राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

Category Archives: हास्य

किस्सा, मज्जा, मौज – प्रवास!

२००७ डिसेंबर महिना असावा.
मी प्रचंड लहरी माणूस आहे, हे आता जवळपास सगळ्यांना माहीती आहेच. तर अशीच एक लहर त्यावेळी आली की आपण दिल्ली ते चिक्कोडी प्रवास बसने करायचा… व्हाल्वो नाही. साधी सरळ बस! आता लहर आली म्हणजे आलीच. पहाटे पहाटे उठलो व एका सॅक मध्ये कपडे कोंबले, गरजेपुर्ते पैसे, कार्ड इत्यादी जवळ घेतले व बाहेर पडलो. गुडगाववरून जयपुर, जयपुरवरून कोटा व कोट्यातून अहमदाबाद पर्यंत येऊ पर्यंत होता नव्हता तो सगळा जीव मेतकुटीस आला होता.. बस प्रवास त्यात खच्चाखच भरलेल्या बसेस.. एका पायावर उभे राहून कोटा ते अहमदाबाद. तेथून असेच धडपडत मुंबई. कोट्यात फक्त एक रात्र मिळाली होती, ते पण बस नाही म्हणून झोपण्यासाठी. सिमेंटच्या बेंचवर रात्री आपल्याच सॅकची उशी करून थंडगार कुडकुडणारी झोप अनुभवास मिळाली इनमीन तीन तास! प्रवासाचा दुसरा दिवस होता. मुंबईत पोचल्या पोचल्या, दादरवर फ्लायओव्हरच्या खाली येथे कोल्हापुरच्या बसेस लागतात तेथे पोहचलो. डोळे तारवटलेले, ताणून ताणून बघावे लागत होते कुठली बस ते. अश्यात लाल डब्बा एस्टी मिळाली सांगलीची, सरळ चढलो व टिकिट काढू मागे जाऊन झोपावे या इच्छेने पळत जाऊन सीट पकडली.. पण साल्ला! बस अशी होती की एक्सप्रेस हायवे सोडून गावागावातून निघाली होती. घोड्याची रपेट परवडली पण ही बस नको असे म्हणू पर्यंत हाडे आन हाडे खि खि खि करून माझ्यावर हसत होती.. कसा बसा.. अगदी लोटांगण घालत शिरोळ नाक्यावर उतरलो.. तेथून अजून एक बस पकडून कोल्हापुरला आलो… जिवाच्या आकांताने झोप कंट्रोल करून ठेवली होती.. अगदी पिलेल्या अट्टल बेवड्यासारखा दिसत होतो.. तीन दिवस अंघोळ नाही, केसांचे घरटे झालेले, खांद्यावर सॅक अश्या अवतारात डचमळत चिक्कोडी बस गाठली व सरळ मिळेल त्या सीटवर झोकून दिले!!!!

कंडेक्टर आला, शीटी पासून, पाण्यापर्यंत सगळे मारून झाले.. मी आपला ढीम! गाढ झोपेत.. क्या फर्क पडता है! झोप महत्वाची बाकी गेले सगळे उडत!!! पण मायला नशीब लैच बेक्कार होते… थोड्या वेळाने बस कर्नाटक राज्यात जशी घुसली तशीच लगेच साईडला थांबली. टिकिट चेकर बसमध्ये चढले.. सगळ्याच्याकडे टिकिटे होती… व मी डाराडूर !!!!!

सौजन्य सप्ताह नसून देखील त्या बेचार्‍यांनी मला उठवण्याचे अनेक प्रयत्न केले, शेवटी एका क्षणासाठी माझे डोळे उघडले….
समोरचा ” टिकीट”
मी “जाऊ दे यार टिकीट बिकिट… मला झोपु दे यार…”
समोरचा “अहो, फाईन होईल तुम्हाला….”
मी ” होऊ दे रे.. झोपु दे मला…”
समोरचा ” अहो, तीनशे रु. फाईन आहे”
मी “बाजूला पर्स पडली आहे, तीनशे घे, पावती ठेव त्यातच.. पण मला आता झोपू दे यार!!”
परत मी डाराडूर… आख्खी बस्स दंग !!!! हा कुठला नमुना बस मध्ये आला हे बघायला एक एक करून माझ्या सीट पर्यंत येऊन गेले…!

नंतर लास्ट स्टॉप वर कंडेक्टरने मला हे सगळे सांगितले.. व मी त्याला वरील सगळे सांगितले.. ही गोष्ट वेगळी.. आज तो कंडेक्टर आपला मित्र आहे अजून पण wink

Big smile

Advertisements

आय हेट गर्ल्स !

आता उडी मारायच्या बेतात असलेल्या सारखा एकटा, गडाच्या एकदम टोकावर असलेल्या कोकण दर्‍याकडे पाय टाकून बसलेला तो दिसला. पाठीमागून जाऊन धप्पकन एक धप्पाटा घालावा तर जैन हत्येचे पातक आपल्या माथी हा विचार करून मी दुरुन आवाज देत मी येत आहे असे सांगत त्याच्या जवळ बसलो. तो जसा बसला होता अगदी त्याच्या विरुद्ध दिशेला पाय करून, हो उगाच बुडत्याला काडीचा आधार म्हणून उडी मारताना माझा हात धरुन ठेवला तर ? तसा मी नेहमीचाच हुशार अगदी आपल्या डॉ. रमताराम सारखा ! गणितातले काही कळत नाही पण आपलं असेच डॉ. रमताराम ! अगदी तसेच. तर कोठे होतो.. तो बसला होता दरी कडे तोंड करून व मी गडाकडे..

मी -“काय रे, का बसला आहेस येथे ?”
तो- “काय नाय, आत्महत्या पाप की पुण्य यांचा ईचार करत हूतो.. तो वर तु आलास…”

म्हणजे मी बरोबर होतो, हे बेटं आत्महत्या करायच्याच विचाराने येथे बसलेले आहे, मी दोन हात मागे सरकलो.

मी -” का ? झाला का परत एकदाचा प्रेम भंग तुझा ? ”
तो- ” मारा टोमणे, मी टाकू का रे उडी ? ”
मी -“टाका, वडे फुकट मिळतील, काय रे तुमच्या जैनाच्यात मेल्यावर वडे करतात काय ?”
तो- “माहीत नाही बॉ, पण मी मेलो तर तुझाच फायदा”
मी -“माझा फायदा कसा रे ?”

फायदा म्हणाल्यावर लगेच अंगातलं रक्त सळसळत माझे लहानपणापासूनच.

तो- “तु लगेच एक चार-पाच लेख टाकून टिआरपी घेणार, माझा फुकाट बळी ! ”

च्या मायला, हलकट आहे बेणं, मरणार पण दुसर्‍याला एक पैश्याचा फायदा होतो आहे म्हणाल्यावर यमाला उद्याची डेट देणार.. जैन रे ! दुसरे काय !

मी -“अरे असे काही नाही रे,एक ब्लॉक टाकेन, नाही तर श्रद्धांजली धागा, बस्स !”
मी- ” बरं ते जाऊ दे काय झालं सांग”
तो- ” प्रेम भंग झाला !”
मी- “ते माहीत आहे रे, नवीन काहीतरी सांग..”
तो- ” तुझ्या सारख्या मित्रामुळेच मी वाया जात आहे..”
मी- ” बरं, सांग बरं काय झाले ते निट..”
तो- ” ती………. खुप…….. लहान स्टोरी आहे.. ती नाही म्हणाली”
मी- ” ग्रेट वाचलास..आता दुसरी शोध !”
तो -” दुसरी दुसरी च्या नादात २२२२ प्रेमभंगाच्या कथा लिहून झाल्या तुझ्या सायटी वर…”
मी- “अरे रे….वाईट वाटले. पण आकडा चुकला का रे ? २२२२ म्हणजे अतीच रे….”
तो- ” साल्या, नाव, गाव, पत्ता, नंबर, ईमेल, जीमेल पासून सगळी हीस्टॄई सांगेन मी आता.. कधी भेटली व कधी सोडून गेली त्या तारखं पासून ते टायमा पर्यंत.. आणि कानाखाली चार बोटं उठली होती की पाच ते बी सांगेन..”

यांचे हे असेच… इमेल व जीमेल म्हणजे एकच असते हे माहीत नाही व इंग्रजी मध्ये हीस्ट्री असे म्हणतात हे देखील माहीत नाही, कोल्हापूर चे पाणी दुसरे काय…आहे नावानं जैन, पण वाढलं शिवाजी पेठेत आणि बुधवार पेठेत… त्यात भर म्हणजे बोलतं येवढ्या वेगानं की महालक्ष्मी एक्सप्रेस देखील स्पिड बघून लाजावी.

मी- ” खरं आहे, तुझी स्मरणशक्ती तशी लहानपणा पासून शार्पच.”
तो- ” तुला खोटं वाटतं… तुला खोटं वाटतं की काय नाय सांग.. आता आता बसल्या बसल्या लिस्ट देतो.. लिही…”

आवशीचा घो.. आता हे चालू झाले की थांबणार नाही. २२२२ मुलीची नावे व पुर्ण इतिहास !

मी- ” थांब थांब! तुझ्यावर आहे रे विश्वास, खरं बोलतो आहेस माहीत आहे… काय झाले सांग”
तो- ” आता कसं ! तरीच म्हटलं तु माझ्यावर नाय इश्वास नाय ठेवणार तर कुणवार…”
मी -” मित्र ना रे तुझा अगदी, तु चड्डी घालत नव्हतास तेव्हा पासूनचा”
तो- ” नको त्या आठवणी काढायचे काम नाय ! काय ? तेव्हा पैका नव्हता”
मी – ” बरं, काय झाले ते सांगतोस का ?”

ह्यांचे म्हणजे आपल्या मीमवरच्या महिला मंडळातील विशाल सदस्यांसारखं ! मुळं मुद्द्यावर कधी यायचेच नाही ! आपले उगाच दळणे दळत राहायचे.

तो -“काय नाय सांगनार, आय हेट गर्ल्स ! बस्स ! सन्यास घेणार म्हणजे घेणार………. ”
मी – “अरे ? काय घेतलीस आज ? देशी का ?”
तो – “ये, तोंड संभाळून हां.. आपण दुपारच्याला फक्त बीयर घेतो.. रात्री मिळेल ती.. आता दुपार हाय ! ”
मी- ” ह्म्म्म. संन्यास घेणार म्हणतोस. मग काही प्लॅन केले का ? गुरु बीरु ? ”
तो- ” केला ना प्लॅन, सन्यास घेणार म्हणजे घेणार… गुरु.. गु………रु कश्याल ? तु आहेस की.. बाकी आय हेट गर्ल्स ! हे फिक्स ! अरे माझी काय इज्जत हाय काय नाय ? २२२२ वेळा प्रेमभंग ? वर्ल्ड रेकॉर्ड किती हाय रे ? ते जाऊ दे.. पण आय हेट गर्ल्स !”

मायला, म्हणजे आजच्या दिवसाचं काय खरं नाही…

हे असे लटकलेलं बेणं.. गळ्यात दिवस रात्र घेऊन फिरावे लागते हो.. काय करु.. !
उत्तर सापडत नाही आहे… एका वर्षात ४-४ प्रेम भंग घेऊन येतं व त्याचं भग्न ह्रदय आम्हाला शिवत बसावे लागते…
ह्यांचे काय करावे ? हा प्रश्न डोक्यात घेऊन… मागे दरी मध्येच स्वतःला झोकून द्यावे असे वाटत आहे…. पण याला ह्या जगत एकटं टाकून जाऊ तरी कसे ?

समजवून घेणे व संसार करणे, एकमेकांना आधार देणे, कोण धडपड असेल तर त्याला सांभाळणे.. एकमेकावर जिवापाड प्रेम करने, दुसऱ्याला व त्याच्या आप्तस्वकीयांना जपणे म्हणजे प्रेम.. व यालाच प्रेम म्हणतात अशी माझी लहानपणापासूनची कल्पना… समजूत पण याला पाहीले की समजते, नाही, प्रेम म्हणजे मी समजतो तसे नाही..

आज काल प्रेम म्हणजे, अधिकार, स्टेटस ! पैसे, शिक्षण.. व सर्वात महत्त्वाचे.. तो / ती माझ्या मुठीत आहे ही भावना… ! मग बळी पडतात असे हे प्रेमभंगी ! खरोखर प्रेमभंगी हा शब्दच बरोबर आहे यांच्यासाठी….. चला मित्रो… यांची उतरली की येईल ताळ्यावर नेहमी सारखा… दुसर्‍या प्रेमभंगाची तयारी करून..

पण याला बघीतले की नक्की म्हणावेसे वाटते आय हेट गर्ल्स !!!!

बुडीत खाते

सत्य घटना :- दिल्लीमध्ये वास्तव असताना घडलेली माझ्या नजरे समोर व काही अंशी मी देखील त्यात सामिल होतो म्हणून.

**

२००६
असाच कुठलातरी महीना मित्राच्या मामाच्या फार्म हाऊसवर बसलो होतो, अशीच संध्याकाळची वेळ.
ढडाम्म्म !!!!! करुन मोठा आवाज झाला, आम्ही पळत बाहेर आलो तर एक ट्रॅक्टर रस्ता सोडून पलिकडील शेतामध्ये मस्तपैकी लोळत उलटा पडला होता. आम्ही धावाधाव करुन ड्राव्हअरला बाहेर काढला व बाकीच्या मजदुरांना.

थोडे पाणी पाजले व कोणाला काही लागले नाही लागले ह्याची चौकशी केली. सर्वजण ठीकठाक होते किरकोळ खरचटलेले सोडले तर. मी जख्मांना लावण्यासाठी काही मलम इत्यादी मिळते का हे पाहण्यासाठी बाईक घेऊन गावाकडे निघून गेलो, मामा एकदम बोलघेवडा लगेच कुठे चालला होता, काय घेऊन चालला आहात काय काम असे अनेक शेकडो प्रश्न विचारुन घेतले होते व मी आल्यावर मला सांगितले की हे मोबाईल टॉवरचे काम करणारे मजदुर आहेत व ह्यांचा हेड आता येत आहेच.

त्यांचा हेड थोड्यावेळाने आपली मारुती ८०० घेऊन लगबगीने आला व चारपाच शिव्या देऊन ड्राव्हर ला आमचे आभार मानले व आम्ही केलेल्या मदतीची परतफेड मी कशी करु असे सारखं सारखं बडबडत बसला. मी कंटाळून उठलो व आता रुम मध्ये जाऊन टीव्ही पाहू लागलो, गेला असेल एक तास दिडतास. मामाने मला आवाज दिला व म्हणाला हे घे गाडीची चावी व पटापट श्रीपादकडे जाऊन बाटल्या घेऊन ये मी फोन केला आहे. समोर तो त्या मजदुरांचा हेड अजून बसलाच होता मजदुर गेले होते. माझे डोके क्षणीक फिरलेच होते पण आपल्या स्कोडाची चावी हातात देऊन त्याने माझा राग शांत केला होता 😉 त्याला माहीत होते मला कसे कामाला पाठवायचे ते 😀

मस्त पैकी तासभर मी स्कोडा एनएच-8ÿÿ वर मनसोक्त उडवून बाटल्या घेऊन परत आलो. मामाने एक नजर स्कोडावर टाकली व लगेच म्हणाला आत बसू या की बाहेर रे ? आता बाटल्या आल्या होता बाहेर कश्यासाठी बसतो मी… 😉 लगेच म्हणालो बाहेरच बसू गवतावर.. ! हळू हळू गप्पा चालू झाल्या वर जसे जसे पॅग मोकळे होऊ लागले तस तसे कळले की बाजूच्या दोनचार गावामध्ये जवळ जवळ ४-५ मोबाईल टॉवर लागणार आहेत व ह्याचा सर्व ठेका ह्या मजदुरांच्या हेडकडे होता व तो मामाला म्हणत होता की तुम्ही हो म्हणा व थोडी जागा बघा मी सगळा सेटअप करुन देतो व सगळे टॉवर तुमच्याच जागेत लावण्याची व्यवस्था करुन देतो. प्रत्येक महिन्याला एका टॉवरचे भाडे २०,०००/- रु. मामाच्या डोळ्यासमोर महिन्याचे ८०,००० ते एक लाख फिरु लागले होते तो पर्यंत. नंबरांची देवाण घेवाण करुन घेतली व तो व्यक्ती निघून गेला व मामा मला म्हणाला ” बघ, दुसर्‍याला मदत केल्यावर असा फायदा होतो. कह गये कबीर…….” मी म्हणालो ” कबीर पैसे देण्यासाठी येणार नाही आहे मामा.”

पण माझे मनावर घेईल तो मामा कसला, लगेच दुसर्‍या दिवशी सेटींग आसपासच्या गावातील मोक्या मोक्याची जागा मिळेल त्या भावाने विकत घेतली ( आधीच काही शे कोटी जमीनी विकूनच आलेला पैसा होता हातात त्यामुळे नो प्रॉब्ल्म 😉 ) सगळी प्रोसेस झाल्यावर एक आठवड्याने त्यांने त्या हेडला (तिवारी त्याचे नाव) फोन करुन परत फॉर्म हाऊसवर बोलवून घेतला व आम्ही शुक्रवार ते सोमवार सकाळ वाजू पर्यंत पडीक मेंबर फॉर्म हाउसचे त्यामुळे मी पण हाजीर होतोच.

प्लान पेपर मध्ये त्यांने थोडे हेरफार केले व एक रिपोर्ट तयार करुन आमच्या समोरच म्हणाला ” उद्या कोणी तरी चला माझ्याबरोबर त्यांच्यासमोरच मी हा लिफाफा माझ्या हेडकडे ( मालकाकडे) देईन व तुम्हाला माझे ऑफिसपण बघता येईल. ” मामा म्हणाला “ठीक आहे आम्ही येऊ उद्या सकाळी तुमच्या बरोबर. ” रात्रभर त्याला फुल्लपार्टी 😉

दुसर्‍या दिवशी कॅनॉट प्लेसच्या एकदम पॉश ऑफिस मध्ये जाऊन आम्ही ते पेपर त्याच्या मालकाला दिले व तेथे आमची चांगलीच सेवा केली गेली.. दोन तीन तासाच्या मिटिंग नंतर आम्हाला एकदम पक्के आश्वासन देऊन पाठवणात आले की सात पैकी चार जागेवर नक्कीच टॉवर आम्ही उभे करु व त्याचे ऑफर लेटर व बाकीच्या गोष्टी २-३ दिवसामध्ये पुर्ण करुन काम चालू केले जाईल.

मामा ने फार्म हाऊसवर फुल्ल्टू मोठी पार्टी दिली सगळ्यांसाठी.

दोन एक दिवसामध्ये तो हेड ४८ पोस्टडेटेड चेक ( २०,०००/- रु.चा एक चेक) घेऊन हजर. व बरोबर लेबर काम चालू करणे आहे ऑफर लेटर हातात दिले ! मामा जाम खुष. गावामध्ये आता इज्जत अजून वाढणार होती ( आता महिना काहीच न करता प्रत्येक महिन्याला ८०,०००/- रु.येणार म्हणजे बाकीचे पब्लिक जळणार व ते जेवढे जळतील तेवढी इज्जतीत वाढ हा सरळ हिशोब 😉 ).

टॉवरचे खड्डे खणून झाले होते, जनरेटरसाठी रुमचा पाया खणून झाला.
हेड मामाकडे आला व म्हणाला “जरा काम थांबवावे लागेल. काही दिवस. त्यांने कंपनीमध्ये आलेल्या एका अडचणीचे नाव घेतले” व म्हणाला “मी बघतो काय करता येईल ते.” मामाने लगेच हरयाणवी स्पेशल हत्यार बाहेर काढले व म्हणाला “बघा काही चिरमिरी देऊन लवकर होते का ते ? इनकम चालू होईल लगेच बाकी काही नाही.” त्याने अशक्य अशी मान हलवली व म्हणाला ” मालकाकडूनच बुच लागले आहे बघतो तरी पण का करता येतं का ते ”

मामाचे डोके फारच फिरले होते… त्याला कारण पण तसेच होते ४८ पोस्टडेटेड चेक हाता होते म्हणजे जवळ जवळ ९,५०,०००/- रु. तो हेड परत आला व म्हणाला ” बघा, सेटिंग होऊ शकते पण खुप महाग पडेल तुम्हाला नाही परवडणार” असे म्हणतातच मामाने त्याचे कॉलर पकडले व एकदम रागाने म्हणाला ” काय म्हणालास, नाही परवडणार..मला नाही परवडणार.. १०० कोस मध्ये माझ्या आजोबाच्या पेक्षा मोठा जमीनदार नव्हता, व आज ही जवळच्या पन्नास गावांना आम्ही विकत घेऊ एवढी ताकत आहे, तोंड संभाळून बोल” तो हेड जवळ जवळ त्याच्या पायातच लोळण घेऊ लागला व म्हणाला ” चुकलो, चुकलो सरकार, माफ करा. मी बोलतो आताच त्यांच्या पार्टनर बरोबर तो ५०% चा मालक आहे तो तयार झाला की दुसरा नाही म्हणूच शकत नाही” मामाने मिशीवर ताव दिला व म्हणाला ” आताच सांग काय ते, नाहीतर मग आम्ही बघू तुमचे काय करायचे ते ”

तासभर तो फोनवर बोलत बोलत पुर्ण फार्म हाऊसला दहा चक्करा मारुन आमच्याकडे येऊ लागला. मी मामाला म्हणालो ” कसा वाटतो हा माणुस ? विश्वास ठेवण्यायोग्य ? ” मामा ताडकन म्हणाला ” धोकेबाज आहे हा, पण मी त्याचा बाप आहे ” मी गप्प बसलो. तो आला व म्हणाला ” दुसरे मालक भेटू म्हणत आहेत व तुम्हालाच फक्त कारण ते परवा इंग्लडला जाणार आहेत त्याच्या आधी भेटू म्हणत आहेत.” मामा ने हो म्हणून सांगितले व दुसर्‍या दिवशीची मिटिंग ठरली.

दुसरा दिवस, दुपारचे दिड एक वाजला होता, मामाचा फोन आला व म्हणाला ” राज, एक काम कर रे, जसा आहेस तसाच जा घरी मी फोन केला आहे आई पॅकेट देईल ते घेऊन तु रेडिसनवर बार मध्ये ये. ” मी म्हणालो ” मामा, गाडी नाही आहे, अरुण घेऊन गेला आहे व मी अजून जेवलो नाही आहे” त्यावर माझा लगेच म्हणाला ” ऑफिसच्या बाहेर स्कोडा आहे, चावी माझ्या बॅगेत आहे व बॅग कुठे असते तुला माहीत आहे. चल पटापट नाटके करु नकोस.” आता काहीच पर्याय नव्हता म्हणून मी उठलो व त्यांच्या बॅगेतून चावी घेतली व सरळ त्यांच्या घरी गेलो. पॅकेट चांगलेच जड होते, पैसे घेतले व गाडी रेडिसनकडे वेगाने घेऊन जाऊ लागलो ते पॅकेट साईडलाच सीटवर पडले होते.

मी पटापट गाडी पार्किंगमध्ये लावली व पॅकेट घेऊन सरळ आत बारकडे वळलो, एकदम कोपर्‍यामध्ये एका कोचावर मामा पसरलेला होता व बाकी तो हेड व एक सुटाबुटातला एक माणूस समोरील कोच मध्ये बसला होता व समोर वाईन, व्हिस्की व बियरचे ग्लास दिसत होते. मी मामाच्या बा़जूला जाऊन बसलो व ते पॅकेट मामाकडे सोपवले. मामा ने विचारले “मोजलेस का ? ” मी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे बघितले. त्यांनी मला पॅकेट परत दिले व म्हणाले ” मला मोजता आले असते तर मी भावाला नाही का बोलवला असता साल्या… ” व खळखळून हसले व मी पण हसलो. लगेच मोजायला घेतले काही वेळ पॅग इत्यादी गोष्टी सोडल्यातर माझे पैसे मोजणे सोडून कुठेच लक्ष नव्हते. ७ लाख होते पुर्ण. त्यांचे बोलणे झाले होते मामाने एका हाताने पॅकेट त्या सुटाबुटातल्या माणसाकडे सोपवले व एका हाताने त्याच्या हातातील पॅकेट घेतले. माझ्या मनात आले की एकदा ते पेपर पहावेत पण मामा पेक्षा जास्त गडबड ते दोघे जाण्यासाठी करत होते, तो व तो हेड दोघे लगबगीने आपला पॅग घेऊन निघून गेले….

” झाले काम राज. मज्जा आली, वेटर स्कॉच घे रे.. ” मामा ओरडला. मला काहीच कळेना… मी म्हणालो ” म्हणजे ? ” मामा म्हणाला ” अरे टॉवरचे काम झाले” मी पण खुष.. मामापण खुष.. वेटर पण खुष… सगळेच खुष. 😉

त्यानंतर काही दिवस मी बाहेर गेलो होतो…
परत आल्यावर शुक्रवारी नेहमी प्रमाणे मामाच्या फॉर्म हाउसवर..
सगळे उदासपणे बीयर पीत होते….
मी गेलो तर मामा माझ्याकडे तावातावाने आला व म्हणाला ” तु ते पॅकेट का नाही बघितलेस ”
मी गोंधळलो मी म्हणालो ” कुठले पॅकेट ??? “
मामा म्हणाला ” अरे ते त्या बिहारीने दिले होते ते… “
मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला तो त्या सुटाबुटातील माणसाबदल बोलत आहे.
मी म्हणालो ” मी येण्याआधीच तुमचे सगळे ठरले होते मामा, म्हणून तर तुम्ही पैसे घेउन मला बोलवले… मला वाटले की तुम्ही बघीतले असतील पेपर.. “
मामा ने झटकरुन हात कप्पाळावर मारला व म्हणला ” *****द फसवले रे त्यां ***च्यांनी. “

मग कळली खरी हकीकत…. ती अशी.

तो ट्रॅक्टर पलटणे हे नाटक होते.
तो हेड येणे हे नाटक होते.
तो हेड नकली होता.
ती लेबर नकली होती..
कॅनोट प्लेसचे ते ऑफिस ऑन रेंट बेसिस वर होते…
पेपर मध्ये व चेक मध्ये नाव असलेली असली कुठलीच कंपनी अस्तित्वात नव्हती…
मोबाईल कंपनी सगळेच आसपासचे टॉवर टेंडर एकाच कंपनीला देत नाही…
एकाच एरियामध्ये एकाच कंपनीचे चारपाच टॉवर लागू शकतच नाहीत.

काही महिन्याआधीच जवळच एका मोठ्या जमीनदाराच्या फॉर्म हाऊस बाहेर पण असाच एक टॅक्टर पलटला होता.. त्याला वीस लाखाचा गंडा बसला होता…

मामा नशीबवान, फक्त सात लाखाचा गंडा… बाकी जमीन घेतली ती तर आज ना उद्या विकली की पैसे मोकळे होतीलच… !

मामाने कप्पाळावरचा हात काढत… आमच्याकडे पहात म्हणाला ” सात लाखाचे अजून एक बुडीत खाते…. “

आम्ही ओरडलो ” काय ? अजून एक ? म्हणजे ? “

तो म्हणाला…. ” सांगतो…. काय झाले माहीत आहे का…. “

देव.. चमत्कार व मी

देव ह्या संकल्पनेवर अनेकवेळा चर्चा होते व होत राहील, विज्ञाननिष्ठ व्यक्ती देव नसल्याचा पुरजोर दावा करेल व जो देव मानतो तो देव असल्याचा खात्रीलायक दावा करेल, येथे मीमराठीवर देखील अधून मधून ही चर्चा चालूच असते कधी धाग्यावर कधी खरडफळ्यावर तर कधी कट्टावर. देवाचे अस्तित्व नाकारावे की नाही हा ज्याच्या त्याच्या बुध्दीचा प्रश्न. विज्ञान देव ही संकल्पना मान्य करत नाही व प्रत्येक गोष्टीला एक कारक आहे , कारण आहे असे शास्त्र शुध्द नियमाद्वारे दाखवून देतो. अनिंस सारख्या संस्था व अनेक विज्ञान निष्ठ व्यक्ती मुळापासून देवाचे अस्तित्व मान्य करतच नाहीत पण हजारो वर्षापासून हिंदू मनावर देवाचे अस्तित्व वेगवेगळ्या कथेतून, ग्रंथातून, काव्यातून, अभंगातून बिंबवले जात आहे व त्यामुळे देवाचे अस्तित्व मान्य करणार्‍यांची संख्या ही जास्त दिसते, त्यामुळे हा वाद नेहमीच रंगतो.

दैवी चमत्कार मान्य करणे न करणे विज्ञाननिष्ठ व्यक्तीला सोपं जाते कारण त्याची मुळापासून आपल्या विज्ञानावर श्रध्दा असते व आपले मत बरोबर आहे ह्यासाठी विज्ञाननिष्ठ पुरावा ही त्याच्याकडे असतो ( जसे नाईल ह्यांनी विहीरी बाबत गणित मांडले आहे तसे) व प्रत्येक वेळी ते पुरावे सामान्य व्यक्तीला देखील पटतात. सामान्य व्यक्तीला आपल्या पुरातन संस्कृतीतून बाहेर पडण्यासाठी, पुरातन कथांना, चमत्कारांना, पुराण पुरुषाच्या अस्तित्वाला, देवाला नाकारणे जवळ जवळ अशक्य होऊन बसलेले असते कारण संस्कार, लोक-शिक्षणाची कमतरता.

मी स्वतः चमत्कार मान्य करतो पण तो विज्ञाननिष्ठ चमत्कार ! बाकी कुठला ही चमत्कार मी मान्य करु शकत नाही ह्यांचे कारण शक्यतो माझ्या वाचनामध्ये असेल किंवा जेव्हापासून डिस्कव्हरी व नॅशनल जीओग्रॉफिक टाईपची सर्वांग सुंदर दुरचित्रवाण्या आल्या त्यामुळे असेल. ह्यांनी दृष्टी दिली एखाद्या चमत्काराकडे कसे पहावे ह्याची. मी देवाचे अस्तित्व नाकारतो असे देखील नाही आहे कारण शेवटी मी देखील त्याच मातीतून आलो आहे जेथे लहानपणापासून देव सदैव आपल्याला पाहात आहे आपले कर्म पहात आहे असे शिकवले जाते. पण तरी ही काही गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर तोलून नक्की पहाव्या असे वाटतं.

कित्येक पिढ्यामागे माहीत नाही पण आमच्या घरातील एका व्यक्तीला आपला मुळ धर्म सोडून जैन धर्मात प्रवेश करावे असे वाटले असेल व त्यांनी त्यानूसार केला. पण मुळ धर्मातील देव हे ते देखील त्याग करु शकले नाहीत त्यामुळे नवीन धर्मात आल्यावर जसे नवीन देव देव्हार्‍यात आले तसेच जुने देव देखील तेथेच राहीले त्यामुळे आमच्या घरात लक्ष्मीपुजन होते, गणपती पुजन होते, कुल दैवत नाईकबाचे पुजन होते व त्याच बरोबर २४ तिर्थंकरांचे देखील पुजन मनन होते. त्यामुळे लहानपणापासून देव ह्या संकल्पनेवर प्रचंड विश्वासाचे वातावरण आमच्या घरात दिसे. देव व देवाचे मंदिर ह्या विषयी मला काय वाटते दे मी मागे एका लेखामध्ये लिहले आहे पण येथे देवाचेच अस्तित्व नाकारणारे वातावरण पाहीले की माझ्यासारखा माणूस बावरुन जातो. कोणाला बरोबर मानावे, कोणाचे सत्य सत्य म्हणून अंगिकारावे ह्या गोंधळात तो गप्प राहणेच पसंद करतो.

चमत्काराचा व माझा सरळ संबध आला तो जेव्हा मी बाहुबली हॉस्टेलमध्ये शिक्षण घेत असताना नेहमी दंगा व हॉस्टेलमधून पळून जाते असे प्रकार करत असे तेव्हा. कोणीतरी आईला सांगितले की ह्याच्यावर (माझ्यावर) कोणीतरी करणी केली असू शकते मग लगेच आमच्या माता आम्हाला कोल्हापुर पासून १३०-१४० किमी दुरवर कर्नाटकात एकोंडी नावाच्या गावी घेऊन गेल्या. बुवामहाराजांनी मला एका पुजेचे ठिकाण असलेल्या पाटावर बसवले व आपले मंत्र पठण चालू केले काही मिनिटानंतर डोक्यावर टपा टपा लिंबू पडू लागले चांगले वीस तीस लिंबू खाली पडले. अंगारा फुंकणे, चित्रविचित्र आवाज काढत गोल गोल फिरणे वर करुन लिंबू पाडणे हे काही वेळ चालू राहीले व आई कडून ५०१ रु. दक्षिणा घेऊन माझ्या डोक्यावरचे भुत उतरले आहे असे सांगून बोळवणी केली. त्या एरियातून बाहेर पडल्या पडल्या मी आईला प्रश्न विचारला ते महाराज मला बाहेर अंगणात बसवून ते लिंबू पाडून दाखवतील का ? झाले देवाबद्दल काय वाटेल ते विचारतोस म्हणून धप्पा धप्पा मार पडला रस्त्यावरच. माझी आई कमी शिकलेली आहे त्यामुळे मी त्या चमत्कारावर शंका व्यक्त करतो आहे म्हणजे मी त्याचे अस्तित्वच नाकारत आहे असे तिला वाटले. ( त्यानंतर देखील मी हॉस्टेलमधून अनेकवेळा पळून गेलो ही गोष्ट निराळीच 😉 )

ह्यानंतरचा चमत्कार आमच्या पाहुण्यामध्येच एक स्त्री करत असे. पाटावर जोंधळे पसरवून त्यावर भरलेली पाण्याची तांब्याची घागर ठेवत असे समोर ती बसत असे व विरुध्द बाजूला ज्याला काही अडचण आहे ती व्यक्ती. मनातल्या मनात प्रश्न विचारायचे व त्या घागरी च्या काठांना दोन्ही हाताच्या मधल्या बोटाने फक्त स्पर्श करायचा व तिकडून तीने देखील तश्याच पध्दतीने स्पर्श करायचा उत्तर हो असेल तर घागर उजव्याबाजूला फिरु लागे व नाही असेल तर डाव्या बाजूला. मला ते पाहून एकदम तिच्यामध्ये असलेल्या शक्तीबद्दल तिच्या कार्याबद्दल व तिच्या अंगात येण्याबद्दल प्रचंड विश्वास वाटू लागला व काहीतरी दैवी शक्ती आहे ह्यामध्ये नक्की ह्या निर्णयापर्यंत आलो. असे काही दिवस भारावलेल्या अवस्थेत मी चांगल्या मुलासारखा वागलो तर घरी देखील तिच्याबद्दल विश्वास निर्माण झाला मग दर रवीवारी त्या पाहुणीकडे आमच्या फेर्‍या वाढल्या. घर पाहुण्याचेच असल्यामु़ळे मला व माझ्या बहिणीला प्रचंड मोकळीक होतीच. आम्ही खेळता खेळता त्या पुजाघरात शिरलो तर समोर ती घागर व साहित्य तयार होते अंगात मस्ती फार त्यामुळे लगेच समोर जबरदस्तीने बहिणीला बसवले व तिला त्या घागरीला स्पर्श करण्यास सांगितले व मी देखील केला काय नवल ती घागर माझ्यासारख्याच्या स्पर्शाने देखील उजवीकडे फिरली, मी बहिणीला हात त्या घागरीवरुन काढून पुन्हा स्पर्श करायला लावला पण आधी उजवे बोट स्पर्श कर असे सांगितले मग परत घाघर फिरली डाव्याबाजूला. हे पाहून माझी बहिणीची तंतरी उडली व ती तेथेच किंचाळली घागर फिरत आहे बघून. झाले परत मार पडला पण मला कळाले ही काहीही असो चमत्कार नक्कीच नाही आहे ह्यामागे. घरी आल्यावर आईला पटवून देण्याचा खुप प्रयत्न केला घरीच तसा सेटअप करुन तीला घागर फिरवून दाखवली तरी तीने ते मान्य केले नाही की तो चमत्कार नव्हता.

ही झाली दोन उदाहरणे भोंदुबाजीची म्हणा अथवा चमत्काराची कारण दोन्ही जागी लोकांच्या प्रचंड रांगा लागायच्या संकट निवारण्यासाठी. चांगल्या गोष्टीचा प्रसार होण्यासाठी वर्षानू वर्ष लागतात पण एखादा चमत्कार काही तासामध्ये जगभर पसरु शकतो, आपल्यापैकी जवळ जवळ सर्वांना “गणपती दुध पितो” चा पराक्रम माहीत असेल ना ! त्या दिवशी आमच्या घरातील डाव्या सोंडेचा सोनेरी गणपती देखील चमच्याने दुध पित होता व वाड्यात आमच्याच घरी गणपतीची मुर्ती असल्यामुळे घरी प्रचंड गर्दी व बाहेर रांगा लागल्या होत्या ते अजून आठवते 😉

असे अनेक चमत्कार करणारे पाहणे माझ्या नशीबी आले पण परवा परवा जेव्हा अपघात झाला म्हणून घरी आडवा पडलो होतो तेव्हा आईला कोणी तरी माझी दृष्ट काढावयास सांगितली, अर्धातास लेक्चर दिले पण आई काय बधली नाही व शेवटी मी हार मान्य करुन तीला तिचे कार्य करु दिले. दहा-बारा वाळलेल्या लाल मिर्च्या तीने माझ्यावर उतरवून चुलीत टाकल्या व चार पाच मिनिटाने माझ्याकडे आली व म्हणाली बघ.. आता तरी समजले का ? मला काहीच समजले नाही तेव्हा तीने मला सांगितले की तु एक लाल मीर्ची चुलीत टाकून बघ. काही न करता उचलायची व चुलीत टाकायची. माझे विज्ञान निष्ठ मन ह्यासाठी लगेच तयार झाले व म्हणालो बघ ह्या मिर्चीचा पण धुर होणार नाही म्हणून समोर असलेल्या पोत्यात हात घालून एक मिर्ची उचलली व सरळ स्वंयपाक घरातील चुलीत टाकली…….दहा मिनिटे खोकुन खोकुन जीव अर्धमेला झाला..

आईच्या डोळयात विजयी भाव होते व माझ्या मनात हे असे कसे झाले असावे ह्याचा विचार. त्याच पोत्यातील बागडी मिर्च्या ( कर्नाटकातील एक लाल मिर्चीचा प्रकार जो प्रचंड तिखट असतो व जहाल देखील) आईने माझ्यासमोर घेतल्या होत्या व चुलीतल्या निखार्‍यावर टाकल्या होता तेव्हा धुर न होता मिर्च्या जळून गेल्या पण त्याच पोत्यातील मिर्ची मी जेव्हा निखार्‍यावर नुस्तीच टाकली तेव्हा मात्र ती मिर्ची जळून न जाता घरात मिर्चीचा धुर करुन गेली असे का घडले असावे ? ह्याचे उत्तर मला काही सापडले नाही, आमच्या स्वयंपाक घरातून त्यानंतरचे चारपाच दिवस मिर्च्याचा धुर येतच असे.. कारण माझे समाधान झाले नव्हते पण प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मी मिर्ची टाकत असे तेव्हा धूर होत असे हे नक्की. शेवटी माझी मावस बहिणी आपल्या बाळाला घेऊन मला बघायला आली होती ते बाळ प्रचंड रडत होते म्हणुन आईने परत तोच प्रयोग त्या बाळावर केला तेव्हा मात्र धुर झाला नाही त्यामुळे डोके जाम सटकले विश्वास ठेवू नये असे नक्की माझे मन सांगत होते पण जे डोळ्यासमोर घडले त्याला काय म्हणावे ! ह्याला मी चमत्कार नक्कीच म्हणणार नाही पण कुठेतरी काहीतरी नक्की ह्यामागे कारण असेल हे मात्र खरं.

जाता जाता….

आग्र्याला ताजमहल आहे जगप्रसिध्द, वास्तू शास्त्रातील चमत्कार असे पण म्हणतात काही जण पण त्याचे मला कधीच आकर्षण वाटले नाही पण तेच जयपुर मध्ये हवा महल आहे तो मला नक्कीच चमत्कार वाटतो भर उन्हाळ्यात बाहेर ४०-४२ अंश उष्णता रखरखत असते व हवामहल मधील प्रत्येक खोली एसी लावल्याप्रमाणे थंडगार असते… चमत्कार म्हणावा तर ह्याला !

तो व मी – लफडा अनलिमिटेड.

तो- अरे बाबा खुप सुखी आहेस रे.
मी- कारे असं का वाटलं तुला ?
तो- तुझं लग्न झाले नाही ना त्यामुळे.
मी- अच्छा.. म्हणजे ज्याचे लग्न नाय झालं तो सुखी ?
तो- नाय तर काय.. परवाची गोष्ट तो व्ही-डे काय विसरलो घरात महाभारत चालू आहे, तीने मला धुतला.
मी- तु व्ही- डे विसरलास लेका ? चांगले केले धुतला ते.
तो- अरे कामाच्या रगाड्यात विसरलो त्यात काय येवढे..३६४ दिवस प्रेम व्यक्त करतोच ना मी काही ना काही तरी करुन.
मी- काय झालं व्यवस्थीत सांग.
तो- शनिवारी सकाळी तीने मला हसून चहा दिला बेड वरच.
मी- मग, तु काय केलं.
तो- नेहमी पेक्षा त्यात साखर जास्त होती, म्हणून मी म्हणालो साखरेचे भाव खुप वाढले आहेत.. जपून वापरा.
मी- धत्त तेरी की.. पुढे.
तो- ति तनातना गेली पाय आदळत.. पुढील पंधरा मिनिटात काचेचे ग्लास व कप बश्या सगळ्या फुटल्या.
मी- तु वाचलास ना ?
तो- नाही ती किचन मध्ये भांडी धुत होती, मी नाष्टा मागीतला.
तो- जळलेला परठा व आंबट दही दिले.. लोंणचं पण नाही दिले यार.
मी- येवढं झालं तरी तुला आठवलं नाही की काहीतरी आज खास डे आहे ते ?
तो- अरे आज काल माझा गझनी झालेला आहे, नेहमी काहीना काही विसरतो, मार्केट मुळे डोक्यात पक्त भाव वरखाली वरखाली चालू असतात.
मी- अरे येड्या, लेका तुला किती दा सांगितले की ३.३० मार्केट बदं. डोक्यातनं सगळे बाहेर काढायचं लगेच.
तो- बरोबर आहे रे पण, त्या दिवशी मार्केट पण चालू नव्हतं सुट्टि होती, तरी देखील आठवलं नाही.
मी- तु मिपा वर नाही आला होतास का ? बुंदी पाडल्या प्रमाणे कविता-लेख पाडले होते यार व्हि-डे वर.. ते वाचून तर तुझ्या डोक्यात आलं असंतच.
तो- अरे मी मिपावर नाही आलो त्या दिवशी , जमलंच नाही.
मी- मग दुपारचे जेवण पाठवले तीने तुला ?
तो- नाही. मी फोन केला घरी व विचारले तर म्हणाली डोबंल तुझं… जेवणासाठी फोन करतयं येडं.
मी- अरे बापरे… म्हणजे जेवण कलटी ? तुझ्या ऑफिस मध्ये कोणीच नव्हतं का ? आसपास तुला कुठली खुण नाही दिसली व्हि-डेची ?
तो- अरे, शनिवार… एखाद दुसरा आजोबा सोडला तर ऑफिस मध्ये कोणिच येत नाही.. त्यात एयरटेलची लाइन खराब होती नेट पण चालू नव्हतं.
मी- ह्म्म. मग संध्याकाळी तू सरळ घरी गेला असणार.
तो- नाही यार लफडा तेथेच झाला.. एका मित्राचा फोन आला, खांदा मागत होता.
मी- अरे अरे, कोण गेलं ?
तो- अबे, कोणी गेलं नाही, तो म्हणाला मला रडायला हक्काचा खांदा हवा.
मी- असं काय… मग ठीक आहे, पुढे.
तो- मग काय मी खांदा दिला त्याने खंबा दिला.. माझाच आवडता ब्रन्डचा.
मी- म्हणजे तु टल्ली.
तो- नाही जास्त नाही पिली काहीच पॅग मारले तो रडता रडता व्हि-डे च्या आवशीला शिव्या देत होता.
मी- का ?
तो- त्याच्या बायकोने त्याला घरातून बाहेर काढलं होतं.
मी- का रे ?
तो- तो व्हि-डेला गिफ्ट नाही घेऊन गेला म्हणुन. तेव्हाच माझी पण ट्युब पेटली.
मी- बरं झालं तुला वेळीच आठवलं.
तो- अरे नाही यार, आठवलं खरं पण रात्री ९ ला दुकान कुठले उघडे असणार.
मी- मग तु काय केलंस.
तो- शहर भर भटकलो रात्री ११ पर्यंत.
मी- मग काही मिळाले का गिफ्ट.
तो- नाही पण एके जागी, नवीनच पॅक केलेले बुके पडलेले दिसलेले… चुकुन पडले असावे अथवा कोणी तरी रागाने फेकले असावे.
मी- मग काय केलंस तु ?
तो- मी ते बुके उचलले व त्याला व्यवस्थीत केले व तेच घरी घेऊन गेलो.
मी- धन्य आहेस, पुढे.
तो- दहा मिनिटे तीने दरवाजाच उघडला नाही, पण उघडल्यावर मी तीला ते बुके दिले व हॅप्पी व्हि-डे विश केला स्टाईल मध्ये.
मी- ती खुष झाली असणार मग.
तो- नाही, काय नुस्तेच बुके म्हणुन तीने ते बुके सोफ्यावर टाकले.
मी- मग काय झालं बॉ !
तो- त्या बुक्यातून एक छोटंस कार्ड बाहेर पडलं ते तीने उचललं व सरळ किचन मध्ये गेली.
मी- किचन मध्ये का ? चहा करायला गेली असेल तुझ्या साठी तु कार्ड मध्ये काही तरी चांगले लिहले असणार… ती पाघळली… ह्या बायका अश्याच.
तो- डोबंलाचं पाघळली, आत जाऊन एक खराटा व लाटणं घेऊन आली…. काली मातेच्या अवतारामध्येच सरळ एन्ट्रीं.
मी- का ? ती का भडकली रे ?
तो- अरे तीने अर्धा तास धुतल्यानंतर मला विचारले ही “राधिका कोण” म्हणून.
मी- आता ही राधिका कोण यार.. मध्येच आली ?
तो- अरे ते बुके कुठल्यातरी राधिकेने आपल्या जानु ला गिफ्ट केलं असणार त्यात ” जानु, आय लव्ह यु – राधिका.” लिहले होते.
मी-
तो- लेका राजा हसतो आहेस काय.. आता मी काय करु ? परवा पासून तीने जेवायला सोड…. चहा पण नाही विचारला .
मी- ह्म्म्म एक काम कर, एखादं नेकलेस गिफ्ट कर… जरा तीला खुष कर… मग हळुच सांग तु ते बुके कुठून आणलं होतंस ते व का !
तो- म्हणजे एका बुक्याची किंमत कमीत कमी पस्त्तीस हजार
मी- लेका एवढ्यातचं भागलं तर ठीक.. नाय तर किती शुन्य वाढतील पुढील व्ही-डे पर्यंत ते तुला काय त्या ब्रम्ह देवाला पण नाय कळणार… !
तो- ह्म्म ठीक. बघतो ट्राय करुन आज. सांगेन तुला उद्याच.
मी- चल. निघतो आता अजून एकाला खांदा देणे आहे, वाट बघत आहे बिचारा

अशीच एक काळरात्र…

२९/१२/२००९, वेळ रात्रीचे ११. ३०

मराठी महाजाल व वर्तमान स्थिती ह्या अश्या महत्त्वाचा विचारास बाजूला करून आम्ही शेयर मार्केट सारख्या दुय्यम गोष्टीवर चर्चा करत करत जेवण करत होतो, जेवण होऊ पर्यंत १ वाजलाच होता. माझ्या ही घरी वाट पाहणारे कोणी नव्हते व मित्राच्या घरी देखील वहिनी घरी गेल्यामुळे प्रेशर नव्हते. बैठक अमर्यादित काळासाठी तहकूब करून आम्ही आमचे आमचे वाहन बाहेर काढले.
नदीपात्राजवळील रास्तावरून आम्ही महादेव मंदिर चौकाकडे जात होतो, तोच मित्राला अजून एक महत्त्वाचा मुद्दा आठवला म्हणून बाइक बाजूला घेऊन आम्ही परत बोलत उभे राहिलो, पाच एक मिनिटाची खडी चर्चा झाल्यावर पुन्हा आम्ही प्रस्थान केले.

३०/१२/२००९ वेळ रात्रीचे १. ३०

आमच्या वाहनांचे स्पीड असावे २०-२५ किमी कारण आम्ही हॅल्मेट घातल्यामुळे कानावर चर्चा कमी पडत होती, त्यासाठी आम्ही हळू हळू चालवत होतो. मेहंदळे गॅरेज रोडवरून आम्ही महादेव चौकाकडे आलो तेव्हा मित्राच्या बाजूला एक खड्डा आला त्यामुळे त्याने गाडी थोडी स्लो करून माझ्या मागे लावली, तो पर्यंत मी रोड चौक क्रॉस करू लागलो होतो…… बस्स्स!!!!!

मेहंदळे गॅरेज रोडवरून आम्ही महादेव चौकाकडे आलो तेव्हा मित्राच्या बाजूला एक खड्डा आला त्यामुळे त्याने गाडी थोडी स्लो करून माझ्या मागे लावली, तो पर्यंत मी रोड चौक क्रॉस करू लागलो होतो…… मी अर्ध्यापेक्षा जास्त अंतर चौकाचे पार केले होते मागून प्रसन्नदा नी आवाज दिला ” राज्या थांब. ” पण हॅल्मेट मुळे अथवा नशिबामुळे समजा मला तो आवाज कानावर आलाच नाही व जर आला जरी असता तरी मी काही करू शकलोच नसतो. एक भरधाव वेगाने काळ्या रंगाची जीप अत्यंत वेगाने नळ स्टॉप वरून म्हात्रे पुलाकडे जात होता व मधोमध येवढ्या मोठ्या यामाहा बाइकवर असलेला मी त्या जीपवाल्याला शक्यतो दिसलोच नाही. प्रचंड वेगाने त्याने उजव्या बाजूने माझ्या बाइकच्या मधोमध टक्कर मारली व मी हवेत सात-ते-आठ फूट उंच उडालो. जीप माझ्या खालून निघून गेली मी व मी जीपच्या टपावरून खाली रस्त्यावर पडलो. डोक्यावर असलेले हॅल्मेट तेव्हाच कुठे तरी आदळा आपटी मध्ये डोक्यावरून दूर जाऊन पडले. माझी बाइक गोलगोल फिरत डिव्हाडरला टक्कर मारून जवळ जवळ ३०-४० फूट लांब जाऊन पडली. प्रसन्नदा आपली बाइक आहे त्या अवस्थेत सोडून पळत माझ्याकडे आले व हे सर्व नाट्य एवढ्या वेगाने घडले की प्रसन्नदाला जीपचा नंबर नोट करून घेताच आला नाही. व माझी अवस्था पाहून प्रसन्नदा प्रचंड टेन्शन मध्ये आलेच होते.

मला इकडे सर्व काही सुन्न. काहीच संवेदना नाहीत किती वेळ माहीत नाही, पण मी सर्व पाहत होतो डोळे टंकाटंक उघडे होते.
मी रस्त्यावर डाव्याबाजूला कलंडलेल्या अवस्थेत.
कोणी तरी उठवून बसवत होते.
दहा-बारा अनोळखी चेहरे पळत येताना अंधुकसे दिसत होते समोर.
तोच एक प्रश्न कानावर आला.. ” राज्या, ठीक आहेस.? “
मी काहीच उत्तर न देता समोरील व्यक्तीकडे बघत होतो.
पुन्हा प्रश्न.. ” राज्या मी कोण आहे? मला ओळखतोस का? “
मग मी उत्तर दिले.. “हो, ओळखतो. प्रसन्नदा, प्रसन्न केसकर माझे मित्र. “
पुन्हा प्रश्न.. ” कुठे लागले आहे? “
मी माझ्या उजव्या पायाकडे हात दाखवत म्हणालो.. ” पूर्णं तुटला आहे. सांभाळून उचला. “
पुन्हा प्रश्न.. ” अजून कुठे दुखत आहे “

मी थोडा थोडा सावरलो होतो पण अजून जखम इत्यादी काही समजत नव्हते, पण पाय तुटल्यामुळे ठणकत होता ते कळत होते. जवळच असलेली पोलिस गाडी व व्हॅन जेथे अपघात झाला होता तेथे काही क्षणामध्येच पोहचल्या. रास्तावर थोडे थोडे रक्त पडलेले दिसत होते पण शरीरावर जखम दिसत नव्हती तेव्हा अचानक प्रसन्नदाचे लक्ष माझ्या डाव्या कानाकडे गेले तेथून रक्त येत होते, प्रसन्नदा प्रचंड कासावीस झाले त्यांनी पुन्हा पुन्हा माझे कान तपासून पाहिले तोच मागून कोणी तरी म्हणाले “अहो, डोक्याला जखम आहे. घाबरू नका. ” माझा हात मागे गेला तर मी पाहिले तर माझ्या डाव्या बाजूला डोक्यावर मोठी जखम झाली होती, पोलिसांनी जास्त वेळ न घेता मला सरळ उचलला व आपल्या जीपमध्ये मागील बाजूस घातले तेवढ्यात ही मी त्यांना.. ” सर माझा उजवा पाय तुटला आहे पूर्णं लटकत आहे मधून, तो जरा जपून, माझी बाइक, हॆल्मेट, एक माझा बूट समोर पडलेले मला दिसत आहेत” ते हवालदार साहेब लगेच म्हणाले ” अरे कुणीतरी ह्याची गाडी चौकीकडे घ्या व ह्याचे सामान देखील. ” हवालदाराने दरवाजा बंद करून घेतला, पोलिस गाडीच्या मागून प्रसन्नदा आपली बाइक घेऊन येऊ लागले. तो पर्यंत पोलिसांनी मला नॊर्मल प्रश्न विचारत माझ्या जखमांकडे माझे दुर्लक्ष व्हावे म्हणून प्रयत्न चालू केले होते.

३०/१२/२००९ वेळ रात्रीचे १. ५०

पाच-दहा मिनिटामध्ये आमची गाडी सरळ आत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये पोहचली. गाडीतून मला स्ट्रेचर वर इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेले गेले प्रसन्नदा लगेच माझा केस पेपर इत्यादी तयारी करण्यासाठी निघून गेले. स्ट्रेचरवर मला दोन-तीन डॉक्टर एक-दोन वॉर्डबॉय घेरून घेऊन चालले होते, डॉक्टर पटापट अवस्था / दुखणे ह्याची नोंद करू लागले, एका वार्डबॉय ने करा करा कात्रीने माझी अत्यंत आवडती ली कॉपरची जीन्स उजव्या बाजूने कापून काढली, तोच दुसऱ्या वॉर्डबॉय ने वस्तरा घेऊन माझ्या डोक्यावर जेथे जखम झाली होती तेथील चार-पाच इंचाचे मैदान साफ केले. एकाने माझ्या डाव्या हाताची एक नस पकडून एक प्लॅस्टिकची थ्री-वे सुई घुसवली व त्याचे फटाफट बँडेज करून एक-दोन पेनकिलर इंजेक्शन व सलाईन लावण्यात आले. तो पर्यंत डॉक्टरांनी माझ्या उजव्या पायाला सपोर्ट लावून बँडेज बांधून काढले व तत्काळ मला एक्स-रे रूम मध्ये वळवण्यात आले. एवढे सगळे होत असताना देखील मी टकटक सगळ्यांच्याकडे पाहत होतो. तो पर्यंत एका डॉक्टर ने झायलोकीन टचाटचा माझ्या डोक्यात टोचून जेथे जखम झाली होती तेथे पाच टाके घातले. तो पर्यंत प्रसन्नदा माझे ऍडमिशन करून केसपेपर घेऊन आले व रूम मोकळी नसल्याने मला सरळ सी विंगच्या पाचव्या मजल्यावर पोहचवले, बेड नंबर १३.
दिलेल्या औषधामुळे मला झोप येऊ लागली होती व हे सर्व होऊ पर्यंत सकाळचे पाच-साडे पाच वाजले होते. प्रसन्नदा नि मी घरी जाऊन कपडे बदलून येतो, काळजी करू नकोस मी आहे. सर्वांना सांगतो असा सल्ला देऊन निघून गेले. दुखणे वाढत होते पण औषधामुळे झोप येत होती. कळत नकळत कधी झोप लागली कळलेच नाही. सकाळी डॉक्टर देशमुख आले व त्यांनी तपासणी केली व काही औषधे व इंजेक्शन देणेच्या रतीब चालू केला. मित्रांच्यामध्ये बातमी तो पर्यंत पोहचली होती, फोन वाजला तेव्हा मला एकदम नवलच वाटले एवढे सगळे झाले हा कसा काय वाचला, डाव्या खिश्यातून बाहेर काढल्यावर तर चाट पडलो, जसा होता तसाच एकही स्क्रॅच देखील नाही, मी आनंदलो व ज्या ज्या मित्रांचे फोन येत गेले त्यांना उत्तर देत गेलो, जवळ जवळ मित्रांच्यामध्ये सर्वांना समजले होतेच. देश परदेशातून जेथे जेथे बातमी पोहचली तेथून फोन येऊन गेले. जेथे पोहचवणे गरजेचे होते तेथे हलकीच थाप मारली पोट दुखत आहे म्हणून ऍडमिट आहे काळजी नको. उगाच त्यांची पळापळ नको व आता जो त्रास होणार होता / होत आहे तो झाला आहे आता सांगून काय फायदा असा विचार केला व हळूहळू ठीक झाल्यावर व्यवस्थित सांगू हा निर्णय घेतला. पण दुपार पर्यंत ऑपरेशन व इत्यादी गोष्टी कळल्यावर कुणालातरी बोलवून घेणे गरजेचे झाले म्हणून घरी आईला अजून थोडी थाप मारली की थोडे पायाला देखील लागले आहे व कुणाला तरी पाठव, बंडूला पाठव त्याला पुणे माहीत आहे माझ्या बरोबर आला होता माझ्या मित्रांना देखील ओळखतो.

सकाळपासून औषधाचा / इंजेक्शनचा ढोस चालू होता तो दुपार पर्यंत वाढला व मला सांगण्यात आले की रात्री तुमचे ऑपरेशन होईल ८ वाजता चालू. तुम्ही तयार राहा काही काही खाऊ नका पिऊ नका. बरोबर संध्याकाळी ७. ३० मला ऑपरेशन थेटर मध्ये घेऊन जाण्यात आले व कंबरे खालील भूल देण्यात आली. ऑपरेशन टेबल वर मी एकदम येशू ख्रिस्त स्टाइल मध्ये पडलो होतो, डाव्या हातात सलाईन / इंजेक्शन व उजव्या हातामध्ये रक्तदाब व इत्यादी यंत्रे. छाती वर कुठल्याश्या मॉनिटर मधून बाहेर काढलेली -१० रंग बेरंगी वायरी ज्या माझ्या शरीराला जोडलेल्या होत्या. कंबरेखालील भाग सुन्न होता पण मी शुद्धीत होतो, डॉक्टर लोक माझ्या पायाशी जी कुस्ती खेळत होते ते मला समजत होते, ठोकाठोकी, तोडातोडी, ड्रिलिंग, कापाकापी, मी सगळ्याची मजा घेत होतो. पेन किलर दिल्यामुळे जास्त त्रास होत नव्हता पण त्यामुळे हलकी हलकी गुंगी येत होती. ३-४ तासाने ऑपरेशन संपले व मला रेस्ट रूम मध्ये पोहचवला गेला. नंतर कळले की पायावर १३ टाके घातले गेले, एक मस्त पैकी स्टीलचा रॉड घातला गेला आहे व महिन्याभराची कमीत कमी सक्तीची विश्रांती घेणे आवश्यक आहे.

०४/०१/२०१० वेळ दुपारचे १. ३०

आता मी व्यवस्थित आहे आजच पायाचे ड्रेसिंग चेंज झाले, आजच थोडे चाललो आधार घेऊन. प्रगती उत्तम आहे लवकरच पूर्णं बरा होईन हि अपेक्षा. जीवावर बेतलेला अपघात फक्त हॅल्मेटमुळे पायावर निभावला. नाही तर येवढ्या मोठ्या अपघातातून मी वाचलो कसा हा प्रश्न जर कोणी मला विचारले तर मी वर बोट करेन. पुण्यात असलेल्या मित्रांनी प्रचंड मदत केली प्रसन्नदा, मोडक ह्यांनी तर अक्षरशः रात्री जागवल्या माझ्यासाठी, बिपीन कार्यकर्ते, परिकथेतील राजकुमार, धमाल मुलगा व कुटुंब, पुण्याचे पेशवे, छोटा डॉन, टिंग्या, डॉ. दाढे ह्यांनी भेटून तर निखिल देशपांडे, मस्त कलंदर, मनिष, सुहास, व इतर अनेक मित्र मैत्रिणींनी फोनवरून मला मानसिक आधार दिला त्यांचे आभार कसे व्यक्त करावेत तेच कळत नाही आहे. देवाचे अनेकानेक आभार आहेत की त्यांने मला हे सुंदर जग पाहण्यासाठी व ह्याचा परिपुर्ण आनंद घेण्यासाठी अजून एक मोका दिला… थॅक्स गॉड !

माझे महान प्रयोग – २

माझे महान प्रयोग – १ मागील भाग.

सकाळ : ७.१५ मिनिटे नंतर टाईम आसपास ग्रहीत धरा.

सतबीरला काल सुट्टी घे म्हणून सांगतले होतेच, त्यानुसार तो सकाळ पासूनच गायब होता + फ्रिज मधील बियर चे कॅन पण.
चहाची तलफ होती, त्यामुळे उठल्या उठल्या सरळ किचन मध्ये प्रवेश केला, वरुन कोणीतरी फुले टाकत आहे.. दुरवर कुठे तरी जय हो जय हो चा घोष चालू आहे, कोणी तरी सुगंधी द्रव्य शिपंडत आहे असा काही तरी भास मला जेव्हा मी प्रथम काहीतरी निर्माण करण्यासाठी किचन मध्ये प्रवेश करताना झाला !

माझ्या मते चहा ही एक सोपी कृती आहे, चहा पावडर, साखर व दुध ! झाला चहा तयार.. पण माझ्या ह्या मताला लवकरच तडा गेला.. ! भाडं कुठलं घ्यावं ह्यावर दोन मिनिटे चिंतन झाले पण भाजपाच्या चिंतन शिबीराप्रमाणेच काही नक्की न झाल्या मुळे हातात जे आलं ते भांडे उचलले व गॅसवर ठेवले, एक कप शोधला व एक कप पाणी त्या भांड्यात ओतले, मस्त पैकी फ्रिज मधून दुध बाहेर काढले व एक कप प्रमाणे भांड्यात ओतले, थोडीशी शोधाशोध चालू केली साखरे साठी, वरच्या रॅक वरील डब्बा काडताना डब्ब्या बरोबर दोन-तीन ग्लास पण खाली आले, मी कॅच केले असे मला वाटले पण क्षणातच खनखणाट झाला व तीन्ही ग्लास भुईसपाट झाले… हातातला डब्बा किचन च्या ओट्यावर ठेऊन आधी झाडू शोधला व प्लॅस्टिकची सुपली घेऊन धारातिर्थ पडलेले ग्लास चे मोठे तुकडे गोळा केले व डस्टबीन मध्ये त्यांना समाधी दिली. परत माझा मोर्चा चहा कडे वळवला, चहा पुड माझ्या नशीबाने समोरच होती, पण आधी चहा पुड घालावी की आधी साखर ह्या बद्दल निर्णय होत नव्हता त्यामुळे एका हातात एक चमचा साखर व दुस-या हातात एक चमचा चहापुड असे सम प्रमाण त्या दुध-पाणी मध्ये टाकले पण जो कलर निर्माण झाला त्यानुसार मला असे वाटले की चहापुड कमी आहे त्यामुळे मी अजून एक चमचा चहा पावडर टाकली, तोच आठवले की चहापुड जास्त झाली की चहा कडू होतो त्यामुळे मी परत एक चमचा साखर घातली.

सर्व तयारी करुन मी एक कप व काही बिस्किटे काढून ट्रे मध्ये सजवली व विचार केला की अजून एक पाच मिनिटात चहा तयार होईल तो पर्यंत आपण डिश टिव्ही चालू करुन येऊ या. मी टिव्ही चालू करुन परत आलो पण भांड्यात काहीच प्रतिक्रिया चालू असलेली दिसली नाही, मी जरा गडबडलो व खाली वाकून गॅस कडे पाहीले तर मी गॅस पेटवला नव्हता हे मला कळाले, मी स्वतःच हसलो व नॉब फिरवून गॅस चालू केला व लायटर ने खॅट खॅट केले पण गॅस नाही पेटला, आता मात्र मी मला समजेणासे झाले की गॅस का पेटत नाही आहे, मी शेगडी पासून खाली जाणारी नळी पाहील तर मला रेग्युलेटर आठवला, मी सिलेंडर वर असलेला रेगुलेटर पाहिला तर तो सतबीर ने काढून ठेवला होता, मी त्याला मस्त पैकी शिव्या दिल्या दोन तीन.. व तो रेगुलेटर परत सिलेंडर वर जोडला व नॉब चालू करुन गॅस पेटवला.

तोच टिव्ही वर माझे आवडते गाणे, मस्स्ककली मटककली चालू झाले पण बाहेर आलो व टिव्ही वरी गाणे पाहू लागलो तो मला आठवल की चहा. मी पळत आत आलो तर अजून उकळी फुटली नव्हती, मी गॅस समोरच उभे रहावे ह्या निर्णयावर आलो व तेथेच उभा राहिलो चहा कडे बघत. तोच मला आठवलं की कुठे तरी हल्दीराम भुजीया आहे डब्यात, ती पण काढू म्हणून मी मागे वळुन डब्बा शोधू लागलो, डब्बा हाती लागताच मागे काही तरी सुं.. सुं… सुं.. झाले ! चहा ने बंड केला होते व काही चहा उकळी बरोबर भांड्यातून बाहेर शेगडी वर पसरला होता.. मी डोक्याला हात लावला व फटाफट गॅस बंद केला व ह्या गडबडीत ओट्यावर ठेवलेला चहापावडरचा डब्बा खाली कोसळला व मी त्याचे झाकण लावले नव्हते हे सांगण्याची काही गरज नसावीच 😉

७.२५ मिनिटे नंतर

मस्त पै़की स्वतः तयार केलेल्या चहाचा घोट घेत मी टिव्ही पाहत बसलो व काही वेळाने ताणून दिली परत….

९.२५ मिनिटे नंतर

मिपा उघडला, माझ्या व्यतिरिक्त नवीन लेखन इत्यादी शोधले काही सापडले नाही 😉 सरळ पाककृती विभागात क्लिकलो व मटार-पालक पराठे हा जरा त्यातल्या त्यात सोपा प्रकार निवडा, जेवणासाठी. व कुणाची ही मदत घ्यायची नाही हे ठरवले.

सोपंच आहे, मटार २ वाट्या, पालक २ वाट्या,आल १ पेरा एवढं,लसुण ४ पाकळ्या, मिरची /तिखट आवडीनुसार,मीठ चविनुसार
कणिक अंदाजे, तांदुळाचे पिठ ४ चमचे, पिठ मळुन घेण्यासाठी तेल , पराठे बनविण्यासाठी १ प्लास्टिक पिशवी. बस्स ! जास्त कटकट नाही.. की झंझट नाही.. हा विचार करुन मी हेच करायचं ठरवले.

आधी फ्रिज मध्ये / किचन मध्ये काय काय सामान आहे व नाही आहे ह्याची लिस्ट तयार केली.
मटार – हाजीर.
पालक – हाजीर.
आलं – गैर हाजीर.
लसुण – हाजीर
मीरच्या – हाजीर (लाल / हिरव्या / शिमल्या मिर्च वाल्या पण हाजीर)
तांदुळाचे पिठ – गैर हाजीर
तेल – हाजीर
प्लास्टीक पिशवी 😕 – सहा पिशव्या हाजीर ( हे कश्याला हा प्रश्न )

म्हणजे आलं व पिठ ह्यांची जुळणा करायला हवी, कॉलीनीतल्या दुकान वाल्याला फोन केला.
मी ” आलं है ? “
तो ” आलं ?”
मी ” स्वारी, अदरक है ? “
तो ” है”
मी ” १०० गॅम “
तो ” आगे “
मी ” चावल का आटा है ?”
तो ” क्या.. नही है.”
मी ” तो बस अदरक भेज दे, एफ-३१ में”
तो ” क्या साब, मजाक कर रहे हो, १०० ग्रॅम अदरक के लिए किसे भेजू”

त्याच्या ह्या नख-यामुळे मला एका आल्याच्या तुकड्यासाठी दोन साबुण व शॅप्मु विनाकारण घ्यावा लागला.

१०.०५ मिनिटे नंतर

आलं झालं, पिठाचं काय करायचं ? शेवटी डोक्यात आयडीयाची कल्पनेने भरारी घेतली व किचन मध्ये जाऊन तांदळाचा शोध चालू केला, तांदुळ मिळाले पण माझा धक्का लागून चार अंडी ठेवलेला बाऊल खाली पडला व त्याच्या बरोबर अंडी पण…. ! झालं पुन्हा पुसणे साफ सफाई करुन मी, तांदुळ व मिक्सर समोरासमोर बसलो. तांदुळ मिक्सर मध्ये घातले व मिक्सर चालू केला… घर घर घर… चांगले दहा मिनिटे फिरवले व ढक्कण उघडून बघितले तर तांदळाचे छोटे छोटे तुकडे झाले होते पण पिठ काय तयार झाले नाही, शेवटी मी मिक्सरचे मॅन्युअल शोधण्याचा प्रयत्न केला व ते बॉक्स मध्येच सापडले. त्यात लिहल्यानुसार मी त्याच्या ब्लेडस बदलल्या व पुन्हा मिक्सी चालू करुन तांदळाचे पिठ निर्माण केले. त्याला ३० % कोणी ही पिठ म्हनून शकेल येवढे ते बारिक जरुर झाले 😉

एक स्टेप पुर्ण केल्याचा आनंद माझ्या चेह-यावर दिसू लागला होता.

आता बस तयारी चालू करायची व पराठे तयार !

पाणी उकळायला ठेवले व त्यात मटार + पालक घड्याळ लावून आठ मिनिटे उकळली, व नंतर मिक्सि मध्ये सर्व आयटम जे हाजीर होते त्यांना १० मिनिटे फिरवले.. मस्त पैकी त्याचे पण पिठासारखे बारिक बारिक तुकडे झाले… ब्लेड चेंज करायला विसरलो होतो. तरी हरकत नाही ह्यामुळे काही फरक पडणार नाही हा उच्च विचार करुन मी ते सर्व मिश्रण एका भांड्यात ओतले. व तयार मिश्रणात तांदळाचे पिठ घातले पण किती घालावे ह्यावर गाडी अडली पण मीच अंदाजे सर्व पिठ त्यात ओतले, आता कणिक हा काय आयटम आहे हे डोके खाजवले तरी शेवट पर्यंत मला उमजले नाही त्यामुळे तो आयटमी मी फालतू चा समजला व त्याला लिस्ट मधून बाहेर केला.
पाककृती लेखिकेने / लेखकाने सैलसर मळून घ्या असं लिहले आहे पण सैलसर मळणे म्हणजे काय हे मला उमजले नाही त्यामुळे मी सैलसर चा अर्थ पाणी जास्त पिठ कमी असा घेतला व त्यानुसार मळायला सुरवात केली माझ्या हिशोबाने पाणी जास्त होते पण हळू हळू मळताना पिठ जास्त मजबुत होऊ लागले व पाणी गायब, म्हणून परत पाणी घातले तर ह्यावेळी पाणी जरा जास्तच पडले म्हणून परत जरा पिठ घातले असे करत करत जे दळलेले पिठ होते ते सर्वं संपले.. पण थोडेसे सॉस सारखे पातळ पिठ मळून तयार झाले, ज्याचा रंग हिरवा दिसत होता.

आता प्लास्टिकच्या पिशवीची जुळणा करुन मी ते मिश्रण त्यावर थापले… (थापल्या पेक्षा पसरवले हे योग्य वाटत आहे) गॅस चालू केला, तवा त्यावर ठेवला व पाच एक मिनिटाने तवा गरम झाल्या वर मी ते मिश्रण तव्यावर ठेवले… तोच ती प्लॅस्टिकची फिशवी भसाभास आजूने जळू लागली व एक सहन न होऊ शकणारा दुर्गंध किचन मध्ये पसरला.. मला लक्ष्यात आले की आपण चुकलो आहोत.. मी लगेच गॅस बंद केला एक ग्लास पाणी तव्यावर ओतला, तव्याचा हाल पाहण्या लायक झाला होता, वरचे पराठा मिश्रण खाली पडले व प्लास्टिक सगळे तव्याला चिटकले… मी निराशेने तो तवा बाजूला ठेवला व दुसरा नवीन नॉन्स्टिकचा तवा परत गॅस वर ठेवला… आता मला तेल का हवे ते कळाले.

मी पुन्हा एक प्लास्टिकची पिशवी घेतली त्याला तेल लावले व मिश्रण त्यावर पसरवले व त्याला उचलून तव्यावर उलटा केला पण सर्व मिश्रण लोळागोळा होऊन एकाच जागी पडले… मी हळुच उलाथण्याने ते मिश्रण सर्व तव्याभर पसरवले व माझ्या डोक्यात आयडीया चमकली… की पुढील वेळी आपण सरळ तव्याला तेल लावू व त्यावर मिश्रण पसरवू !

मी माझा पहिला स्वनिर्मित पराठा तव्यातून बाहेर काढला व त्याला एका प्लेट मध्ये ठेवला, व दुस-याची तयारी करु लागलो, दुसरा सरळ तव्यावरच पसरवला व तो पकण्याची वाट पाहू लागलो तोच बाजूला प्लेट मध्ये असलेला पराठा मला खुणवत होता.. टेस्ट कर टेस्ट कर पण मी स्वतःला संयमीत करुन उभाच राहीलो पण काही क्षणात संयम सुटला व मी सरळ त्या पराठ्याचा एक
तुकडा तोडून तोंडात टाकला… अरे वा ! मस्त चव. पण जरा कच्चां राहिला असावा असे वाटले पराठा, मी जरा निरखुन पाहीले तर मी पराठा तव्यावर फिरवलाच नव्हता.

१०.४५ मिनिटे नंतर

दोन-तीन पराठे करपल्यामुळे… जळल्यामुळे.. खराब झाले पण त्यानंतरचे दहा-बारा पराठे एकदम व्यवस्थीत झाले, जरा टेस्ट विचित्र होता.. पण ठिक स्वतः तयार केलेल्या आयटम ला का नावे ठेवा.. काही नाही जरा मिठ घालायला विसरलो होतो.. हिरवी कि लाल मिर्च ह्या नादात दोन्ही मिर्च घातली होती त्यामुळे तिखट जाळ झाला होता पराठा पण टेस्टी होता बॉस ! मी जोर लावून दोन पराठे कसे बसे खल्ले ! व किचनचा दरवाजा बंद करुन मस्त पैकी दोन ग्लास मोसंबी ज्युस घेतला व गप्प संगणक चालू करुन मिपा-मिपा खेळू लागलो 😉

चार अंडी, दोन-तीन काचेचे फुटलेले ग्लास, मिक्सर + मिक्सरची सर्व भांडी व ब्लेड्स , सर्व किचन भर पसरलेले सामान, खाली काढून ठेवलेले डब्बे व डझनाने धुण्याची भांडी एक प्लास्टिक जळून चिटकलेला तवा व दहा एक मटार-पालक पराठे चे पराठे मी सतबीर साठी सोडून त्याच्या येण्याची वाट बघू लागलो !

संध्याकाळी ०५.१० मिनिटे नंतर

“हे भगवान, किचन में क्या करने गये थे… यह आटा कुं गोंद के रखा है… यह प्लेटे में क्या कालीसी रोटी रखी है.. .. क्या करते हो राज भाई ! ओ मेरी मां ! ग्लास फोडा क्या…. ” – एका पायावर नाचत सतबीर किचन मधून बाहेर येताना मला दिसला व मी लगेच मागच्या दाराने…. बागे कडे सटकलो !

रात्रीचे ११.३५ मिनिटे नंतर

पोट का गुडुम गुडुम वाजत आहे………………. !

***************************************************
* आता सध्या कानाला खडा लावला आहे.. नो प्रयोग @ किचन ! ना बाबा ना !

माझे महान प्रयोग – १

मागील आठवडा असाच झोपून घालवला, खुप कंटाळा येतो नाही असं बेड वर पडून राहणे, पण ह्या रविवारची सकाळ जरा वेगळीच होती मस्त पैकी अंगात तरतरी जाणवत होती व शक्ती आली आहे असे वाटत होते, त्यामुळे विचार केला चला आज जरा बाहेर पडू, थोडा वेळ बागेत फिरलो, हिरवळीचा आनंद घेतला. रविवार होता त्यामुळे सर्वत्र आनंदी आनंद होता, , युवक-युवती मस्त पैकी सकाळाच्या कोवळ्या उन्हात गप्पा मारत होते, दोनचार आजोबा टाईप व्यक्तीमहत्वे त्यांच्या कडे चोरून चोरुन पाहत गप्पा मारत होते… पण हे सर्व बघून मी लवकरच कंटाळलो व परत घरी आलो, इकडे तिकडे करताना दिवाळीच्या वेळेस आणलेला डिस्टेंपरचा डब्बा दिसला व मनात एक विचार चमकला की चला आज आपली रुम पेंट करु या. दहा लिटरचा डिस्टेंपरचा डब्बा घेऊन मी आपल्या रुम मध्ये आलो व कुठली भिंत रंगवावी ह्याचा विचार चालू केला, बेडच्या समोरची भिंत स्काय ब्ल्यु रंगाने रंगवायचे मनात ठरवले व रुम मधील सामान एक एक करुन बाहेर काढायला सुरवात केली !

सर्व सामान जेव्हा मी बाहेरील हॉल मध्ये काढले तोच आमचा गडी किचन मधून बाहेर आला व म्हणाला ” क्या कर रहे हो भाई ?”
मी म्हणालो ” कुछ नही, जा तु रोटी बना” मी असे म्हणून बाथरुम मधील बाल्टी घेऊन आलो व दिड एक लिटर डिस्टेंपर बाल्टी मध्ये ओतले, तोच लक्ष्यात आले की ब्रेश नाही आहे व ब्ल्यु पिडीडिंन्ट तर नाहीच आहे, मग हळूच प्रेमाने गड्याला हाक दिली व म्हणालो ” सतबीर, एक काम कर यार, मार्केट से ब्रेश तथा ब्ल्यु पिडीडिंन्ट ले के आजा यार.. बाईकले के जा.” त्याने मला खाऊ का गिळू नजरे ने बघत म्हणाला ” मै रोटी बना रहा हूं ! आप को भी कुछ काम नही है.. रुको अभीला के देता हुं! ” चरफडत तो सामान घेऊन येण्यासाठी कसाबसा गेला, आजकाल शोधायला गेले तर देव भेटेल पण गडी भेटणार नाही, त्यामुळे ह्यांचे भाव जरा वाढलेलेच असतात, असो.

तो येऊ पर्यंत जरा आपलं कपाट साफ करु ह्या विचाराने कपाट साफ करायला घेतले, कपाट उघडताच समोर चार्-पाच सिग्नेचर च्या बाटल्या डोळ्यासमोर चमकल्या… अत्यंत दुखःने मी त्या बाटल्या उचलून आपल्या नजरे आड करत हॉल मधील कपाटमध्ये ठेवले ! व परत रुम मधील कपाटाकडे वळलो, खालचा कप्पा साफ करताना फोस्टर बियर च्या कॅनचा सरळ सरळ बॉक्सच हाती लागला जो मागच्या महिन्यात केलेल्या कॅकटेल पार्टी साठी आणला होतो, पण सर्वांचाच व्हिस्की व व्होडका मध्ये टांगा पलटी झाल्यामुळे बियर पण आहे हे जवळ जवळ सर्व जण विसरले होते व ती पेटी कपाटात राहिली होती, मी अत्यानंदाने वेडा व्हायचा तेवढा राहिलो.. चला डॉक्टर ने व्हिस्की सांगितले आहे घेऊ नको, बीयर ला थोडीच ना आहे… हा विचार करुन मी लगेच त्यातील दोन्-चार कॅन फ्रिज मध्ये लावल्या व निवांत पणे सोफ्यावर हुडपलो… आता काही वेळात बियर थंड होणार व मी त्या सर्व च्या सर्व गटकणार.. आठवडाभर पिली नाही त्याचा वचपा आज काढणार म्हणून मी खुषीत होतो, तोच माझ्या डोक्यात विचार आला च्यामायला त्या उमेश ला (माझा मित्र + डॉक्टर) विचारुन घेऊ या एकदा की बियर चालेल का नाही, नाही तर बियरच्या नादात मला स्वर्ग मिळायचा फुकटात…

मी त्याला फोन लावला ” उमेश, क्या हाल है भाई ?”
तो ” मजे में, हॉस्पिटल में हुं बोल, ठीक है अब. कोई तकलिफ ?”
मी ” नही यार, ठीक हुं, मेरे पास व्हिस्की है… “
तो जवळ जवळ ओरडलाच ” राज, हात तोड डालूंगा, साले व्हिक्सि को हात भी लगा या तो”
मी नर्वस होत म्हणालो ” अबे, पुरी बात तो सुन. मेरे पास तीन-चार बोतले पडी हुंई है, जो मेरे काम की तो फिलाल है नहीं, तु ले जा.” मी त्याला लालच + मस्का लावत म्हणालो.
तो ” अच्छा ! चल कोई बात नहीं, दोस्त कब काम आएगें, शाम को ले जाऊंगा”
मी ” तुझ्या आवशीचा घो, फुकट म्हणजे दे”
तो ” क्या बोला बे ? समज में नही आया”
मी सावरासावरी करत म्हणालो ” अबे तुझे नही, मुझे बियर चल सकती है क्या ?”
तो म्हणाला ” चलेगी… जल्दी उपर जाना है तो पी , तेरे पास बियर का भी स्टॉक पडा है क्या ?”
मी गडबडीने म्हणालो ” नही, नही. मंगाने वाला था, अब नहीं “
तो ” अब आया लाईन पें, शाम को घर आ रहा हूं “
मी ” ठीक. आ जाना !”

म्हणजे, पिण्याचा मार्ग संपला होता, पण येवढं होऊ पर्यंत सतबीर ब्रेश व बाकीचे सामान घेऊन माझ्या समोर उभा राहिला,मी त्याच्या हातातून सामान घेतले व सरळ आपल्या रुम मध्ये गेलो व आतातून दरवाजा बंद करुन घेतला.
बाल्टी मध्ये हलकेसे पिडीडिंन्ट टाकुन मी त्याला कश्याने घुसळायचा हा विचार करु लागलो काहीच सापडले नाही म्हणून शेवटी सरळ हात घातला व घुसळू लागलो .. थोड्या वेळा ने फिकट निळा रंग दिसू लागला पण त्या रंगाने माझे समाधान झाले नाही म्हनून अजून जरा पिडीडिंन्ट ओतले पण जरा जास्तच पडला पिडीडिंन्ट त्यामुळे तो एकदम निळा पेंट तयार झाला हे पाहून मी त्यात अजून थोडे डिस्टेंपर घातले अर्धा एक लिटर तर तो रंग परत हलका निळा झाला… थोडा पिडीडिंन्ट थोडा डिस्टेपर असे करत करत सरते शेवटी मला हवा तो निळा रंग तयार झाला, पण तो पर्यंत बाल्टी आर्धी भरली होती जवळ जवळ सहा एक लिटर रंग तयार झाला होता.. आता काय करायचे हा विचार करता करता मला ती सैफ अली खान ची पेंट ची जाहिरात आठवली ज्यामध्ये तो रंग ब्रेश ने भिंती वर झाडतो, हवे तसे ब्रेश फिरवतो व एक सुंदर कला कृती निर्माण होते, माझ्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली व मी ती कल्पना प्रत्यक्षात आपल्या भिंती वर उमठवण्याची तयारी सुरु केली.

पहिला ब्रेश रंगात बुडवला व झपाक करुन भिंती वर उडवला, पण भिंती वर थोडा व माझ्या चेह-यावर जास्त उडाला… मी सद-याच्या बाही ने तोंड फुसत आपले काम नेटाने चालू ठेवले, कधी तलवारी सारखा ब्रश चालव तर कधी, गाडीचे स्टेरिंग फिरवत आहे तसा चालव, कधी उड्या मारत चालव तर कधी आडवा तिडवा जसा हवा तसा फिरव… तास भराच्या महनती नंतर अर्धी भिंत माझ्या कलाकृती ने भरली होती, माझी छाती एक इंच भर फुलली व मी परत नेटाने काम चालू केले, सपासप ब्रेश चालवत राहिलो व पुर्ण सहा लिटर पेंट भिंत वर अक्षरशः ओतून मी एकदम कौतुकाने ती माझी भिंत पहात उभा राहिलो !

टक टक, टक टक.
“भाई, क्या कर रहे हो अंदर ?” सतबीर म्हणाला बाहेरून.
“रुक जा पाच मिनिट” मी म्हणालो.

पुन्हा एकदा आपल्या कलाकृती वर नजर टाकुन मी विजयी आवेशा मध्ये दरवाजा उघडला तोच सतबीर तोंड वासून उभा माझ्या समोर.
“हे भगवान, कलर से नहा लिया है क्या ?” असे म्हणून तो अक्षरशः पोट धरुन हसू लागला.. मी त्याच्या कडे रागाने बघत हॉल मधील आरसा समोर उभा राहिलो, ७०% मी रंगात भिजलो होतो, केसं, तोंड, कपडे… चप्पल सर्व काही निळा / आकाशी रंग झाला होता, मी हसत म्हणालो, ” अबे, कुछ काम करते करते गंदे हो गये तो उस में हसने वाली कोणसी बात है ?, चल चाय बना ! “
मी माझ्या हातातला ब्रश तलवारी सारखा फिरवत परत आपल्या रुम मध्ये गेलो व आपली कलाकृतीला आपल्या नजरेत साठवत उभा राहिलो, तोच सतबीर चहा घेऊन आत आला व भिंती कडे बघत म्हणाला ” ए क्या है सब ? बाल्टी फेक दी क्या दिवार पें ?” मी कपाळाला हात लावत म्हणालो ” अबे, ढक्कन. यह नया टाईप का डिझाईन है… अच्छा लग रहा है ना ? ” मी त्याला डोळ्याने वटारत म्हणालो… त्याला समजले होयच म्हणायचे आहे ते. तो म्हणाला ” बहोत बढियां, यह सब ठीक है… पर आपने फर्श क्युं रंग दिया.. अब इसे धोयेगा कोन ?” तेव्हा मी खाली बघितले, जवळ जवळ सर्व रुम ची फर्श निळ्या रंगात रंगली होती.. मी ब्रेश जसे हवे तसे चालवले त्यावेळी अर्धा रंग भिंती वर व अर्धा रंग सर्व रुम मध्ये पसरला होता.. मी आपली जिभ चावत त्याला म्हणालो ” कोण साफ करेगा मतलब. दो घंटे के अंदर साफ कर रुम. मै अभी घुम के आता हूं बाहर से. तब तक एकदम ठीक ठाक होणी चाहीए रुम.”

असे म्हणून मी जवळ जवळ पळतच बाथरुम मध्ये गेलो व अंघोळीला उभा राहिलो, आत मन भरुन हसून घेतल्या वर मी अंघोळ करुन बाहेर आलो तोच सतबीर चे एक वाक्य कानावर पडले जो फोन वर बोलत होता आपल्या कुठल्या तरी जाणकाराशी ” रे यार, हमारे साहब भी पगला गये है, पुरा घर गंदा कर दिया.. मेरा संन्डे बरबाद कर दिया यार… ! ” अरे रे मला खुप वाइट वाटले म्हटले ह्याचे पण काही प्लान असतील… आपल्या मुळे राहिलेच. त्याला बोलवले व म्हणालो ” फ्रिज में चार बियर की कॅन रखी है, कल छुट्टी ले लेना, साथ में बियर भी लेके जा. लेकिन आज रुम साफ कर फटाफट.” तो म्हणाला ” ठिक है साब, पर फिर मत करना पेंन्ट का काम.. आप के बस की नहीं है…. पेंट करना.. दिवार खराब कर दी.” माझ्या महान कलाकृतीला खराब म्हणाल्या म्हणाल्या मला खुप राग आला त्याचा पण.. हा गेला तर उपासमार होईल व अजून एक भुकबळी म्हणून आपली पण सरकार दप्तरी नोंद होईल ह्या भविष्यकालीन विचार करुन मी त्याला काहीच म्हणालो नाही…..

पण,

उद्या सुट्टी दिली आहे त्याला… उद्याची उचापत आताच माझ्या मनात रेंगत होती.. उद्या सतबीर ला सुट्टी दिली आहे.. मिपावर पाककृती दालन मध्ये डझनाने कलाकृती पडल्या आहेत त्यातील एक उचलणे व स्वयंपाक घरात आपली तलवार चालवणे…. ढ्णठढड्याण !!!!!!! ढ्णठढड्याण !!!!!!! ढ्णठढड्याण !!!!!!!

माझं थोबाड… भाग- ०

” एकदम आपल्या आजोबांवर गेलं आहे नाही बाळ, त्यांच्या सारखच नाक, त्याच्या सारखेच डोळे” – मावशी म्हणाली, मी जेव्हा जन्मलो तेव्हा. (हे परवा परवा मावशीने सांगितले व खालील मामाचा पण संवाद.)
” कार्ट, एकदम बाबाच्या वळणावर गेलं आहे, केसं बघ कशी आहेत ह्याची उंदरा सारखी, वसावसा अंगावर येतो, नाही जमनार, ह्याचं व माझं नाही जमणार कधी “ मामा. जेव्हा मी ५ वर्षाचा होतो.
” राजा लेका, थोबाड रंगवीन तुझं एक कानाखाली वाजवली तर ” बाबा जेव्हा त्यांचे चारमिनार सिगरेटचे पाकिट आपोआप मोकळं होऊ लागलं तेव्हा.
” थोबाड बघितलं आहे का आरसामध्ये कधी ?” पहिली मुलगी जीला प्रपोज केलं होतं ती (वय लिहायची गरज नाही 😉 )

“किती काळवंडला आहे चेहरा माझ्या बाळाचा, कशाला उन्हात खेळतो रे “ मोठी माऊशी.
” तोंडाला काय लावून घेतले आहेस बाळा ? आमचा राजा कुठे आहे ? ” रंगपंचमीला ग्रीस कोणी तरी फासल्यामुळे चेहरा / केसं अनोळखी झाला तेव्हा आई म्हणाली.
“कुठ थोबाड फोडून घेतलं रे ” माझा एक मित्र, जेव्हा मी मार खाऊन आलो होतो शाळेतून.
” अपना फेस देखा है क्या, साला तु पियेगा बियर, मेरे साथ ? “ एका बियर पिण्याच्या पैजेच्या वेळी मित्र.

असं आयुष्यभर कोठे ना कुठे नेहमी तोंडाचा, थोबाडाचा माझ्या चेहराच्या उदोउदो होतच असे. कधी शाळेत, कधी हॉस्टेल मध्ये कुठल्यातरी सराने / बाईने वाजवल्यामुळे चेहराचा रंग बदलतच असे त्यात नवीन काही नव्हतंच मला, पण कधी खुप वेळ पंचगंगेत डुबक्या मारल्यामुळे तर रंगपंचमीला डोळ्यात रंग गेल्यामुळे ताबारलेले डोळे व त्यात आमचं चित्रविचित्र थोबाड बघून लहान मुले बघताच रडायला सूरु होतं. कधी काळी सायकल शिकताना पडलो त्यामुळे नाकाच्या सुरवातीलाच एक कच, चांगलाच मोठा, तर अक्काचे पुस्तक फाडले होते म्हणून तीने कानाजवळ आपल्या नखांनी केलेली नक्षी, भले मोठे डोळे व कधी काळी क्रिकेटचा बॉल लागल्यावर सुजलेले व वाकडे झालेले नाक, उजव्या होठावर तिळ , स्वर नलिका दोन इंच बाहेर आल्या सारखी दिसणे ! भुवयावर केसं देवानं जसे वरदान दिले असावे तसे दोन्ही सख्खे जुळे भाऊ असल्यासारखे जुडलेले, म्हणजे आमचं थोबाड. रंग तसा गोराच, जसं १००% पाढं-या रंगात ४०% काळा व ३०% ताबुस रंग मिक्स केल्यावर जसा रंग तयार होईल तसा, पण लहान पणी मी खुप गोरा होतो पण गल्लीतल्या काही मुलींची नजर लागल्यामुळे माझा रंग काळवंडला असं आई आज ही सांगते.

असो,

आता थोबाड आठवायचं कारणं म्हणजे, मागील आठवड्यापासून वेळ मिळाला नव्हता व हा आठवडा आजारपणात काढला त्यामुळे थोबाडा कडे बघायला वेळ मिळालाच नाही आज जरा कंटाळा आला होता टिपी करुन म्हनून विचार केला मोकळा वेळ सतकारणी लावावा, त्यासाठी जवळच असलेल्या माझ्या नावडत्या हजामाकडे कडे गेलो व म्हणालो ” काट डाल सबकुछ… ” तो दचकला व म्हणाला ” क्या साहब ? सबकुछ सफाचट ? गंजा होणा है क्या ? ” अरे लेका… ” नाही यार, थोडा बाल कम कर बाकी दाढी, मुछे सफाचट.”
तो आपला नेहमीचा कपडा माझ्या अंगावर ओढून गळाला फास बसावा ह्या हेतूने टाईट बांधत म्हणाला ” साब, चार्-पाच दिन से दिखे नही आप” लेका मी मसनात गेलो होतो तु आपलं काम कर ना भाऊ.. हा उच्च विचार माझ्या मनात आला होता की बोलावं त्याला पण त्याच्या हातात माझी मुंडी व थोबाड दोन्ही होतंच तसेच एक कात्री व समोर ठेवलेला वस्तरा पण दिसत होता त्यामुळे मी त्याला एकदम संयमाने म्हणालो ” बिझनेस मिटिंग मे बिझी था.. तु काटो बाल.. काटो..”

पंधरा मिनिटामध्ये त्यांने माझी केसं कमी कापली व मेंदुला बोलून बोलून झिनझिन्या जास्त आणल्या, आधीच आजारी त्यात जरा पण विचार केला की गुढगा दुखतो त्यात तो माझं नसलेलं डोकं खात होता भसा भसा.. पण आलीया भोगासी , कर्म. आपल्याच पापाची फळे ह्याच भुतलावर मिळतात असं कुठ तरी वाचलं होतं, त्याचं मुर्तीमंत उदाहरण माझ्यासमोर बोलत होतं, राजकारणापासून पाकीस्तान पर्यंत पाकिस्तान पासून हेमामालिनी पर्यंत अर्धा तासात त्याने सबसे तेज चॅनेलला पण लाजवेल ह्या स्पीड मध्ये बातम्या दिल्या, हिचं लग्न झालं, तीचं अफेयर झालं, तो मेला तो जगला. सर्व काही. घरा जवळ आहे व जास्त लाबं मी जाऊ शकत नाही त्यामुळे ह्याच्या कडे येण्याची बुध्दी झाली व मी माझ्या बुध्दी वर किव करत बसलो होतो.

फक्त एक तासात त्याने माझे केस कापले व पुढील अर्धातास त्यांने माझी दाढी व मिशी काढायला घेतली ह्यावरुन तुम्हाला त्याचा कामाचा वेग व बोलण्याचा वेग कळालाच असेल. असो, त्यांने तोडावर फसाफसा पाणी मारत माझ्या चेहरा निरखुन पाहात म्हणाला ” साब, आप का फेशीयल कर दुं क्या ? चेहरा साफ हो जायेगा, रंग भी निखर जायेगा” मी त्याच्या कडे डोळे मोठे करुन बघीतले तेव्हा तो गडबडून म्हणाला ” नहीं नहीं, आपका रंग तो साफ है ही, फेशीयल से निखर जायेगा, कंपनी गॅरेंटी देती है साब कलर गोरा होने की, बाल भी काले करा लो या गारनियर के यह रंग शेड देख लो जो पसंद हो वही तयार कर देता हूं” त्याच्या कामाचा वेग व बोलण्याचा वेग पाहून मी नकार देण्याचं ठरवलं होतं पण, समोर आरशामध्ये पाहिल्यावर मला माझा लहानपणाचा गोरा रंग आठवला व त्या नजर लावणा-या मुलींच्या नावाने बोटे मोडली व त्याच रागात मी त्याला हो म्हणावे की नाही ह्याचा मी विचार करत होतो तो त्याने काही ही विचार न करता त्याने सरळ माझ्या थोबाडाला कसलीशी क्रिम फासू लागला व दहा एक मिनिटात माझ्या थोबाडावर चांगलाच पांढ-या रंगाचा थर जमा करुन बाहेर गेला मला कळालेच नाही, मी त्याला शोधण्यासाठी , पाहण्याचा वळण्याचा प्रयत्न केला तर तो बाहेरुन ओरडला ” हिल ना मत साब, क्रिम को सुख ने आराम से सिट पर बैठे रहो.” मी जो हुकुम सरकार असं म्हणत चुपचाप बसून राहिलो.

काही मिनिटात तो आता ही क्रिम धुणार व माझा रंग एकदम उजळणार व आपला हरवलेला गोरा रंग सापडणार अशी काही दिवास्वप्ने मला त्या खुर्चीवर बसून पडू लागली ! पंधरा मिनिटाने तो आला व हळुहळु माझ्या चेह-यावरील ती क्रिम काढून लागला, मी एकदम काही तरी मी नवल पाहणार आज ह्या नजरेने समोर अरसामध्ये आपलं थोबाड पाहत होतो, पण कसले काय ०.००१% पण रंग गोरा झाला आहे असं मला तरी वाटलं नाही पण तो लेकाचा म्हणाला ” देखा साब, कितना फरक पडा आप अगले हप्ते भी करा ले ना दो चार बार करोगे तो आप का रंग गोरा जरुर होगा. ” आता चेह-यावर प्रयोग केलाच होतो आता केसांच्या कडे त्याचे लक्ष होते पण मी त्याच क्षणी भानावर आलो व म्हणालो ” बाल कलर मत करना बाद में देखुंगा, जब टाईम होगा तब.” त्याचं मन खट्टु झालं पण मी आपल्या निर्णयावर पक्का होतो पण त्याने ठरवलं असावं की अजून काहीतरी प्रयोग करायचाच माझ्या वर त्यासाठी त्याने पुन्हा माझ्या भुवया पाहत म्हणाला” साब, एक काम करता हूं, आप कि भोएं ठिक ठाक करता हूं.. ठीक है” त्याला केसाला कलर करुन नको असे सांगून त्याचं मन मी दुखावलंच होतं… आता चार भुवयावरील केसंच काढतो म्हणत आहे तर काढू दे बापडा हा उच्च विचार करुन मी त्याला बरं कर म्हणलो… थोड्या वेळाने कळालं कि तो माझा उच्च नाही तर हुच्च विचार होता.

त्याने कसलासा तरी धागा आपल्या ड्राव्ह मधून काढला व थोडी पावडर माझ्या भुवयाच्या मध्ये लावली व धाग्याचे एक टोक हातात व एक तोंडात पकडून त्याचे त्याचा काहीतर शस्त्रासारखा वापर चालू करुन अक्षरश: माझ्या भुवयावरील केसं उपटू लागला, मला वाटलं होतं कात्री ने नाही तर वस्तराने करेल केसं कमी तर हा लेकाचा एक एक केसांना उखडून काढत होता… भयानक त्रास होत होता एक केस जेथून निघे तेथे रक्त आलं की काय असं वाटतं होतो, तो आपलं ते शस्त्र चालवत म्हणाला “साब, अब देख ना आपका चेहरा आप को भी नया दिखेगा” माझ्या डोळ्यात आसवं जमा झाली होती व मी आता सुरवात झालीच आहे ह्याचा कुठे तरी अंत असेल असा विचार करुन त्याचे अत्याचार सहन करत राहिलो, थोड्यावेळाने त्याने आपले शस्त्र म्यान केले व माझं थोबाड परत साफ करत म्हणाला “देखो साब, हो गया कितना आसान था” मी माझ्या भुवया चोळत म्हणालो ” बहोत आसान था… कितना हुवा “

खिश्यातून दिलेले अडीचशे रुपये, कोरलेल्या भुवया व माझा न उजळलेलं थोबाड घेऊन मी तेथून बाहेर पडलो. व शिकलेली अक्कल आपल्या मेंदुमध्ये कुठेतरी खुणगाठ बांधावी तशी बाधून स्वतःशीच निर्णय घेतला की आज पासून आपल्या थोबाडावर कुणालाच प्रयोग करुन द्यायचे नाहीत… जे आहे, जसं आहे तसं आपलं !

हा विचार करुन आपल्या घराकडे चाललो तर एक मित्र भेटला व म्हणाला ” क्या हाल है, अच्छे दिख रहे हो, दाढी-मुछ कटवाई बढिया किया, एक काम कर ना जो तुम्हारा डॉक्टर दोस्त है ना, उसको बोल तेरी तेढीं नाक व सींधा कर दे! एकदम हिरो लगेगा भाई तु ” माझ्या चेहराचा बदललेला रंग व मी माझं पायतान हात घेण्यासाठी खाली वाकलो…. हे पाहताच तो सुसाट सटकला तेथून !

माझं थोबाड समाप्त !