राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

Monthly Archives: डिसेंबर 2010

सुकलेले ते पिंपळ पान..

एकदा मागं वळून दिवस
बदलावे असे वाटत आहे,
आपले नियम थोडे आता
मोडावे असे वाटत आहे..

कधीच न पाहिलेला तो
निंबोणी च्या झाडामागे लपलेल्या
चंद्राला जरा जवळून पहावे असे
मनात आज सारखं येत आहे,

या सिमेंटच्या गुहेतून थोडं
बाहेर डोकवावं असे वाट आहे..
स्मृतीभंश होतो कसा हे जरा
मी शोधावे म्हणत आहे..

एक नवी सूरवात करावी
नववर्षाची असे वाटत आहे…
मी संकल्प रोज करतो
आता ते पाळावे असे वाटत आहे

उगाच का मी तडफडावं
जुन्या आठवणीत जगावे
आठवणीतल्या गावाला थोडे
आता विसरावे असे वाटत आहे.

वहीतील ती कोमजलेली फुले
नावाच्या रेघोट्या व ते शब्द खेळ
सुकलेले ते पिंपळ पान…जाळी झालेले
आता टाकून द्यावे असे वाटत आहे

जगण्याची रित समजता जमजता
वेडा मी, आता खूप थकलो आहे
आठवणीचे ओझे खूप झाले..
आता निवांत व्हावे असे वाटत आहे..

Advertisements

आज…

अनोळखी कसे वागायचे
ते शिकलो आज…

आश्रुनां कसं थोपवावं
ते उमजले आज..

सत्य व आभास म्हणजे काय
ते कळले आज..

चेहरा निर्विकार ठेवणं
ते शिकलो आज…

मना ला जरा समजवावे
ते पहिल्यांदा घडले आज…

सरळ जमिनी वर पाय ठेवणं
ते जमले आज..

बस्स ! आता हे शेवटचं लिहणे… प्रेमावरचं
हृदय-कळ म्हणजे काय
ते समजले आज..

चिता..

निर्जन स्थानी, एका नदीकाठी..
दिसतील ती लाकडे, काट्याकुट्या, पालापाचोळा, जे मिळेल ते.. घेऊन…
त्याने एक चिता रचली, प्रेतच म्हणावे, त्याला. शरीर चितेवर ठेऊन, त्याने शांत चित्ताने हातातील अग्नीने चिता पेटवली.
रानात सर्वत्र, ताजे मांस जळल्याचा वास भरुन राहीला, जीव घुसमटत होता, किती वेळ झाला काय माहीत.
धडाधडा चिता जळत होती, एकदम अलिप्त नजरेने त्याने मागे वळून, एकदा पाहीले व निश्चयाने पाऊले टाकत तो पुढे निघाला.
ते सगळे मागे सोडून तो वाट फुटेल त्या दिशेने चालू लागला.

मागे कसला तरी आवाज झाला, कवटी फुटली वाटतं, असे मनातल्या मनात पुटपुटत, तो क्षणभर थबकला, पण मनात आलेले विचार तसेच झटकून तो आपल्याच तंद्रीत चालू लागला.

सुखाने मरणार देखील नाही तो !
हे शब्द कानावर आले व तो सैरभैर झाला. कानावर हात ठेऊन तो, वेड्या सारखा जिकडे दिशा दिसेल तिकडे पळू लागला, जिवाच्या आकांताने.
पहिल्यांदाच शब्द कानावर आले होते असे नाही, कित्येक दिवस व रात्र हे शब्द त्याचा पाठलाग करत होते. धावता धावता अंगात त्राण उरले नाही, व तो जमिनीवर कोसळला. चेहेऱ्यावर अनामिक भिती दाटून आली होती, त्याच्या.
काय करावे हे न सुचल्यामुळे तो तसाच जमिनीवर पडून राहीला.

आपण मुद्दाम फसवावे म्हणून काहीच केले नाही, त्याला आठवलं.
नियतीमुळे हे घडतं गेले, नाहीतर काही कारण नसताना, दरमजल करत आपण भटकत येथेच का आलो ? तीच आपल्याला का भेटावी ? भेटली तर भेटली आपले सर्वस्व तीने आपल्यालाच का द्यावे ? ओळख ना पाळखं, पाहीले देखील नव्हते तीने त्या आधी कधी, त्याने स्वतःलाच अनेक प्रश्न विचारले. तिच्यामध्ये गुंतलो, ही चूक नव्हती. ठरवून देखील केलं नव्हतं, आपल्याला माहीत तरी होतं का, कोण आहे ,कशी आहे ? त्याने हलकेच नकारार्थी मान हलवली.

काहीतरी कुठेतरी चुकले नक्कीच होते, काय चुकले बरे ? त्याने स्वतःलाच हा प्रश्न अनेकवेळा विचारला असेल.
बाजूच्या झुडपाचा आधार घेत तो उभा राहीला, व पुन्हा चालू लागला.
विचारांच्या तंद्रीत, कुठे जावे कुठे नाही याचे भान नसलेला, तो फक्त पाऊले टाकली की आपण पुढे जातो, अश्या पद्धतीने चालत होता.
उजव्या बाजूला वाहत असलेल्या नदीकडे त्यांची नजर गेली व तो तेथेच थबकला.
वाहतं पाणी स्वच्छ असतं म्हणे, पाणी वाहणे थांबले की त्यांचे डबके होते, हा विचार मनामध्ये येताच तो तेथेच मटकन खाली बसला.
वाहतं पाणी.. शब्द बदललेले की तीचे ते, वाक्य पुर्ण होऊ शकते.. तो पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा देऊ लागला.

कित्येक तास तो तसाच बसून होता, उन्हं, वारा, पाऊस.. काही फरक नाही. तसाच वेड्या सारखा !
वाहतं पाणी.. शब्द म्हणून किती सोपे आहेत नाही, पण व्यवहारात ? त्यांची कोरडी नजर इकडे तिकडे फिरली, जसे स्वतःच्याच नजरे पासून तो पळत होता. तिला पहावे म्हणून केलेल्या दिशाहीन प्रवासाबरोबर त्याने वाहत्या पाण्याची तुलना करण्याचा निष्फळ प्रयत्न केला…
समोर, काही फुटावर ती असताना देखील, आपण तिला सांगू शकलो शकलो नाही, की मी आहे, मी.
फक्त डोळे भरून पाहून घेतले, व माघारी फिरलो… तिच्या चेहऱ्यावरचे ते हसू आपल्यामुळे तरी मावळू नये म्हणून.
तिचीच इच्छा नव्हती, तेथे मी जरी समोर गेलो असतो तरी काय वेगळे घडले असते ? कडू आठवणींमुळे त्यांचे आधीच निस्तेज झालेले डोळे, भरुन आले की काय असे क्षणभर त्याला वाटले. पण नाही, समोर भरलेली नदी असून देखील, डोळ्यात एक पाण्याचा थेंब नव्हता.

अंधारून आले वाटते, त्याने स्वतःलाच प्रश्न करावा अश्या पद्धतीने इकडे तिकडे पाहीले.
तीने खरोखर ते शब्द उच्चारले असतील का ? हा प्रश्न मनात येतातच तो गडबडून गेला.
दुसऱ्याच्या सांगण्यावर आपण तेव्हा विश्वास ठेऊन होतो, हे आठवल्यावर तो पुन्हा निरर्थक चुळबुळू करू लागला.
का आपण असे वागलो ? हा प्रश्न सारखा सारखा मनामध्ये त्याच्या थैमान घालू लागला..
किती मुर्ख मी ? सगळे जग आपले गुपित लपवत होते तेव्हा, व मी सार्‍या जगाला ओरडून सांगत होतो… आपले गुपित.
निराशेने त्याने मान झटकली व पुन्हा विचारामध्ये गुंतून गेला. मी असे का केले ?

विश्वास ज्याच्यावर ठेवावा, त्यानेच धोका द्यावा हे त्याच्या बरोबर अनेकदा घडले, तरी देखील पुन्हा पुन्हा तीच चूक.
घडले ते घडले, असे म्हणतं आपण कितीवेळा नवे जग उभे केले ? त्याने बोटावर मोजण्यास सुरुवात केली.
पण मध्येच थबकला, या मोजण्याचा निष्फळ प्रयत्नांना त्याने एखादा विचार झटकावून टाकावा तसे झटकून दिले.
चुकांचे परिमार्जन करावयास हवे… पण आपली चूक काय ? हा प्रश्न समोर आल्यावर तो जे नेहमी करतो ते करण्यासाठी उठून उभा राहीला..

निर्जन स्थानी, एका नदीकाठी..
दिसतील ती लाकडे, काट्याकुट्या, पालापाचोळा, जे मिळेल ते.. घेऊन…
त्याने एक चिता रचली, प्रेतच म्हणावे, त्याला. स्वतःचे शरीर चितेवर ठेऊन, त्याने शांत चित्ताने आपल्याच हातातील अग्नीने चिता पेटवली.
मुक्त व्हायचे आहे म्हणतो.. कित्येक वेळा केलेली क्रिया आता त्याने पुन्हा केली… अगदी अश्वथामा प्रमाणे.. वेड्याला कोण सांगणार, आत्मा या सगळ्याच्या पलीकडे असतो ते ? त्याला असे कोणी अग्नीत जाळू शकते ? वेडाच आहे तो…

मागे, धडाधडा चिता जळत होती, एकदम अलिप्त नजरेने त्याने मागे वळून, एकदा पाहीले व निश्चयाने पाऊले टाकत तो पुढे निघाला.
ते सगळे मागे सोडून तो वाट फुटेल त्या दिशेने चालू लागला… पुन्हा एक नवीन चिता सजवण्यासाठी असेल..

लेखन स्पर्धा २०१०

नमस्कार,

गेली काही वर्षे मराठी आंतरजालाची उत्तरोत्तर प्रगती होते आहे. मराठी ब्लॉग्स, मीमराठी.नेट सारख्या मराठी सोशल नेटवर्किंग संस्थळावर अनेक मराठी जालकर नियमित लेखन करीत असतात. अनेक उत्तम ब्लॉग लेखक, लेखक मराठी आंतरजालावर प्रसिद्ध झाले आहे. परंतु दुर्दैवाने बरेचदा याबाबतची माहिती आवश्यक त्या वेगाने सर्व जालकरांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे विविध सोशल नेटवर्किंग संस्थळांवर लिहिणारे जालकर अनेक उत्तम ब्लॉग्सबाबत अनभिज्ञ असतात, तर बहुतेक ब्लॉगर हे अशा सोशल नेटवर्किंग संस्थळावर फारसे दखलपात्र लेखन न होता ते निव्वळ वेळ घालवण्याचे कट्टे असतात असे समजतात. अशीच काहीशी अनास्था विविध सोशल नेटवर्किंग संस्थळांवरील सदस्यांची एकमेकांबद्दल असू शकते. या सार्‍या भिंती पाडून विविध संकेतस्थळावरील लेखकांचे, ब्लॉगर्सचे लेखन मराठी आंतरजालावर अधिक दूरवर पोचवावे अशी इच्छा मी-मराठी.नेट च्या अनेक सदस्यांनी व्यक्त केली होती. यातून मी मराठीनेच पुढाकार का घेऊ नये असा विचार पुढे आला. याचा पहिला टप्पा म्हणून मीमराठी.नेट व मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे आंतरजालीय ललित-लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासंबंधीचा तपशील इथे देण्यात आलेला आहे. सर्व मराठी जाणकारांनी यात आवर्जून भाग घ्यावा आणि या जालावरील लेखनाच्या अभिसरणामध्ये आपला वाटा उचलावा ही विनंती.

सदर स्पर्धेसाठी प्रसिद्ध लेखक/समीक्षक श्री. शंकर सारडा, प्रसिद्ध पत्रकार श्री. प्रवीण टोकेकर, व श्री रामदास यांनी परीक्षक म्हणून काम करण्यास अनुमती दिली आहे. मी मराठी तर्फे आणि स्पर्धेच्या संयोजकांतर्फे या सर्वांचे आभार.

स्पर्धेचे स्वरूप थोडक्यात या प्रमाणे:

* स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वत:चे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे. लेखन मुद्रण माध्यमात पूर्वप्रकाशित झालेले नसावे. लेखन जालावर पूर्वप्रकाशित असल्यास या पूर्वी प्रकाशित झालेल्या संस्थळाचा दुवा द्यावा.

* एक लेखक एकाहून अधिक प्रवेशिका सादर करू शकतो.

* लेखनाचा प्रकार हा ढोबळमानाने ललित लेखन असा ठेवण्यात आला आहे. यात स्वतंत्र कथा, लेख, प्रवासवर्णने, लेखक/पुस्तक/चित्रपट/नाटक इ.चा परिचय, या सार्या प्रकारचे लेखन अंतर्भूत होईल. यात अ-साहित्यिक वा विशिष्ट अभ्यास विषयाशी संबंधित तांत्रिक लिखाण स्वीकारले जाणार नाही. लेखन गद्य असावे स्वरूपात असणे आवश्यक आहे. तरीही स्पर्धेत कविता/कवि याबद्दलचे परिचय/आस्वाद लेखन स्वीकारले जाईल.

* स्पर्धा १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०१० या कालावधीसाठी खुली राहील. त्यानंतर अंदाजे १ फेब्रुवारी २०११ च्या सुमारास अंतिम निकाल जाहीर केला जाईल, जो मीमराठी.नेट या संकेतस्थळावर तसेच संबंधित संस्थांच्या मुद्रित वितरणातून जाहीर केला जाईल.

* स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना प्रसिद्ध प्रकाशक ’मेहता पब्लिशिंग हाऊस’ तर्फे पारितोषिके देण्यात येतील जी पुस्तक स्वरूपात असणार आहे. या तिघांव्यतिरिक्त अंतिम फेरीत पोचलेल्या सर्वांना मीमराठी.नेट तर्फे प्रशस्तिपत्रक देण्यात येईल.

प्रवेशिका सादर करण्याची पद्धत.

१. लेखन स्पर्धा खुला असण्याच्या काळात मीमराठी.नेट इथे प्रकाशित करावे लागेल.

२. यासाठी लेखकाला मीमराठी.नेट चे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. १८ वर्षे पूर्ण केलेल्या कोणाही व्यक्तीला मीमराठी.नेट चे सभासदत्व विनामूल्य होता येते.

३. स्पर्धेच्या कालावधीत आपण प्रकाशित केलेले साहित्य स्पर्धेतील प्रवेशिका म्हणून गणले जावे याचा व्यक्तिगत निरोप (स्पर्धा-)व्यवस्थापक या आयडीला पाठवणे आवश्यक आहे. अन्यथा प्रकाशित साहित्य हे प्रवेशिका म्हणून गृहित धरले जाणार नाही. या निरोपातच लेखकाचे मूळ नाव (स्पर्धेच्या निकालात मूळ नावाचीच घोषणा केली जाईल.), संपर्क क्र., विरोप पत्ता (ई-मेल), ब्लॉग पत्ता (असल्यास) व भारतातील पत्ता (पारितोषिके पाठवण्यासाठी) देणे बंधनकारक आहे.

४. सदर स्पर्धा मीमराठी.नेट चे मालक व संचालक व त्यांच्या कुटुंबियाव्यतिरिक्त इतर सर्वांसाठी खुली आहे.

५. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही, ती सर्वांसाठी खुली आहे.

६ एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क मीमराठी.नेट चे संचालक मंडळ राखून ठेवत आहे.

७. अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखेआधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क मीमराठी.नेट राखून ठेवत आहे.

८. निकालाबाबत मीमराठी.नेट च्या संचालक मंडळाने नियुक्त केलेले पर्यवेक्षक व परीक्षक यांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास मीमराठी.नेट व स्पर्धा-संयोजक बांधील नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

______

स्पर्धेसाठी लेखन करण्यासाठी मदत :

डाव्या बाजूला असलेल्या मार्गदर्शकातून लेखन करा येथे टिचकी मारा.
व तेथे असलेला “लेखन स्पर्धा २०१०” ह्या विभागामध्ये आपले लेखन प्रकाशित करा.

 

 

Mimarathi.net

Mimarathi.net