राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

Monthly Archives: नोव्हेंबर 2010

अवेळी पडलेला.. पाऊस..

*****

पावसाच्या आठवणी, सगळ्यांच्याच
मनातल्या कुपित लपवलेल्या
कधीतरी सांजवेळी खिडकी बाहेर कोसळणारा..
चमकत असताना विजा, कळा हृदयामध्ये आणणारा..
आठवणीने चिंब भिजून जावे असे वाटत असताना..
हवा हवासा वाट असताना मध्येच निघून जाणारा
अचानक थांबतो.. जसा काळ थांबा वा…
मग अनेक तास ती जीवघेणी पोकळी..
त्या पावसाच्या आठवणी… मध्ये मध्ये फ्लॅशबॅक..
पुन्हा पाऊस.. थोडा हलकासा….
डोळ्याच्या कड्याच्या पलीकडे.. थबकलेला..
थोपवून धरावा ह्यासाठी जीवघेणी हालचाल..
पण आठवणींचा वेग… त्याच्या सरी सारखा वाढणारा..
धडपडणारे हात.. पाय, खिडकी जवळ जाण्यासाठी आसूसलेले मन..
जिवाची ती केविलवाणी अवस्था.. ती तगमग..
सरी बरोबर विरघळत जाणारे आजू-बाजूचे जग….
हातचा ग्लास, खाळक्कन फुटतो.. काचेचा सडा..
खिडकी वरची नजर.. फिरते.. उष्ण धार हातातून..
खाली फरशीवर.. रक्त सडा.. फ्लॅशबॅक पुन्हा पुन्हा..
वीजत असलेल्या डोळ्या समोर…पाऊस थांबलेला..
मग उरतो शेवटी.. तडफड पडलेला एक जीव..
जग पुन्हा कामाला.. लागलेले.. पुर्वी सारखे..

http://www.mimarathi.net/node/4122

Advertisements

जी-२

रोज सकाळी सात – साडेसातला आवरून उठून बाहेर पडणे व थोड्या अंतरावर असलेल्या हायवे वर जाऊन जी-२ बस पकडणे व आडीगुडी नाहीतर बिटीएम ऑफिसला पोहचणे हे रोजचे रुटिंग. दिवसभर कामे करून संध्याकाळी परत जी-२ पकडणे व परत इलेक्ट्रॉनिक सिटी कडे परत… येथे प्रत्येक बसला दोन दरवाजे आहेत, एक पुढील स्त्रियांसाठी राखीव व दुसरा मधला मोठा दरवाजा, जसा एअरपोर्ट वरील बसमध्ये असतो तसा, स्वयंचलित व त्या दरवाज्या पुढील ड्रायव्हर पर्यंतच्या सर्व सीट स्त्रियांसाठी राखीव. सकाळ सकाळी बसला आमच्या स्टॉपवर गर्दी नसते, बस तशी रिकामीच, थोडीफार माझ्या सारखी लवकर बाहेर पडणारी काही जणं सोडली तर, बसमध्ये शुकशुकाटच असतो.

तर मी काय सांगत होतो, एके दिवशी असाच जरा उशिर झाल्यामुळे गडबडीत बसमध्ये शिरलो व दरवाज्या समोरच्याच सीटवर जाऊन बसलो. तोच बस थोडी स्लो झाली व थांबली, माझ्या समोरचा दरवाजा उघडला व ती कशीबशी आत आली, जगाची परवा न करता तीने आपली खांद्यावरील बॅग नीट केली व राखीव असलेल्या माझ्या पुढील सीटवर बसली.. टिकीट काढले व नंतर मी मोबाईलवर गेम खेळण्यात गुंग झालो व बसमध्ये कधी गर्दी वाढली, कधी कोण चढले-उतरले ह्यांचा मला विसर पडला.

पुन्हा दुसर्‍या दिवशी, मी नेहमी प्रमाणे जरा उशीराच आलो, पण बस अजून थांबलेली होती, आत गेल्यावर नेहमीच्या सीटवर बसून मी बॅग मांडीवर ठेऊन हुश्श करत बसलो, तोच कंडक्टर समोर आला, टिकीट काढलं व जरा समोर नजर फिरवली, आज थोडी स्त्रियांची गर्दी होती, कालची ती कुठे दिसते का हे नजरेने पाहिले पण नाही, आपल्याला काय म्हणून खिश्यातून मोबाईल काढला व गेम सुरू करणार तोच दरवाजा उघडला व ती आपली बॅग व स्वतःला सांभाळत बस मध्ये चढली, समोर सीट मोकळी दिसत नसल्यामुळे ती च्या कप्पाळावर आट्या पडायला सुरू होण्याआधीच मी उठलो व सीट ती ला दिली , ती हसली. मी बॅग उचलली व मागे मोकळ्या असलेल्या सीटकडे निघणार तोच ती म्हणाली “इल्ले खुंडरी ( येथेच बसा.) याडं मंदी सीट इदे. ( दोन माणसांची सीट आहे)” मी हसलो व त्या रिकाम्या सीटवर बसलो. ती आपले पुस्तक वाचण्यात दंग झाली व मी मोबाईलवर गेम खेळण्यात. पण होसा रोड स्टॉप नंतर गेम मध्ये हरल्या मुळे म्हणा अथवा मूड नव्हता म्हणून म्हणा, मी गेम बंद केला व मग इकडे तिकडे पाहिले.. तर ही बाजूला बसून एक कुठलसं पुस्तक वाचत होती. आता जरा मी हिला निरखून पाहू लागलो.

सावळा रंग, काळेभोर डोळे, केसाला तेल लावून नीट वेणी घातलेली व त्या वेणी मध्ये कसलसं तरी एक पिवळसर फुलं. आकाशी रंगाचा झाक असलेला ड्रेस, खाकी रंगाची बँग व हातात कन्नड भाषेतील एखादे पुस्तक. मी तिच्याकडे पाहत आहे ह्यांची ती ला शक्यतो जाणीव झाली व तीने पुस्तक खाली करून माझ्याकडे पाहीले व एक स्मित हास्य केले, मी देखील उत्तर म्हणून स्मितहास्य दिले. काही वेळाने ती चा स्टॉप आला, गर्दीतून वाट काढत, स्वतःला व आपल्या बॅगला सावरत ती उतरुन गेली, माझ्या बाजूला रिकाम्या झालेल्या सीटवर दुसरा कोणीतरी येऊन बसला..

रोजचीच दिनचर्या झाली ही.. मी तिच्यासाठी नाहीतर तीने माझ्यासाठी सीट राखीव करून ठेवायची, ती अत्यंत उत्तम असे कन्नड बोलत असे ( जसे मराठी भाषेत पुणेरी भाषा ही उत्तम व कोल्हापुरी म्हणजे…. तसेच) व माझी कन्नड एकदम दैवी, ती लाच काय कधी कधी मला देखील कळत नसे मी काय बोललो ते. मग ती खुदुखुदू करून हसायची व मी तेव्हा माझ्या लक्ष्यात आले, हसताना ही च्या दोन्ही गालावर सुंदर खळी पडते.. आता मी रोज बस स्टॅन्डकडे जाताना अण्णाच्या दुकानातून तिच्यासाठी चॉकलेट्स इत्यादी घेईन जाऊ लागलो… न कळत ह्या बसच्या प्रवासात एक नाते निर्माण होऊ लागले.

ती चे व माझे सुट्टीचे दिवस सोडले तर रोजच बस मध्ये भेट होत असेच. हसणे खेळणे, अखंड बडबड करणे हा ती चा स्वभाव व जीवनाच्या भवर्‍यामध्ये अडकलेला माझ्या सारखा, आजकाल हसणे, बागडणे, बडबड करणे विसरुन गेला होता.. पण पुन्हा पालवी फुटली तिच्या जिवंत वागण्यामुळे. रोजच फक्त काही अर्धा-पाऊण तास असलेली ही प्रवासातील सोबतीनं जिवापाड आवडून गेली मला. कधी मैत्रिणींचे किस्से तर कधी घरातली भाऊ-बहिणीची गुपिते, तर आज डब्यात काय ओळख, हा खेळ. चालू असायचे ती चे काही ना काही. दिवसाच्या अश्या आनंददायी सुरुवातीमुळे दिवस पुर्ण आनंदात जात असे.. आपल्या हसण्याचं गुपित कळलं होतं मला…

ती चे नाव सरु, सरोजिनी. आडनाव व इतर गोष्टी विचारल्या नाही, नंतर विचारेन कधीतरी. असेल वय तीचे १०-१२ वर्ष. कन्नड शाळेत शिकायला जाते रोज. जी-२ बस ती च्या शाळेसमोरच थांबते, त्यामुळे ती ची कामावर जाणारी आईतील बसमध्ये बसवून जाते, गेली एक वर्ष ती अशीच एकटी जाते शाळेला, पण बसमधले नियमित प्रवासी ती ला ओळखतात त्यामुळे ती पण निर्धास्त व ती च्या घरचे देखील. बस कंडक्टर बस मुद्दाम ती च्या साठी म्हणून बस ती च्या शाळेच्या गेटवर थांबवतो, व मग थोडेच पुढे असलेल्या बस स्टॉपवर.. शाळा सुटल्यावर ती चे वडील ती ला शाळेतून घरी घेऊन जातात.. डाव्या पाय थोडा अखूड असल्यामुळे थोडी लंगडत चालते.. पण अत्यंत चपळ मुलगी…

काही दिवसांपूर्वी ती ची आई ती ला बस स्टॉपवर सोडायला आली होती बस अजून आली नव्हती, मला पाहताच सरु पटकन माझ्याकडे आली, मग आईला माझी ओळख करून दिली.. ती ची आई म्हणाली, रोजचे बस वाले सरुची काळजी घेतात, पण ती अपंग आहे म्हणून, पण का काय माहीत तुमचा ती ला लळा लागला आहे, ती च्या मते, तुम्ही ती अपंग आहे ह्यांची आता पर्यंत एकदा ही तिला जाणीव करून दिली नाही की पाया बद्दल कधी एक प्रश्न केला नाही, घरी आली की तुमच्या बद्दल सांगितल्या शिवाय दुसरे काहीच करु देत नाही.. मी हसून तिच्याकडे पहिले त्यांना हातानेच राहू दे म्हणालो व एक स्मित केले व त्या चिमुरडी बरोबर पुन्हा नवा गेम खेळण्यात दंग झालो.. अश्या वेळी काय उत्तर द्यावे व प्रतिक्रिया करावी तेच कळत नाही.. म्हणून मी निरुत्तर झालो होतो.. ती च्या आई समोर मी काही नाही म्हणालो पण ती ला नक्कीच सांगितले की अश्या प्रसंगी मला ओशाळल्या सारखं होतं… ती नक्की हे घरी सांगेल…

मन झर करून मागील जानेवारी – ते मे महिन्याच्या कालावधी कडे आपसूकच गेले.. व अपघातामुळे हातात आलेल्या पण कधीच घरी ठेऊन दिलेल्या काठीचा स्पर्श का माहीत पुन्हा एकदा जाणवला…. रोजचा हा प्रवास किती दिवस चालू राहणार आहे काय माहीत पण जे चालू आहे त्यामुळे मला एक वेगळेच सुख मिळत आहे.. लहानपणी मी देखील तिसरीत असल्यापासून अक्काचा हात धरुन अख्खा महाद्वार रोड पार करून नूतन मराठी शाळेत जात असे, तेव्हा अक्का पहिलीला होती.. ते दिवस काय केले तरी मला आठवत नसतं… पण ह्या चिमुरडी मुळे ते दिवस मी आता लख्ख पाहू शकतो,जसा मी तेथेच उभा आहे.. दिवस बदलायला वेळ नाही लागत.. पण मागच्या आठवणी हरवू लागल्या तर मन कसे बेचैन होतं… मनातील हा भाव ह्या एका निरागस हसण्यामुळे कुठल्या कुठे निघून गेला..

सरु आता देखील रोज भेटते… पण पुढे नाही भेटेल काही दिवसांनी तिच्या शाळेला सुट्टी लागेल, शक्यतो मी देखील त्याच जी-२ मधून प्रवास करत असेन असे खात्रीने सांगू शकत नाही.. पण एका लहानग्या मुलीने अगदी ती च्या नकळत मला माझे बालपण परत दिले.. ती मला कदाचित विसरुन ही जाईल.. पण हा दिड महिन्याचा प्रवास माझ्यासाठी, माझ्या आठवणींच्या खजिन्यासाठी मोलाची भर घालत आहे….

एक होता म्हादबां

जवळ असलेली ग्लास मधील दारू ढोसून, त्याने आपल्या सदर्‍यांने तोंड पुसले व जवळ असलेल्या ऍल्युमिनियमच्या छोट्या थाळीतील मीठ आपल्या, बोटांना लावत चटकारा मारला. आज जरा गर्दी कमी होती गुत्त्यात. दिसणारी चारपाच अनोळखी चेहरे पाहून त्याने तोंड वाकडे केले व गुत्त्याच्या सेठला म्हणाला ” अरे, दिन्या. आज गँग नाही आली रे ? ” दिन्यानं त्यांचे थोबाड देखील न बघता, गल्ल्यात हात घाला, व बाकीच्या पब्लिकला शिव्या देत इरसालपणे म्हणाला “अरे, आज दिवाळी ना, गेले घरी. तुझ्या सारखं आहे व्हयं लोकांचे, सणासुदीला तरी घरी जाऊ दे.” एवढं ऐकल्यावर त्याने तोंड कडवटसं केले, व उरलेली ग्लासातील दारु झटकन गळ्यात ओतून, भेलकांडत गुत्त्या बाहेर पडला.

गावात, दिवाळी होती आज. सगळीकडं एकदम कसं उत्साहाचं वातावरण ! सगळीकडे फटाके व फटाक्यांचा धूर. सगळं गाव जसं लखलखत होतं, समोरून राम्या न्हावी गेला, अगदी नजरेला नजर न देता, काय रुबाब, नवा धोतरं, नवा अंगरखा. त्याने ओशाळल्यागत आपल्या कपड्यांकडे पाहिले. अनेक जागी भोकं पडलेला कुर्ता व पिवळसर पडलेले धोतरं ! कसला तरी इचार करता करता पायात काहीतर आडवं आलं आणि धप्पकन हा शेंणात पडला. उभा राहून अंग झाडताना त्याने समोर पाहिलं तर,पाटलाचा वाडा, पाटलीण बाई नटून थटून, सोन्यानं मढून, तोंडावर हसू घेऊन, हातात पंचारती घेऊन पाटलानं नव्या घेतलेल्या बैलगाडी ला ओवाळत होती. काय रुबाब !

पाटलीण बाईनं आवाज दिला, म्हणून हा तिकडे गेला. हातात एक पिशवी देत म्हणाली ” घरी जाऊन खां” काय बी न बोलता, त्याने पिशवी हातात धरली, पाटलीणबाईच्या डोळ्यात त्याने रागाने पहिले, पाटलीणबाई चपापल्या, अचानक काय बोलावे हे न सुचल्यामुळे काहीच न बोलता झटकन माघारी वळल्या. पच्चकन वाड्या समोर थुंकून हा मागे वळला. तोच पाठीवर कुणाचा तरी हात पडला व आवाज आला ” काय, म्हादबां ! काय म्हणते दिवाळी, वैनी साहेबांनी जेवण दिलं वाटतं, वैनीचा लै जीव तुझ्यावर, आज पण गाडी टाईट का ? लै भारी. चालू द्या..” त्याने मागे वळून पाहिलं तर मारुती पैलवान होता, काहीच न बोलता हसून म्हादबानं आपली वाट धरली. झोकांड्या खात कधी गावा बाहेर आला त्यांचे त्यालाच नाही कळाले. एका वडाच्या झाडाचा आधार घेतं तो समोर माळरानावर दिसणाऱ्या झोपडी च्या बाहेर लुकलुकत असलेल्या दिव्याकडे पाहत, स्वतःशीच गुढ हसला. पुन्हा धडपडत तो त्या झोपडी च्या दिशेनं जाऊ लागला. सांजच्याला त्याने झोपडी बाहेर लावलेला रॉकेलचा दिवा उचलला व त्याने झोपडीचे दार ढकलले. दोन पातेली, एक ताट, दगडाची चुल, पाण्याचं मडकं व हंतरायला असलेली एक सतरंजी. सगळे जागच्या जागी होतं.

दिवसभर पाटिलाच्या शेतात राबून अंग आंबलेले होतं, पाटलीण बाईनं दिलेली प्लॅस्टिकची पिशवी त्यांनी उघडली व एका ताटात ओतली. डाळ आंबलेली होती जरा, पण त्याला काहीच फरक पडत नव्हता. धोतराच्या शेंड्या ला बांधलेले पुडी त्याने उघडली व ताटात असलेल्या डाळ-भातात कालवली, जरा देखील उसंत न घेता त्याने बकाबका ते सगळे गळ्याखाली उतरवलं व मडक्यातून पाणी तोंडला लावले. दिवस संपला होता कधीच. तसा तो रोज सतरंजी घेऊन बाहेरच झोपायचा पण आज त्यांची इच्छा होत नव्हती. नाईलाजाने तो तेथेच आडवा झाला. डोळ्यात झोप नव्हती, उगाच डोळ्यात पाणी आल्या सारखं वाटल्यावर त्यानं डोळे हलकेच मिटले.

*****

” अरे, शिरप्या, तो म्हाद्या कुठे दिसला कारं तुला ? दोन दिसं झाले आला नाही कामावर” पाटलानं सुपारी कातरत, समोर बैलाला चारा घालत असलेल्या शिरप्याला विचारले. “नाय पाटिल, गेली दोन दिवस गुत्त्यात पण नाही दिसला” पाटला समोर गुत्त्याचे नाव घेतलं म्हणून शिरपा जीभ चावत म्हणला. ” जा त्याला , शोध बघू जरा, गाडी पाठवायची आहे, तालुक्याला. बैलाला लै जोर पडतं हाय, गाडी खेचायला. चाकात काय तरी गडबड हाय वाटतं” पाटलानं कातरलेली सुपारी तोंडात टाकत शिरप्याला हुकुम सोडला.

शिरपा, भर उन्हांत म्हाद्यामुळे पायपीट करायला लागल्यामुळे शिरपा तसा वैतागलाच होता. म्हादबाच्या नावानं शिव्या घालत, राम्या न्हाव्यापासून ते गावच्या वेसावर असलेल्या भिकार्‍यापर्यंत सगळ्यांना विचारुन झाले, पण गेल्या दोन दिवसात म्हाद्याला कोणी बघितलाच नव्हता. आता ह्याला कुठं शोधायचा म्हणून शिरपा गावाच्या देवळाबाहेर उभा होता, तोच त्यांची नजर, माळरानावर असलेल्या म्हादबांच्या झोपडी कडे गेली. तरातरा चालत शिरपा त्या झोपडी कडे निघाला. झोपडीपासून १०० हात लांब असल्यापासूनच त्यानं म्हादबाच्या नावाने शंख करायला सुरुवात केली.

रणरणत्या उन्हामध्ये, मातीचे चटके खात वैतागलेल्या शिरपानं सरळ सगळा जोर झोपडी च्या दारावर लावला, आधीच कुजके असलेले ते झोपडीचे दार निखळून, धाडकन आत पडले. शिरपां जरा चपापला , पण आतून काहीच आवाज नाही आला. म्हादबा आत नाही असे वाटून तो मागे वळला होता. पण म्हादबांला गावात येऊन दोन वरीस होत आली होती, पण आज पर्यंत त्यानं कोणालाच झोपडीत येऊ दिलं नव्हतं, काय हाय काय ह्यांच्या झोपडीत असा विचार करून शिरपा मागे वळला व पहिल्यांदा त्यानं म्हादबांच्या झोपडीत पाय ठेवला. पण जे समोर दिसले ते पाहून त्यांची बोबडीच वळली व जिवाच्या आकांताने तो गावाकडे धावत निघाला.

****
क्रमशः

मी वेडा

अचानक विसावलीस तू दूर कोठेतरी
विसरुन सर्व, स्मृतींना घालून बंधने जशी
वाटतं येशील कधीतरी फिरूनी
नेहमी स्वप्न पाहतो, मी वेडा

आठ्वतेस अजून ही तू मला
जसे पाहिली क्षणांपूर्वी तुला
अवचित दिसतेस समोर कधीतरी
मग भरकटतो जरा, मी वेडा

असाच मग खेळत बसतो कुठेतरी
आठवणीशी वाद घालत, नाहीतर स्वतःशी
कोसळलेली ती स्वप्ननगरी पाहतो कधीतरी
मग मोजत बसतो विटा, जसा मी वेडा

विचार गुंता सोडवताना कुठेतरी
त्यातच गुंग होतो, तुटते साखळी
जेव्हा आठवतेस तू पुन्हा कुठेतरी
मग पुन्हा नवा गुंता, सोडवत बसतो, मी वेडा