राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

Category Archives: other

मैं तैनू फ़िर मिलांगी (अमृता प्रीतम) इतर भाषेतील रत्ने – भाग -३

प्रेम म्हणजे अनुभूती असते, असेच कधी तरी मी व माझा मित्र प्रेम या विषयावर चर्चा करत होतो. नवतारुण्याच्या उंबरठ्यावर आम्ही दोघे ही तेव्हा होतो त्यामुळे भावना महत्त्वाची की संबध महत्त्वाचे यावर चर्चा चालू होती, अचानक त्या चर्चे मध्ये आमचीच एक मैत्रीण सामील झाली. सर्व चर्चा ऐकल्यावर तीने फक्त आपल्या केबीन मधून एक डायरी घेऊन आली व खालील कविता समोर ठेवली, अमृता प्रीतम यांची.

मैं तैनू फ़िर मिलांगी
कित्थे ? किस तरह पता नई
शायद तेरे ताखियल दी चिंगारी बण के
तेरे केनवास ते उतरांगी
जा खोरे तेरे केनवास दे उत्ते
इक रह्स्म्यी लकीर बण के
खामोश तैनू तक्दी रवांगी

जा खोरे सूरज दी लौ बण के
तेरे रंगा विच घुलांगी
जा रंगा दिया बाहवां विच बैठ के
तेरे केनवास नु वलांगी
पता नही किस तरह कित्थे
पर तेनु जरुर मिलांगी

जा खोरे इक चश्मा बनी होवांगी
ते जिवें झर्नियाँ दा पानी उड्दा
मैं पानी दियां बूंदा
तेरे पिंडे ते मलांगी
ते इक ठंडक जेहि बण के
तेरी छाती दे नाल लगांगी

मैं होर कुच्छ नही जानदी
पर इणा जानदी हां
कि वक्त जो वी करेगा
एक जनम मेरे नाल तुरेगा
एह जिस्म मुक्दा है
ता सब कुछ मूक जांदा हैं

पर चेतना दे धागे
कायनती कण हुन्दे ने
मैं ओना कणा नु चुगांगी
ते तेनु फ़िर मिलांगी
(पंजाबी)

(हिंदी) मैं तुझे फ़िर मिलूंगी
कहाँ किस तरह पता नही
शायद तेरी तख्यिल की चिंगारी बन
तेरे केनवास पर उतरुंगी
या तेरे केनवास पर
एक रहस्यमयी लकीर बन
खामोश तुझे देखती रहूंगी

या फ़िर सूरज कि लौ बन कर
तेरे रंगो में घुलती रहूंगी
या रंगो कि बाहों में बैठ कर
तेरे केनवास से लिपट जाउंगी
पता नहीं कहाँ किस तरह
पर तुझे जरुर मिलूंगी

या फ़िर एक चश्मा बनी
जैसे झरने से पानी उड़ता है
मैं पानी की बूंदें
तेरे बदन पर मलूंगी
और एक ठंडक सी बन कर
तेरे सीने से लगूंगी

मैं और कुछ नही जानती
पर इतना जानती हूँ
कि वक्त जो भी करेगा
यह जनम मेरे साथ चलेगा
यह जिस्म खतम होता है
तो सब कुछ खत्म हो जाता है

पर चेतना के धागे
कायनात के कण होते हैं
मैं उन कणों को चुनुंगी
मैं तुझे फ़िर मिलूंगी !!
कविता वाचली, जिवनात पहिल्यांदा अमृता प्रीतमच्या लेखनीची ओळखत त्या वेळी झाली. अद्भुत! मागे मी लिहले होते, प्रत्येक गोष्ट शब्दात व्यक्त करणे जवळ जवळ अशक्य असते, तसे काहीसे घडलं होते जेव्हा ही कविता सर्वात प्रथम वाचली होती तेव्हा. त्यानंतर अनेक पारायणे झाली या कवितेची, प्रत्येक वाचनानंतर खूप काही नवीन सापडतं जातं या कवितेत. व ज्यांना अमृता प्रीतम व त्यांचे जीवन या बद्दल थोडेफार जरी माहिती असेल तर या कवितेचे मर्म समजेल.

काही व्यक्ती जिवन स्वप्नवत जगतात, त्यातील एक म्हणजे अमृता प्रीतम. स्त्रीची व्यथा, दुखः त्यांनी सशक्तपणे आपल्या लेखनीद्वारे व्यक्त केल्या. “मैं तैनू फ़िर मिलांगी” ही फक्त कविता नाही आहे. आपल्या प्रेमीची वाट पाहत असलेल्या प्रियसीच्या अतंरगातील अवस्था आहे , अमृता जेव्हा खूप आजारी होत्या व त्यांना आपल्या अंताची कल्पना आली होती तेव्हा ही कविता त्यांनी इमरोज साठी लिहली होती. अमृतासाठी इमरोज काय होते हे त्यांच्या लेखनीतून वारंवार येत असे, पण ही कविता म्हणजे इमरोज वर त्यांचे असलेल्या उत्कंठप्रेमाची साक्ष आहे.

प्रेम, विरह, मिलन या तीन गोष्टीवर उभी असलेली ही कविता, पाहताना साधी वाटते एकदम सोपी शब्द रचना पण जेव्हा त्यातून अर्थ ध्वनीत होतो, जेव्हा त्या कवितेचा भावार्थ आपल्याला समजतो तेव्हा ही कविता आपल्या मनाच्या कुठल्यातरी नाजुक कोपर्‍याला हलकसे स्पर्श करुन जाते. प्रत्येक ओळ आणि ओळ आपल्या समोर कवियत्रीच्या मनातील भावना चित्रवत उभ्या करतात.

मैं तैनू फ़िर मिलांगी
कित्थे ? किस तरह पता नई
शायद तेरे ताखियल दी चिंगारी बण के
तेरे केनवास ते उतरांगी
जा खोरे तेरे केनवास दे उत्ते
इक रह्स्म्यी लकीर बण के
खामोश तैनू तक्दी रवांगी

मी तुला कशी, कुठे भेटेन माहिती नाही, शक्यतो तुझ्या कुठल्यातरी कलाकृतीतील अनुभुती म्हणून, एखादी मनातील तेजस्वी कल्पना म्हणून, एक कलाकृती म्हणून येईन व तुझ्या केनवास वर अवतरीत होईन. नाहीतर त्याच केनवासवर एक रेघ म्हणून असेल, तुला नकळत तुला पाहत राहीन. काय सहज सुंदर कल्पना आहे, आपल्याच प्रेमीच्या कलाकृतीमध्ये येण्याची आस, ती रचना. वाचताना आता सोपं वाटतं, पण थोडं विचार करून पाहिले की लक्ष्यात येईल ही विरह नक्की आहे, कवयत्रीला तो मान्य देखील आहे पण तीची इच्छा आहे परत येण्याची आपल्या आवडत्या व्यक्तीकडे. शक्य नसेल तर इतर माध्यमातून पण यायचे आहे, त्याच्यात हरवून जायचे आहे.

जा खोरे सूरज दी लौ बण के
तेरे रंगा विच घुलांगी
जा रंगा दिया बाहवां विच बैठ के
तेरे केनवास नु वलांगी
पता नही किस तरह कित्थे
पर तेनु जरुर मिलांगी

उच्च! वरील ओळी शब्दात कश्या व्यक्त कराव्यात, शब्द अपुरे पडत आहेत. कसं ही करून मला तुझ्या सोबतच रहायचे आहे, तुझ्यापासून मी दुर राहू शकत नाही ही भावना व अतुट प्रेमाची उच्चतम अवस्था अश्या प्रकारे सहज भाषेत व्यक्त करणे अमृताच जाने. तिला विश्वास आहे, ती नसली तरी प्रेमीच्या मनातून, त्याच्या अंतरंगातून ती कधीच जाणार नाही म्हणून तीला खात्री आहे, त्याच्या कलाकृती मधून, रंगाच्या छटामधून ती डोकावत राहिल, अनेक वेळा.

जा खोरे इक चश्मा बनी होवांगी
ते जिवें झर्नियाँ दा पानी उड्दा
मैं पानी दियां बूंदा
तेरे पिंडे ते मलांगी
ते इक ठंडक जेहि बण के
तेरी छाती दे नाल लगांगी

वाह क्या बात है, वेगाने उसळणार्‍या, मुक्त होऊ पाहत असलेल्या एका पाण्याचा झरा व्हावे, नाही तर एक ठेंब होऊन तुझ्यात विरून जावे. मिलन! या पेक्षा उत्कृष्ट मिलन दुसरे कुठले असू शकते ? रचनेचा भावार्थ जर पाहिला तर तुझी माझी भेट कशी व्हावी, तर ती अशी असावी की मी तुझ्यात व तु माझ्यात विरून जावे. जी व्यक्ती खरचं वाहत्या पाण्यासारखं जगली असेल, मनसोक्त, आपल्याला हवे तसे तीच एवढी सुंदर रचना उभी करू शकते, ज्यांनी त्यांचे आत्मचरित्र वाचले असेल त्यांना ते लगेच समजेल, आजच्या काळात लिव्ह-ईन-रिलेशन लोकांना पचनी पडत नाही तेथे अमृता प्रितम १९४०-४५ च्या आसपास लिव्ह-ईन-रिलेशन मध्ये राहत होत्या, इमरोज त्यांच्यापेक्षा वयांनी लहान होते. या वरून कल्पना येईल.

मैं होर कुच्छ नही जानदी
पर इणा जानदी हां
कि वक्त जो वी करेगा
एक जनम मेरे नाल तुरेगा
एह जिस्म मुक्दा है
ता सब कुछ मूक जांदा हैं

पर चेतना दे धागे
कायनती कण हुन्दे ने
मैं ओना कणा नु चुगांगी
ते तेनु फ़िर मिलांगी

जीवन-मरण, शरीर-आत्मा काहीच नाही, काळाच्या ओघात सगळे नष्ट होईल, मला माहिती आहे. मला तुझ्या सोबत रहायचे आहे पण हळूहळू सगळे नश्वर होत चालले आहे, मी ही जाईन, अशी वेळी येईल की सर्व संपलेले असेल. अमृता प्रीतम नी ही कविता फक्त लिहलेली नाही आहे तर जगल्या आहेत. प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ त्यांच्या अंतर्मनातून उमटत जात आहे हे वाचणार्‍याला समजतं, म्हणून म्हणालो त्या कविता जगल्या आहेत. अनेकवेळा छोट्या छोट्या गोष्टी आपण विसरत असतो, अचानक नाती तोडतो, एखाद्याचे भावविश्व आपण उद्घवस्त करतो नकळत त्यावेळी आपण जीवनाचे सत्य कुठेतरी विसरतो. त्या म्हणतात “कि वक्त जो भी करेगा” काळाला काय करायचे आहे ते करू दे, हा वेळ तर तो माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. शरीर जाणार आहे, मी जाणार आहे पण कुठे ना कुठेतरी मी तुझ्या सोबत असेन, तुझ्या मनात, तुझ्या हदयात. एक एक अणू-रेणू गोळा करेन, स्वतःला पुन्हा तुझ्या समोर घेऊन येईन, काही होवो तु व मी कधी ना कधी तरी एक नक्कीच होऊ, तेथे बंधन नसेल, तेथे नश्वर वस्तुची गरज नसेल फक्त तु व मी असू आपली भावना, प्रेम असेल. काही हो आपण पुन्हा एकत्र येऊ. प्रबभ इच्छा व उत्कठ प्रेम यांचा संगम म्हणजे ही कविता. आपल्या एक एक अक्षरातून आपल्या समोर उभी राहत जाणारी एक प्रेम कविता.

तुम्हारे इकरार को फूल की तरह नहीं पकड़ा था, अपनी मुट्ठी में भींच लिया था. वह कई बरस मेरी मुट्ठी में खिला रहा. पर मांस की हथेली मांस की होती है, यह मिटटी की तरह हमेशा जवान नहीं रहती. इस पर समय की सलवटें पड़ती हैं और जब यह बंजर होने लगती है तो इसमें उगा हर पत्ता मुरझा जाता है. तुम्हारे इकरार का फूल भी मुरझा गया…………अमृता प्रीतम

अमृताप्रीतम एक लेखिका, कवयत्री म्हणून जेवढ्या भावतात त्यापेक्षा ही जास्त त्यांच्यात असलेली प्रेमिका मला भावते, वादळी व्यक्तीमहत्त्व होते यात शंका नाही, त्यांच्या चांगल्या गोष्टीपेक्षा जास्त चर्चा त्यांच्या साहिर लुधयानवी सोबत असलेल्या संबधाच्या, इमरोज वर करत असलेल्या जिवापाड प्रेमाच्या व त्यांच्या सिगरेट पिण्यापासून त्यांच्या व्यक्तीगत सवयींच्याच झाल्या. पण ज्यांना त्यांची लेखनी भावली ते अमृता प्रितमला कधीच विसरू शकणार नाहीत, अशी एखादीच अमृता प्रीतम शतकामध्ये जन्मते, तिच्या लेखनी ला, तीच्या भावविश्व जपण्याच्या प्रवृत्तीला, स्वप्न पाहण्याची व ती खरी करण्याची जिद्दीला माझा मनापासून सलाम! ज्यांना भेटतं जेव्हा शक्य होतं तेव्हा भेटू शकलो नाही अश्या मोजक्याच व्यक्तीमध्ये अमृता प्रितम येतात याची हुरहुर मनाला कायम लागून राहील.

Advertisements

हरि बिन कूण गती मेरी।

नये साल की पहली सुबह तुम्हें क्या दूं मैं ?
एक फूल अमन के लिए,
एक बन्दूक आज़ादी के लिए,
एक किताब संग-साथ के लिए ?
तुम्हारी आंखों के लिए नयी चमक ?
तुम्हारे ख़ून के लिए नयी गरमी,
तुम्हरे प्रेम के लिए नयी नरमी,
दिल के लिए नयी आशा, संघर्ष के लिए नयी भाषा ?
नये वर्ष में दूर हों ग़म,
नये वर्ष में मिटें सितम,
नये वर्ष में दुख हों कम,
सिर झुकें नहीं, बांहें थकें नहीं,
टूटें सभी बेड़ियां, मिले नया दम ।

रचनाकार: नीलाभ

कधी कधी भाषेची भिंत उध्वस्त होते ती अश्या कवीच्या मुळे / लेखकांच्यामुळे.
मराठीमध्ये, हिंदीमध्ये व इतर अनेक भारतीय भाषेत अनेक कवी लेखक होऊन गेले, आहेत व येतील जे आपल्या या तणावपुर्ण जिवनात काही क्षण आपले साथी बनून राहतील. वरील कविता जेव्हा मी वाचली तेव्हा दंग राहिलो होतो. एक एक ओळ म्हणजे अप्रतिम आहे, प्रत्येक ओळ एवढी समर्थ आहे कवी समोर नतमस्तक व्हावे माणसाने.

सिर झुकें नहीं, बांहें थकें नहीं,
टूटें सभी बेड़ियां, मिले नया दम ।

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येवर लिहलेली असेल ही कविता त्यांनी. तरूण रक्ताला जागृत करण्यासाठी.. जोष, एक उल्हास निर्माण करण्यासाठी निर्मित झालेली असावी ही कविता.

काही कविता भुरळ घालतात मनात कुठेतरी घर करून राहतात, त्यामध्ये नावे घ्यावीत असे खूप आहेत पण एक नाव नक्कीच सर्वात प्रथम येईल माझ्या लिस्ट मध्ये मीरा !

अरे प्रेमात वेडे होणे म्हणजे काय हे मीराच्या भजनांकडे पाहिले की कळते. भक्तीची परमोच्च सीमा रेखा पार करून ज्याला इश्वर मानले त्याच्यावरच प्रेम करायचे व ते देखील एवढं उच्च किती हातात आलेला विषप्याला देखील अमृत म्हणून घ्यायचे, हा साधा खेळ नाही आहे. त्यासाठी मीराच व्हावे लागते, मीरा आपल्या समोर फक्त येते काव्य स्वरूपात, तीने केलेल्या तीच्या बोली भाषेतील रचनेत, राजस्थानी म्हणजे पहाडी आवाज असलेला, खडी बोली ज्याला म्हणतात अशी भाषा पण त्या भाषेची गोडी जरा वेगळीच आहे.
*
हरि बिन कूण गती मेरी।
तुम मेरे प्रतिपाल कहिये मैं रावरी चेरी॥

आदि अंत निज नाँव तेरो हीयामें फेरी।
बेर बेर पुकार कहूं प्रभु आरति है तेरी॥

यौ संसार बिकार सागर बीच में घेरी।
नाव फाटी प्रभु पाल बाँधो बूड़त है बेरी॥

बिरहणि पिवकी बाट जोवै राखल्यो नेरी।
दासि मीरा राम रटत है मैं सरण हूं तेरी॥
*

हरि बिन कूण गती मेरी।
तुम मेरे प्रतिपाल कहिये मैं रावरी चेरी॥

कृष्णा तुझ्या वाचून कोण माझे, मला या संसाराच्या भवसागरातून पार करण्यास तुच समर्थ, पण जर तूच जर नसशील तर माझे काय होईल. तुच माझे सर्वस्व आहेस व तूच माझी काळजी घेणारा आहे.. येथे मीरा स्वतःला रावरी चेरी म्हणत आहे, रावरी चेरी = कट्टर समर्थक हास्य कट्टर भक्त !

आदि अंत निज नाँव तेरो हीयामें फेरी।
बेर बेर पुकार कहूं प्रभु आरति है तेरी॥

अरे तुझे नाव माझ्या हदयात फेरे धरून नाचत आहे, क्षणाक्षणाला तुझी आठवण येत आहे, सुरवात तूच व माझा शेवट ही तूच, असे वेड्या सारखं तुझे नाव घेत आहे, पण याला वेडेपणा म्हणून नकोस हीच तुझ्यासाठी मी रचलेली आरती, पुजा आहे देवा !

यौ संसार बिकार सागर बीच में घेरी।
नाव फाटी प्रभु पाल बाँधो बूड़त है बेरी॥

या संसाराच्या विक्राल सागराच्या मध्यात मी अडकलेली आहे, तीच सुटका कर रे माझी, नाव फाटी , अरे या भवसागरात अडकत चाले आहे मी, तुच त्राता आहेस तूच मला यातून बाहेर काढशील… हात दे मला, या बुडत्या जहाजातून बाहेर पडण्यासाठी, पाल बाँधो प्रभु !

बिरहणि पिवकी बाट जोवै राखल्यो नेरी।
दासि मीरा राम रटत है मैं सरण हूं तेरी॥

मी, वाट पाहत आहे तुझी, ये व मला जवळ घे, आपल्यात सामावून घे माधवा, सगळे हरले आता, दासी झाली मीरा… तुझ्या नामस्मरण मध्येच दंग आहे, लवकर ये व आपल्या जवळ कर.

किती साध्या सोप्या बोली भाषेत लिहलेली रचना आहे, काही उदाहरणे देणे, त्यातून आपली अजोड भक्ती देवा समोर मांडणे व त्याची आर्जव करण्यासाठी धडपणे ही मीरा च्या रचनेची खासियत म्हणावी लागेल. प्रयेक ओळ आपल्या ह्दयाला स्पर्श करून जाते, तीच्या प्रेमाची, भक्तीची तुलना कोणाशी होऊच शकत नाही, मीरा ही मीराच आहे, दुसर्‍या एका रचनेत तीला माधवा बरोबर राधा ची उपस्थिती खलती आहे हे स्पष्ट म्हणते पण त्याच नंतर लगेच, राधा शिवाय तुझ्यावर एवढं प्रेम करणार म्हणून ती ची महती देखील कबूल करते. ही समर्पणाची भावना मीरा च्या शब्दाशब्दांत आहे म्हणून ती मला जरा वेगळीच भासते, आवडते.

आता जरा वेगळी रचना.. माझ्या अत्यंत आवडत्या गझलकराची निदा फ़ाज़ली यांची !

कुछ तबीयत ही मिली थी ऐसी चैन से जीने की सूरत ना हुई
जिसको चाहा उसे अपना ना सके जो मिला उससे मुहब्बत ना हुई

जिससे जब तक मिले दिल ही से मिले दिल जो बदला तो फसाना बदला
रस्में दुनिया की निभाने के लिए हमसे रिश्तों की तिज़ारत ना हुई

दूर से था वो कई चेहरों में पास से कोई भी वैसा ना लगा
बेवफ़ाई भी उसी का था चलन फिर किसीसे भी शिकायत ना हुई

वक्त रूठा रहा बच्चे की तरह राह में कोई खिलौना ना मिला
दोस्ती भी तो निभाई ना गई दुश्मनी में भी अदावत ना हुई

किती स्पष्ट व अर्थपुर्ण रचना !
पहिली ओळ “कुछ तबीयत ही मिली थी ऐसी चैन से जीने की सूरत ना हुई” पाया आहे तर शेवटीची ओळ “दोस्ती भी तो निभाई ना गई दुश्मनी में भी अदावत ना हुई” कळस आहे.

दोस्ती भी तो निभाई ना गई दुश्मनी में भी अदावत ना हुई
मैत्री करणे जमलेच नाही ते तर सोडा, पण दुश्मनी करण्यासाठी गेलो तर साधी दुश्मनी (अदावत) पण नाही झाली…. क्लास !

रस्में दुनिया की निभाने के लिए हमसे रिश्तों की तिज़ारत ना हुई

मरजावां ! काय लिहू मी ओळीसाठी हास्य जगाची रित जरा वेगळी असते, येथे टिकण्यासाठी काही गोष्टी करणे गरजेचे , पण त्याच गोष्टी मला करता नाही आल्या, नात्यांचा धंदा / व्यापार करता नाही आला मला.

आता थोडा आराम… पुन्हा कधी तरी असेच लिहीन काही माझ्या मनातील आवडत्या कवितेच्या संदर्भात !

मी रोबोट पाहिला………….

थांबा थांबा, का पाहिला म्हणून शिव्या देण्याआधी.

१. फुकट पाहिला wink

२. काल बीबीसीवर रोबोटला ५ तारे दिलेले पाहिले व रिपोर्टर बाईंनी पहाच असा शेरा दिला होता म्हणून…

दिल थाम के बैठीए !!!!
आ रहा है रोबोट

**************

रोबोट – आय-रोबोट – टर्मिनेटर – मॅट्रिक्स ह्यांची भेसळ व Bicentennial Man चा गाभा घेऊन तयार केलेला हा चित्रपट !
विचार करा एवड्या हिट – सुपर डुप्पर हिट चित्रपटातील स्टंट, भावनात्मक दृष्ये व इफेक्क्ट वापरल्यावर चित्रपटाचे काय होणार ?
कचरा. हो निव्वळ कचरा आहे हा चित्रपट.
रोबोट काही ही करु शकतो हे दाखवण्याचा अट्टाहास म्हणजेच हा “रोबोट” चित्रपट.
रजनीकांत थोडा सुसह्य आहे ह्या चित्रपटात हे नशीब व त्या अ‍ॅशच्या जागी पुर्ण चित्रपटात तीची बाहुली जरी ठेवली असती तरी चालले असते, डोळ्यात कायम तेच अडाणि असल्या सारखे भाव व अत्यंत हाणामारीच्या प्रसंगात देखील ढिम्म ते ढिम्मच… !!!

रजनीकांत एक रोबोटिक सायन्स मधला मोठा शास्त्रज्ञ आहे व तो रोबोट एक रोबोट तयार करण्यासाठी गेली दहा वर्ष झटत असतो… पुर्ण लॅब मध्ये एक रजनीकांत व दोन सपोर्टिंग स्टाफ ! बस्स ! एवढेच जण मिळून रोबोट तयार करतात, थोडे फार रजनीला कमी काम असावे असे वाटल्यांने रोबोट पण रजनीकांत सारखाच दाखवला आहे wink

असो,

रोबोट तयार होतो पण त्या नंतर, त्याला बेसिक काही माहित नसते सामान्य समाजाचे नियम इत्यादी. ह्यामुळे तो काही थोडेफार गोंधळ घालतो , पण ते चालून जाते. हा रोबोट खरं तर सैन्यासाठी तयार केलेला असतो पण तो सैन्याकडे घेऊन जाण्याआधीच त्याला समाजामध्ये टेस्टिंगसाठी सोडतात Laughing out loud मायला ! एखादा प्रयोग सरळ सरळ पब्लिकवरच करायची आयडिया चांगली आहे wink .

असो,

तर तो अ‍ॅशला गुंडाच्या तावडीतून सोडवतो, लोकल ट्रेन वर जी-फोर्स नियमाच्या विरुध्द आडवा पळतो, वाटेल तश्या उड्या मारतो, महा-आगीतून लोकांना वाचवतो !!!! च्यामायला जगाला आग लागलेली असते व एक युवती त्यावेळी बाथ टब मध्ये अंघोळ करत बसलेली असते, रोबोट जाऊन तिला वाचवून आणतो तर ती आत्महत्या करते का तर म्हणे तिला नग्न अवस्थेत उचलून घेऊन आला म्हणून व मिडिया व तिचे घरवाले तीचा जीव वाचलेला आहे हे महत्वाचे नाहीतर ती नग्न आहे हे दाखवण्यासाठी/ सांगण्यासाठी धडपड करत असतात, म्हणून ती आत्महत्या करते Laughing out loud .

पण हे देखील माफ केलं ! पण एक गोष्ट पचनी पडत नाही स्वतःला रिचार्ज करण्यासाठी त्याला कुठलाही म्हणजे अगदी लोकल ट्रेनला असलेला पॉवर सप्लाय असो व गाडीची बॅटरी असो काही चालते, एसी, डीसी, हाय व्होल्टेज, लो व्होल्टेज ह्याचा काहीच परिणाम त्याच्या सर्किटवर होत नाही Laughing out loud हे बी माफ केलं !!!!

जो मानव रजनीकांत असतो तो त्याला सैन्यासमोर उभा करतो डेमोसाठी, पण आपला डॅनी जो त्या टीममध्ये असतो तो रोबोला भावना नाहित म्हणून रिजेक्ट करतो Sad लगेच रजनी ( आपला मानव रजनी) रोबोटला काही मिनिटामध्येच काही प्रयोग न करता भावना इत्यादी समजावून देणेसाठी हात चोळत त्या रोबोटच्या मागे लागतो. त्याच वेळी वीज ( आकाशातील बरं का ) त्या रोबोट च्या अंगावर पडते, व त्याला काहीच होत नाही फक्त त्यांचे वरील रबराचे आवरण जळते पण त्याच्यात आपोआप काही सॉफ्टवेअर इत्यादी न अपग्रेड करता मानवासारख्या भावना निर्माण होतात Laughing out loud .

असो,

जो मानव रजनी आहे त्यांची प्रियसी बच्चनची अ‍ॅश !
रोबो रजनी देखील त्या अ‍ॅशवरच प्रेम करु लागतो मग लफडा चालू होतो.
त्याला म्हणजे रोबोटला देखील अ‍ॅशच हवी असते wink
त्याच वेळी मानव रजनी, परत एकदा रोबोटचा डेमो सैन्यासमोर करुन दाखवणार असतो, हा रोबोट तेथे सैन्य अधिकारांच्या समोर प्रेमावर लेक्चर देऊन येतो Big smile

मग काय , पुन्हा रिजेक्ट ! मग मानव रजनी भडकतो व रोबोटचे तुकडे तुकडे करुन टाकतो Sad

बरं तुकड्यांची विलेवाट लावण्याची काही पध्दतच नाही, सरळ उचलून कचरा डेपो मध्ये जगातील सर्वात अ‍ॅडवान्स असा रोबोट टाकलेला असतो, ज्याच्या मागे जगभरातील आतंकवादी त्यांना हुमन बॉम्ब तयार करण्यासाठी हवा असतो तो ! कप्पाळ माझे !!!!

असो,

डॅनी हा देखील रोबो शास्त्रज्ञ असतो पण त्याचा रोबो चालू पण शकत नसतो व तो मानव रजनीचा गुरु असतो wink
पण डॅनी साईड बिझनेस म्हणून आतंकवाद्यांना रोबोट पुरवण्याचे काम देखील करत असतो त्याला रजनीच्या रोबोट मधील कोड / प्रोग्रम हवा असतो मम्हणून तो त्या रोबोटला कचरा डेपोतून आपल्या लॅबमध्ये घेऊन येतो व त्याला पुन्हा तयार करतो, च्यामायला ज्या माणासाचा रोबो सरळ चालू शकत नाही तो माणूस तुटलेला रोबो पुन्हा तयार करतो व हे कमी म्हणून वाईट / हिंसेसारखी अवगुण तो त्याच्यात भरतो, म्हणजे मानव रजनीला मानवासारखे गुण ( भावना) भरण्यासाठी आकाशातील विजेचा व योगायोगाचा सहारा घ्यावा लागतो पण हा मात्र लगेच एक चिप लावतो व लगेच रोबोट हिंसक होतो.., धडाधडा पोलिसांना चने-फुटाणे खावे तसे मारत अ‍ॅशला पळवून घेऊन येतो !
काही मिनिटामध्येच कुठली ही साधन सामुग्री न वापरता आपल्या सारखे हजारो रोबोट तयार करतो व त्यांची फौज तयार करुन त्यांना आपला गुलाम म्हणून पदरी ठेवतो, राहला जागा हवी म्हणून सरळ सैन्य मुख्यालय ताब्यात घेतो. सेक्स करता यावे म्हणून आपल्यामध्ये हवे ते बदल करुन घेतो Crazy .
लै मज्जा !

असो….
पण त्याला(रोबोटला) फसवून आपला मानव रजनी त्यांचा सारखा वेश करुन त्यांच्या टिममध्ये घुसतो wink त्याला कोणीच ओळखत नाही… मग अ‍ॅशला भेटतो व तिला त्याच्या चुंगल मधून वाचवण्याचा प्रयत्न सुरु करतो. रोबोटला शंका येते ( कुठली ते विचारु नका ) मग तो सगळ्या रोबोट मधून त्याला शोधतो…. पण त्याला मारायच्या आधीच सैन्य त्यांच्यावर ( रोबोच्यावर) हल्ला करतं ! मग मानव रजनी अ‍ॅशला घेऊन बाहेर येतो व एका टिनपाट व्हॅनमध्ये बसून तो जगातील सर्वात अडव्हांन्स रोबोटमध्ये व्हायरस / कोड ब्रेक करण्याचा प्रयत्न चालू करतो…

तो पर्यंत रोबोट आपले वेगवेगळे कारनामे दाखवू लागतो मग तुम्हाला अचानक भास होऊ लागतात की तुम्ही मॅट्रिक्स पाहत आहात, तुम्ही टर्मिनेटर पाहत आहात की तुम्ही आय रोबोट पाहत आहात Laughing out loud.

पुन्हा असो,

वेगवेगळे अचाट प्रयोग दाखवून, दोन्ही हातानी शेकडो एके-४७ चालवून, अनेक गाड्यांचा विध्वस करत, शेकडो पोलिसांना मारत हा रोबोट आपले कारनामे दाखवत राहतो.. शेवटी कसा बसा एकटा महामानव रजनी रोबोटवर कंन्ट्रोल करण्यात यशस्वी होतो, हे राम !

मग चित्रपट संपतो ( थोडेफार लफडे आहे पण ते सांगायची ताकत नाही राहिली हो माझ्यात…… pray )

या आपले स्वागत आहे…

श्री गणेशाचा आशिर्वाद घेऊन हा ब्लॉग येथे नवीन पत्तावर चालू करत आहे.
पुर्वी सारखेच भरभरुन तुमचे प्रेम मला येथे देखील भेटेल ही अपेक्षा.

आपलाच,

राज जैन

श्याम पिया मोरी ,रंग दे चुनरिया ॥

राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन!
मन मेरा बन गया सखी री सुँदर वृँदावन
कान्हा की नन्ही ऊँगली पर नाचे गोवर्धन
राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन!
मन मेरा बन गया सखी री सुँदर वृँदावन।

श्याम सांवरे, राधा गोरी, जैसे बादल बिजली!
जोड़ी जुगल लिए गोपी दल, कुञ्ज गलिन से निकली,
खड़े कदम्ब की छांह, बांह में बांह भरे मोहन!
राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन !

वही द्वारिकाधीश सखी री, वही नन्द के नंदन!
एक हाथ में मुरली सोहे, दूजे चक्र सुदर्शन!
कान्हा की नन्ही ऊँगली पर नाचे गोवर्धन!
राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन

जमुना जल में लहरें नाचें , लहरों पर शशि छाया!
मुरली पर अंगुलियाँ नाचें , उँगलियों पर माया!
नाचें गैय्याँ , छम छम छैँय्याँ , नाच रहा मधुबन!
राधा नाचे कृष्ण नाचे , नाचे गोपी जन!
मन मेरा बन गया सखी री सुँदर वृँदावन.

– पँडित नरेन्द्र शर्मा

radha


काहीतरी शोधताना अचानक वरील रचना दिसली व नकळत ब्रिजभूमी, वृँदावन, गोवर्धन नजरेसमोर आकार घेऊ लागले व अनेक दिवसापासून मनात सुप्त इच्छा होती की राधाकृष्ण ह्यांच्यावर आपण कधीतरी लिहावे म्हणून हा लेखन प्रपंच.

राधाकृष्ण ! जय राधे राधे, हरियाणामध्ये राम राम जेवढे प्रिय आहे तेवढेच हे दोन्ही शब्द देखील. आज ही जेव्हा कधी हे शब्द कानावर पडत तेव्हा एक वेगळीच अनुभुती होत असे. एकदा मनात असेच आले की नाही एवढे जवळ आहोत तर मथुरा-वृंदावन-गोवर्धन करु येऊ एकदा. भटकंती झाली, फिर फिर फिरलो सगळा भाग. जेवढा कृष्ण माहित होता तो महाभारतामुळे व थोडेफार गुणीजणांचा सत्संग हरिद्वारमध्ये लाभल्यामुळे. पण ह्या मथुरा-वृंदावन-गोवर्धनवारी नंतर कृष्ण जाणून घेण्याची व त्यापेक्षा आधिक राधिकाराणी ला समजून घेण्याची ललक मनामध्ये येऊ लागली व त्यांनतर शोध घेत, वाचन करत, थोरामोठ्यांना विचारलेल्या प्रश्नातून व आलेल्या उत्तरातून कृष्ण-राधिका मला समजतील का ह्याचे विवेंचन करु लागलो.

राधा !

एक अदभुत व्यक्तीरेखा. श्री कृष्णाच्या जिवनकथेतील एक महत्वाचा भाग. जीच्या शिवाय श्री कृष्ण पुर्ण होत नाही ना कृष्णकथा. प्रेमस्वरुप राधा, कृष्णाची सखी, प्रेमिका राधा, रायाण पत्नी राधा, ब्रीजची राधारानी. राधा राधा.. यत्र सर्वत्र राधा ! कृष्ण जीवन कथा राधामय होतं. सर्वात आधी कृष्ण म्हणजे देव हा विचार बाजूला ठेऊन मी लिहतो आहे माझ्या मते कृष्ण देवत्वाला पोहचलेला एक कसलेला राजकारणी, योध्दा व राजा होता जो आपल्या गुणामुळे, बुध्दी चातुर्यामुळे व डावपेचामुळे जिवनात यशस्वी झाला त्याच्या कथेतील एक भाग म्हणा अथवा जीने त्यांचे जीवन व्यापुन टाकले अशी राधा म्हणा. ही एक कल्पना आहे असे ही समजले जाते कारण जेथे साक्षात कॄष्णाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले नाहीत तेथे राधाचे कोठून मिळणार. त्यामुळे ह्या लेखाला काही इतिहास संदर्भ नाही आहे ना त्याचा मी कुठे शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसे पाहता महाभारतात कुठेच राधेचा संदर्भ येत नाही की उल्लेख पण जनसामान्यात राधेचा उल्लेख हा कृष्णाआधी येतो हे देखील नवलच नाही का ?

राधेकृष्ण…

राधा कोण हा प्रश्न महत्वाचा नाही आहे पण कृष्णावर तीची असिम भक्ती होती व ती कृष्णमय झाली. कृष्णाची बासरीची धुन जेव्हा जेव्हा परमसीमेवर पोहचत असे तसे तसे राधिकाराणी आपोआप कृष्णाजवळ खेचली जात असे. प्रेम भावना, कृष्णाला भेटण्याची अतिव इच्छामुळे अथवा प्रेमाचे अदभुत संगीतामुळे म्हणा पण ती मंत्रमुग्ध होऊन कृष्णमय होत असे. राधा शिवाय कृष्ण नाही व कृष्णाशिवाय राधा नाही ! कदंबाचे झाड कृष्णला अतीप्रिय तो नेहमी आपली बासुरी कदंब वृक्षाखाली बसून वाजवत असे. कृष्ण बासुरी वाजवतो आहे व राधा हलकेच डोके त्याच्या खांद्यावर ठेऊन मंत्रमुग्धपणे ते स्वर आपल्या हदयामध्ये जपून ठेवत आहे हे तर प्रसिध्द चित्र.

2

राधाकृष्ण ह्यांच्या नात्याची फोड करणे हे अत्यंत किल्ष्ट आहे, पुढील अनेक युगामध्ये ही प्रेमगाथा कधी कथेतून कधी बोली भाषेच्या गाण्यातून, संताच्या शब्दातून समोर येत गेली पण त्याचे सौंदर्य तसेच टिकून राहीले. तसे पाहता त्यांची कथा ही जगावेगळी प्रेमकथा आहे, सामजिक बंधन आहे, वयामध्ये खुप मोठे अंतर आहे, निर्मळ असे प्रेम आहे व वर्षानूवर्ष सहन करावा लागणारा विरह आहे व अनेक वर्षाच्या विरहानंतर फक्त काही क्षणाची भेट आहे ती ही दुरुन. पांडवांनी कुरुक्षेत्रामध्ये यज्ञकर्म केले होते त्यासाठी अन्य गोकुळवासीच्या बरोबर राधा देखील तेथे गेली होती अनेक वर्षाच्या ताटातूटीनंतरची ही अंतःकरणाला वेदना देणारी भेट, काही क्षणाची. काय वाटले असेल तेव्हा राधेला ? कृष्णाचे काय तो तोपर्यंत देवत्वाला पोहचला होता त्याच्या शिरावर भारतभूमीच्या उध्दाराचे अगणित काम होते व तोच त्याचा ध्यास होता, जी गीता त्याने अर्जूनाला सांगितली होती तीच त्याला रोज मनन करावी लागत होती, युध्दातून, राजकारणातून, डावपेचातून एखाद क्षण दिवसभरात त्याला कधी तरी मिळत असेल तेव्हा तो एकांतामध्ये राधा बरोबर असताना व्यतीत केले क्षण आठवत असेल, पण राधा ? घरातील कामे आवरली, गायी-म्हशींचे चारापाणी निपटले व त्यानंतर पुर्ण दिवसरात्र ती कृष्णमय होऊन जात असे. त्या बिचारीला ह्या शिवाय काय काम असणार ? ना ती शस्त्र हातीधरून सत्यभामे सारखे कृष्णाबरोबर जाऊ शकत होती अथवा ना ती कृष्णाएवढी प्रगाढ पंडित होती की उभ्या उभ्या जगाला गीतेचे अमृत पाजेल. ती तर साधीभोळी निरागस राधा. कृष्ण कृष्ण कृष्ण जपाशिवाय तिला दुसरे काही जमलेच नाही.

आता थोडे कळले आधी राधा का ते.. राधेकृष्ण……

पुढील भागात आपण थोडे खोलवर जाऊ.

( क्रमशः )

कबीर – सत्याचा आरसा

१४ जून म्हणजे संत कबीर ह्यांचा जन्म दिवस.

ह्यांच्या बदल मला जास्त काही माहिती नाही आहे पण.. ह्यांची व माझी ओळख ही अशीच त्यांच्या दोहयातून होत गेली व हा संत म्हणण्यापेक्षा कवी कधी मनात घर करुन बसला ते कळलेच नाही. साध्या सोप्या शब्दामध्ये जीवनाचे मर्म त्यांनी व्यक्त करुन दाखवले.

चाह मिटी, चिंता मिटी मनवा बेपरवाह ।
जिसको कुछ नहीं चाहिए वह शहनशाह॥

माटी कहे कुम्हार से, तु क्या रौंदे मोय ।
एक दिन ऐसा आएगा, मैं रौंदूगी तोय ॥

माला फेरत जुग भया, फिरा न मन का फेर ।
कर का मन का डार दे, मन का मनका फेर ॥

तिनका कबहुँ ना निंदये, जो पाँव तले होय ।
कबहुँ उड़ आँखो पड़े, पीर घानेरी होय ॥

गुरु गोविंद दोनों खड़े, काके लागूं पाँय ।
बलिहारी गुरु आपनो, गोविंद दियो मिलाय ॥

सुख मे सुमिरन ना किया, दु:ख में करते याद ।
कह कबीर ता दास की, कौन सुने फरियाद ॥

साईं इतना दीजिये, जा मे कुटुम समाय ।
मैं भी भूखा न रहूँ, साधु ना भूखा जाय ॥

धीरे-धीरे रे मना, धीरे सब कुछ होय ।
माली सींचे सौ घड़ा, ॠतु आए फल होय ॥

कबीरा ते नर अँध है, गुरु को कहते और ।
हरि रूठे गुरु ठौर है, गुरु रूठे नहीं ठौर ॥

माया मरी न मन मरा, मर-मर गए शरीर ।
आशा तृष्णा न मरी, कह गए दास कबीर ॥

रात गंवाई सोय के, दिवस गंवाया खाय ।
हीरा जन्म अमोल था, कोड़ी बदले जाय ॥

दुःख में सुमिरन सब करे सुख में करै न कोय।
जो सुख में सुमिरन करे दुःख काहे को होय ॥

बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर।
पंथी को छाया नही फल लागे अति दूर ॥

साधु ऐसा चाहिए जैसा सूप सुभाय।
सार-सार को गहि रहै थोथा देई उडाय॥

साँई इतना दीजिए जामें कुटुंब समाय ।
मैं भी भूखा ना रहूँ साधु न भुखा जाय॥

जो तोको काँटा बुवै ताहि बोव तू फूल।
तोहि फूल को फूल है वाको है तिरसुल॥

उठा बगुला प्रेम का तिनका चढ़ा अकास।
तिनका तिनके से मिला तिन का तिन के पास॥

सात समंदर की मसि करौं लेखनि सब बनराइ।
धरती सब कागद करौं हरि गुण लिखा न जाइ॥

साधू गाँठ न बाँधई उदर समाता लेय।
आगे पाछे हरी खड़े जब माँगे तब देय॥

काही निवडक दोहे व त्यांचा मला समजलेला अर्थ.

*

चाह मिटी, चिंता मिटी मनवा बेपरवाह ।
जिसको कुछ नहीं चाहिए वह शहनशाह॥

वाह !

इच्छा, लोभ हे सगळे माती आहे. सगळा जे सगळे रामायण-महाभारत घडते त्याच्या मूळामध्ये हा लोभच आहे.
पण ज्या मनात मध्ये चिंता समाप्त होते तेथे मग कसलीच चिंता राहत नाही मन एकदम निश्चिंत राहते..
व ज्याला काहिच इच्छा नाही, लोभ नाही व चिंता नाही तोच खरा शहेनशाह ! तोच खरा राजा !

*

माटी कहे कुम्हार से, तु क्या रौंदे मोय ।
एक दिन ऐसा आएगा, मैं रौंदूगी तोय ॥

माझे सर्वात आवडता दोहा आहे हा.

जे पेराल तेच उगवेल. जसे वागाल तसेच तुम्हाला मिळत जाईल.
कोणीच काळाच्या वरती नाही सर्व शक्तीमान तो काळ आहे.
आज तु राजा आहेस तर तो काळ तुला रंक देखील करु शकतो.

*

*

तिनका कबहुँ ना निंदये, जो पाँव तले होय ।
कबहुँ उड़ आँखो पड़े, पीर घानेरी होय ॥

कोणाला कधीच छोटे समजू नये व त्यास त्रास देऊ नये, त्याच्या नियतीमुळे तो तेथे आहे,
जर त्याचे दिवस फिरले तर तो तुमच्यावर देखील भारी पडू शकेल, घमंड कधीच नको.
सर्वांना आदर द्या.

*

सुख मे सुमिरन ना किया, दु:ख में करते याद ।
कह कबीर ता दास की, कौन सुने फरियाद ॥

गरज सरो वैद्य मरो अशी जर मानसिकता जर ठेवली तर वाईट काळामध्ये तुम्हाला कोणीच मदत करणार नाही. तेव्हा आपल्या चांगल्या काळामध्ये लोकांना मदत करत रहा जेणे करुन तुमच्या वाईट काळामध्ये कोणी ना कोणि तरी असेल जे तुम्हाला साथ देतील. आपल्या यशाच्या आनंदात मग्न राहून ज्यांच्यामुळे आपण येथे पोहचलो आहे त्यांना विसरु नका.

********

कबीर बाणी ...... Music for Soul !

एक सर्वांग सुंदर अल्बम !!!

राहूल देशपांडे ह्यांनी गायलेली कबीर बाणी ची सिडी ई-खरेदी विभागामध्ये उपलब्ध आहे.

बंद मंदिरातील धर्म..

बंद मंदिरातील धर्म.. खरं हे हे शिर्षक चुकीचेच वाटत आहे मला तर येथे उघडा मंदिरे अथवा उघडदार देवा आता उघड दार असे काही शिर्षक द्यावे असे वाटत आहे त्याला कारण ही तसेच आहे हा जैन धर्म.. हो मी जैन धर्माविषयी बोलतो आहे ज्या धर्माचा शेवटचा तिर्थंकर, प्रवर्तक २५०० वर्षापुर्वी होऊन गेला व ज्याची जयंती आज भारतभरातील जैन बांधव उत्साहाने व आनंदाने साजरी करतात तो धर्म म्हणजे जैन धर्म. गेली हजारो वर्ष हा धर्म मंदिरात अडकून आहे. पराकोटीच्या अहिंसेचे समर्थन करणारा हा धर्म.

jain dharma

णमो अरिहंताणं।
णमो सिद्धाणं।
णमो आइरियाणं।
णमो उवज्झायाणं।
णमो लोए सव्वसाहूणं॥

अरिहंतांना नमस्कार, सिध्दीनां नमस्कार, आचार्यांना नमस्कार, उपाध्यांना नमस्कार व सर्व साधुनां नमस्कार अशी पाचं परमेष्ठींना नमस्कार करावयास सांगणारा जैन धर्म !

कधी काळी तिर्थंकारांनी जैन म्हणजे काय हे सांगितले, त्यांचे कर्तव्य काय हे सांगितले व अतिंम ध्येय मोक्ष कसा मिळवावा ह्याचे मार्गदर्शन केले. जैन म्हणजे ज्याने मनावर विजय मिळवला आहे असा अथवा सर्वसाधारण ज्यांने मनावर विजय मिळवला तोच जैन ! ऋषभदेव पासून महावीरांपर्यंत सर्व २४ च्या २४ तिर्थिंकरांनी ह्याचेच सुतोवाच केले. अहिंसा हा धर्माचा मुल धर्म, मार्गदर्शन. नमोकार मंत्र म्हणजे जिवनात नम्र रहा ह्याची शिकवण व अतिंम ध्येय म्हणजे मोक्ष, ज्या जिवन मरण चक्रापासून मुक्ती व त्या परमशक्तीमान अश्या देवाच्या मध्ये एकरुप होऊन मुक्त होणे. एवढे साधेसोपे तत्वज्ञान असलेला हा धर्म बाकीच्यांना गुढ, विचित्र व वेगळा का वाटतो तर ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे हा धर्म नेहमी मंदिरामध्येच बंधीस्त राहीला पुजारी व मुनी मंडळींनी त्याला कधी सामान्य जनतेपर्यंत पोहचू दिला नाही अथवा तसा प्रयत्न केला नाही. सुरवातीच्या काळी ह्या धर्माला प्रचंडमोठ्या प्रमाणात राजश्रय मिळाला, रोज रोज होणारी युध्दे व अपरिमित मनुष्य व धन हानी ह्यापासून मुक्ती देणारा हा धर्म त्यामुळे हा शेवटपर्यंत पुर्ण राजश्रय मिळालेला धर्म ! शक्यतो ह्याचे कारण पण हेच असावे कि २४ च्या २४ तिर्थंकर हे राजकुमार अथवा राजा होते.

कधीकाळी जैन धर्मात मुर्तीपुजनास स्थान नव्हते पण जसा जसा धर्म वाढत गेला तस तसे ह्यात विभाग पडत गेले व दिगंबर जैन, श्वेतांबर जैन व तेरापंथी सारखे उपशाखा निर्माण झाल्या. ज्या तिर्थंकरांनी मोक्ष प्राप्तीसाठी घनदाट जंगलामध्ये अथक कष्ट घेऊन तप केले त्यांना ह्यांनी मंदिरात बसवले !

खुप सुंदर अश्या संगमरवर मंदिरात अतिशय देखणी जिन मुर्ती पाहण्याचे भाग्य हे फक्त जैनांनाच होते, व आज देखील आहे सर्व जागी नाही पण काही जागी नक्कीच सामान्य जनतेला प्रवेश नाही दोन उदाहरणे सांगतो एक खुप आधी जेव्हा मी अयोध्येला गेलो होतो तेव्हा…

अयोध्या, जैनाच्या पाच तिर्थंकरांचे जन्मस्थान ! हो आमचे काही तिर्थंकर रामाचे पुर्वज तर काहीचा राम पुर्वज असे मानले जाते त्यामुळे हिंदु धर्मात जेवढे महत्व अयोध्येचे आहे तेवढेच महत्व जैन धर्मात देखील आहे. तर अश्या ह्या जैन धर्माच्या पंढरीमध्ये मी पाच वेगवेगळ्या मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर मला मी दिगंबर जैन आहे हे सांगून सुध्दा प्रवेश नाकारला शेवटी मला त्याला नमोकार मंत्र पठन करुन दाखवावा लागला व काही तिर्थंकरांची नावे सांगावी लागली नशीब माझे मी जैन हॉस्टेल मध्ये शिकलो होतो म्हणून तेवढे आठवत होते नाही तर मी जैन आहे हे सर्टिफिकेट घेऊन मला फिरावे लागले असते.

दुसरा अनुभव, माझे काही विदेशी मित्र भारतभ्रमणसाठी आले होते त्यावेळी त्यांना घेऊन मी मथुरा बघावयास गेलो होतो तर जाताना रस्त्यात एक जिनालय आहे थोडेसे आड वाटेला आहे पण सुरेख असे निसर्गाच्या सानिध्यात आहे त्यामुळे ते संदुर ठिकाण त्या मित्रांना देखील दाखवावे म्हणून तेथे घेऊन गेलो सर्व प्रवेश प्रक्रिया पुर्ण झाली व आम्ही आत गेलो तर मला सांगण्यात आले की बाकीच्यांना प्रवेश नाही फक्त तुम्ही जाऊ शकता. ती ट्रिप जैन मंदिर न बघताच पुर्ण झाली हे सांगणे गरजेचे नाही.

गुडगांव मध्ये दिगंबर जैनांचे मोठे स्वामी, मुनी बाहुबली स्वामी ह्यांचा आश्रम आहे व त्यांचे जन्मगाव हे माझे आजोळ त्यामुळे तेथे मला जरा प्रवेशाला अडचण नव्हती मी त्यांच्याकडे गेलो व वरील अनुभव सांगून म्हणालो असे का ? त्यांनी धर्म, पवित्रता अशी काही ठेवणीतील कारणे दिली तेव्हा मी त्यांना भारतीय राजघटनेने दिलेले अधिकार सांगितले तर ते म्हणाले की प्रवेश आम्ही नाकारतो असे नाही पण आमचे पुजेचे व मंदिराचे नियम खुप कडक आहेत ते पाळले जात नाही म्हणून आम्ही थांबवतो. मग त्यांना २००१ मध्येच त्याच आश्रम मध्ये प्रवेश घेण्यासाठी मला स्वतःला पुरावे व वाद घालावा लागला होता व त्यांना स्वतः त्यात मध्यस्थी करावी लागली होती ह्याची आठवण करुन दिली व त्यांना विचारले की ” टिशर्ट व जिन्स घातली म्हणजे धर्म कसा बाटतो ह्याचे विष्लेशन करा कृपा करुन.” हॅ हॅ हॅ ठरले होते संध्येचे व ध्यानाचे कारण देऊन माझी बोळवणी करण्यात आली.

क्रमशः

१ तास..

आज अर्थ अव्हर म्हणून आपण मी मराठी संकेतस्थळ एक तास ८.३० ते ९.३० बंद ठेवले व एका नव्या प्रयोगास सुरवात केली. हवे तर एखादे चित्र टाकून, मुखपृष्ठ सजवून आपण हा दिवस साजरा करु शकलो असतो पण काल मस्त कलंदर हिचा धागा व निखिल देशपांडे ह्यांनी अर्थ अव्हर मोड्युअल बद्दल सांगितले व मनात आले आपण हा प्रयोग करायचा. ह्यांने काय होईल, काय फरक पडेल सदस्य काय म्हणतील हा विचार बाजूला ठेवून हा निर्णय घेतला व एका प्रयोगास हातभार लावल्याचा आनंद मिळाला.

काही ठिकाणी ह्या प्रयोगाची खिल्ली उडवली गेली व काही जणांनी सरळ विचारले काय मिळाले हे करुन ? तर वर म्हणालो तसे एका प्रयोगात सहभागी झालो ह्यांचा आनंद मिळालाच पण आपल्या संकेतस्थळावरील वाचक व सदस्य ह्यांना आपण वेळेवर आठवण करुन देण्यात देखील यशस्वी झालो. इनमीन ताशी २००-३०० पानं पाहीली जाणारी आपली साईट व ताशी १०० एक वाचक व सदस्य असलेली साईट ह्यांनी आपले संकेतस्थळ एक तास बंद ठेवला म्हणून काय फरक पडला ग्लोबल वॉर्मिंग मध्ये ?

‘प्रत्येक गोष्टीची सुरवात ही लहानच असते, शुन्यातून विश्व निर्माण होते’ ह्या वाक्यावर माझी श्रध्दा आहे व हाच विचार डोक्यात घेऊन आपण हा प्रयोग केला. जर आपल्या सदस्यांपैकी / वाचकांपैकी एकाने जरी हा २०१० चा अर्थ अव्हर पाळला असेल तर तर आपण नक्कीच यशस्वी झालो आहोत ह्या प्रयोगात व हीच आपली सुरवात आहे. भारतासारख्या जेथे वीजेचा प्रश्न पाण्याच्या प्रश्नाप्रमाणेच गंभीर आहे तेथे असले अर्थ अव्हर पाळून काय होणार असा देखील एक सुर समाजात जाणवतो पण अश्या प्रयोगामुळे समाजामध्ये जागृती येते, ठीक आहे आपल्याकडे वीजेची टंचाई आहे पण जी आहे ती तर आपण जपून वापरायला शिकू अश्या प्रयोगामुळे त्यासाठी हा सगळा अट्टाहास. आजच्या ह्या एका तासामुळे आपण किती वीज वाचवली हे महत्वाचे नाही आहे पण आपण कमीत कमी वीज वाचवण्यासाठी सुरवात तरी केली हे महत्वाचे. आजचा दिवस संपला म्हणजे प्रयोग संपला असे नाही आपण वेळोवेळी अश्या प्रकारच्या सामाजिक बदल घडवणार्‍या प्रयोगांना समर्थन देऊ व शक्य तेवढा त्याचा प्रचार देखील करु.

इतर फालतु डे आपण आनंदाने व उत्साहाने पाळतो त्याच उत्साहाने व त्यापेक्षा द्विगुणीत आनंदाने हे असे सामाजिक उत्सव आपण पाळले पाहीजेत जेणे करुन आपली येणारी पिढी सुखाने ह्या धरतीवर श्वास घेऊ शकेल.

http://www.earthhour.org/ ही संस्था ह्यावर कार्य करत आहे व ह्यांनी जे मोड्युअल तयार करुन दिले होते ते वापरुन हा मराठी संकेतस्थळावर नवीन प्रयोग यशस्वीपणे राबवला त्यांचे व ड्रुपल चे अनेकानेक धन्यवाद.

***

आपण कसा व कश्या पध्दतीने अर्थ अव्हर पाळला व इतरांना तो पाळण्यासाठी कसे प्रोत्साहित केले ह्या बद्दल आपण जरुर लिहा.

धन्यवाद.

मी मराठी,
व्यवस्थापक.

देव.. चमत्कार व मी

देव ह्या संकल्पनेवर अनेकवेळा चर्चा होते व होत राहील, विज्ञाननिष्ठ व्यक्ती देव नसल्याचा पुरजोर दावा करेल व जो देव मानतो तो देव असल्याचा खात्रीलायक दावा करेल, येथे मीमराठीवर देखील अधून मधून ही चर्चा चालूच असते कधी धाग्यावर कधी खरडफळ्यावर तर कधी कट्टावर. देवाचे अस्तित्व नाकारावे की नाही हा ज्याच्या त्याच्या बुध्दीचा प्रश्न. विज्ञान देव ही संकल्पना मान्य करत नाही व प्रत्येक गोष्टीला एक कारक आहे , कारण आहे असे शास्त्र शुध्द नियमाद्वारे दाखवून देतो. अनिंस सारख्या संस्था व अनेक विज्ञान निष्ठ व्यक्ती मुळापासून देवाचे अस्तित्व मान्य करतच नाहीत पण हजारो वर्षापासून हिंदू मनावर देवाचे अस्तित्व वेगवेगळ्या कथेतून, ग्रंथातून, काव्यातून, अभंगातून बिंबवले जात आहे व त्यामुळे देवाचे अस्तित्व मान्य करणार्‍यांची संख्या ही जास्त दिसते, त्यामुळे हा वाद नेहमीच रंगतो.

दैवी चमत्कार मान्य करणे न करणे विज्ञाननिष्ठ व्यक्तीला सोपं जाते कारण त्याची मुळापासून आपल्या विज्ञानावर श्रध्दा असते व आपले मत बरोबर आहे ह्यासाठी विज्ञाननिष्ठ पुरावा ही त्याच्याकडे असतो ( जसे नाईल ह्यांनी विहीरी बाबत गणित मांडले आहे तसे) व प्रत्येक वेळी ते पुरावे सामान्य व्यक्तीला देखील पटतात. सामान्य व्यक्तीला आपल्या पुरातन संस्कृतीतून बाहेर पडण्यासाठी, पुरातन कथांना, चमत्कारांना, पुराण पुरुषाच्या अस्तित्वाला, देवाला नाकारणे जवळ जवळ अशक्य होऊन बसलेले असते कारण संस्कार, लोक-शिक्षणाची कमतरता.

मी स्वतः चमत्कार मान्य करतो पण तो विज्ञाननिष्ठ चमत्कार ! बाकी कुठला ही चमत्कार मी मान्य करु शकत नाही ह्यांचे कारण शक्यतो माझ्या वाचनामध्ये असेल किंवा जेव्हापासून डिस्कव्हरी व नॅशनल जीओग्रॉफिक टाईपची सर्वांग सुंदर दुरचित्रवाण्या आल्या त्यामुळे असेल. ह्यांनी दृष्टी दिली एखाद्या चमत्काराकडे कसे पहावे ह्याची. मी देवाचे अस्तित्व नाकारतो असे देखील नाही आहे कारण शेवटी मी देखील त्याच मातीतून आलो आहे जेथे लहानपणापासून देव सदैव आपल्याला पाहात आहे आपले कर्म पहात आहे असे शिकवले जाते. पण तरी ही काही गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर तोलून नक्की पहाव्या असे वाटतं.

कित्येक पिढ्यामागे माहीत नाही पण आमच्या घरातील एका व्यक्तीला आपला मुळ धर्म सोडून जैन धर्मात प्रवेश करावे असे वाटले असेल व त्यांनी त्यानूसार केला. पण मुळ धर्मातील देव हे ते देखील त्याग करु शकले नाहीत त्यामुळे नवीन धर्मात आल्यावर जसे नवीन देव देव्हार्‍यात आले तसेच जुने देव देखील तेथेच राहीले त्यामुळे आमच्या घरात लक्ष्मीपुजन होते, गणपती पुजन होते, कुल दैवत नाईकबाचे पुजन होते व त्याच बरोबर २४ तिर्थंकरांचे देखील पुजन मनन होते. त्यामुळे लहानपणापासून देव ह्या संकल्पनेवर प्रचंड विश्वासाचे वातावरण आमच्या घरात दिसे. देव व देवाचे मंदिर ह्या विषयी मला काय वाटते दे मी मागे एका लेखामध्ये लिहले आहे पण येथे देवाचेच अस्तित्व नाकारणारे वातावरण पाहीले की माझ्यासारखा माणूस बावरुन जातो. कोणाला बरोबर मानावे, कोणाचे सत्य सत्य म्हणून अंगिकारावे ह्या गोंधळात तो गप्प राहणेच पसंद करतो.

चमत्काराचा व माझा सरळ संबध आला तो जेव्हा मी बाहुबली हॉस्टेलमध्ये शिक्षण घेत असताना नेहमी दंगा व हॉस्टेलमधून पळून जाते असे प्रकार करत असे तेव्हा. कोणीतरी आईला सांगितले की ह्याच्यावर (माझ्यावर) कोणीतरी करणी केली असू शकते मग लगेच आमच्या माता आम्हाला कोल्हापुर पासून १३०-१४० किमी दुरवर कर्नाटकात एकोंडी नावाच्या गावी घेऊन गेल्या. बुवामहाराजांनी मला एका पुजेचे ठिकाण असलेल्या पाटावर बसवले व आपले मंत्र पठण चालू केले काही मिनिटानंतर डोक्यावर टपा टपा लिंबू पडू लागले चांगले वीस तीस लिंबू खाली पडले. अंगारा फुंकणे, चित्रविचित्र आवाज काढत गोल गोल फिरणे वर करुन लिंबू पाडणे हे काही वेळ चालू राहीले व आई कडून ५०१ रु. दक्षिणा घेऊन माझ्या डोक्यावरचे भुत उतरले आहे असे सांगून बोळवणी केली. त्या एरियातून बाहेर पडल्या पडल्या मी आईला प्रश्न विचारला ते महाराज मला बाहेर अंगणात बसवून ते लिंबू पाडून दाखवतील का ? झाले देवाबद्दल काय वाटेल ते विचारतोस म्हणून धप्पा धप्पा मार पडला रस्त्यावरच. माझी आई कमी शिकलेली आहे त्यामुळे मी त्या चमत्कारावर शंका व्यक्त करतो आहे म्हणजे मी त्याचे अस्तित्वच नाकारत आहे असे तिला वाटले. ( त्यानंतर देखील मी हॉस्टेलमधून अनेकवेळा पळून गेलो ही गोष्ट निराळीच 😉 )

ह्यानंतरचा चमत्कार आमच्या पाहुण्यामध्येच एक स्त्री करत असे. पाटावर जोंधळे पसरवून त्यावर भरलेली पाण्याची तांब्याची घागर ठेवत असे समोर ती बसत असे व विरुध्द बाजूला ज्याला काही अडचण आहे ती व्यक्ती. मनातल्या मनात प्रश्न विचारायचे व त्या घागरी च्या काठांना दोन्ही हाताच्या मधल्या बोटाने फक्त स्पर्श करायचा व तिकडून तीने देखील तश्याच पध्दतीने स्पर्श करायचा उत्तर हो असेल तर घागर उजव्याबाजूला फिरु लागे व नाही असेल तर डाव्या बाजूला. मला ते पाहून एकदम तिच्यामध्ये असलेल्या शक्तीबद्दल तिच्या कार्याबद्दल व तिच्या अंगात येण्याबद्दल प्रचंड विश्वास वाटू लागला व काहीतरी दैवी शक्ती आहे ह्यामध्ये नक्की ह्या निर्णयापर्यंत आलो. असे काही दिवस भारावलेल्या अवस्थेत मी चांगल्या मुलासारखा वागलो तर घरी देखील तिच्याबद्दल विश्वास निर्माण झाला मग दर रवीवारी त्या पाहुणीकडे आमच्या फेर्‍या वाढल्या. घर पाहुण्याचेच असल्यामु़ळे मला व माझ्या बहिणीला प्रचंड मोकळीक होतीच. आम्ही खेळता खेळता त्या पुजाघरात शिरलो तर समोर ती घागर व साहित्य तयार होते अंगात मस्ती फार त्यामुळे लगेच समोर जबरदस्तीने बहिणीला बसवले व तिला त्या घागरीला स्पर्श करण्यास सांगितले व मी देखील केला काय नवल ती घागर माझ्यासारख्याच्या स्पर्शाने देखील उजवीकडे फिरली, मी बहिणीला हात त्या घागरीवरुन काढून पुन्हा स्पर्श करायला लावला पण आधी उजवे बोट स्पर्श कर असे सांगितले मग परत घाघर फिरली डाव्याबाजूला. हे पाहून माझी बहिणीची तंतरी उडली व ती तेथेच किंचाळली घागर फिरत आहे बघून. झाले परत मार पडला पण मला कळाले ही काहीही असो चमत्कार नक्कीच नाही आहे ह्यामागे. घरी आल्यावर आईला पटवून देण्याचा खुप प्रयत्न केला घरीच तसा सेटअप करुन तीला घागर फिरवून दाखवली तरी तीने ते मान्य केले नाही की तो चमत्कार नव्हता.

ही झाली दोन उदाहरणे भोंदुबाजीची म्हणा अथवा चमत्काराची कारण दोन्ही जागी लोकांच्या प्रचंड रांगा लागायच्या संकट निवारण्यासाठी. चांगल्या गोष्टीचा प्रसार होण्यासाठी वर्षानू वर्ष लागतात पण एखादा चमत्कार काही तासामध्ये जगभर पसरु शकतो, आपल्यापैकी जवळ जवळ सर्वांना “गणपती दुध पितो” चा पराक्रम माहीत असेल ना ! त्या दिवशी आमच्या घरातील डाव्या सोंडेचा सोनेरी गणपती देखील चमच्याने दुध पित होता व वाड्यात आमच्याच घरी गणपतीची मुर्ती असल्यामुळे घरी प्रचंड गर्दी व बाहेर रांगा लागल्या होत्या ते अजून आठवते 😉

असे अनेक चमत्कार करणारे पाहणे माझ्या नशीबी आले पण परवा परवा जेव्हा अपघात झाला म्हणून घरी आडवा पडलो होतो तेव्हा आईला कोणी तरी माझी दृष्ट काढावयास सांगितली, अर्धातास लेक्चर दिले पण आई काय बधली नाही व शेवटी मी हार मान्य करुन तीला तिचे कार्य करु दिले. दहा-बारा वाळलेल्या लाल मिर्च्या तीने माझ्यावर उतरवून चुलीत टाकल्या व चार पाच मिनिटाने माझ्याकडे आली व म्हणाली बघ.. आता तरी समजले का ? मला काहीच समजले नाही तेव्हा तीने मला सांगितले की तु एक लाल मीर्ची चुलीत टाकून बघ. काही न करता उचलायची व चुलीत टाकायची. माझे विज्ञान निष्ठ मन ह्यासाठी लगेच तयार झाले व म्हणालो बघ ह्या मिर्चीचा पण धुर होणार नाही म्हणून समोर असलेल्या पोत्यात हात घालून एक मिर्ची उचलली व सरळ स्वंयपाक घरातील चुलीत टाकली…….दहा मिनिटे खोकुन खोकुन जीव अर्धमेला झाला..

आईच्या डोळयात विजयी भाव होते व माझ्या मनात हे असे कसे झाले असावे ह्याचा विचार. त्याच पोत्यातील बागडी मिर्च्या ( कर्नाटकातील एक लाल मिर्चीचा प्रकार जो प्रचंड तिखट असतो व जहाल देखील) आईने माझ्यासमोर घेतल्या होत्या व चुलीतल्या निखार्‍यावर टाकल्या होता तेव्हा धुर न होता मिर्च्या जळून गेल्या पण त्याच पोत्यातील मिर्ची मी जेव्हा निखार्‍यावर नुस्तीच टाकली तेव्हा मात्र ती मिर्ची जळून न जाता घरात मिर्चीचा धुर करुन गेली असे का घडले असावे ? ह्याचे उत्तर मला काही सापडले नाही, आमच्या स्वयंपाक घरातून त्यानंतरचे चारपाच दिवस मिर्च्याचा धुर येतच असे.. कारण माझे समाधान झाले नव्हते पण प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मी मिर्ची टाकत असे तेव्हा धूर होत असे हे नक्की. शेवटी माझी मावस बहिणी आपल्या बाळाला घेऊन मला बघायला आली होती ते बाळ प्रचंड रडत होते म्हणुन आईने परत तोच प्रयोग त्या बाळावर केला तेव्हा मात्र धुर झाला नाही त्यामुळे डोके जाम सटकले विश्वास ठेवू नये असे नक्की माझे मन सांगत होते पण जे डोळ्यासमोर घडले त्याला काय म्हणावे ! ह्याला मी चमत्कार नक्कीच म्हणणार नाही पण कुठेतरी काहीतरी नक्की ह्यामागे कारण असेल हे मात्र खरं.

जाता जाता….

आग्र्याला ताजमहल आहे जगप्रसिध्द, वास्तू शास्त्रातील चमत्कार असे पण म्हणतात काही जण पण त्याचे मला कधीच आकर्षण वाटले नाही पण तेच जयपुर मध्ये हवा महल आहे तो मला नक्कीच चमत्कार वाटतो भर उन्हाळ्यात बाहेर ४०-४२ अंश उष्णता रखरखत असते व हवामहल मधील प्रत्येक खोली एसी लावल्याप्रमाणे थंडगार असते… चमत्कार म्हणावा तर ह्याला !

कार्तिक कॉलिंग कार्तिक

एक वेगळा चित्रपट अथवा थरारक चित्रपट असे नाही म्हणता येणार पण “कार्तिक कॉलिंग कार्तिक” नक्कीच पाहण्यालायक चित्रपट आहे हे नक्की. शेवट पर्यंत काय घडत आहे हे पाहण्याची उत्सुकता टिकून राहते मध्येच काहीवेळ चित्रपट स्लो होतो पण ओके नियमीत वेग पुन्हा येतो.

हा चित्रपट कार्तिक नावाच्या एका व्यक्तीवर अवलंबून आहे हे नावावरुन समजतेच हा कर्तिक साधा सुधा, एका कंपनीत काम करत असलेला, शोनाली ( सोनाली – असावे) वर जिवापाड प्रेम करत असलेला व प्रचंड हुशार असलेला पण लहानपणी घडलेल्या एका घटनेमुळे आत्मविश्वास नसल्यासारखा. त्यामुळे त्याला कोणी मित्र नाहीत व कोणीच त्याला समजवून घेत नाही उलट त्याच्याकडून जमेल तेवढा फायदा उचलणे असे घडत असल्यामुळे तो निराश झालेला असतोच पण जेव्हा ज्या सोनालीव्रर तो प्रेम करत आहे एका प्रसंगात तीच्या एका वाक्यात त्याला कळते की गेली चार वर्ष जेथे हा काम करत आहे तेथे तीला त्याची उपस्थीती देखील जाणवलेली नाही व हा आत्महत्या करण्याचे ठरवतो… घरी झोपेच्या गोळ्या घेण्याच्या तयारीत असतानाच जेव्हा फोन वाजतो… व समोरच्या त्याला सांगतो की तो पण कार्तिकच आहे…… तो तोच आहे जो हा आहे… ह्याची खात्री पटवून देण्यासाठी तो काही गोष्टी ज्या फक्त कार्तिकलाच माहीत आहेत त्या सांगतो..

ह्या क्षणापासून चित्रपट वेगवान होतो व पाहण्यालायक होतो. तो कार्तिक ( फोनवाला) ह्याचा पुर्ण आत्मविश्वास परत उभारुन ह्याचे जिवन सुखकर बनवण्यासाठी फोन वरुनच ह्याला मदत करतो व त्याच्यामुळेच ह्याचे प्रेम देखील यशस्वी मार्गावर येतं. येथे पर्यंत चित्रपट एका नेहमीच्या मार्गावर चालू असतो व फोनवाल्या कार्तिक ने ह्याला सांगितले असते की कोणाला ही माझे अस्तित्व सागू नकोस… पण हा सोनालीला सांगतो व ती त्याला वेड्यात काढते… व चित्रपट एकदम बदलतो… सर्वकाही गोड गोड चाललेले एकदम वेगळे होऊन जाते… हे सर्व तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच कळेल की काय घडतं पण एकदा पाहण्यास काही हरकत नाही असा हा चित्रपट आहे हे नक्की.

फरहान अख्तर व दीपिका पादुकोण ह्यांचा अभिनय उत्तम आहे पण तरी ही पुर्ण चित्रपटामध्ये फरहानच नजरे समोर राहतो व चित्रपट देखील ह्याच्या भोवती फिरत असल्यामुळे हे २ तास प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची अभिनय क्षमता हवी ती फरहानकडे नक्कीच दिसून येते त्यामुळे हा चित्रपट पाहणे देखील सुसह्य होते. चित्रपटातील काही दृश्य तर अतिशय उत्तम पध्दतीने साकारली गेली आहेत असे जेव्हा जेव्हा फोन वाजतो तेव्हा तेव्हा फरहान च्या वागण्यात, चेहर्‍यावर, डोळ्यात येणारे हाव भाव अतिशय योग्य पध्दतीने टिपलेले आहेत.

आपल्याकडील चित्रपटात हमखास छोट्या मोठ्या चुका राहतात मग तो ३ ईडियटस असो वा माय नेम ईज खान असो, पण हा चित्रपट पाहताना असे काही कच्चे दुवे सुटलेले आहेत असे वाटत नाही अथवा कुठली गोष्ट अशक्य कोटीतील वाटत नाही हेच ह्या चित्रपटाचे यश.

एकदा नक्की पाहू शकता ते ही सहकुटुंब बसून पाहता येईल असा चित्रपट आहे हा नक्कीच.. !