राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

मामाचं गाव (इसावअज्जा)

“राज्या, परिक्षेत किती मार्क पडले रे.”
मे महिन्याच्या सुटीसाठी बस स्टॅन्डवरुन अजून घरात पाऊल न ठेवलेल्या आपल्या एकुलत्या एक भाच्याला उंबरठ्यावरच प्रश्न विचारणारा मामा आठवला की या मामा लोकांनी माझे लहानपण कसे वाया घालावले याबद्दल दोन-चार आश्रु मी गाळून घेतो. दिड-दोन फुटी आपला भाचा वर्षभर मास्तर व बाईचा मार खाऊन खाऊन वैतागलेला, अभ्यास कर हे एकच पालूपद वर्षभर ज्याच्या मानगुटीवर भुतासारखे बसलेले, तिमाही, सहामाही, वार्षिक च्या सोबत असंख्य तोंडी परीक्षेतून पार पडून थोडा निवांत झालेला असतो तर लगेच घरात टूम निघते.. चला मामाच्या गावी!

मामाच्या गावाला जायचे,
आंब्याच्या झाडावर घर बांधायचे..
विहीरीवर अंघोळीला जायचे,
तेव्हा थोडे पेरु चोरायचे…

असली अफाट कल्पना घेऊन पोहचलेला आपला भाचा पाहिल्या पाहिल्या पहिला प्रश्न काय तर “राज्या, परिक्षेत किती मार्क पडले रे.” अरे कसा आहेस विचार, गाल-गुच्चा घे, मामासाठी काय आणलं आमच्या राज्यानं असे बोबड्या भाषेत विचार! पण नाही “राखुंड्या” मास्तरासारखा पहिला प्रश्न अभ्यास नाही तर मार्काचा… पहिले काही दिवस बोंबलून सांगावे असे वाटत असेल मला की लेको…. तुमच्या कर्नाटकात आमच्या पेक्षा आधी २०-२५ दिवस निकाल लागतो रे.. आम्ही घरी गेल्यावर माझा निकाल कळेल.. पण कोण ऐकून घेईल तर शपथ!

तर गावच्या सुट्टीची सुरवात! त्यात मी नवसाचा.. एकुलता एक मुलगा जवळपास २०-२५ घरात (पाहुण्यांच्यात) कोणाच्या पण घरी गेला की पहिला प्रश्न ठरलेला “राज्या, परिक्षेत किती मार्क पडले रे.” मी घरातून का पळून गेलो या प्रश्नाचे हे उत्तर नसेल ही पण कुठल्या पाहूण्याच्या घरी कधीच न जाण्याचा संकल्प करण्याचे हेच नक्की कारण होते.

या लोकांना काय असुरी आनंद मिळत असावा असले प्रश्न पोरांना विचारून देवाकं ठावूक!
मामाचा वाडा त्यावेळी खूपच मोठा असल्यामुळे व आजोबा वृद्ध असल्यामुळे एप्रिल-मे महिन्यात त्यांना भेटायला व सुट्टीचा आनंद घ्यायला सगळेच आजोळी यायचे, १६-१७ बहिणी (मावस, आत्ते इ. + सक्की एक) व त्यांच्या आया-बाबा आणि अनेक लांबचे पाहुणे एकावेळी त्या वाड्यावर हजर असतं! खाण्यात रेलचेल असे, पहाटे पहाटे पेटलेली चुल, आम्ही सर्व अंगणात झोपल्यावर रात्री कधी तरी चर्र असा आवाज करीत शांत होत असे. पहाटे पहाटे जाग यायची ती आजोबाच्या हाकेने. माझे दुदैव येवढे की एकुलता एक मुलगा असल्यामुळे सकाळचा शंख माझ्या नावानेच होत असे.. आजोबा मुलींना चुकून ही काही बोलत नसतं, हा त्यांना प्रेमाने खाऊ घाल, सगळ्यांना गोळा करून गोष्टी सांग, स्वातंत्र्य लढ्यात बेळगाव आंदोलनात कशी इंग्रजाची पळतीभूई केली व नंतर कसा मार खल्ला या प्रामुख्याने गोष्टी.

मी आपला बापुडा त्या गोष्टी ऐकण्यासाठी तेथे जाऊन बसावे तोच शेतातील काम संपवून आलेला मामा कडाडत असे “राज्या! लेका बायकांच्यात काय बसला आहेस, बायल्या कुठला!, जा गोठ्यात रम्याला मदत कर” झाले सगळ्या मुली फिदीफिदी हसणार व माझा रंग उडणार हे ठरलेले. रडत आईकडे तक्रार घेऊन स्वयंपाक घरात जावे तर कोणीतरी माउशी, मामी, आत्या, काकी म्हणायची “या राज्याला आईविना करमत नाही, यामुळेच बायकांमध्ये लुडबुड करायची सवय.” व तोंडाला पदर लावून गालातल्या गालात हसत. मोठ्याने हसल्या की बाहेरून आजोबांच्या काठीचा आवाज येणार हे नक्की.

बरं या सगळ्याला वैतागून घरातून बाहेर पडण्यासाठी अंगणात यावे तोच लहान मामा “राज्या! घराबाहेर पाय टाकलस तर बघ. तंगडे तोडेन.” बर त्याचे ऐकून गप्प परसबागेकडे जावे तर लगेच सन्नतात्या (लहान आजोबा आमचे) लगेच “राज्या! आकडे नी काल इड, निंद काल तगद् निंन कयागं उडत्यान नोड!” बोंबललं, मायला पुढून घरातून बाहेर पडायचे तर लहान मामा पाय तोडायला तयार व परसबागेत जावे तर ज्याने बाग (बाग कसली, रोजच्या भाज्या लावलेल्या) लावली तो पाय तोडून हातात देण्याची भाषा करतो. काय करावे काय करावे असले प्रश्न चिन्ह चेहर्‍यावर मिरवत मी इकडे तिकडे भटकत असलो तर एखादी ताई-आक्का हमखास म्हणायची..”नोड.. हुंब ईदे इद” (बघ, वेंधळाच आहे हा) असे म्हणून परत फिदीफिदी हसायच्या.

शेवटी मी वैताग वैताग करुन इसावअज्जा च्या रुमकडे वळत असे.
इसावअज्जा= पोहायला शिकवणारे आजोबा, हेच नाव त्यांचे गावभर नाही तर पंचक्रोशीत प्रसिद्ध होते, या आजोबांनी एका आणि एक पोराला/मुलीला पोहायला आलेच पाहिजे असा चंग बांधला होता. हे आजोबांचे कोणीतरी लांबचे नातेवाईक होते, ब्रम्हचारी. पोरांना पोहायला शिकवले तर घरचे गहू-तांदुळ द्यायचे, कोणी फारच उदार असेल कधी कधी पैसे देखील. मला आज देखील ते आठवतात ते त्यांच्या दंतपंगतीहिन हास्यामुळे. त्यांचे नक्की वय किती आहे याची चर्चा रात्री अंगणात घरचे सगळे झाडून जेव्हा झोपायला गोळा होत तेव्हा वडीलधारी मंडळी करत म्हणजे पहा किती वय असेल त्यांचे. अज्जा-इसावअज्जा असे सगळेच म्हणत त्यामुळे त्यांचे नाव काय असावे याची चर्चा आम्हां लहान मंडळीमध्ये होत असे, त्याचे कारण म्हणजे मोठा मामा लहान होता तेव्हा त्याने धाडस करुन त्यांना नाव विचारले होते म्हणे व त्यांनी मामाला उचलून २०-२५ फुट खोल असलेल्या विहरीमध्ये फेकलं होते.. अश्या अनेक दंतकथा त्यांच्या बद्दल होत्या. पण मामाला त्यांनी उचलून विहीरीत फेकले होते हे ऐकून मला खूप आनंद झाला असलाच पाहीजे.

इसावअज्जा व माझे जरा बरं जुळत होते (परवा परवा माझी मोठी मामेबहीण मला सांगत होती, ते जेव्हा आजारी पडले व त्यांचे शेवटचे काही क्षण राहीले होते तेव्हा त्यांनी जुन्याकाळात जमणार्‍या गोतावळ्याची आठवण काढली होती व तु हरवला आहेस हे ऐकून ढसाढसा रडले होते.) इसावअज्जा मला त्याच्याकडे असलेल्या ठेवणीतील गोष्टी दाखवत असे. त्याच्या पत्र्याच्या पेटीत खूप काही अमुल्य असे दडलेले होते, त्या पेटीला एक सोडून दोन दोन कुलपे होती व त्याच्या चाव्या इसावअज्जा नेहमी जानव्यात अडकवून ठेवी. जेव्हा जवळपास कोणी नसेल तेव्हा तो ती पेटी उघडून बसलेला असे. त्या पेटीमध्ये काय आहे याची जेवढी उत्सुकता त्याबालसुलभ वयात मला होती तेवढीच थोरामोठ्यांना देखील होती हे आता-आता कळले. त्यांनी ते विश्व इतरांच्यापासून जरा जास्तच लपवून ठेवले होते.

इसावअज्जा माझ्यावर न जाणे का पण खूप प्रेम करायचा, अनेकवेळा इतरांपासून लपवून खाऊ देण्यापासून, प्रसंगी आजोबांचा रोष अंगावर घेऊन मला शेतात मनसोक्त दंगा घालण्यासाठी घेऊन जात असे. पोहणे शिवण्याच्यावेळी प्रसंगी मुलींना देखील उचलुन विहीरीत फेकणारा हा आजोबा मला मात्र पत्र्याचा (डालड्याचा डब्बा) किंवा लाकडाची मोळ बांधल्याशिवाय पाण्यात पाऊल टाकू देत नसे किंवा त्यांनी मला कधीच आधाराविना पाण्यात जाऊच दिले नाही.
त्यांनी मला पोहायला शिकवले, त्यांनी मला निर्धास्तपणे पाण्याशी खेळणे शिकवले मग ते पाणी, विहरीचे असो, वाहत्या ओढ्याचे किंवा तुडुंब भरलेल्या कृष्णेचे!

क्रमशः

Advertisements

पोस्टमेन इन द माउंटन (Postmen in the mountain)

चित्रपट चित्र

वर्ष :

२००२

गीतकार / संगीतकार :

दिग्दर्शक:

Jianqi Huo

कथाकार / लेखक:

Wu Si

कलाकार:

Hao Chen, Ye Liu, Rujun Ten

परिक्षण :

postmen in the mountains

मी, आई व वडील. कुटुंब व परस्परांचा सहभाग! थोडीफार या चक्रातील कथा असलेला हा चित्रपट. पण त्या ही पेक्षा खूप वेगळा असलेला. कल्पकतेने निसर्गाचा केलेला सुंदर वापर, पात्रांचा सहज व अकृत्रिम वावर हे या चित्रपटाचे शक्तिस्थान आहे व अनेक छोटी मोठी प्रतीके या चित्रपटामध्ये आहेत, ज्याचा कल्पकतेने वापर केला गेला आहे. प्रेमात पडावा असा हा चित्रपट. हिंदी-मराठी चित्रपटामध्ये मुलगा, आई व वडील या व्यक्तीरेखावर आधारित अनेक चित्रपट येऊन गेले. त्यात प्रत्येक वेळी आई-वडिलांचे कष्ट, त्याग व मुलाच्या चुकीच्या किंवा स्वभाव वैगुणांचा प्रचंड वापर असलेल्या कथा याचाच मारा अधिक असायचा. (उदा. अवतार, एकटी इत्यादी) अश्या प्रकारचे चित्रपट पाहून या विषयावर चांगले काही असू शकते असा विश्वास नव्हता. पण मीम सदस्य श्री रमताराम यांनी या चित्रपटाबद्दल सांगितल्यावर हा पाहणे गरजेचे आहे असे वाटू लागले होते. चित्रपट आपल्याला न समजणाऱ्या भाषेत असून देखील तो पहायचा नक्की केला तो सबटायटल्स च्या भरवशावर. कोणताही चित्रपट पाहताना काय पहावे, कसा व कधी पहावे या बद्दल रमताराम, अशोक पाटील व निवांत पोपट सारख्या दिग्गज मंडळींनी अनेकवेळा लेखनातून, प्रत्यक्ष भेटीतून अनेक मुद्दे मांडले होते त्याचा वापर या एक सुरेख चित्रपट पाहताना झाला.

हा चित्रपट काय आहे या पेक्षा हा चित्रपट कसा आहे हे मला लिहायला खूप आवडेल. चित्रपटाच्या नावामध्ये मध्यवर्ती पात्राची आपल्याला कल्पना येते, की एका पोस्टमन च्या जीवनावर हा चित्रपट असावा व ने काही अंशी खरं ही आहे. पण चित्रपट पाहून झाल्यावर जाणवलं की या चित्रपटात पोस्टमन च्या जागी दुसरे कुठलेही काम करणारे पात्र असले तरी चित्रपटातील आशय तेथे लागू झाला असता. पण दिग्दर्शकाने कल्पतेने पोस्टमनचेच पात्र निवडले आहे, ज्यामुळे चित्रपट आपल्या पर्यंत पुर्ण ताकदीने पोहचतो. चित्रपटामध्ये मध्यवर्ती पात्रांना नावे नाही आहेत. त्यांचा ते आपापसात उल्लेख आई, वडील व मुलगा असेच करतात हा एक मुद्दा हा या चित्रपटाला इतरांपासून थोडे वेगळे करतो. चित्रपट जवळ जवळ स्थिर कॅमेराने चित्रित केला असल्यामुळे नेहमी इतर चित्रपट पाहताना जाणवणारा पात्रांचा वेग येथे जाणवत नाही पण त्याची भरपाई दिग्दर्शकाने संवादातून व नातेसंबंधातील छोट्या छोट्या गोष्टी अधोरेखित करत केली आहे. त्यामुळे हा चित्रपट संथ वाटत नाही. एखाद्याला हा संथ वाटू शकतो, त्यावेळी तो संथ का आहे हे कथेसोबत जोडून पाहिले तर योग्य अर्थ सापडेल, ज्याचा उल्लेख मी पुढे करणार आहे. या चित्रपटातील पात्रे आपल्याला अनोळखी आहेत. त्यांचे त्यांच्या देशात असलेले ग्लॅमर, अभिनयातील वैभव आपल्याला माहिती नाही पण निवडलेले प्रत्येक पात्र अभिनयाने सशक्त आहे याची जाणीव आपल्याला होत राहते.

हा चित्रपट आपल्याला सांगण्याची जबाबदारी कथेमध्ये मुलाकडे आहे, त्यामुळे मुलाच्या नजरेतून हा चित्रपट पहावा लागतो. एक मुलगा, ज्याचे वडील पोस्टमन आहेत व त्यांना पर्वत रांगेतील गावामध्ये पत्रे वाटण्याची जबाबदारी आहे व वर्षानूवर्षे ते आपली जबाबदारी अत्यंत मनापासून करत आले आहेत पण वय व गुढगे दुःखीमुळे त्यांना नोकरी सोडावी लागते व त्यांच्या जागी त्यांच्या तरुण मुलाची नियुक्ती त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीचे बक्षीस म्हणून झालेली असते. मुलाच्या नोकरीचा पहिला दिवस म्हणजेच चित्रपटाची सुरुवात आहे. चित्रपटामध्ये आई, वडील व मुलगा यांच्या सोबत अजून एक महत्त्वाचे पात्र आहे ज्याची जाणीव आपल्याला चित्रपट सुरू झाल्यावर होत नाही पण शेवटी शेवटी झालेला बदल पाहिल्यावर होते, ते पात्र म्हणजे पोस्टमनने पाळलेले कुत्रे. कुत्र्याला वडिलांच्या सोबत प्रवास करण्याची सवय अनेक वर्षापासून असल्यामुळे त्याला त्यांचा लळा लागलेला असतो, तो मुलाबरोबर प्रवासाला जाण्यास तयार होत नाही म्हणून शेवटी वडील त्याला सोबत म्हणून जाण्यास निघतात जेणे करून मुलाला रस्ता देखील दाखवता येईल व कुत्र्याला त्याची सवय देखील होईल. येथून सुरू होतो जुन्या पिढीचा नवीन पिढी सोबत संवाद. चित्रपटाच्या सुरवातीला आपल्याला लक्षात येतं की मुलगा व आई हे नाते, मुलगा व वडील या नात्यापेक्षा घट आहे.याचे कारण ही सुरवातीच्या संवादातून आपल्याला जाणवतं. वडीलांना पर्वतरांगेवरील गावांच्या मध्ये पायी चालत जाऊन पत्रे पोहोचवण्याचे काम असल्यामुळे ते घरातून बाहेर पडले की महिनोंमहिने बाहेरच असतात व परत घरी आल्यावर त्यांच्यासाठी नवीन पत्रे वाटण्याचे काम तयार असे. त्यामुळे घरातील व्यक्तींना हवा तो वेळ कधी त्यांना देता आलेला नसतो. आपण नसताना घरी काय काय अडचणी आल्या, मुलाने, बायकोने कसे दिवस काढले या बाबत तो खूपच अभिन्न असतो. अश्या परिस्थिती नोकरी सोडल्यावर पहिल्यांदा ते आपल्या मुला सोबत प्रवास करणार असतात. त्या दोघांच्या संवादातून ही कथा पुढे सरकत जाते. सुरवातीला रुक्ष वाटणारे वडील, थोडा उद्धट वाटणारा मुलगा व त्यांच्यात असलेली संवादाची कमतरता दाखवण्यासाठी दिग्दर्शकाने एका पुलाचा निवड केली आहे. Postmen in the mountains .तरा-तरा मुलगा पुढे चालत आहे व त्याच्या मागून वडील, कुत्रा कधी पुढे तर कधी मागे. या निःशब्द प्रवासाची कोंडी फुटते ती एका चढावर मुलगा पुढे जात असतो, पाठीवर असलेले वजन, चढ यामुळे थोडा संथ झाल्या सारखा वाटतो व वडील कुत्र्याला उद्देशून म्हणतात अरे, जरा हळू. हा तरुण पहिल्यांदाच येतो आहे. मुलगा तेथेच प्रतिउत्तर देतो की काळजी करू नका. माझे मी पाहून घेईन. छोट्या छोट्या वाक्यातून दोन व्यक्ती मध्ये असलेल्या संवादाची कमतरता स्पष्ट करण्यात दिग्दर्शक यशस्वी होत जातो व आपण या चित्रपटात गुंतु लागतो. सुरवातीला मी लिहले आहे की हा चित्रपट संथ वाटू शकतो, हा संथ वाटतो कारण जर पर्वतरांगेच्या लोकांचे जीवन हे एक प्रकारे स्थिर असते व माझ्या नजरेत दिसलेला दुसरा मुद्दा म्हणजे त्या वडिलांची नोकरी संपलेली आहे, चालणे, प्रवास त्यांच्यासाठी का होईना थांबलेला आहे व त्यांच्या नजरेतून पाहताना हा संथपणा त्याना जाणवतं आहे व तोच त्यांच्या सोबत आपल्याला देखील जाणवतो आहे.

जसा जसा प्रवास पुढे चालत राहतो, त्यांचा संवाद खुलू लागतो, तसं तसे मुलाला वडीलांच्याबद्दल व वडीलांना मुलाबद्दल अनेक गोष्टी नव्याने कळू लागतात. वडलांनी फक्त पत्रे वाटली नसून, त्यांनी अनेक माणसे विविध गावात जोडून ठेवलेली आहेत, लोकांचा विश्वास संपादित केला आहे व त्यांना एक वेगळाच मान या छोट्या छोट्या गावात आहे हे मुलाला कळतं जाते तर आपल्या मागे मुलाने व त्याच्या आईने कसे दिवस काढले हे त्यांना कळत जाते. छोट्या छोट्या गोष्टीतून अनेक बाबी समोर येत जातात व चित्रपट पुढे सरकत राहतो.

postmen

 

क्रमशः

(Mimarathi.net)

स्क्रीन काळा मोठ्ठा गोळा

पुस्तक: स्क्रीन काळा मोठ्ठा गोळा
लेखक: नचिकेत गद्रे
प्रकाशक: सुकृत प्रकाशन

कधी कधी समोरच्या कपाट उभी असलेली पुस्तकाकडे मी नजरेला नजर देऊन पाहूच शकत नाही, साल्ला! वेळ कमी पडतो आहे की आळशी झालो आहे ? खूप दिवस झाले एक पुर्ण पुस्तक वाचून काढले नाही आहे याची खंत गेली दोन-चार दिवस सारखी सारखी जाणवत होती. म्हणून इकडे तिकडे चाळताना, काय वाचावे हे शोधताना अचानक नचिकेतचे “स्क्रीन काळा मोठ्ठा गोळा” हे पुस्तक हाती पडले.

लेखक आपल्या ओळखीचा असला तर दोन पैकी एक गोष्ट होते… आधी दोन गोष्टी कुठल्या तर आपल्या ओळखीचा लेखक, मित्र त्याचे पुस्तक म्हणून झपाट्याने आपण ते वाचून काढतो अथवा फक्त आणि फक्त निवांत वेळ देता येईल तेव्हाच वाचू म्हणून मस्ट रिडचा टॅग लावून बाजूला ठेऊन देतो.. निवांत वेळ मिळण्याची आशा करत.. नचिकेतच्या पुस्तकाबद्दल असेच झाले.. टँग लावला! नचिकेतला भेटलो आहे, एकदा-दोनदा… फोनवर नेहमीच बोलणे. त्याच्या ब्लॉग माझ्या आवडत्या ब्लॉग लिस्टमध्ये आहेच. शक्यतो हीच कारणे असावीत की पुस्तक असेच समोर “मस्ट रीड”चे टॅगचे ओझे संभाळत कपाटात उभे होते!

काल अचानक शोधत असलेला निवांतपणा एकदाचा हाती लागला व “स्क्रीन काळा मोठ्ठा गोळा” वाचायला हाती घेतले. एकून ११२ पानाचं पुस्तक!
“प.पू. गूगलबाबा या माझ्या गुरूंच्या चरणी अर्पण” ही अर्पण पत्रिका पाहिली व हलकेच हसू ओठांवर पसरले.. म्हणालो नेट अ‍ॅडिक्टेड आहे साला हा तर.. !

एकून ३१ लेख आहेत. शाळेतील गमती जमती पासून आसपासच्या जगावर भाष्य करणारे लेखन असो की स्वतःच स्वतःचे चिमटे काढणारे लेख असो. एकून पुस्तक फक्कड जमले आहे. अनेक कोपरखळ्या व चिमटे काढत “ज्ञान” देणारं पुस्तक. “ज्ञान” म्हणजे ते पुस्तकी ज्ञान नाही, सरळ साध्या जगण्यात आनंद मिळवण्याचे “ज्ञान”. प्रत्येक लेख वेगळा असल्याने माझ्यासारख्या पुस्तक कोठून ही खायला सुरवात करणार्‍या लोकांसाठी एकदम सुयोग्य असे आहे. नचिकेतची लेखन शैली म्हणजे वाचकासमोर शब्दाने दृष्य निर्माण करणारी शैली.

“स्क्रीन काळा मोठ्ठा गोळा” हे नाव नेमकं काय विचित्र नाव आहे, असाच प्रश्न माझ्या समोर उभा राहिला होता पण इनमीन २५ ओळीत संपणारा हा लेख. एक आज्जी आजोबा, आपल्या नातवाला पाहण्यासाठी म्हणून सायबर कॅफेत बसले असताना त्यांची होणारी घालमेल व स्क्रीन विन्डोचा स्क्रिन सेव्हर आल्यावर आज्जीची नातू न दिसल्यामुळे होणारी केविलवाणी अवस्था वाचून मन अस्वस्थ होतं.

आठ नंबरच्या पानावर असलेला “जिन्यातला उभा बाबा..” अवाढव्य देहामध्ये तीन-चार वर्षाचं चिमुरडं पोरं ही आहे हे दाखवून, मुलाला पहिल्यांदा शाळेत सोडताना बाबाच्या मनातील विचार अलगदपणे उलगडून दाखवतो. आणि “खरं तर आजकाल” दोन पिढ्यातील नेहमीचेच अंतर खुसखुशीत शैलीमध्ये आपल्या समोर येतं व आपण अशी वाक्य उच्चारणारी माणसं अवतीभोवती पाहत असल्यामुळे ती नजरे समोर येऊन आपण खळखळून हसून जातो. “घट्ट नळ…” अनेकांच्या रोजच्या सवयीवर भाष्य करणारा लेख, या लेखात भेटणारी अनेक नमुने आपल्या आसपास फिरतच असतात त्यामुळे हसून हसून मुरकुंडी वळते हे नक्की….

जगण्याचं तत्त्वज्ञान एवढं अवघड नसतं जेवढं अवघड आपण ते करून ठेवतो. खूप सरळ व सोपं तत्त्वज्ञान आहे जगण्याचे. फक्त डोळे उघडे ठेऊन पाहिले तर अनेक गुरू दिसतील जे आपल्याला हे तत्त्वज्ञान शिकवत असतील. जगण्यातला आनंद मिळवण्यासाठी फक्त नजर उघडी ठेवावी लागते हे नचिकेतचे “स्क्रीन काळा मोठ्ठा गोळा” पुस्तक नक्कीच शिकवून जातं.

राजमाची

DSC02377.jpg

DSC02318.jpg

DSC02328.jpg

DSC02337.jpg

DSC02346.jpg

DSC02347.jpg

DSC02351.jpg

DSC02357.jpg

DSC02359.jpg

DSC02368.jpg

DSC02373.jpg

किस्सा, मज्जा, मौज – प्रवास!

२००७ डिसेंबर महिना असावा.
मी प्रचंड लहरी माणूस आहे, हे आता जवळपास सगळ्यांना माहीती आहेच. तर अशीच एक लहर त्यावेळी आली की आपण दिल्ली ते चिक्कोडी प्रवास बसने करायचा… व्हाल्वो नाही. साधी सरळ बस! आता लहर आली म्हणजे आलीच. पहाटे पहाटे उठलो व एका सॅक मध्ये कपडे कोंबले, गरजेपुर्ते पैसे, कार्ड इत्यादी जवळ घेतले व बाहेर पडलो. गुडगाववरून जयपुर, जयपुरवरून कोटा व कोट्यातून अहमदाबाद पर्यंत येऊ पर्यंत होता नव्हता तो सगळा जीव मेतकुटीस आला होता.. बस प्रवास त्यात खच्चाखच भरलेल्या बसेस.. एका पायावर उभे राहून कोटा ते अहमदाबाद. तेथून असेच धडपडत मुंबई. कोट्यात फक्त एक रात्र मिळाली होती, ते पण बस नाही म्हणून झोपण्यासाठी. सिमेंटच्या बेंचवर रात्री आपल्याच सॅकची उशी करून थंडगार कुडकुडणारी झोप अनुभवास मिळाली इनमीन तीन तास! प्रवासाचा दुसरा दिवस होता. मुंबईत पोचल्या पोचल्या, दादरवर फ्लायओव्हरच्या खाली येथे कोल्हापुरच्या बसेस लागतात तेथे पोहचलो. डोळे तारवटलेले, ताणून ताणून बघावे लागत होते कुठली बस ते. अश्यात लाल डब्बा एस्टी मिळाली सांगलीची, सरळ चढलो व टिकिट काढू मागे जाऊन झोपावे या इच्छेने पळत जाऊन सीट पकडली.. पण साल्ला! बस अशी होती की एक्सप्रेस हायवे सोडून गावागावातून निघाली होती. घोड्याची रपेट परवडली पण ही बस नको असे म्हणू पर्यंत हाडे आन हाडे खि खि खि करून माझ्यावर हसत होती.. कसा बसा.. अगदी लोटांगण घालत शिरोळ नाक्यावर उतरलो.. तेथून अजून एक बस पकडून कोल्हापुरला आलो… जिवाच्या आकांताने झोप कंट्रोल करून ठेवली होती.. अगदी पिलेल्या अट्टल बेवड्यासारखा दिसत होतो.. तीन दिवस अंघोळ नाही, केसांचे घरटे झालेले, खांद्यावर सॅक अश्या अवतारात डचमळत चिक्कोडी बस गाठली व सरळ मिळेल त्या सीटवर झोकून दिले!!!!

कंडेक्टर आला, शीटी पासून, पाण्यापर्यंत सगळे मारून झाले.. मी आपला ढीम! गाढ झोपेत.. क्या फर्क पडता है! झोप महत्वाची बाकी गेले सगळे उडत!!! पण मायला नशीब लैच बेक्कार होते… थोड्या वेळाने बस कर्नाटक राज्यात जशी घुसली तशीच लगेच साईडला थांबली. टिकिट चेकर बसमध्ये चढले.. सगळ्याच्याकडे टिकिटे होती… व मी डाराडूर !!!!!

सौजन्य सप्ताह नसून देखील त्या बेचार्‍यांनी मला उठवण्याचे अनेक प्रयत्न केले, शेवटी एका क्षणासाठी माझे डोळे उघडले….
समोरचा ” टिकीट”
मी “जाऊ दे यार टिकीट बिकिट… मला झोपु दे यार…”
समोरचा “अहो, फाईन होईल तुम्हाला….”
मी ” होऊ दे रे.. झोपु दे मला…”
समोरचा ” अहो, तीनशे रु. फाईन आहे”
मी “बाजूला पर्स पडली आहे, तीनशे घे, पावती ठेव त्यातच.. पण मला आता झोपू दे यार!!”
परत मी डाराडूर… आख्खी बस्स दंग !!!! हा कुठला नमुना बस मध्ये आला हे बघायला एक एक करून माझ्या सीट पर्यंत येऊन गेले…!

नंतर लास्ट स्टॉप वर कंडेक्टरने मला हे सगळे सांगितले.. व मी त्याला वरील सगळे सांगितले.. ही गोष्ट वेगळी.. आज तो कंडेक्टर आपला मित्र आहे अजून पण wink

Big smile

मैं तैनू फ़िर मिलांगी (अमृता प्रीतम) इतर भाषेतील रत्ने – भाग -३

प्रेम म्हणजे अनुभूती असते, असेच कधी तरी मी व माझा मित्र प्रेम या विषयावर चर्चा करत होतो. नवतारुण्याच्या उंबरठ्यावर आम्ही दोघे ही तेव्हा होतो त्यामुळे भावना महत्त्वाची की संबध महत्त्वाचे यावर चर्चा चालू होती, अचानक त्या चर्चे मध्ये आमचीच एक मैत्रीण सामील झाली. सर्व चर्चा ऐकल्यावर तीने फक्त आपल्या केबीन मधून एक डायरी घेऊन आली व खालील कविता समोर ठेवली, अमृता प्रीतम यांची.

मैं तैनू फ़िर मिलांगी
कित्थे ? किस तरह पता नई
शायद तेरे ताखियल दी चिंगारी बण के
तेरे केनवास ते उतरांगी
जा खोरे तेरे केनवास दे उत्ते
इक रह्स्म्यी लकीर बण के
खामोश तैनू तक्दी रवांगी

जा खोरे सूरज दी लौ बण के
तेरे रंगा विच घुलांगी
जा रंगा दिया बाहवां विच बैठ के
तेरे केनवास नु वलांगी
पता नही किस तरह कित्थे
पर तेनु जरुर मिलांगी

जा खोरे इक चश्मा बनी होवांगी
ते जिवें झर्नियाँ दा पानी उड्दा
मैं पानी दियां बूंदा
तेरे पिंडे ते मलांगी
ते इक ठंडक जेहि बण के
तेरी छाती दे नाल लगांगी

मैं होर कुच्छ नही जानदी
पर इणा जानदी हां
कि वक्त जो वी करेगा
एक जनम मेरे नाल तुरेगा
एह जिस्म मुक्दा है
ता सब कुछ मूक जांदा हैं

पर चेतना दे धागे
कायनती कण हुन्दे ने
मैं ओना कणा नु चुगांगी
ते तेनु फ़िर मिलांगी
(पंजाबी)

(हिंदी) मैं तुझे फ़िर मिलूंगी
कहाँ किस तरह पता नही
शायद तेरी तख्यिल की चिंगारी बन
तेरे केनवास पर उतरुंगी
या तेरे केनवास पर
एक रहस्यमयी लकीर बन
खामोश तुझे देखती रहूंगी

या फ़िर सूरज कि लौ बन कर
तेरे रंगो में घुलती रहूंगी
या रंगो कि बाहों में बैठ कर
तेरे केनवास से लिपट जाउंगी
पता नहीं कहाँ किस तरह
पर तुझे जरुर मिलूंगी

या फ़िर एक चश्मा बनी
जैसे झरने से पानी उड़ता है
मैं पानी की बूंदें
तेरे बदन पर मलूंगी
और एक ठंडक सी बन कर
तेरे सीने से लगूंगी

मैं और कुछ नही जानती
पर इतना जानती हूँ
कि वक्त जो भी करेगा
यह जनम मेरे साथ चलेगा
यह जिस्म खतम होता है
तो सब कुछ खत्म हो जाता है

पर चेतना के धागे
कायनात के कण होते हैं
मैं उन कणों को चुनुंगी
मैं तुझे फ़िर मिलूंगी !!
कविता वाचली, जिवनात पहिल्यांदा अमृता प्रीतमच्या लेखनीची ओळखत त्या वेळी झाली. अद्भुत! मागे मी लिहले होते, प्रत्येक गोष्ट शब्दात व्यक्त करणे जवळ जवळ अशक्य असते, तसे काहीसे घडलं होते जेव्हा ही कविता सर्वात प्रथम वाचली होती तेव्हा. त्यानंतर अनेक पारायणे झाली या कवितेची, प्रत्येक वाचनानंतर खूप काही नवीन सापडतं जातं या कवितेत. व ज्यांना अमृता प्रीतम व त्यांचे जीवन या बद्दल थोडेफार जरी माहिती असेल तर या कवितेचे मर्म समजेल.

काही व्यक्ती जिवन स्वप्नवत जगतात, त्यातील एक म्हणजे अमृता प्रीतम. स्त्रीची व्यथा, दुखः त्यांनी सशक्तपणे आपल्या लेखनीद्वारे व्यक्त केल्या. “मैं तैनू फ़िर मिलांगी” ही फक्त कविता नाही आहे. आपल्या प्रेमीची वाट पाहत असलेल्या प्रियसीच्या अतंरगातील अवस्था आहे , अमृता जेव्हा खूप आजारी होत्या व त्यांना आपल्या अंताची कल्पना आली होती तेव्हा ही कविता त्यांनी इमरोज साठी लिहली होती. अमृतासाठी इमरोज काय होते हे त्यांच्या लेखनीतून वारंवार येत असे, पण ही कविता म्हणजे इमरोज वर त्यांचे असलेल्या उत्कंठप्रेमाची साक्ष आहे.

प्रेम, विरह, मिलन या तीन गोष्टीवर उभी असलेली ही कविता, पाहताना साधी वाटते एकदम सोपी शब्द रचना पण जेव्हा त्यातून अर्थ ध्वनीत होतो, जेव्हा त्या कवितेचा भावार्थ आपल्याला समजतो तेव्हा ही कविता आपल्या मनाच्या कुठल्यातरी नाजुक कोपर्‍याला हलकसे स्पर्श करुन जाते. प्रत्येक ओळ आणि ओळ आपल्या समोर कवियत्रीच्या मनातील भावना चित्रवत उभ्या करतात.

मैं तैनू फ़िर मिलांगी
कित्थे ? किस तरह पता नई
शायद तेरे ताखियल दी चिंगारी बण के
तेरे केनवास ते उतरांगी
जा खोरे तेरे केनवास दे उत्ते
इक रह्स्म्यी लकीर बण के
खामोश तैनू तक्दी रवांगी

मी तुला कशी, कुठे भेटेन माहिती नाही, शक्यतो तुझ्या कुठल्यातरी कलाकृतीतील अनुभुती म्हणून, एखादी मनातील तेजस्वी कल्पना म्हणून, एक कलाकृती म्हणून येईन व तुझ्या केनवास वर अवतरीत होईन. नाहीतर त्याच केनवासवर एक रेघ म्हणून असेल, तुला नकळत तुला पाहत राहीन. काय सहज सुंदर कल्पना आहे, आपल्याच प्रेमीच्या कलाकृतीमध्ये येण्याची आस, ती रचना. वाचताना आता सोपं वाटतं, पण थोडं विचार करून पाहिले की लक्ष्यात येईल ही विरह नक्की आहे, कवयत्रीला तो मान्य देखील आहे पण तीची इच्छा आहे परत येण्याची आपल्या आवडत्या व्यक्तीकडे. शक्य नसेल तर इतर माध्यमातून पण यायचे आहे, त्याच्यात हरवून जायचे आहे.

जा खोरे सूरज दी लौ बण के
तेरे रंगा विच घुलांगी
जा रंगा दिया बाहवां विच बैठ के
तेरे केनवास नु वलांगी
पता नही किस तरह कित्थे
पर तेनु जरुर मिलांगी

उच्च! वरील ओळी शब्दात कश्या व्यक्त कराव्यात, शब्द अपुरे पडत आहेत. कसं ही करून मला तुझ्या सोबतच रहायचे आहे, तुझ्यापासून मी दुर राहू शकत नाही ही भावना व अतुट प्रेमाची उच्चतम अवस्था अश्या प्रकारे सहज भाषेत व्यक्त करणे अमृताच जाने. तिला विश्वास आहे, ती नसली तरी प्रेमीच्या मनातून, त्याच्या अंतरंगातून ती कधीच जाणार नाही म्हणून तीला खात्री आहे, त्याच्या कलाकृती मधून, रंगाच्या छटामधून ती डोकावत राहिल, अनेक वेळा.

जा खोरे इक चश्मा बनी होवांगी
ते जिवें झर्नियाँ दा पानी उड्दा
मैं पानी दियां बूंदा
तेरे पिंडे ते मलांगी
ते इक ठंडक जेहि बण के
तेरी छाती दे नाल लगांगी

वाह क्या बात है, वेगाने उसळणार्‍या, मुक्त होऊ पाहत असलेल्या एका पाण्याचा झरा व्हावे, नाही तर एक ठेंब होऊन तुझ्यात विरून जावे. मिलन! या पेक्षा उत्कृष्ट मिलन दुसरे कुठले असू शकते ? रचनेचा भावार्थ जर पाहिला तर तुझी माझी भेट कशी व्हावी, तर ती अशी असावी की मी तुझ्यात व तु माझ्यात विरून जावे. जी व्यक्ती खरचं वाहत्या पाण्यासारखं जगली असेल, मनसोक्त, आपल्याला हवे तसे तीच एवढी सुंदर रचना उभी करू शकते, ज्यांनी त्यांचे आत्मचरित्र वाचले असेल त्यांना ते लगेच समजेल, आजच्या काळात लिव्ह-ईन-रिलेशन लोकांना पचनी पडत नाही तेथे अमृता प्रितम १९४०-४५ च्या आसपास लिव्ह-ईन-रिलेशन मध्ये राहत होत्या, इमरोज त्यांच्यापेक्षा वयांनी लहान होते. या वरून कल्पना येईल.

मैं होर कुच्छ नही जानदी
पर इणा जानदी हां
कि वक्त जो वी करेगा
एक जनम मेरे नाल तुरेगा
एह जिस्म मुक्दा है
ता सब कुछ मूक जांदा हैं

पर चेतना दे धागे
कायनती कण हुन्दे ने
मैं ओना कणा नु चुगांगी
ते तेनु फ़िर मिलांगी

जीवन-मरण, शरीर-आत्मा काहीच नाही, काळाच्या ओघात सगळे नष्ट होईल, मला माहिती आहे. मला तुझ्या सोबत रहायचे आहे पण हळूहळू सगळे नश्वर होत चालले आहे, मी ही जाईन, अशी वेळी येईल की सर्व संपलेले असेल. अमृता प्रीतम नी ही कविता फक्त लिहलेली नाही आहे तर जगल्या आहेत. प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ त्यांच्या अंतर्मनातून उमटत जात आहे हे वाचणार्‍याला समजतं, म्हणून म्हणालो त्या कविता जगल्या आहेत. अनेकवेळा छोट्या छोट्या गोष्टी आपण विसरत असतो, अचानक नाती तोडतो, एखाद्याचे भावविश्व आपण उद्घवस्त करतो नकळत त्यावेळी आपण जीवनाचे सत्य कुठेतरी विसरतो. त्या म्हणतात “कि वक्त जो भी करेगा” काळाला काय करायचे आहे ते करू दे, हा वेळ तर तो माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. शरीर जाणार आहे, मी जाणार आहे पण कुठे ना कुठेतरी मी तुझ्या सोबत असेन, तुझ्या मनात, तुझ्या हदयात. एक एक अणू-रेणू गोळा करेन, स्वतःला पुन्हा तुझ्या समोर घेऊन येईन, काही होवो तु व मी कधी ना कधी तरी एक नक्कीच होऊ, तेथे बंधन नसेल, तेथे नश्वर वस्तुची गरज नसेल फक्त तु व मी असू आपली भावना, प्रेम असेल. काही हो आपण पुन्हा एकत्र येऊ. प्रबभ इच्छा व उत्कठ प्रेम यांचा संगम म्हणजे ही कविता. आपल्या एक एक अक्षरातून आपल्या समोर उभी राहत जाणारी एक प्रेम कविता.

तुम्हारे इकरार को फूल की तरह नहीं पकड़ा था, अपनी मुट्ठी में भींच लिया था. वह कई बरस मेरी मुट्ठी में खिला रहा. पर मांस की हथेली मांस की होती है, यह मिटटी की तरह हमेशा जवान नहीं रहती. इस पर समय की सलवटें पड़ती हैं और जब यह बंजर होने लगती है तो इसमें उगा हर पत्ता मुरझा जाता है. तुम्हारे इकरार का फूल भी मुरझा गया…………अमृता प्रीतम

अमृताप्रीतम एक लेखिका, कवयत्री म्हणून जेवढ्या भावतात त्यापेक्षा ही जास्त त्यांच्यात असलेली प्रेमिका मला भावते, वादळी व्यक्तीमहत्त्व होते यात शंका नाही, त्यांच्या चांगल्या गोष्टीपेक्षा जास्त चर्चा त्यांच्या साहिर लुधयानवी सोबत असलेल्या संबधाच्या, इमरोज वर करत असलेल्या जिवापाड प्रेमाच्या व त्यांच्या सिगरेट पिण्यापासून त्यांच्या व्यक्तीगत सवयींच्याच झाल्या. पण ज्यांना त्यांची लेखनी भावली ते अमृता प्रितमला कधीच विसरू शकणार नाहीत, अशी एखादीच अमृता प्रीतम शतकामध्ये जन्मते, तिच्या लेखनी ला, तीच्या भावविश्व जपण्याच्या प्रवृत्तीला, स्वप्न पाहण्याची व ती खरी करण्याची जिद्दीला माझा मनापासून सलाम! ज्यांना भेटतं जेव्हा शक्य होतं तेव्हा भेटू शकलो नाही अश्या मोजक्याच व्यक्तीमध्ये अमृता प्रितम येतात याची हुरहुर मनाला कायम लागून राहील.

ईर्शाळ – एक अविस्मरणीय अनुभव

२०११ हे माझ्या जिवनातील अतिशय सुंदर वर्ष आहे असे मला वाटतं आहे, प्रचंड भटकंती सूरू आहे, वर्षाची सुरवातच कर्नाटकातील अनेक प्राचीन भागाचे दर्शन घेण्यात निघून गेले व आता गेली दोन महिने सतत महाराष्ट्रातील दुर्गभ्रमंती चालू आहे. अजून खूप भ्रमंती होतील, होत आहे पण ईर्शाळ गडाची कालची भ्रमंती अविस्मरणीय आहे. आता पर्यंत सोपे सोपे गड खूप केले आहेत पण अवघड विभागातील गड पहिल्यांदाच केला.
दुर्गभ्रमंती म्हणजे नक्की काय, याचा अनुभव ईर्शाळ गडने दिला. लिडरची गरज का असते, वेळेचे नियोजन करणे किती महत्त्वाचे आहे अती उत्साहाला कसे बंधन घालावे व निसर्गाच्या विविध रूपासमोर कसे नतमस्तक व्हावे हे देखील ईर्शाळाच्या या प्रवासानंतर समजले.

पुण्यावरून सकाळी ४.३० ला बाईकवरून निघालो, पहाटेच्या वेळी मोकळा रस्त्ता व १८० सीसीची बाईक हा अफलातुन योग असतो. बाईक किती पळू शकते व आपण तीला किती वेगाने पळवू शकतो हे पाहण्याची योग्य वेळ. कार्ले सोडलावर पावसाने संगत दिली ती थेट शेवट पर्यंत. नखशिखांत भिजून लोणावळा, खोपोली वरून बरोबर ६.२० ला कर्जत मध्ये (११० किमी) प्रवेश केल्यावर आमची मुंबईकर टिम अजून पोहचली नाही हे कळल्यावर मी कर्जत दर्शन करण्यासाठी बाहेर पडलो, मनसोक्त भटकंती करून परतलो तेव्हा बाकीची मंडळी माझी वाट पाहत उभे होते. बरोबर ८ च्या आसपास सर्व मंडळी चौक रेल्वेस्टेशनच्या मागे हजर झाली त्यांना च्या सोबत ओळख इत्यादी करून घेतली व गडाकडे कुच केली.

कर्जत वरून ७ किमी अंतरावर चौक रेल्वेस्टेशनच्या मागून गडावर जाण्यासाठी रस्त्ता आहे, मोरबी धरणाच्या बरोबर हा रस्ता गडाकडे जातो. चौक रेल्वेस्टेशन पासून २-३ किमी अंतरावर पायथा लागतो व तेथून चढाईला सुरवात होते.

http://maps.google.com/maps?f=d&source=s_d&saddr=Pune,+Maharashtra,+India&daddr=Irshalgad,+Maharashtra,+India&hl=en&geocode=FW6ZGgEd6PZmBCkBEUZnLr_COzFD456dv0ONgg%3BFWbtIAEdGnBdBCFMQy4l42RHgg&mra=ls&sll=18.66624,74.099025&sspn=1.327043,1.766052&ie=UTF8&t=h&ll=18.72929,73.526155&spn=0.41778,0.67439&output=embed
View Larger Map

ईर्शाळ गड हा टेहाळणीचा गड आहे , याचा वापर करून त्या काळी खूप मोठ्या भुभागावर नजर ठेवली जात असे.

गडाचे पहिले दर्शन

अवखळ व टारगट मुलांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक मास्तर हवा असतो. मुंबईहून १०० पेक्षा अधिक गड-किल्ले व हिमालयातील अत्यंत अवघड अश्या अनेक मोहिमेचा अनुभव असलेले अनुभवी श्री विजय हे आले होते.

श्री. विजय

या प्रवासामध्ये मुंबई वरून आनंद काळे ( बझ मित्र व मीमवरील आका), सिमा ( मीमवरील सिम्स) तीची मैत्रीण क्षमा, स्वल्पेश, संकेत, वासंती , रुपाली व तीचे पतिदेव, अभिजीत, महेश ( बझ मित्र व अस्सल मावळा) व विजय यांची १२-१५ वर्षांची दोन मुले असे आम्ही एकून १४ जण होतो.

उजव्या बाजूला धरणाच्या पाण्याचा प्रचंड साठा समोर निसर्गरम्य ईर्शाळ व मागे प्रबळगड!

सरळसाधी वाटणारी चढाई कधी अवघड होते ते कळत देखील नाही. चढाईचे दोन टप्पे आहेत खाली धरणाजवळून वर पठाराचा पहिला टप्पा जेथे एक वाडी आहे, लोक तेथे शेती करतात.

पहिले पठार

येथे एक छोटी विश्रांती घेतली, बसून हलके फुलके स्नॅक खल्ले व थोडे फोटो काढून घेतले. थोडा थोडा पडत असलेला पाऊस व आजू बाजूला असलेली हिरवळ या मुळे दम लागत नव्हता, चढाई सोपी वाटतं होती.आनंद काळे व सिमा


क्षमा नावा प्रमाणेच मला क्षमा कर गं wink खूप पिडला आहे ही ला.

पठारावर पसरलेल्या जंगलातून, झाडी झुडपातुन वाट काढत आमची चढाई सूरू होतीच.

“आका, लेका बघून घेईन तुला.. आय गं… अजून किती चढायचे बाकी आहे Big smile ” – मी (मनातल्या मनात)

सुळका! अफाट अफाट अफाट !!! एवढा एकच शब्द सुचत होता याला पाहून. जसे जसे वर येत होतो तस तसे जमीनीचे क्षेत्रफळ कमी कमी होत जात होते. आता मुख्य चढाईला सुरवात होत होती.

ही सुरवात पाहून आपण येथेच खाली बसून रहावे काय हा उच्च विचार माझ्या मनात घोळू लागला. पण आता मुलींच्या समोर माघार कशी घ्यावी winkइज्जत का सवाल ! म्हणून डोळे झाकून चढलो बुवा ! पण मला काय माहिती हीच इज्जत माझी पुर्ण मातीमोल होईल पुढे Oups

अस्सल मावळा, महेश एक अवघड वळणावर विचारात मग्न झालेला…. नक्की पाय कुठे ठेऊ Big smile

स्वल्पेश मागे हो, नाही तर पुर्ण विराम लागेल ! असे सांगावे असे माझ्या मनात खूप आलं होतं पण पहिलीच भेट म्हणून गप्प बसलो बॉ Evil

गडाच्या अस्तित्वाची एकमेव खुण, हे पाण्याचं टाकं !


सिमे, हसू नकोस, माहिती आहे ना कुठे बसली आहेस ते Big smile , ३-४ फुट जागा, उजवीकडे हजारो फुट खोलवर दरी व मध्ये निसर्ग निर्मित ४-५ फुटाची दगडी कमान व परत डावीकडे हजारो फुट खोलवर दरी, वावरण्यासाठी फक्त १० फुट जागा त्यात ५ फुटामध्ये एक मोठा खडक ! हे सांगून कळणार नाही, त्याचा अनुभवच घ्यावा लागेल.

चिंताग्रस्त नाही आहे मी, समोर कोसळणारा पाऊस पाहत होतो त्या दगडी कमानी शेजारी बसून, जाग कीती जमी असेल बघा, एक ही फोटो त्या कमानीचा घेता आला नाही Sad

मी जिवनात पहिल्यांदा नकार दिला ! फक्त ५-६ फुटाची चढाई असताना देखील! उत्तर परत तेच, उजवीकडे दरी वरून धो धो कोसळणारा पाऊस, भन्नाट वेगवान वारा ! पण विजय यांनी हार नाही मानली व आम्हाला मानसिकरित्या बळ देऊन तयार तयार केले, शेवटी चढाई करायला लावलीच.

जेवण !

२००० फुट पेक्षा जास्त उंचीवर असलेली आमची लंचरुम घाबरगुंडी

चढताना उसनी हिंमत घेतली होती, पण उतरणे ? धडकी भरणे म्हणजे काय हे कळाले.. शेवटी रोप वापरावा लागलाच.

७० फुट लांब असलेल्या गुहे कडे जाणारा मार्ग Drunk
ही गुहा येथे आहे हे २००७ मध्ये माहिती झाले पहिल्यांदा, विचार करा मार्ग किती दुर्गम असेल जाण्याचा.


महिला गँग !
अवघड चढाई वर मिळवलेला विजय व त्याचा अविस्मरणीय आनंद चेहर्‍यावरून वाहत आहे सर्वांच्या!

ढासळत असलेला कडा, अजून किती वर्ष हा ईर्शाळ कडा उभा असेल काय माहिती Sad

क्षमा, धक्का देऊ नकोस, शिळा पडेल खाली ती.. असा गोंधळ करतेस म्हणून सिमा तुला कुठे घेऊन येत नाही बघ Laughing out loudजीव अर्धा लटकला आहे पण फोटो काढून घेण्याची हौसफार बॉ काही लोकांना Stare


यशस्वी चढाई व उतराई करून आनंदात एकत्र आलेली टीम!


परतीची वाट! एक छान व सुंदर भ्रमंती झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्‍यावरून ओसांडून वाहत होता.

बाकी सर्व फोटो येथे पाहता येतील.

विसापुर…

पुण्या-मुंबई हायवे वर इंद्रायणी नदीच्या काठी, कार्लाजवळ लोहगड व विसापुर हे दोन दुर्ग उभे आहेत.
११०० मीटरच्या आसपास उंची असलेला विसापुर नेहमीच गुढ व अगम्य वाटतो दुरवरून पाहताना.

लोहगडचा पिकनिक पॉइंट झाला आहेच, त्यामुळे देखील थोडा दुर्गम व चढण्यास अवघड असा विसापुर आपला वाटतो, जे फक्त फिरायचे खायचे व परतायचे या उद्देशाने येतात ते चूकून ही विसापुरकडे पाय वाकडी अजून करत नाही आहेत हे आपल्या सारख्या दुर्गप्रेमींचे भाग्य.

तोरणा एवढा अवघड जरी नसला तरी चढणे तुमचा दम किती आहे हे पाहण्यास पुरेसे आहे.

ढासळलेली तटबंदी आपलं गडावर स्वागत करते, दुर्गप्रेमीनी वाटेत गडावर जाण्यासाठी मार्गदर्शक लावलेले आहेत ( दगडावर रंगाने).
भरपावसात चढाई चालू केल्यावर एक वेगळाच आनंद तुम्हाला अनुभवता येई शकतो वरून वाहत येणारे पाणी व त्याच्यावर चढा-ओढ करत आपण आपली स्वतःसंगेच लढाई लढायची हा एक विस्मरणीय अनुभव ठरू शकतो.

निसर्गाचे भन्नाट रूप येथे पाहता येतं, जर नजर असेल तर जागोजागी विखुरलेले सौदंर्य पाहताना आपल्याला किती अनमोल ठेवा निसर्गाने दिला आहे याचेच अप्रुप वाटतं. वेगवेगळ्या कोनातून वरील गडाच्या तटबंदीचे दर्शन होत असते व आपण कधी एकदा वर पोहचू असे वाटत असते. गडावर पाहण्यासारखं खूप काही आहे, आपल्या अस्तित्वाच्या खुणा जपण्याचा हा गड आटोकाट प्रयत्न करत आहे.

पण आपण एक समाज म्हणून त्या पुरातन वास्तूची किती काळजी घेतो, हे तेथे पसलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, गुटक्याचे पाऊच व कचरा पाहून समजते.

गडावर थोडी स्वच्छता मोहिम राबवून स्वतःचीच मान खाली जाण्यापासून काही अंशी वाचवण्याचा प्रयत्न केला पण हात कमी पडले, कचरा जास्त होता. गडावर असलेल्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ आहेत ही त्यातल्या त्यात आनंदाची बाब.

निसर्गाने दोन्ही हाताने श्रीमंती विसापुरवर उधळली आहे हे जागो जागी नजर फिरवल्यावर दिसून येते.

गडाच्या रक्षणासाठी व कचरा टाकू लोकांना थोडीशी बुध्दी देण्या करता दोन दोन हनुमान आहेत गडावर.. तरी देखील दारूच्या बाटल्या व बीयरच्या बाटल्याचा खच गडावर दिसतोच..

सागरगड…..

काय मिळते रे भटकून ? हा प्रश्न गेली अनेक वर्षे अनेकांच्या कडून माझ्यासाठी आला असेल, पण दर प्रवासाच्या वेळी आमच्या मातोश्री न चुकता हे वाक्य आमच्या तोंडावर फेकतात व आम्ही एक विकट असे हास्य उत्तरा दाखल परत देतो. विनोदाचा भाग सोडला तर खरचं नेहमी हा प्रश्न विचारला जातो. प्रत्येक वेळी काय उत्तर देणार ? घरात बसून गड-किल्लावर चढण्याचा आनंद, तेथे पोहचल्यावर मिळणारे सुख हे शब्दात कसे सांगायचे ?

असो,

जे शब्दात सांगता येत नाही ते येथे थोडं फोटोद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करतो.

मित्रवर्य महेश सावंत याच्यांकडून सभार

आयला मी Big smile

गडाची वाट…

सुप्परमॅन Big smile

दुरवर राहिला…. सागर किनारा……

आपला निसर्ग…..

तरीच…. गाडी हिंदकाळत होती जाताना

माझ्या सारखे तरूण व ररा सारखे म्हातारे.. असा गड’करर्‍याचा हा मेळावा !!

सुझे म्हणत आहेत “मायला, पक्का भटक्याने लैभ भटकवला राव” Big smile

माझे आवडते खाद्य !!!

पोरांचा थरारक खेळ !!!

वाट हरवली रे.. धुक्यात!!

पुण्यातून कसे जावे :

कसे ही जा Big smile
अलिबाग च्या अलिकडे ४/६ किमी खंडाले नावाचे गाव आहे, तेथून रस्ता आहे गडावर जाण्यासाठी.
पहाटे पहाटे निघा व्यवस्थित पोहचाल. ( मित्रांना उठवण्याची जबाबदारी अंगावर घेऊ नका, पोपट होतो )

अवघड आहे का ?

आमच्या संगे ररा, निपो, टिंग्या सारखे म्हातारे कोतारे होते ते धडघाकट परत आले यावरून समजून घ्या Oups

शब्द काही

हरवले असतील शब्द काही
जूने माझेच बोल काही
विसरलो होतो स्वतःला
गुंग राहू दे,  थोडा वेळ मला
पाहतो आहे, आरसा जरा

हरवले असतील शब्द काही
जूने माझेच बोल काही
आशा ना अपेक्षा घडला
कसा योगायोग या क्षणा
शोधतो आहे त्या खाणाखुणा

हरवले असतील शब्द काही
जूने माझेच बोल काही
माझा पाझरतो घाव जूना
माझे दान उलटे सदा पडावे
हा नियतीचा तसा दोष पुराना