत गेलो व पुर्ण झाली, कुठल्या ही जिवित व्यक्तीशी / कथेशी साम्य आढळले तर तो निवळ योगायोग समजावा. वादळामध्ये चिरतारुण्य लाभलेल्या आवेशामध्ये उभं असलेलं मनमोहक वट वृक्ष देखील मुळापासून उन्मळून पडतो तेथे सर्व सामान्याची काय गत, अश्याच एका उन्मळून पडलेल्या पण स्वतःची मुळे जपून असलेल्या, नवीन पालवी फुटण्याची वाट पाहत असलेल्या प्रेमीचे हे आत्मकथन. वेगवेगळ्या भावनिक कोल्होळातून जाताना त्याच्या मनाची अवस्था काय असू शकते हे जाणुन घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न. )

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: