राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

तिन्हीसांजेस करता केवढी किलबील दु:खांनो

कित्येक महिने झाले तिच्याशी बोलून, ती चा तो अबोला कधी सुटलाच नाही. कारणे माहीत नाहीत की काय चूकलं ते माहिती आहे. काहीतरी कुठेतरी कसे तरी बिनसलं एवढं नक्की. तीला जे खटकले असेल व मला जे खटकले नसेल हे सापेक्ष नाही आहे, म्हणून माहिती नाही आह शब्द, पण किती आनंदात होतो तिच्या बरोबर, दूर का असे ना ती पण क्षणोक्षणी जवळ होती. सुख दुखः सगळे ती च्या नजरेत जरी नसले तरी ती ला माहीत असायचे. अखंड बडबड, पुन्हा पुन्हा प्रश्न, भविष्याची चिंता, इतिहासाची काळजी. ह्यात दिवस कसे जात होते कोण जाणे.. थोडं सुख मिळत आहे असे वाटू पर्यंत कोणी ना कोणी कसा ही आ वासून उभा राही समोर. टाळता येत नसे म्हणून तर अशी अवस्था.


सुखे संचारबंदी लावती गाफील दु:खांनो
असे बाहेर डोकावू नका आतील दु:खांनो

असे नेहमी म्हणावे असे वाटायचे पण, सुख: कमजोर पडायचे व दुःख नेहमीच शक्तिशाली. किती शक्तिशाली ? असलेल्या नसलेल्या गोष्टी देखील समोरच्याला खर्‍या वाटाव्यात अश्या गोष्टी ज्या नकळत हातातून घडत गेल्या त्याचं समोरचा सत्य समजत गेला, बरं त्यांना चुका म्हणावे तरी का ? ना स्वार्थ होता ना वासना, ना धोका होता ना काही हेवा. पण मी जे जे करत गेलो ते समोरच्या साठी चुकीचे ठरत गेले. सुखांनी किती ही आपला जोर लावला तरी मी हरत गेलो, पटावर खेळ हारणे एक वेळ सोपं आहे, युद्ध भूमीवर अनंत जखमा झेलणे सोपं आहे. पण असं धगधगतं जीवन जगणं खरोखर सोपं आहे ?


किती लांबेल यंदाचा अबोला कल्पना नाही
तुम्हाला पाहिजे तर व्हा तिला सामील दु:खांनो

जग नेहमी मला सांगत असतं की अरे युद्धात व प्रेमात सर्वकाही क्षम्य असते, पण सत्य सांगण्याचा अट्टहास कितीवेळा महागात पडला ह्यांची मोजदाद नाही. हरणे काय असते हे माहीत असून ही पुन्हा पुन्हा प्रयत्न केले, माझी अशी अवस्था झाली की एक छोटेसे राज्य, ज्यांची सीमारेषा कोणालाच माहिती नाही व बलाढ्य अश्या पांडव अथवा कौरव सत्तेविरुद्ध नेहमी उभा ठाकतो, मागे सैन्य देखील आहे की नाही ह्यांची तमा न बाळगता.

हा अबोला नक्कीच कधीतरी संपेल, आज नाही तरी उद्या, जीवनाच्या उतार वयात, जेव्हा दात साक्षीला नसतील अथवा ही चिंता व जगण्याची आस नसताना .. कधीतरी ! आज ती नाही म्हणते, मन मोडत असेल दररोज सकाळी स्वतःचे , जसे मी स्वतःला बजावतो, तसे. अबोलीचं फुलं जरी दिसले तरी किती ही आवडत असू दे मला, तरी दुर्लक्ष करतोच ना मी ? ती ही करत असेल, निळा रंग चुकून ही वापरत नसेल, ना माझी आठवण येईल अशी एखादी गोष्ट करत असेल, एवढंच कश्याला स्वतःच्या गालावर चूकून ही खळी पडू नये म्हणून कसोशीने प्रयत्न करत असेल. नक्कीच. कारण जेवढा मी ओळखतो तिला ती हे नक्कीच करत असेल.


कुणी नाही इथे आता, सुटा मोकाट कोठेही
निघाला पापणीचा तांबडा कंदील दु:खांनो

आकाशामध्ये भरकटलेला पतंग पाहिला की नेहमी मला माझीच आठवण येते, कोणीतरी भेटेल जो मला समजवून घेईल शेवटी, जो हा तुटलेला मांजा हाती धरेल थोडा, कष्ट होतील, नक्कीच होती, मांज्याची धार थोडी तेज आहे, काय करू ? ह्या जगण्याने शिकवलं आहे, बाबा रे तुला तुझा पतंग उडता ठेवायचा आहे ना तर मांजा तेज ठेव, कोण कोठून येईल व कापून जाईल हे समजणार देखील नाही रे, कमजोर पतंग कोठे तरी खांबावर नाही तर कुठल्यातरी अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीवर अडकलेले सापडतात, फाटके तुटके, ज्यांचे अस्तित्व कधीच नाहीसे झालेले असते असे.


सुखे छाटून थोडीशी पुन्हा येईन माघारी
पतंगासारखी देता जराशी ढील दु:खांनो?

जगण्याची कला कोणी कोणाला शिकवावी लागत नाही, ते प्रेम, ते वात्सल्य, तो राग, तो लोभ सर्वजण मिळून ही कला अनपेक्षितपणे शिकवून जातात. जुनं दुःख गोंजारत बसणे चांगले की वाईट हे माहिती नाही, पण कळत नकळत कधीतरी कधी तरी एखादी खपली निघते व पुन्हा जखम भळभळून वाहू लागते.. नवीन खपली चढू पर्यंत. आनंदात जगणे शिकलो आहे असे वाजवू पर्यंत एखादा घाव वर्मी लागतो, जुन्या आठवणी, तो काळ, पुन्हा पुन्हा समोर येऊ पाहतो. निकराने त्या आठवणींशी लढा देतो, त्यांना हरवणे सोपं नसते, चोहोबाजूंनी त्यांनी घेरलेले असते मग एखादी जोरदार मुसंडी मारुन तो वेढा तोडून त्यातून बाहेर पडावे तोच नवा वेढा दुसऱ्याच कुठल्यातरी रुपाने पुन्हा समोर उभा ठाकतो.


मला वाटेल तेव्हा मी मला मानेन आनंदी
कुठे आहात तुम्हीही मला बांधील दु:खांनो?

इथे एकांत होता त्यामुळे मी हासलो थोडा
जरासे पाहिले वागून मी मिश्कील दु:खांनो

हसण्यानं दुखः विसरण्यास मदत होते म्हणे, हो मी हसतो, स्वतः वर कधीतरी असेच, एकांतात, आता सर्वांसमोर हसण्याची देखील भिती वाटते. ह्या दु:खांचे देखील वागणे थोडे विचित्रच असते नाही, जेव्हा जेव्हा येऊ नका म्हणतो तेव्हा मात्र नक्की येतात. असू दे, आता त्यांच्याबरोबरच आनंदात राहणे जमतं आहे, त्यापेक्षा असे म्हणू की सवय होत आली आहे. काळ्याभोर डोळ्यातून आलेला तो मोती जसा तीने जगापासून अलगद लपवणे शिकले आहे अगदी तसेच. एकदा असेच सह्याद्री भटकंतीमध्ये मी एक झाड पाहिले होते, पाण्याचा एक टिपूर देखील आसपास नाही, व पुर्ण खडकाळ जमीन, पण त्याने तो कातळ फोडून आपली मुळे घट्ट रोवून घेतली होती व एखाद्या विजेत्या सारखा त्या मोकळ्या रान माळावर दिमाखात उभा होता. तो आठवला की परत माझ्यात जिद्द येते मग कुठली दु:ख व कुठल्या आठवणी, नवे जग, नवीन आकाश.. मग त्याला पहिल्या सारखाच कवेत घेण्यासाठी पुन्हा नवी धडपड.


चला… अंधारते आहे… मनामध्ये बसा आता
तिन्हीसांजेस करता केवढी किलबील दु:खांनो

नवा दिवस उगवतो, कामाची सुरूवात होते, त्यात रमून जातो, दुसरे काहीच सूचत नाही तेथे दु:खांसाठी कुठे वेळ ? पण जेव्हा सांजवेळ येते, आसपास कोणीच नसते, मावळता सुर्य आपल्याला एक स्मित देऊन जातो आहे असे वाटत असते तेव्हाच कुठेतरी, मागून पाठीवर थाप पडते, व एकामागोमाग एक अश्या जुन्या आठवणींचा घोळका जमा होत जातो. येतात ते येतात व पुन्हा पुन्हा जखमा उघडया करुन जातात..असं वाटतं हाकलून काढावं एकेकाला, पण नाही जमजले कधीच, पण तरी ही प्रयत्न चालूच असतो. कधी तरी जिंकेन.. नव्हे जिंकायलाच हवे.


तिला कित्येक वर्षांनी पुन्हा भेटायचे आहे
मधे बोलायचे नाही बरे फाजील दु:खांनो?

शिव्यांची देत लाखोली उपाशी मारतो आहे
तरीही नांदता माझ्याघरी सत्शील दु:खांनो?

भेटायचे आहे, तीला. एकदा तरी. घालवलेले दिवस व रात्री यांचा हिशोब नाही मागायचा आहे, का ? हे देखील नाही विचारायचे आहे. फक्त बघायचे आहे, डोळे भरून, व काळजीपूर्वक. हो डोळ्यातून एक थेंब जरी गेला वाहून तर त्याच्या बरोबर मी देखील जाईन वाहून असे शिंपला किनार्‍यावरचा. भावना जपणे व भावना लपवणे या खूप वेगळ्या गोष्टी. जमतात सध्या दोन्ही गोष्टी मला नीट तरी वाटते भिती थोडी, थोडी हुरहुर. समोर आल्यावर बोलायचे काय हा प्रश्न नसून बोलणे सुरू कोठून करायचे हा प्रश्न असेल. मध्ये गेलेला हा अनंत काळ, आ वासून उभा असेल, अनेक प्रश्न व अनेक कारणे असतील, थरथरत असलेले काळीज व चलबील नजर असेल. या सगळ्यातून बाहेर पडून नजरेला नजर मिळवायची आहे. अशक्य आहे, तरी एकदा प्रयत्न करायचा आहे.


कुणी येणार आहे वाटते चुचकारण्यासाठी
अशी का लोचने झाली म्हणे स्वप्नील दु:खांनो?

जगण्यात व स्वप्नात तफावत खूप असते, आपण जे पाहतो ते कधी कधी स्वप्न असते व कधी कधी सत्याला आपण स्वप्न समजतो. दूरवर कोठेतरी मुरलीमनोहरच्या बासरीचा रम्य आवाज येत आहे, की भास होत आहे ? समोर दिसते आहे ती छबी तीचीच दिसत आहे. वेळ आली. ती येत आहे. आता बस्स, थोडेच क्षण. मोजकेच, आता नको त्या कडू आठवणी व नको ते सुकलेले दिवस, हरवलेल्या वाटा पुन्हा दिसत आहेत, रात्र संपली आता, उषःकाल होत आहे.


मनाने ‘बेफिकिर’ व्हा… जन्मतो तो संपतो येथे
पुढे न्या आपली ही पोरकी मैफील दु:खांनो

स्वप्ने दिसतात, स्वप्ने भंगतात, जीवन मात्र चालू राहतं. जुन्या डायरीतील पानं कधी कधी आपसूकच समोर येतात, स्वप्नरंजन सारखाच दुखःरंजन असा देखील एखादा शब्द असावा. कधी कधी ती स्वप्ने पुर्ण होतात, तर कधी कधी अर्धवट डाव मांडला जातो. या स्वप्नांची तर्‍हा एकदम वेगळी, कुठल्या कुठं घेऊन जातात, सुतावरून स्वर्ग गाठणे या वाक्प्रचार समोर उभा करतात. तरी काय झाले, अजून पालवी सुकली नाही, आधाराची जमीन अजून सुटली नाही. पुन्हा सुर्योदयाच्या आधी एखादं स्वप्नं दिसेल.. जगण्यासाठी नवीन उम्मीद दिसेल. मनानं कसं माणसांन “राजे” हवे नाही तर ‘बेफिकिर’ मग जगण्यात ला उन्माद जसा काल होता तसाच असेल. दु:खानों जमवा मैफिल असा सांगण्याचा कैफ असेल, व मैफिलीला सोबत त्या दिवसांची याद असेल. पण नवा दिवस माझा असेल.

( ‘बेफिकिर’ यांची गझल खाली पुर्ण देत आहे, त्याचा दुवा )

सुखे संचारबंदी लावती गाफील दु:खांनो
असे बाहेर डोकावू नका आतील दु:खांनो

किती लांबेल यंदाचा अबोला कल्पना नाही
तुम्हाला पाहिजे तर व्हा तिला सामील दु:खांनो

कुणी नाही इथे आता, सुटा मोकाट कोठेही
निघाला पापणीचा तांबडा कंदील दु:खांनो

सुखे छाटून थोडीशी पुन्हा येईन माघारी
पतंगासारखी देता जराशी ढील दु:खांनो?

मला वाटेल तेव्हा मी मला मानेन आनंदी
कुठे आहात तुम्हीही मला बांधील दु:खांनो?

इथे एकांत होता त्यामुळे मी हासलो थोडा
जरासे पाहिले वागून मी मिश्कील दु:खांनो

चला… अंधारते आहे… मनामध्ये बसा आता
तिन्हीसांजेस करता केवढी किलबील दु:खांनो

तिला कित्येक वर्षांनी पुन्हा भेटायचे आहे
मधे बोलायचे नाही बरे फाजील दु:खांनो?

शिव्यांची देत लाखोली उपाशी मारतो आहे
तरीही नांदता माझ्याघरी सत्शील दु:खांनो?

कुणी येणार आहे वाटते चुचकारण्यासाठी
अशी का लोचने झाली म्हणे स्वप्नील दु:खांनो?

मनाने ‘बेफिकिर’ व्हा… जन्मतो तो संपतो येथे
पुढे न्या आपली ही पोरकी मैफील दु:खांनो

-गझल!

टीप – सूट – काही र्‍हस्व दीर्घ

-‘बेफिकीर’!

( बेफिकीर’ साहेब, गझलेच्या वापराबद्दल जी परवानगी दिलीत त्या बद्दल शत शत आभार, थोडं प्रकाशित करण्यासाठी कालावधी जास्त घेतला, कारण व्यक्तीगत 🙂 त्या बद्दल क्षमा असावी )

http://www.mimarathi.net/node/5798

Advertisements

4 responses to “तिन्हीसांजेस करता केवढी किलबील दु:खांनो

  1. जयश्री एप्रिल 14, 2011 येथे 2:03 pm

    क्या बात है….. !! मस्त !!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: