राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

एक होता म्हादबां

जवळ असलेली ग्लास मधील दारू ढोसून, त्याने आपल्या सदर्‍यांने तोंड पुसले व जवळ असलेल्या ऍल्युमिनियमच्या छोट्या थाळीतील मीठ आपल्या, बोटांना लावत चटकारा मारला. आज जरा गर्दी कमी होती गुत्त्यात. दिसणारी चारपाच अनोळखी चेहरे पाहून त्याने तोंड वाकडे केले व गुत्त्याच्या सेठला म्हणाला ” अरे, दिन्या. आज गँग नाही आली रे ? ” दिन्यानं त्यांचे थोबाड देखील न बघता, गल्ल्यात हात घाला, व बाकीच्या पब्लिकला शिव्या देत इरसालपणे म्हणाला “अरे, आज दिवाळी ना, गेले घरी. तुझ्या सारखं आहे व्हयं लोकांचे, सणासुदीला तरी घरी जाऊ दे.” एवढं ऐकल्यावर त्याने तोंड कडवटसं केले, व उरलेली ग्लासातील दारु झटकन गळ्यात ओतून, भेलकांडत गुत्त्या बाहेर पडला.

गावात, दिवाळी होती आज. सगळीकडं एकदम कसं उत्साहाचं वातावरण ! सगळीकडे फटाके व फटाक्यांचा धूर. सगळं गाव जसं लखलखत होतं, समोरून राम्या न्हावी गेला, अगदी नजरेला नजर न देता, काय रुबाब, नवा धोतरं, नवा अंगरखा. त्याने ओशाळल्यागत आपल्या कपड्यांकडे पाहिले. अनेक जागी भोकं पडलेला कुर्ता व पिवळसर पडलेले धोतरं ! कसला तरी इचार करता करता पायात काहीतर आडवं आलं आणि धप्पकन हा शेंणात पडला. उभा राहून अंग झाडताना त्याने समोर पाहिलं तर,पाटलाचा वाडा, पाटलीण बाई नटून थटून, सोन्यानं मढून, तोंडावर हसू घेऊन, हातात पंचारती घेऊन पाटलानं नव्या घेतलेल्या बैलगाडी ला ओवाळत होती. काय रुबाब !

पाटलीण बाईनं आवाज दिला, म्हणून हा तिकडे गेला. हातात एक पिशवी देत म्हणाली ” घरी जाऊन खां” काय बी न बोलता, त्याने पिशवी हातात धरली, पाटलीणबाईच्या डोळ्यात त्याने रागाने पहिले, पाटलीणबाई चपापल्या, अचानक काय बोलावे हे न सुचल्यामुळे काहीच न बोलता झटकन माघारी वळल्या. पच्चकन वाड्या समोर थुंकून हा मागे वळला. तोच पाठीवर कुणाचा तरी हात पडला व आवाज आला ” काय, म्हादबां ! काय म्हणते दिवाळी, वैनी साहेबांनी जेवण दिलं वाटतं, वैनीचा लै जीव तुझ्यावर, आज पण गाडी टाईट का ? लै भारी. चालू द्या..” त्याने मागे वळून पाहिलं तर मारुती पैलवान होता, काहीच न बोलता हसून म्हादबानं आपली वाट धरली. झोकांड्या खात कधी गावा बाहेर आला त्यांचे त्यालाच नाही कळाले. एका वडाच्या झाडाचा आधार घेतं तो समोर माळरानावर दिसणाऱ्या झोपडी च्या बाहेर लुकलुकत असलेल्या दिव्याकडे पाहत, स्वतःशीच गुढ हसला. पुन्हा धडपडत तो त्या झोपडी च्या दिशेनं जाऊ लागला. सांजच्याला त्याने झोपडी बाहेर लावलेला रॉकेलचा दिवा उचलला व त्याने झोपडीचे दार ढकलले. दोन पातेली, एक ताट, दगडाची चुल, पाण्याचं मडकं व हंतरायला असलेली एक सतरंजी. सगळे जागच्या जागी होतं.

दिवसभर पाटिलाच्या शेतात राबून अंग आंबलेले होतं, पाटलीण बाईनं दिलेली प्लॅस्टिकची पिशवी त्यांनी उघडली व एका ताटात ओतली. डाळ आंबलेली होती जरा, पण त्याला काहीच फरक पडत नव्हता. धोतराच्या शेंड्या ला बांधलेले पुडी त्याने उघडली व ताटात असलेल्या डाळ-भातात कालवली, जरा देखील उसंत न घेता त्याने बकाबका ते सगळे गळ्याखाली उतरवलं व मडक्यातून पाणी तोंडला लावले. दिवस संपला होता कधीच. तसा तो रोज सतरंजी घेऊन बाहेरच झोपायचा पण आज त्यांची इच्छा होत नव्हती. नाईलाजाने तो तेथेच आडवा झाला. डोळ्यात झोप नव्हती, उगाच डोळ्यात पाणी आल्या सारखं वाटल्यावर त्यानं डोळे हलकेच मिटले.

*****

” अरे, शिरप्या, तो म्हाद्या कुठे दिसला कारं तुला ? दोन दिसं झाले आला नाही कामावर” पाटलानं सुपारी कातरत, समोर बैलाला चारा घालत असलेल्या शिरप्याला विचारले. “नाय पाटिल, गेली दोन दिवस गुत्त्यात पण नाही दिसला” पाटला समोर गुत्त्याचे नाव घेतलं म्हणून शिरपा जीभ चावत म्हणला. ” जा त्याला , शोध बघू जरा, गाडी पाठवायची आहे, तालुक्याला. बैलाला लै जोर पडतं हाय, गाडी खेचायला. चाकात काय तरी गडबड हाय वाटतं” पाटलानं कातरलेली सुपारी तोंडात टाकत शिरप्याला हुकुम सोडला.

शिरपा, भर उन्हांत म्हाद्यामुळे पायपीट करायला लागल्यामुळे शिरपा तसा वैतागलाच होता. म्हादबाच्या नावानं शिव्या घालत, राम्या न्हाव्यापासून ते गावच्या वेसावर असलेल्या भिकार्‍यापर्यंत सगळ्यांना विचारुन झाले, पण गेल्या दोन दिवसात म्हाद्याला कोणी बघितलाच नव्हता. आता ह्याला कुठं शोधायचा म्हणून शिरपा गावाच्या देवळाबाहेर उभा होता, तोच त्यांची नजर, माळरानावर असलेल्या म्हादबांच्या झोपडी कडे गेली. तरातरा चालत शिरपा त्या झोपडी कडे निघाला. झोपडीपासून १०० हात लांब असल्यापासूनच त्यानं म्हादबाच्या नावाने शंख करायला सुरुवात केली.

रणरणत्या उन्हामध्ये, मातीचे चटके खात वैतागलेल्या शिरपानं सरळ सगळा जोर झोपडी च्या दारावर लावला, आधीच कुजके असलेले ते झोपडीचे दार निखळून, धाडकन आत पडले. शिरपां जरा चपापला , पण आतून काहीच आवाज नाही आला. म्हादबा आत नाही असे वाटून तो मागे वळला होता. पण म्हादबांला गावात येऊन दोन वरीस होत आली होती, पण आज पर्यंत त्यानं कोणालाच झोपडीत येऊ दिलं नव्हतं, काय हाय काय ह्यांच्या झोपडीत असा विचार करून शिरपा मागे वळला व पहिल्यांदा त्यानं म्हादबांच्या झोपडीत पाय ठेवला. पण जे समोर दिसले ते पाहून त्यांची बोबडीच वळली व जिवाच्या आकांताने तो गावाकडे धावत निघाला.

****
क्रमशः

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: