राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

इतर भाषेतील रत्ने – भाग -२

कात्तिक बदी अमावस थी और दिन था खास दीवाळी का
आंख्यां कै म्हां आंसू आ-गे घर देख्या जिब हाळी का ।

कितै बणैं थी खीर, कितै हलवे की खुशबू ऊठ रही
हाळी की बहू एक कूण मैं खड़ी बाजरा कूट रही ।
हाळी नै ली खाट बिछा, वा पैत्यां कानी तैं टूट रही
भर कै हुक्का बैठ गया वो, चिलम तळे तैं फूट रही ॥

चाकी धोरै जर लाग्या डंडूक पड़्या एक फाहळी का
आंख्यां कै म्हां आंसू आ-गे घर देख्या जिब हाळी का ॥

सारे पड़ौसी बाळकां खातिर खील-खेलणे ल्यावैं थे
दो बाळक बैठे हाळी के उनकी ओड़ लखावैं थे ।
बची रात की जळी खीचड़ी घोळ सीत मैं खावैं थे
मगन हुए दो कुत्ते बैठे साहमी कान हलावैं थे ॥

एक बखोरा तीन कटोरे, काम नहीं था थाळी का
आंख्यां कै म्हां आंसू आ-गे घर देख्या जिब हाळी का ॥

दोनूं बाळक खील-खेलणां का करकै विश्वास गये
मां धोरै बिल पेश करया, वे ले-कै पूरी आस गये ।
मां बोली बाप के जी नै रोवो, जिसके जाए नास गए
फिर माता की बाणी सुण वे झट बाबू कै पास गए ।

तुरत ऊठ-कै बाहर लिकड़ ग्या पति गौहाने आळी का
आंख्यां कै मांह आंसू आ-गे घर देख्या जब हाळी का ॥

ऊठ उड़े तैं बणिये कै गया, बिन दामां सौदा ना थ्याया
भूखी हालत देख जाट की, हुक्का तक बी ना प्याया !
देख चढी करड़ाई सिर पै, दुखिया का मन घबराया
छोड गाम नै चल्या गया वो, फेर बाहवड़ कै ना आया ।

कहै नरसिंह थारा बाग उजड़-ग्या भेद चल्या ना माळी का ।
आंख्यां कै मांह आंसू आ-गे घर देख्या जब हाळी का ॥

रचनाकार – कवि नरसिंह

शेतकऱ्यांचा प्रश्न आपल्या येथेच आहे असे नाही, तर समृद्ध अश्या समजल्या जाणार्‍या पंजाब व हरियानामध्ये देखील बिकट अवस्था आहे शेतकऱ्याची. व प्रत्येक भाषेत, प्रत्येक मातीत असा एखादा जन्म घेतोच जो आपल्या रचनेतून अश्या प्रश्नांना वाचा फोडतो. हरयानामध्ये आजही संयुक्त कुटुंबं पद्धती असते व गावच्या गाव नात्यातील असते, ५२ गावाचा कुणबा ,पंचक्रोशी असते, जे वयोवृद्ध आहेत त्यांच्या संध्याकाळी तरुणाई जेव्हा शेकोटीला बसते तेव्हा, कोणीतरी एखाद्या ९० पार बाबाला एखादा किस्सा सांगायला सांगतो.. व गप्पांचा फड रंगतो. प्रत्येक गावात हीच पद्धत ! मग कधी कधी लोक गीतांचा जोर चालतो व एकापेक्षा एक लोक गीते कानावर येऊ लागतात व आपण कधी तल्लीन होऊन जातो ते समजत देखील नाही.

काल रात्री थंडीचा जोर वाढल्यामुळे जरा चहा पिण्यासाठी म्हणून बाहेर पडलो तर थोडेफार असेच दृष्य एकदम हरयाणाच्या विरुद्ध दिशेला बंगलोर मध्ये दिसले. तेव्हाच मनात आलं हरयाणाचे जरा वेगळे रुप दाखवू या गेली ३-४ वर्ष हरयाना बातम्या मधून बदनाम होत आहे, लोकांच्या मनात हरियानाची प्रतिमा जरा वेगळीच होत आहे. पण तेथील माणूस देखील मातीशी जुळलेला आहे, जो प्रश्न आपल्या येथे तोच प्रश्न तिकडे देखील आहे. जमिनी विकून त्यांची पोरं आपली स्वप्ने पुर्ण करण्याच्या नादी लागली आहेत.. !

तर हा हरयाणा व हरयाणाची बोलीभाषा म्हणजे हरयाणवी !
जाट व यादवांची भाषा ! पहिल्यांदा जेव्हा कानावर ही भाषा पडेल तर तुम्ही नक्कीच दचकणार ! एकदम खडी व थेट बोलली जाणारी ही भाषा. पण या भाषेत देखील माधुर्य कमी नाही. खरं तर एखादी आनंदी कविता घेऊन अथवा रचना घेऊन हे लिहता आले असते.. पण मला ही कविता दुःखाची झालर जरी असतील तरी आवडली. भाषेची ताकत दाखवण्यासाठी योग्य वाटली म्हणून घेतली आहे.


कात्तिक बदी अमावस थी और दिन था खास दीवाळी का
आंख्यां कै म्हां आंसू आ-गे घर देख्या जिब हाळी का ।

“कात्तिक बदी अमावस थी और दिन था खास दीवाळी का” दिवाळीचे जेवढे महत्त्व आपल्याकडे आहे तेवढेच हरियाणामध्ये, आपल्याकडे गणपती, दसरा इतर सण तर आहेत साजरे करायला पण त्यांना दिवाळी म्हणजे खरोखरची दिवाळी मोजून एक-दोन सण असलेला हा समाज दिवाळी एकदम उत्साहात साजरी करतो, आता पहिल्या ओळीचा अर्थ लागला असेल. वर खास हा शब्द आहे, तो मुख्य या अर्थाने आहे.

“आंख्यां कै म्हां आंसू आ-गे घर देख्या जिब हाळी का ।”

दिवाळीच्या दिवशी पाहुण्याच्या घरी जाण्याची व त्यांना मिठाई व कपडेलत्ते भेट म्हणून देण्याची पद्धत तीकडे आहे व कोणी टाळू शकत नाही व जर टाळली तर बाकीचे मुद्दाम सर्वांना गोळा करून जास्त भेट देतात कारण त्यांना कळते की अरे पैश्याची अडचण असेल, नाहीतर रितीरिवाज टाळणार नाही कोणी. याच उद्देशाने जेव्हा तो पाहुण्याच्या घरी जातो तेव्हा मात्र मनात चलबिचल चालू होते, समोरच्याची अवस्था पाहून.


कितै बणैं थी खीर, कितै हलवे की खुशबू ऊठ रही
हाळी की बहू एक कूण मैं खड़ी बाजरा कूट रही ।
हाळी नै ली खाट बिछा, वा पैत्यां कानी तैं टूट रही
भर कै हुक्का बैठ गया वो, चिलम तळे तैं फूट रही ॥

पुर्ण गावात, खीर व हलवा प्रत्येक घरात तयार होत आहे, त्यांचा सुगंध सगळीकडेच पसरला आहे, सगळी कडे दिवाळीची तयारी जोरात चालू आहे, सगळे खुशीत आहेत पण, पाहुण्यांची ( हाळीच शब्द वापरू आपण) सून एका कोपर्‍यात बाजरा ( जोंधळे) कुटत उभी आहे. हाळीने (पाहुण्याने) मी आलेला पाहून लाकडी खाट ( दोर्‍यांची, जी आपल्या कडून कधीच हद्दपार झाली आहे) पुढे केली पण तो विसरला होता, ती थोडी तुटलेली आहे… पाहुण्याला हुक्का भरून देणे हा रिवाज, त्याने हुक्का भरून दिला, पण समोर हुक्का असून देखील तो फुटलेली चिलीम ओढत राहिला.

आता या ओळी काय सांगत आहेत ? अवस्था एवढी वाईट झालेली आहे की बाजरा ( जोंधळ्यांची) भाकरी करण्यासाठी सून स्वतः बाजरा कुटत उभी आहे. ( हरयाणाचे प्रमुख खाद्य गव्हाची भाकरी हे आहे, जसे आपल्या येथे गरिबीची उपमा देण्यासाठी, पीठ घातलेले पाणी दुध म्हणून पिलं असे सांगतात तसेच) बाजरा खावा लागत आहे, साधे गहू देखील शेतात पिकलेले नाही अथवा सगळे पिकं वाया गेलेले आहे. हरयाणवी शेतकरी , कोणाच्या घरी जाऊन गहू कधीच मागणार नाही. खळी च्या खळी प्रत्येक घरात भरून ठेवलेल्या असतात, पण याच्याकडे खळी तील गहू देखील संपले आहे.

घरात येणाऱ्या जाणाऱ्याला बसण्यासाठी खुर्च्या नसतात, तर खाट असतात २ फुट बाय ४-५ फुट चे. तो प्रत्येक घरात असतो व त्यावर पाहूणे बसणार म्हणून तो नेहमी व्यवस्थित ठेवला जातो. पण तो तुटला आहे हे तो विसरला आहे अथवा त्याला माहितीच नाही अथवा ते दुरुस्त करून घ्यावे एवढे ही सामर्थ्य नाही राहिले आहे.

पाहुण्याला हुक्का देणे ही त्याला सन्मान देणे हे तर आहेच पण त्यातून मी हुक्का देऊ शकतो तेवढा मी संपन्न आहे हे सांगणे देखील आहे. पण येथे जरा अवघड परिस्थिती झाली आहे, हुक्का आहे पण तो पाहुण्याला पुरले एवढाच आहे ( हुक्क्याचा तंबाखू) म्हणून समोरच्याला हुक्का देऊन तो चिलीम ओढत बसतो आहे, पण ती चिलीम खालून फुटलेली आहे, म्हणजे एक नवीन चिलीम घेणे देखील सध्या अशक्य आहे. फुटकी चिलीम ओढणे सोडा, जर हलकाच टवका जरी चिलीम चा उडाला असे तर हरयाणवी ती फेकून नवीन घेतो, इज्जत अब्रू जपणे हे त्याच्या साठी सर्वात महत्त्वाचे आहे. पण हाळीची (पाहूण्याची) अवस्था खूपच बिकट आहे.


चाकी धोरै जर लाग्या डंडूक पड़्या एक फाहळी का
आंख्यां कै म्हां आंसू आ-गे घर देख्या जिब हाळी का ॥

सगळ्यात वाईट त्याला तेव्हा वाटते की अरे हे काय चाकी जवळ ( चाकी = चुली जवळ) एक दांडुकं पडलं आहे व तो दांडकं फाहळी चे आहे.. ( फाहळी = फावडा = शेत जमीन खोदण्यासाठी वापरले जाणारे). म्हणजे शेती वरून त्याचा विश्वास उडत चला आहे, आपण राब राब राबून देखील आपल्याला त्यांचे काही फळ मिळेल असे त्याला वाटत नाही आहे, म्हणून नैराश्यामुळे त्याने फावडा मोडला असेल व आता त्या फावड्याचा दांडा सरपण म्हणून चुली जवळ पडलेले आहे.


सारे पड़ौसी बाळकां खातिर खील-खेलणे ल्यावैं थे
दो बाळक बैठे हाळी के उनकी ओड़ लखावैं थे ।
बची रात की जळी खीचड़ी घोळ सीत मैं खावैं थे
मगन हुए दो कुत्ते बैठे साहमी कान हलावैं थे ॥

बाहेर दिवाळी आहे, आजूबाजूची मुले खेळ खेळत आहेत, फटाके फोडत आहेत पण यांची मुले फक्त पाहत उभी आहेत, हिरमुसलेली आहेत. काल रात्री राहिलेला भात व सीत ( ताक ?) मिसळून खात आहेत व आम्हाला ही खायला मिळेल अशी आशा घेऊन दोन कुत्री येथे बसलेली आहेत. आपल्या मुलांना देण्यास अन्न नाही आहे.. कुत्र्याला कोठून देणार ?


एक बखोरा तीन कटोरे, काम नहीं था थाळी का
आंख्यां कै म्हां आंसू आ-गे घर देख्या जिब हाळी का ॥

एक बखोरा ( एक खोलगट भांडे) आणि तीन वाट्या, ताटाची गरज नाही आहे, कारण ताटाची गरज तेव्हा लागणार जेव्हा भाकरी असेल, भाजी असेल. जर तेच अन्न उपलब्ध नाही आहे तर ताट घेऊन बसण्यात काय अर्थ आहे ? मुलाबा़ळांची जेवणाची देखील आबाळ चालू आहे. त्यांची अवस्था अशी झालेली आहे की, गरिबी लपवावी हे देखील आता त्याला साध्य नाही आहे.

दोनूं बाळक खील-खेलणां का करकै विश्वास गये
मां धोरै बिल पेश करया, वे ले-कै पूरी आस गये ।
मां बोली बाप के जी नै रोवो, जिसके जाए नास गए
फिर माता की बाणी सुण वे झट बाबू कै पास गए ।

आसपासच्या मुले साजरी करत असलेली दिवाळी पाहून शेवटी त्यांच्या मुलांना रहावले नाही व आम्हाला ही हवे असा हट्ट धरण्यासाठी आई जवळ गेले. पण आधीच त्रासलेली आई, त्यांना काय उत्तर देणार ? शेवटी ती म्हणते आपल्या वडिलाकडे जावा, त्याच्या समोर रडा.(मां बोली बाप के जी नै रोवो, = माझा जीव घाऊ नका, आपल्या बापाची खा) हे सगळे वाईट घडत आहे, सगळे नासले आहे, जेथे हे गेले. यांच्यामुळेच हे घडले. दोषारोपण चालू झाले आहे, घरात ठिणगी पडलेली आहे. भांडणे होत आहेत हे आपल्या फक्त या चार शब्दातून कळते…. कारण नवर्‍यासमोर ब्र देखील न उच्चारणे ही मुलींसाठी सामाजिक शिकवण तेथे आहे, पण आता ती स्त्री देखील वैतागली आहे, त्रासलेली आहे. अगतिकतेतून काहीही बोलत आहे.


तुरत ऊठ-कै बाहर लिकड़ ग्या पति गौहाने आळी का
आंख्यां कै मांह आंसू आ-गे घर देख्या जब हाळी का ॥

बायकोचे बोलणे एकल्यावर व मुले आपल्याकडे येत आहेत, आता ते कपडे, फटाके मागणार, हे समजल्या समजल्या तो उठून गल्लीच्या कोपर्‍याकडे गेला. त्याला सुचत नाही आहे, मुलांच्या प्रश्नांना काय उत्तरे देऊ, त्यांचा सामना कसा करू. खिश्यात दमडी नाही आहे कशी साजरी करणार दिवाळी व मुलंची इच्छा तरी किती मारायची ? नैराष्य ! प्रत्येक क्षण अवघड होत चलला आहे.

ऊठ उड़े तैं बणिये कै गया, बिन दामां सौदा ना थ्याया
भूखी हालत देख जाट की, हुक्का तक बी ना प्याया !
देख चढी करड़ाई सिर पै, दुखिया का मन घबराया
छोड गाम नै चल्या गया वो, फेर बाहवड़ कै ना आया ।

गल्लीच्या कोपर्‍यावर असलेल्या वाण्याच्या दुकानात तो गेला पण वाण्याने पण छिडकारले, आधीची उधारी बाकी असताना कलफ माणसाला कोण उधारी देणार ? या जाटाचा हाल बघून हुक्का पण प्यावा असे वाटत नाही आहे, मन भरून आले आहे.
आपली अशी अवस्था पाहून तो आधीच दुखी असलेला घाबरला आहे, आपली इज्जत , अब्रु जाणार या भितीने चलबिचल झाला आहे, अचानक निर्णय घेतला व तेथूनच गाव सोडून, कि जग सोडून ? निघून गेला ते कधीच परत न येण्यासाठी. कधीच परत फिरकला नाही घराकडे. भरलेले घर, एका दिवाळीच्या रात्री श्मशान झाले. आपल्या दोन लहानग्यांना सोडून, परिवाराला सोडून तो निघून गेला.


कहै नरसिंह थारा बाग उजड़-ग्या भेद चल्या ना माळी का ।
आंख्यां कै मांह आंसू आ-गे घर देख्या जब हाळी का ॥

कवी देवाला म्हणातो आहे, अरे तु बसवलेले एक घर बरबाद झाले, मातीत मिसळले, पण तुझा खेळ काय समजला नाही, तु माळी असताना तुझ्या बागेची अशी अवस्था का झाली ? तुझ्या मनातला खेळ काही समजला नाही.

एक शेतकरी जेव्हा आत्महत्येचे पाऊल उचलतो, तेव्हा काय मानसिक अवस्था असते कसे कोणी समजू शकेल ? शेतीच्या खर्चाचे गणित फक्त एका ऋतुमुळे देखील बिघडू शकते पण ज्यांची घरेच शेतीवर चालतात, त्यांना एकदा गणित चूकले, फाडा पानं, दुसरे चालू करू असा पर्याय नसतो. असे काही वाचले ले की जिवाची तगमग होते, वाटतं की अशा आत्महत्या जर होत राहतील तर कोण पुढे शेती करायला धजावेल ?

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: