राज दरबार…..

साद घालतो रानवारा….. !

Category Archives: Uncategorized

मामाचं गाव (इसावअज्जा)

“राज्या, परिक्षेत किती मार्क पडले रे.”
मे महिन्याच्या सुटीसाठी बस स्टॅन्डवरुन अजून घरात पाऊल न ठेवलेल्या आपल्या एकुलत्या एक भाच्याला उंबरठ्यावरच प्रश्न विचारणारा मामा आठवला की या मामा लोकांनी माझे लहानपण कसे वाया घालावले याबद्दल दोन-चार आश्रु मी गाळून घेतो. दिड-दोन फुटी आपला भाचा वर्षभर मास्तर व बाईचा मार खाऊन खाऊन वैतागलेला, अभ्यास कर हे एकच पालूपद वर्षभर ज्याच्या मानगुटीवर भुतासारखे बसलेले, तिमाही, सहामाही, वार्षिक च्या सोबत असंख्य तोंडी परीक्षेतून पार पडून थोडा निवांत झालेला असतो तर लगेच घरात टूम निघते.. चला मामाच्या गावी!

मामाच्या गावाला जायचे,
आंब्याच्या झाडावर घर बांधायचे..
विहीरीवर अंघोळीला जायचे,
तेव्हा थोडे पेरु चोरायचे…

असली अफाट कल्पना घेऊन पोहचलेला आपला भाचा पाहिल्या पाहिल्या पहिला प्रश्न काय तर “राज्या, परिक्षेत किती मार्क पडले रे.” अरे कसा आहेस विचार, गाल-गुच्चा घे, मामासाठी काय आणलं आमच्या राज्यानं असे बोबड्या भाषेत विचार! पण नाही “राखुंड्या” मास्तरासारखा पहिला प्रश्न अभ्यास नाही तर मार्काचा… पहिले काही दिवस बोंबलून सांगावे असे वाटत असेल मला की लेको…. तुमच्या कर्नाटकात आमच्या पेक्षा आधी २०-२५ दिवस निकाल लागतो रे.. आम्ही घरी गेल्यावर माझा निकाल कळेल.. पण कोण ऐकून घेईल तर शपथ!

तर गावच्या सुट्टीची सुरवात! त्यात मी नवसाचा.. एकुलता एक मुलगा जवळपास २०-२५ घरात (पाहुण्यांच्यात) कोणाच्या पण घरी गेला की पहिला प्रश्न ठरलेला “राज्या, परिक्षेत किती मार्क पडले रे.” मी घरातून का पळून गेलो या प्रश्नाचे हे उत्तर नसेल ही पण कुठल्या पाहूण्याच्या घरी कधीच न जाण्याचा संकल्प करण्याचे हेच नक्की कारण होते.

या लोकांना काय असुरी आनंद मिळत असावा असले प्रश्न पोरांना विचारून देवाकं ठावूक!
मामाचा वाडा त्यावेळी खूपच मोठा असल्यामुळे व आजोबा वृद्ध असल्यामुळे एप्रिल-मे महिन्यात त्यांना भेटायला व सुट्टीचा आनंद घ्यायला सगळेच आजोळी यायचे, १६-१७ बहिणी (मावस, आत्ते इ. + सक्की एक) व त्यांच्या आया-बाबा आणि अनेक लांबचे पाहुणे एकावेळी त्या वाड्यावर हजर असतं! खाण्यात रेलचेल असे, पहाटे पहाटे पेटलेली चुल, आम्ही सर्व अंगणात झोपल्यावर रात्री कधी तरी चर्र असा आवाज करीत शांत होत असे. पहाटे पहाटे जाग यायची ती आजोबाच्या हाकेने. माझे दुदैव येवढे की एकुलता एक मुलगा असल्यामुळे सकाळचा शंख माझ्या नावानेच होत असे.. आजोबा मुलींना चुकून ही काही बोलत नसतं, हा त्यांना प्रेमाने खाऊ घाल, सगळ्यांना गोळा करून गोष्टी सांग, स्वातंत्र्य लढ्यात बेळगाव आंदोलनात कशी इंग्रजाची पळतीभूई केली व नंतर कसा मार खल्ला या प्रामुख्याने गोष्टी.

मी आपला बापुडा त्या गोष्टी ऐकण्यासाठी तेथे जाऊन बसावे तोच शेतातील काम संपवून आलेला मामा कडाडत असे “राज्या! लेका बायकांच्यात काय बसला आहेस, बायल्या कुठला!, जा गोठ्यात रम्याला मदत कर” झाले सगळ्या मुली फिदीफिदी हसणार व माझा रंग उडणार हे ठरलेले. रडत आईकडे तक्रार घेऊन स्वयंपाक घरात जावे तर कोणीतरी माउशी, मामी, आत्या, काकी म्हणायची “या राज्याला आईविना करमत नाही, यामुळेच बायकांमध्ये लुडबुड करायची सवय.” व तोंडाला पदर लावून गालातल्या गालात हसत. मोठ्याने हसल्या की बाहेरून आजोबांच्या काठीचा आवाज येणार हे नक्की.

बरं या सगळ्याला वैतागून घरातून बाहेर पडण्यासाठी अंगणात यावे तोच लहान मामा “राज्या! घराबाहेर पाय टाकलस तर बघ. तंगडे तोडेन.” बर त्याचे ऐकून गप्प परसबागेकडे जावे तर लगेच सन्नतात्या (लहान आजोबा आमचे) लगेच “राज्या! आकडे नी काल इड, निंद काल तगद् निंन कयागं उडत्यान नोड!” बोंबललं, मायला पुढून घरातून बाहेर पडायचे तर लहान मामा पाय तोडायला तयार व परसबागेत जावे तर ज्याने बाग (बाग कसली, रोजच्या भाज्या लावलेल्या) लावली तो पाय तोडून हातात देण्याची भाषा करतो. काय करावे काय करावे असले प्रश्न चिन्ह चेहर्‍यावर मिरवत मी इकडे तिकडे भटकत असलो तर एखादी ताई-आक्का हमखास म्हणायची..”नोड.. हुंब ईदे इद” (बघ, वेंधळाच आहे हा) असे म्हणून परत फिदीफिदी हसायच्या.

शेवटी मी वैताग वैताग करुन इसावअज्जा च्या रुमकडे वळत असे.
इसावअज्जा= पोहायला शिकवणारे आजोबा, हेच नाव त्यांचे गावभर नाही तर पंचक्रोशीत प्रसिद्ध होते, या आजोबांनी एका आणि एक पोराला/मुलीला पोहायला आलेच पाहिजे असा चंग बांधला होता. हे आजोबांचे कोणीतरी लांबचे नातेवाईक होते, ब्रम्हचारी. पोरांना पोहायला शिकवले तर घरचे गहू-तांदुळ द्यायचे, कोणी फारच उदार असेल कधी कधी पैसे देखील. मला आज देखील ते आठवतात ते त्यांच्या दंतपंगतीहिन हास्यामुळे. त्यांचे नक्की वय किती आहे याची चर्चा रात्री अंगणात घरचे सगळे झाडून जेव्हा झोपायला गोळा होत तेव्हा वडीलधारी मंडळी करत म्हणजे पहा किती वय असेल त्यांचे. अज्जा-इसावअज्जा असे सगळेच म्हणत त्यामुळे त्यांचे नाव काय असावे याची चर्चा आम्हां लहान मंडळीमध्ये होत असे, त्याचे कारण म्हणजे मोठा मामा लहान होता तेव्हा त्याने धाडस करुन त्यांना नाव विचारले होते म्हणे व त्यांनी मामाला उचलून २०-२५ फुट खोल असलेल्या विहरीमध्ये फेकलं होते.. अश्या अनेक दंतकथा त्यांच्या बद्दल होत्या. पण मामाला त्यांनी उचलून विहीरीत फेकले होते हे ऐकून मला खूप आनंद झाला असलाच पाहीजे.

इसावअज्जा व माझे जरा बरं जुळत होते (परवा परवा माझी मोठी मामेबहीण मला सांगत होती, ते जेव्हा आजारी पडले व त्यांचे शेवटचे काही क्षण राहीले होते तेव्हा त्यांनी जुन्याकाळात जमणार्‍या गोतावळ्याची आठवण काढली होती व तु हरवला आहेस हे ऐकून ढसाढसा रडले होते.) इसावअज्जा मला त्याच्याकडे असलेल्या ठेवणीतील गोष्टी दाखवत असे. त्याच्या पत्र्याच्या पेटीत खूप काही अमुल्य असे दडलेले होते, त्या पेटीला एक सोडून दोन दोन कुलपे होती व त्याच्या चाव्या इसावअज्जा नेहमी जानव्यात अडकवून ठेवी. जेव्हा जवळपास कोणी नसेल तेव्हा तो ती पेटी उघडून बसलेला असे. त्या पेटीमध्ये काय आहे याची जेवढी उत्सुकता त्याबालसुलभ वयात मला होती तेवढीच थोरामोठ्यांना देखील होती हे आता-आता कळले. त्यांनी ते विश्व इतरांच्यापासून जरा जास्तच लपवून ठेवले होते.

इसावअज्जा माझ्यावर न जाणे का पण खूप प्रेम करायचा, अनेकवेळा इतरांपासून लपवून खाऊ देण्यापासून, प्रसंगी आजोबांचा रोष अंगावर घेऊन मला शेतात मनसोक्त दंगा घालण्यासाठी घेऊन जात असे. पोहणे शिवण्याच्यावेळी प्रसंगी मुलींना देखील उचलुन विहीरीत फेकणारा हा आजोबा मला मात्र पत्र्याचा (डालड्याचा डब्बा) किंवा लाकडाची मोळ बांधल्याशिवाय पाण्यात पाऊल टाकू देत नसे किंवा त्यांनी मला कधीच आधाराविना पाण्यात जाऊच दिले नाही.
त्यांनी मला पोहायला शिकवले, त्यांनी मला निर्धास्तपणे पाण्याशी खेळणे शिकवले मग ते पाणी, विहरीचे असो, वाहत्या ओढ्याचे किंवा तुडुंब भरलेल्या कृष्णेचे!

क्रमशः

Advertisements

स्क्रीन काळा मोठ्ठा गोळा

पुस्तक: स्क्रीन काळा मोठ्ठा गोळा
लेखक: नचिकेत गद्रे
प्रकाशक: सुकृत प्रकाशन

कधी कधी समोरच्या कपाट उभी असलेली पुस्तकाकडे मी नजरेला नजर देऊन पाहूच शकत नाही, साल्ला! वेळ कमी पडतो आहे की आळशी झालो आहे ? खूप दिवस झाले एक पुर्ण पुस्तक वाचून काढले नाही आहे याची खंत गेली दोन-चार दिवस सारखी सारखी जाणवत होती. म्हणून इकडे तिकडे चाळताना, काय वाचावे हे शोधताना अचानक नचिकेतचे “स्क्रीन काळा मोठ्ठा गोळा” हे पुस्तक हाती पडले.

लेखक आपल्या ओळखीचा असला तर दोन पैकी एक गोष्ट होते… आधी दोन गोष्टी कुठल्या तर आपल्या ओळखीचा लेखक, मित्र त्याचे पुस्तक म्हणून झपाट्याने आपण ते वाचून काढतो अथवा फक्त आणि फक्त निवांत वेळ देता येईल तेव्हाच वाचू म्हणून मस्ट रिडचा टॅग लावून बाजूला ठेऊन देतो.. निवांत वेळ मिळण्याची आशा करत.. नचिकेतच्या पुस्तकाबद्दल असेच झाले.. टँग लावला! नचिकेतला भेटलो आहे, एकदा-दोनदा… फोनवर नेहमीच बोलणे. त्याच्या ब्लॉग माझ्या आवडत्या ब्लॉग लिस्टमध्ये आहेच. शक्यतो हीच कारणे असावीत की पुस्तक असेच समोर “मस्ट रीड”चे टॅगचे ओझे संभाळत कपाटात उभे होते!

काल अचानक शोधत असलेला निवांतपणा एकदाचा हाती लागला व “स्क्रीन काळा मोठ्ठा गोळा” वाचायला हाती घेतले. एकून ११२ पानाचं पुस्तक!
“प.पू. गूगलबाबा या माझ्या गुरूंच्या चरणी अर्पण” ही अर्पण पत्रिका पाहिली व हलकेच हसू ओठांवर पसरले.. म्हणालो नेट अ‍ॅडिक्टेड आहे साला हा तर.. !

एकून ३१ लेख आहेत. शाळेतील गमती जमती पासून आसपासच्या जगावर भाष्य करणारे लेखन असो की स्वतःच स्वतःचे चिमटे काढणारे लेख असो. एकून पुस्तक फक्कड जमले आहे. अनेक कोपरखळ्या व चिमटे काढत “ज्ञान” देणारं पुस्तक. “ज्ञान” म्हणजे ते पुस्तकी ज्ञान नाही, सरळ साध्या जगण्यात आनंद मिळवण्याचे “ज्ञान”. प्रत्येक लेख वेगळा असल्याने माझ्यासारख्या पुस्तक कोठून ही खायला सुरवात करणार्‍या लोकांसाठी एकदम सुयोग्य असे आहे. नचिकेतची लेखन शैली म्हणजे वाचकासमोर शब्दाने दृष्य निर्माण करणारी शैली.

“स्क्रीन काळा मोठ्ठा गोळा” हे नाव नेमकं काय विचित्र नाव आहे, असाच प्रश्न माझ्या समोर उभा राहिला होता पण इनमीन २५ ओळीत संपणारा हा लेख. एक आज्जी आजोबा, आपल्या नातवाला पाहण्यासाठी म्हणून सायबर कॅफेत बसले असताना त्यांची होणारी घालमेल व स्क्रीन विन्डोचा स्क्रिन सेव्हर आल्यावर आज्जीची नातू न दिसल्यामुळे होणारी केविलवाणी अवस्था वाचून मन अस्वस्थ होतं.

आठ नंबरच्या पानावर असलेला “जिन्यातला उभा बाबा..” अवाढव्य देहामध्ये तीन-चार वर्षाचं चिमुरडं पोरं ही आहे हे दाखवून, मुलाला पहिल्यांदा शाळेत सोडताना बाबाच्या मनातील विचार अलगदपणे उलगडून दाखवतो. आणि “खरं तर आजकाल” दोन पिढ्यातील नेहमीचेच अंतर खुसखुशीत शैलीमध्ये आपल्या समोर येतं व आपण अशी वाक्य उच्चारणारी माणसं अवतीभोवती पाहत असल्यामुळे ती नजरे समोर येऊन आपण खळखळून हसून जातो. “घट्ट नळ…” अनेकांच्या रोजच्या सवयीवर भाष्य करणारा लेख, या लेखात भेटणारी अनेक नमुने आपल्या आसपास फिरतच असतात त्यामुळे हसून हसून मुरकुंडी वळते हे नक्की….

जगण्याचं तत्त्वज्ञान एवढं अवघड नसतं जेवढं अवघड आपण ते करून ठेवतो. खूप सरळ व सोपं तत्त्वज्ञान आहे जगण्याचे. फक्त डोळे उघडे ठेऊन पाहिले तर अनेक गुरू दिसतील जे आपल्याला हे तत्त्वज्ञान शिकवत असतील. जगण्यातला आनंद मिळवण्यासाठी फक्त नजर उघडी ठेवावी लागते हे नचिकेतचे “स्क्रीन काळा मोठ्ठा गोळा” पुस्तक नक्कीच शिकवून जातं.

स्वयंपाक प्रयोग

पोटामध्ये कावळे ओरडू लागले की समजावे भुक लागली आहे, काही तरी खाणे महत्त्वाचे.
राजाध्यक्षांसारखं आरामात उठतात तसे सावकाश उठावे, किचन मध्ये पाय ठेवण्याआधी तालमीतला मल्ल जसा भूमी वंदन करतो असे वंदन करावे.. काळजीपूर्वक किचनमध्ये असलेल्या सर्व वस्तू पाहून घेणे व योजना तयार करणे.

योजना तयार करणे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा. कारण तुम्ही नेमके काय करणार आहात ते तुमच्या योजनेला देखील माहीत नसते. त्यामुळे नीटपणे योजनेला बाजूला घेऊन आखणी करावी.
एखादा कांदा, टोमॅटो, लसूण, इत्यादी जे काही दिसत आहे खाण्यायोग्य ते बाजूला काढून घ्यावे.
एक सुरी व पोळपाट विसरू नये. ते महत्त्वाचे नाही तर कापणार कसे तुम्ही ?

जसे जमतील तसे वार करून कांदा व टोमॅटो चा लगदा तयार करावा, हो लगदा ! कारण आपण जो करतो तो लगदाच असतो. त्याला व्यवस्थित कापलेला कांदा, टोमॅटो कोणी म्हणणार नाही..

ते कापून झाल्यावर ते बाजूला ठेऊन द्या.

मस्त पैकी समोरच्या रॅकवर पहा काय दिसते ते ! हो कारण हा लगदा आपण कश्यात वापरणार हे ठरवायला नको ? कधी कधी अशी अवस्था येते घरात भरपूर सामान असल्यावर भाजी कशाची करावी हा प्रश्न समोर उभा राहतो तसेच काहीच भाजी नसल्यावर काय करावे हा देखील तेवढा मोठा प्रश्न ! त्यात आपण आळशी सम्राट.. बाहेर जाऊन अगदी १० पावलावर असलेल्या दुकानातून भाजी घेऊन येणाचा पण कंटाळा… !

असो,

समोर काळे, पिवळे, लाल असे कसले ही रंग असलेल्या डाळीचा डब्बा हातात घ्यावा, सगळ्या डाळी मिक्स कराव्यात.
स्वच्छ, जमेल तेवढे त्यांना पाण्यात धून काढावे हो पाण्यातच चुकून हात रम च्या बाटली कडे जाण्याची अश्यावेळी शक्यता असते.

एका कुकर मध्ये योग्य प्रमाणात पाणी, जे कधीच आपल्याला जमत नाही, ते पाणी घालून कुकर पॅक करून गॅस वर ठेऊन निवांत बाहेर यावे एक सिगरेट ओढावी, कुठे काय प्रतिसाद आले, फेसबुक वर कोण चावून गेले.. इत्यादी महत्त्वपूर्ण कामे हातावेगळी करावी, तरी जर तुमच्या कानावर कुकरची शिट्टी आली नाही तरी बावरून जाऊ नये, निवांत किचन मध्ये जाऊन ज्या गॅसवर आपण कुकर ठेवला आहे, तो पेटवा. पुन्हा बाहेर या व आपली महत्त्वपूर्ण कामे करायला लागा… ३-५ मिनिटामध्ये कुकर आवाज देईल.

काय जळले, पाणी जास्त झाले असेल का ? असले नतद्रष्ट विचार डोक्यात किती येऊ देत त्या कुकर कडे ढुंकून देखील पहावयाचे नाही. आपण आपले पुढील कार्य नेटाने चालू ठेवायचे.

एक कढई घ्या. गॅसवर ठेवा, गॅस पेटवा, थोडे अंदाज घेऊन तेल टाका. कढई गरम होऊ द्या.

समोर मसाल्याच्या डब्यातील जेवढे काही आयटम दिसत आहेत ते सगळे अंदाजाने घाला !

धूर होईल, घाबरायचे नाही, चटाचटा काहीतरी उडू लागेल तेलातून, मागे वळायचं नाही… चटचट बंद झाली की मग तो कांदा, टोमॅटो व मिर्ची असलेला आयटम त्या गरम तेलात टाका !

रिलाक्स !

मस्त पैकी पुन्हा एक सिगरेट शिलगावून कश मारत ते मिश्रण संमिश्रपणे हालवत रहा…

थोड्या वेळाने कांदा लाल झालेला दिसला की कुकर कडे वळा….

कुकरचे झाकण काढा…. आतला पदार्थ कसा ही दिसत असो…

त्या कढई मध्ये ओता.. !

मीठ व लाल मिर्चीपुड त्यामध्ये हवी तेवढी टाका…. दोन-चार दा हलवा !
३ मिनिटाने गॅस बंद करा… त्यावर काही तरी झाका !

५ मिनिटाने गरमागरम काही तरी खायला मिळेल….

चांगले झाले असले अथवा नसले तरी खावे लागेल… ते तुमच्या नशिबावर अवलंबून राहील wink

जय हिंद ||

थोडा है…. थोडे की जरूरत है..

फोनाफोनी वर…..

पार्ट – १

तो : राम राम राजे
मी i dont know :- राम राम! काय म्हणता…. काय विषेश ?
तो : काही नाही, चालू आहे काम.
मी : अच्छा, अच्छा, काय म्हणतो आहे बच्चा Big smile
तो : Drunk बच्चा ?
मी : रे तू अ ब क ना रे ?
तो : Crazy अबे मी बोलतो आहे, क ब ड!
मी- स्वारी रे, टेक्निकल लोचा, यू नो… Laughing out loud

पार्ट – १

गेली तासभर चर्चा चालू आहे, मराठी पुस्तके खपत नाहीत.

मी : अहो, लोक आहेत खरेदीदार, पण तुम्ही तुम्ही लोक, त्याच्या पर्यंत पोहचण्यास कमी पडता..
तो: अरे, तो म्हणत असेल, एवढं मोठं शॉप उघडून बसलो आहे, तरी आम्हीच कसे कमी पडतो..
मी : लोक तुमच्या पर्यंत येतील ही अपेक्षाच का आजच्या यूगात.
तो : अरे येतात रे..
मी : किती.. किती.. सांगा ना मला… ५-१०% Angry
तो : नाही, त्या पेक्षा नक्कीच जास्त, मला माहिती आहे तुझे गणित खराब आहे Big smile
मी : हसू नका, माझा मुद्दा बरोबर की नाही सांगा, अ ब क !
तो : अबक ? अबे झेंडू मी काटकर बोलतो आहे मीम वरचा
मी : ओह! स्वारी बरं का, मला वाटलं प्रकाशक अबक बोलत आहेत… Cool
तो :

पार्ट – ३

मी: हल्लो!
ती: ओळख बघू कोन ?
मी : Steve …………… अरे तू ? कशी आहेस ? खूप दिवसांनी फोन केलास ? बीझी आहेस की काय ? wink
ती : घाबरगुंडी …… काल तर फोन केला होता.
मी : अच्छा ? अरे विसरलो वाटतं Big smile
ती : चांगले आहे, बाकी काय विषेश, कामाचे काय झाले ?
मी : बाकी मस्त चालू आहे, काय म्हणतात तुमचे ते ?
ती : राज, माझे लग्न कुठे झाले आहे
मी : ओह, स्वारी हा, तुझ्याच नावाची अजून एक मैत्रीण आहे , त्यामुळे गोंधळ Big smile
ती : माझे नाव सांग, आताच्या आता angery
मी : Grade देवा शपथ माहिती नाही…………..
ती :
ती : अरे मी……….. !
मी : ओह, तू आहेस तर… Big smile

हा लोचा आहे Sad
यावर कोणाकडे उपाय आहे का ?
नंबर व नावे विसरतो हो फक्त व असे लफडे होते कधी कधी (आय ची आन, रोजच ) Big smile

बंद मंदिरातील धर्म.. – भाग २

त्यांना २००१ मध्येच त्याच आश्रम मध्ये प्रवेश घेण्यासाठी मला स्वतःला पुरावे व वाद घालावा लागला होता व त्यांना स्वतः त्यात मध्यस्थी करावी लागली होती ह्याची आठवण करुन दिली व त्यांना विचारले की ” टिशर्ट व जिन्स घातली म्हणजे धर्म कसा बाटतो ह्याचे विष्लेशन करा कृपा करुन.” हॅ हॅ हॅ ठरले होते संध्येचे व ध्यानाचे कारण देऊन माझी बोळवणी करण्यात आली.

मागील भाग

***

या अनुभवानंतर देखील मी वेळोवेळी अनेकांशी चर्चा केली, जमेल तसे धर्म म्हणजे नक्की काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला, अजून ही करतो आहे. आध्यात्मिक मार्गावर चालणे हे उद्दिष्ट नाही आहे, ना आधी होते. परंतू माहिती करून घेणे महत्त्वाचे आहे हे समजते.

हे केले की धर्म नष्ट होतो, ते केले की धर्म नष्ट होतो, अरे जो हजारो वर्षापासून चालत आला आहे, तो माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या चूकीमुळे (?) कसा काय नष्ट होऊ शकतो ? याचा अर्थ धर्मापेक्षा मानव श्रेष्ठ आहे मग, व मानव श्रेष्ठ आहे तर धर्माने कालानुसार बदलणे देखील शिकले पाहिजे,कारण मानव बदला आहे, बदलण्याची गती अफाट आहे व तो धर्म अजून ही शेकडो वर्ष मागेच आहे.

राजस्थानमध्ये एकेजागी (कोटा जवळ एक गाव आहे, नाव आठवत नाही आहे.) असेच फिरता फिरता पोहचलो होतो, तेथे एक साधू मंडल ( ज्यांच्याकडे स्थायी स्वरुपात संपत्ती असते, आश्रम, गोधन इत्यादी) भेटले, अनेक उच्चशिक्षित सामान्य जीवन सोडून आध्यात्मिक मार्ग पकडलेले येथे दिसले, भेटले. चर्चेला सुरवात माझ्या बर्मोडा टाईप जीन्सच्या पॅटमुळे झाली. बाईक वर प्रवास करताना मला अश्याच प्रकारच्या पँट सुखकर वाटतात म्हणून मी वापरतो.

एक साधू म्हणाले की संकृतीचा नाश होत आहे, धर्म अधर्माकडे वाहत चला आहे.
मी प्रतिप्रश्न केला कसा ? नाश होत आहे म्हणजे काय होत आहे ?
माझ्याकडे पाहत तो म्हणाला, भोगवाद व चंगळवाद वाढला आहे, काय कपडे घालावेत, कसे वागावे, धर्माची, धार्मिक नियमांची अवेहलना करणे इत्यादी प्रकारामुळे.
जर मला हे कपडे ( टिशर्ट/जीन्स/अर्धी पँट) जर वापरण्यायोग्य व माझ्या शारिरिक हलचालींना सुखकर असे आहेत तर यात चंगळवाद अथवा भोगवाद कोठून आला ? जर मला समोर असलेल्या मंदिरातील मुर्तीवर विश्वास ठेवण्यापेक्षा माझ्या श्रध्देवर अथवा माझ्या स्वतःच्या “मी” वर जास्त विश्वास असेल तर संकृती कशी काय नष्ट होते ?

दुसरा साधू, हेच म्हणतो आहे मी, तुम्ही तरूण, भोगवादाची चटक लागली की लगेच पश्चिमेकडील देशांच्या सर्व पध्दतीचे अनुकरण करू लागता, व हळूहळू स्वतःला नास्तिक म्हणवणे तुम्हाला गर्वाचे वाटते, संस्कार व इतर गोष्टी तुम्हाला अडचणीच्या वाटतात, जान्हवे वापरणे अपमानास्पद वाटते, कपाळावर टिळा लावला म्हणजे आपण बावळट दिसू असे वाटते.

मी, पश्चिमेकडून आलेल्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला भोगवाद का वाटतात ? टिळा लावणे, अथवा गंध लावण्यामागे एक शास्त्रिय कारण होते व आहे, हेच अनेकाना माहिती नाही हा त्यांचा दोष नाही आहे, तुमच्या सारख्या व्यक्तीचा आहे ज्यांनी धर्माची ध्वजा आपल्या खांद्यावर उचलली आहे, म्हणजेच जेव्हा एकदा पंडित, साधू माझ्या कपाळावर टिळा लावत असेल व त्याला जर मी विचारले की का लावायचे ? तर त्याच्या कडे उत्तर नसते लगेच तो धर्म बुडला अथवा बुडवला अशी आरोळी ठोकतो व शिव्याशाप देऊन माझ्याकडे विचित्र नजरेने पाहतो.
मला अजून ही माहिती नाही आहे की टिळा का लावावा, कोठेतरी वाचनात आले होते की शरिराचा केंद्र बिंदु दोन भुवयाच्या मध्ये समजला जातो (योगसाधनेत शक्यतो) म्हणून. राहिली गोष्ट जान्हवे बाळगण्याची तर त्याच्या मागचे कारण मला माहिती नाही, आपण जान्हवे का वापरावे हा प्रश्न ज्या क्षणी मनात आला त्याच क्षणी मी ते जान्हवे काढून नदीत सोडले.

माझे प्रश्न बालबोध असतील, कोणाला बावळट वाटतील, कोणाला मुद्दाम कोंडीत पकडण्यासाठी केलेला बनाव वाटेल, पण येत आहेत प्रश्न तर उत्तरे शोधणे गरजेचे. तुम्ही गीतेतील श्लोक सांगता व म्हणता की कृष्णाने असे सांगीतले होते धर्म म्हणजे मी, सत्य म्हणजे मी, हे विश्व म्हणजे मी व सर्व प्राणीमात्र म्हणजेच मी, मीच कर्ता, मीच निर्माता व मीच नष्ट करणारा, जर हे सगळे बरोबर आहे तर मग जाती व्यवस्था का आली ? त्याच कृष्णाच्या मंदिरात प्रवेशाची अनेकांना का परवानगी नसते, जगन्नाथ पुरीचेच उदाहरण घ्या. अजून ही अडथळा होतोच की, नावा आडून जात विचारण्याचा प्रयत्न होतोच की.

धर्म आम्ही संभाळतो म्हणणार्‍या लोकांची मानसिकता अजून ही समजत नाही मला, आडवळणावर असलेल्या मंदिरात एखादा भटक्या गेला, पाण्यासाठी तर त्याला पाणी न देता तुम्ही आधी नाव विचारता, मग अपेक्षित नाव नाही आले की ठेवणीतला तांब्या, पेला काढून त्यातून पाणी देता व म्हणतात आमचा धर्म सर्वसमभावाची शिक्षा जगाला देतो. अरे आपल्याच देशातील, आपल्याच धर्मातील दुसरा पंथ असलेल्या माणसाला तुम्ही साधं पाणी वेगळ्या भांड्यातून देता, बाहेरून आलेल्या लोकांना तुम्ही काय पाणी पाजणार.

मानसिकता, आम्ही उच्च ते नीच! आम्ही सवर्ण ते पिच्छडे, हे देशात सर्वत्र चालू आहे, फक्त आजकाल त्याच्या बातम्या होत नाहीत, आपले एक भावी पंतप्रधान, देशाचे युवा आयडिअल, दलिताच्या घरी जेवायला गेले होते ही पहिल्या पानावर झळकण्यासारखी बातमी होते यातच सर्व काही आले ना, की अजून भेदभाव कोणाच्याच मनातून गेला नाही आहे, शक्यतो त्यांचे जेवण देखील त्यांच्या आजोबा/पणजोबा सारखे बाहेरून मागवले गेले असेल व त्यांनी झोपडीत बसून खल्ले असेल. हा प्रश्न राजकीय नाही आहे, हा धार्मिक देखील नाही आहे, हा सामाजिक प्रश्न आहे.

धर्म म्हणजे फक्त अवडंबर माजवणे एवढेच राहिले आहे का ?
जैन समाजात वर्षाला अनेक पंपकल्याण पुजा होतात, शेकडो, लाखो रुपये घेऊन पुजेचे, हत्तीवर बसण्याचे, कलश वाहण्याचे मान वाटले (विकले) जातात पण पुजा संपल्यावर त्या पैश्याचे काय होते ? जैन धर्माच्या प्रसारासाठी खर्च केले एवढं एकच उत्तर! व प्रसार काय तर सिमेंटची मंदिरे बांधली, मागील भागात मी लिहल्या प्रमाणे ज्यांनी मोक्षासाठी राजमहल सोडले, समाज सोडला त्यांना उचलून आपण परत शहरामध्ये सिमेंटच्या एका चार बाय चारच्या रुम मध्ये बसवला, किती मोठा विरोधाभास !

एका ही साधूला मुनीला या प्रश्नाचे उत्तर देता येऊ नये? जैन धर्माची संकल्पना व जो आधार होता ती अहिंसा होती व आहे, चुकून ही हिंसा होऊ नये म्हणून जपणारे हा का विचार करत नाहीत की आपण मंदिराच्या पायेसाठी जमीन खणतो, डोंगर फोडून, दगड, माती, सिमेंट घेऊन येतो, तेथील निसर्गाची आपण हत्त्या करत नाही आहोत का ? अजाणतेपणे तरी का होईना ? व अजाणतेपणे देखील हत्या होऊ नये म्हणून हजार नियम तयार करून घेतले आहेत मग हे नियम करताना या गोष्टीचा का विचार केला नाही ? व फक्त मोठमोठी मंदिरे बांधली म्हणजेच धर्माचा प्रसार होतो हे बालिश उत्तर आहे.

शेकडो पोथ्या, ग्रंथ, हस्तलिखिते वाळवी खात तुमच्या तिजोरीत बंद आहेत, मंदिराच्या कपाटात आहेत त्यांना बाहेर काढा, ते सर्व सामान्य लोकाच्या आवाक्यात येईल असे काही तरी प्रयत्न करा, धर्माचा प्रसार विचारामुळे व विचाराच्या उपयुक्तेमुळे होईल, शेकडो फुट उंच मुर्ती उभी केली अथवा १००८ मंदिरे उभारण्याचा संकल्प तडिस नेला म्हणून होणार नाही. जी शाळा, कॉलेजे, हॉस्पिटल्स उभी केली आहेत ती सर्वांसाठी उघडी करा, आपल्या जातीचा, धर्माचा आहे म्हणून आधी तो असे न होता गरजू कोण आहे हे ओळखून प्रवेश देण्याची पध्दत वापरा अश्याने समाजाचे भले होईल व धर्माचे देखील.

अपवाद सगळीकडेच आहेत, नाही असे नाही पण भारतभ्रमण करताना जे नजरे समोर येत आहे ते निश्चितच कुठल्याही धर्मासाठी चांगले नाही आहे हे मात्र खरं. अनेक धर्माचे पंथाचे आपापले नियम आहेत, काही बंधने आहेत मान्य पण मानवतेचे देखील काही नियम आहेत, ते जेव्हा हे धर्माचे ध्वजवाहक समजून घेतील, धर्माला, देवाला मंदिरातून बाहेर काढून सर्वसामान्यापर्यंत घेऊन येतील तो खरा सुदिन.

**

एक गझल येथे देण्याचा मोह आवरत नाही आहे…

मैं ढूँढता हूँ जिसे वो जहाँ नहीं मिलता
नई ज़मीं नया आसमाँ नहीं मिलता

नई ज़मीं नया आसमाँ भी मिल जाये
नये बशर का कहीं कुछ निशाँ नहीं मिलता

वो तेग़ मिल गई जिस से हुआ है क़त्ल मेरा
किसी के हाथ का उस पर निशाँ नहीं मिलता

वो मेरा गाँव है वो मेरे गाँव के चूल्हे
कि जिन में शोले तो शोले धुआँ नहीं मिलता

जो इक ख़ुदा नहीं मिलता तो इतना मातम क्यूँ
यहाँ तो कोई मेरा हमज़बाँ नहीं मिलता

खड़ा हूँ कब से मैं चेहरों के एक जंगल में
तुम्हारे चेहरे का कुछ भी यहाँ नहीं मिलता

– कैफ़ी आज़मी

 

http://www.mimarathi.net/node/5596

मैं और मेरा लॅप्पी. अक्सर बाते करते है…. – डायरीची पानं

कधी तरी, मार्च २००६

अनेक दिवस घ्यावे घ्यावे असे मनात होते, एकदा हुर्रे करून आज घ्यायचाच असे ठरवून मार्केट मध्ये पाऊल टाकले. एक छानसा इटुकला-पिटुकला पण सर्व काही सोय असलेला विझार्ड निवडा, मागे पुढे न बघता पेमेंट केलं ! चांगला आहे पासून अरे दणकट आहे इत्यादी कौतुकाची फुलं त्यावर पडत गेली व माझा प्रेम त्याच्यावर वाढत गेलं !

जून २००६
घरातला पीसी मागे मागे करत कधी स्टोर रुम मध्ये जाऊन पोहचला त्याला देखील कळाले नाही, एवढे माझे जिवन लॅपटॉपमय झाले होते. चोबिस घंटे आप के साथ, टाईप त्याची व माझी जोडी जमली. झोपता ना शेजारी, जेवताना शेजारी, ऑफिसमध्ये पीसी शेजारी.. लोकांनी फक्त लॅपटॉप मॅन एवढेच म्हणायचे बाकी ठेवलं होतं… असा हा माझा लॅपटॉप व त्यांचे नाव लॅप्पी !!

जानेवारी २००७

तर हा लॅप्पी आधी पासूनच हुषार, मी सांगितले सर्व काम फटाफटा करायचा, मी कधी कधी रागवायचो पण तेवढंच प्रेमानं… एका मैत्रीणीला डेटवर घेऊन गेलो होतो, तर तेथे हा माझ्यासंगे, बेचारीने रागारागात सगळा राग त्या लॅप्पीवर काढला, दिला ढकलून तीने टेबलावरून खाली… बेच्चारा उं की चू म्हणाला नाही, मी वेड्या सारखा वेगाने त्याला उचलला व प्रेमाने जवळ घेऊन वर खाली पाहीले, काही लागले तर नाही ना ? अतीविचित्र राग आला होता, मी जंजीर मधील अमिताबच्या नजरेत जेवढी आग होती त्यापेक्षा डब्बल शोले डोळ्यात भरून तीच्याकडे पाहीले…. झालं…. पहिलीच डेट, तीच शेवटची ठरली !

तर हा असा हा लॅप्पी, आपला जीव की प्राण.. शहाण्यासारखा वागतो म्हणून आवडतो. पण कधी कधी मी रुद्रावतार मध्ये असतो तेव्हा ( आय मीन सटकलेला असतो तेव्हा…) सगळा राग याच्यावर निघतो….. गाडी गाडी खेळत याला अनेकदा भिरकावून दिला आहे फरशीवर… मार तर कितीदा खल्ला हे त्यालाच आठवत नसेल… पण एक वाईट दिवस तो विसरला नव्हता…

१७ मार्च २००७

वर्ल्डकपची मॅच.. भारत विरुध्द बांगलादेश… ! धडाधड विकेट पडत गेल्या, दादा एकटाच किल्ला लढवत होता.. व १९१ ला टिम गादर ! ओके होता है… असे म्हणत मी लॅपटॉपकडे दुर्लक्ष करून पुर्ण लक्ष टिव्हीवर अर्जून नजरेने ठेवले… एक डाऊन नंतर बांग्लाची मॅच सावरून धरणा-या जोडी मुळे, लॅपटॉप वर भारत हरणार.. हरणारच.. व शिव्यांचा पाऊस.. असे मॅसेज येऊ लागले… तरी मी मूग + इतर काही द्रव्य, अद्रव्य, खाद्य- अखाद्य ( जैनांनी खाऊ नयेत असे) गिळून गप्प शहाण्यासारखा मॅच पाहत होतो.. पण शेवटी कडेलोट झाला !!!!
मायला, बांगलादेशने भारताला वर्ल्डकप बाहेर भिरकावला……………… नहीं……. कसं कसं होऊ शकते………. भगवान……… असे मी ओरडावे म्हणत होतो.. तेच एक काळतोंड मित्राचा मँसेज आला… बघ म्हणालो होतो कि नाय.. हॅ हॅ हॅ…. त्याच्या ७२ खानदानाचा उध्दार करून… त्याला स्वर्गातून नरकात पाठवून… जीव थोडा फार शांत झाला होता.. तोच.. टिव्हीवर परत परत क्षणचित्रे दाखवणे चालू झाले.. धडाधड पडणा-या विकेट्स… व हताश पब्लिक……… परत राग उफाळून आला व पहिला झटका बसला तो माझ्या प्राण प्रिय लॅपीला…
ढ्यॅम्म्म्म्म्म्म !!!! आडवा.. एकदम त्रिफळाचीत. दांडी गुल.. टुक टुक करून एक दोनदा स्क्रिन उघडझाप झाली व ढेर…. !!
मेला तर मेला… भारत मॅच हरलीच कशी……… या रागात.. आम्ही…. !!!

१८ मार्च २००७

दुस-या दिवशी डोळे उघडले, तर लॅप्पीचे डोळे काळेच… Sad
जीव घाबुरा घाबुरा झाला.. पळत पळत आय सी यू मध्ये घेऊन गेलो……….. आपल्या हार्डवेअर रुम मध्ये, दोन पावलावर असलेला स्क्रु-ड्रायव्हर सेट घेऊन आलो, ऑपरेशन !! ती धडधड… ते थरथर कापत असलेले पैशाचे पॅकेट… व थरथरता हात… (हँग ओव्हर मुळे) कसा-बसा त्याला उघडला… त्याची सगळी हाडे त्यांची जागच्या जागी आहेत का पाहिले… थोडेफार फस्ट रिलिफ अ‍ॅक्शन कार्यक्रम राबवला.. पण डोळे काय त्याचे उघडले नाहीत…. शेवटी शॉक ट्रिटमेंट द्यावी या विचारावर आलो व काळजावर सिंहगड ठेऊन मी बॅटरी काढली व…..व…….. क्या बात !! फटाक करून डोळे उघडले.. माझ्या बच्चाने !! म्य्य्य्य्य्यूऊऊउह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआअ !! चालू झाला… आय लव्ह माय बेबी wink फक्त एक अडचण होती आता तो कधीच बॅटरीवर चालू शकणार नव्हता…..

कधीतरी मध्येच २००७ / २००८

माझ्यामुळे त्याच्यावर अपंगत्व आले ही सल मला नेहमी बोचत राहिली… मी सर्वार्थाने प्रयत्न करत होतो की त्याची असल्ली आय.. आय मीन्स… आई.. शोधावी व त्याच्याकडून डोनेट नाही तर.. मायला चार पैका खर्च करून बॅटरी घ्यावी… पण… मार्केटच्या वादळात ती कुठे हरवली देवाकं ठावं ! आय वीना पोरकं पोरं.. त्यात मी असला… कसे संभाळले मलाच ठावं ! तरी देशाच्या कानाकोपर्‍यात माहिती देऊन ठेवली होतीच.. की एक बॅटरी द्या रे कोणी तरी.. एक बॅटरी… देव तुमचे भले करेल… !! पण २००८ उजाडून संपत आलं… तरी बॅटरीचा काय बी पत्ता लागला नाय…. जो पर्यंत वीज आहे तो पर्यंत नीट चालायचा.. पण वीज गेली की पटकन डोळे मिटायचा ते परत वीज येऊ पर्यंत.. Sad

२२ डिसेंबर २००८

पण पठ्याने माझी साथ नाही सोडली, एकापेक्षा एक वादळ येऊन गेली, घर जाऊन एक बेडरुम सेटवर आलो.. बेड जाऊन शेअर रुम मध्ये आलो तरी बी पठठ्या बरोबरचं.. जेवढी वादळी मी सहन केली तेवढीच त्यानं देखील. अगदी वाईटाच्या क्षणाला देखील तुम्हाला सोडून जात नाही त्याला मित्र म्हणावा असे आपले जय-विरू पासून रामदेवबाबा पर्यंत सगळे फक्त सांगतात… पण हा खरचं असा आहे… माझा लॅप्प्पी…..

३० डिसेंबर २००९

ती काळरात्र…. मी कसा विसरू.. ( आठवत काय नाय ही गोष्ट वेगळी) जीपनं मला उडवला, माझ्या पाठीशी बांधलेलं माझं पोरं… माझा लॅप्पी.. देखील माझ्या बरोबर उडला… ( त्याच्या आधी त्याने विमानातून प्रवास अनेकदा केला.. होता.. पण असा पहिल्यांदाच..) दोघे आदळलो….. माझी हाडे जशी दुरावली माझ्या पासून तशी त्यांची दुरावली… काही तुटली, काही फुटली…. पण ऑपरेशन झाल्यावर व शुध्दीत आल्यावर मला सर्वात आधी आठवलं कोण असेल………… विचार करा. विचार करा…. प्लिज……… माझा लॅप्पी….. हे माझे नववर्षाच्या सुरवातीला प्रथम शब्द होते…. हाडं तुटलेली पाहून आई पण दचकली नाही एवढ्या बाकीच्या नर्स ( सुंदर होत्या) + डॉक्टर + इतर दचकले… ! चालायचेच आमचे अमर’प्रेम त्यांना कसे कळणार……….. !

२ जानेवारी २०१०

डावाकोपरा तुटलेला…. वरचे सुंदर पॅनलचा चांगला ४ इंचाचा टवका उडालेला…. स्क्रिनचा उजव कोपरा किंचित वाकलेला…. चालू होईल की नाही अशी धाकधुक मनात होती….. पण मनातील धाकधूक मनातच राहिली…. धक धक करने लगा…. म्हणत.. मी पॉवर प्लग करताच माझा लॅप्पी चालू झाला…….. व हॉस्पिटल मधील दिवस कसे काढावे या चिंतेवर त्यांने मस्त पैकी स्माईल दिले…. हास्य त्या नंतरच्या माझ्या बेड रेस्टच्या टायमाला त्यानं जी साथ दिली ती नाय विसरू शकत… आज हे तुम्ही मीमवर वाचत आहात ना.. त्याला देखील ९९% तो कारणीभूत आहे… त्यानं साथ दिली म्हणून नवीन नवीन सोय, बदल मी मीमवर बेडवर असून पण दिल्या…. हा देवानं दिलेला मला गिफ्ट आहे…. याच्यामुळेच माझे कित्येक दिवसरात्र… सुखात गेले ते मला माहिती आहेत…

१४ मार्च २०१०
दिवस बदलत असतात…. या दिवसी मायनं जवळ घेऊन लै रडलो राव, काय हे नका ईचारू…. नाय मारला मी पॅप्पीला… पण कोणीतरी.. मलाच रडवून गेला होता… माझं दुखं लॅप्पीने लैच मनावर घेतलं की काय माहित.. लै शहाण्यासारखा वागू लागला…. कधीच बंद पडला नाही, दिवसरात्र चालू असे… पण कधी ओव्हर टाईम मागीतला नाही… माझा त्रागा.. माझी ओढताना माझ्या पायाच्या दुखण्यासारखीच वाढू लागली… व त्याचा त्रास देखील…

२० मे २०१०…

लॅप्पीला भिंतीवर भिरकावून… २ आठवडे झाले होते…..आता डावा कोपरा दुमडला होता… व डिव्हिडी ट्रेची पॅल्स्टिक कॅप तुटली होती…. त्याच्या पाठीवर अगणित ओरखाडे उठले होते….. काळी भोरं पाठं… त्याची…. ओरखाड्यामुळे ब्लॅक & व्हाईट दिसत होती… तरी चालू होता… माझ्यासाठी…. पुन्हा जवळ घेऊन रडलो… अनेक सुख-दुखाचा साथी आहे माझा हा.. त्याने तेवढेच आनंदाचे दिवस पाहीले आहेत व तेवढेच दुखाचे…. जेवढे मी पाहिले…..

२८ फ्रेबुवारी २०११

जिवापाड प्रेम करणारे हे ना ते सांगून कधी फिरले त्याचे दुखः माझा हा लॅप्पी व मी सोडून कोणी समजून घेतलेच नाही, काय नाही दिलं यानं मला ? अनेक मित्र… अनेक दोस्त… अनेक कहाण्या…. अनेक लेख…. अनेक चित्रे… व अनेक अमोल क्षण.. यांने खरचं काही वर्ष मला संभाळले आहे…… आय लव्ह यू लॅप्पी !!!

माझा लॅप्पी आहे हा….. माझं पिल्लू आहे हे…. !
मध्येच अनेकांनी सूचवले देऊन टाक.. दुसरा घे…. आपल्या पोराला कोणी असं देतं का ? राहील घरी असाच… जसा आहे तसाच.. मला जड नाही हा…… जसे इतर सोडून गेले तसे हा जाणार नाही.. याची खात्री आहे… अनेक क्षण याच्या बरोबर जुडलेले आहेत… वाईट चांगले… त्याला ही माझा कधी कधी राग येतो नाही असे नाही, पण तो क्षणीकच….. बापापुढे.. पोरगं किती धावणारं wink पण तरी ही खरचं… आय लव्ह माय बच्चा !!!

*
असेच… आठवलं म्हणून……

भटकता भटकता….. रायगडावर मला एकाने विचारले होते… अरे लॅपटॉप का घेऊन भटकत आहेस…. येथे नेटवर्क थोडीच आहे… त्याला नकळत दिलेले उत्तर “माझ्या लॅप्पीला पण राजगड पहायचा आहे”

*
इतके सोसून, मला सहन करून, कसा आहे तसा.. चांगला वाईट… खडूस.. रागीट… प्रेमळ… जसा आहे तसा…. माझा लॅप्पी मला सहन करत आहे ना ……अजून, माझा बच्चा आज ही माझ्या बरोबर.. आहे ! इतके सोसून कोणी आपल्याला सोडून जातं का ? हो जातात.. पण ती माणसं असतात…..

आपण राष्ट्रगीताची अवहेलना सहन करणार आहोत काय?

स्वातंत्र्यापुर्वीचा काळ ! साधारण १९१० ते पुढचा…..

सगळ्या भारतभर स्वातंत्र्याचे वारे सुरू झाले होते. मवाळ आणि जहाल असे दोन्ही पक्ष आपापल्या पद्धतीने ब्रिटीश सरकारचा विरोध करत होते. ब्रिटीश सत्ता उलटून लावायचा प्रयत्न करत होते. ब्रिटीश सरकार मात्र दोन्ही चळवळी अतिशय निर्दयतेने मोडून काढत होते. गांधीजींचे सत्याग्रह आणि क्रांतीकारकांच्या जहाल कारवाया यांना अजिबात दाद न देणारे ब्रिटीश सरकार त्या काळात फ़क्त दोन शब्दांना घाबरत होते असे म्हटले तर अतिषयोक्ती वाटेल कदाचित पण ती सत्य परिस्थिती आहे….

“वंदे मातरम…!”

हे दोन शब्द उच्चारायला देखील बंदी होती. शिरीषकुमार, वीणाकुमारी सारख्या क्रांतीकारकांना केवळ ’वंदे मातरम” चा जयघोष केला या कारणापायी ब्रिटीशांच्या रोषाचे धनी व्हायला लागले होते. शिरीषकुमारला तर आपले प्राण गमवावे लागले. असे काय होते त्या दोन शब्दात? क्रांतीकारकांना, सत्याग्रहींना दाद न देणार्‍या ब्रिटीशांचा थरकाप उडावा अशी कुठली शक्ती होती त्या शब्दात? आ. बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १९७६ ते १९८२ च्या दरम्यान लिहीलेले हे गीत त्यांच्या १९८२ साली प्रसिद्ध झालेल्या “आनंदमठ” या कादंबरीत समाविष्ट केलेले होते. पुढे त्यांचा भारताचे राष्ट्रीय गीत म्हणुनही विचार करण्यात आला होता. १८९६ मध्ये कलकत्ता येथे झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात आचार्य रविंद्रनाथ टागोर यांनी सर्व प्रथम हे गीत गायले. त्या काळात वंदे मातरम हा शब्द क्रांतीकारकांसाठी, देशभक्तांसाठी परवलीचा शब्द बनला होता. ब्रिटीशांनी “वंदे मातरम” या शब्दांचा इतका धसका घेतला होता की सार्वजनिक जागी त्याचा उच्चार करण्यावरदेखील बंदी घालण्यात आली होती. १९०७ साली जर्मनीमध्ये स्टुटगार्ड येथे मादाम भिकाजी कामा यांनी सादर केलेल्या भारताच्या पहिल्या ध्वजात त्यांनी ‘वंदे मातरम’ या शब्दांचा वापर केला होता.

मादाम कामा यांनी तयार केलेला पहिला भारतीय ध्वज

या गाण्याच्या पहिल्या कडव्याला भारतीय संविधानाने “राष्ट्रगीता”चा दर्जा दिलेला आहे.

असं नक्की काय होतं ‘वंदे मातरम’ या गीतात… ज्याने अर्ध्या जगावर राज्य करणार्या ब्रिटीश सत्तेचा थरकाप उडवला होता !

स्व. बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी संस्कृत आणि बंगाली अशा भाषांमध्ये मिळुन लिहीलेले मुळ वंदे मातरम….

वन्दे मातरम्
वन्दे मातरम्
सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम्
सस्यश्यामलाम् मातरम्।

शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम्
फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम्
सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्
सुखदाम् वरदाम् मातरम् ॥ १ ॥
वन्दे मातरम् ।

कोटि – कोटि – कण्ठ कल – कल – निनाद – कराले,
कोटि – कोटि – भुजैर्धृत – खरकरवाले,
अबला केन मा एत बले।
बहुबलधारिणीम् नमामि तारिणीम्
रिपुदलवारिणीम् मातरम् ॥ २ ॥
वन्दे मातरम् ।

तुमि विद्या, तुमि धर्म
तुमि हृदि, तुमि मर्म
त्वं हि प्राणाः शरीरे
बाहुते तुमि मा शक्ति,
हृदये तुमि मा भक्ति,
तोमारइ प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे ॥ ३ ॥
मातरम् वन्दे मातरम् ।

त्वम् हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदलविहारिणी
वाणी विद्यादायिनी,
नमामि त्वाम् नमामि कमलाम्
अमलाम् अतुलाम् सुजलाम् सुफलाम् मातरम् ॥ ४ ॥
वन्दे मातरम् ।

श्यामलाम् सरलाम् सुस्मिताम् भूषिताम्
धरणीम् भरणीम् मातरम् ॥ ५ ॥

वन्दे मातरम् ।

स्व. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय

*******************************************************

या गीताचा आपले ब्लॉगर मित्र श्री. नरेंद्रकाका गोळे यांनी केलेला हा मराठी अनुवाद…

आई तुला प्रणाम

आई तुला प्रणाम ॥ धृ ॥

सुजल तू, सुफल तू, मलयानिलशीत तू ।
हरीतशस्यावृत्त तू ॥
चांद्रज्योत्सनापुलकित यामिनी ।
उदितपुष्प-लता-वनांनी विभूषिते ॥
सुहासिनी, सुमधूर भाषिणी ।
सुखदा, वरदायिनी ॥ १ ॥ आई, तुला प्रणाम

कोटी कोटी मुखांनी अभिव्यक्त तू ।
कोटी कोटी बाहूंचे बल प्राप्त तू ॥
अबला कशी? महाशक्ती तू ।
अतुलबलधारिणी ॥
प्रणितो तुज तारिणी ।
शत्रुदलसंहारिणी, तुला प्रणाम ॥ २ ॥ आई, तुला प्रणाम

तू विद्या, तू धर्म ।
तू हृदय, तू मर्म ॥
तूच प्राण अन् कुडीही ।
तूच मम बाहूशक्ती ॥
तूची अंतरीची भक्ती ।
तुझीच प्रतिमा वसे, हर मंदिरी, मंदिरी ॥
तुला प्रणाम ।
आई तुला प्रणाम ॥ ३ ॥ आई, तुला प्रणाम

तू ची दुर्गा, दशप्रहरणधारिणी ।
कमला, कमलदल विहारिणी ॥
वाणी, विद्यादायिनी ।
तुला प्रणाम, कमले तुला प्रणाम ॥
अमले, अतुले, सुजले, सुफले, आई ।
आई तुला प्रणाम ॥
श्यामले, सरले, सुस्मिते, भूषिते ।
तूच घडवी, पोषी तू, आई ॥ ४ ॥ आई तुला प्रणाम

===

मराठी रुपांतर – श्री. नरेंद्र गोळे

***********************************************************************************************

आज हे सगळं पुन्हा लिहायचं कारण म्हणजे “आपल्याला खरोखर आपल्या या ज्वलंत, क्रांतीकारक राष्ट्रगीताबद्दल किती आदर आहे? या काव्याबद्दल आपल्या मनात नक्की कुठली भावना आहे याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आज क्रिकेट विश्व चषक २०११ साठी या काव्याचा व्यापार मांडला जातोय. टाईम्स ऑफ इंडीया, रेडीओ मिर्ची, फिवर १०४ एफ्.एम. अशा वाहिन्यांवर “वंदे मातरम” या महान काव्याचे चक्क “वन-डे मातरम” असे भ्रष्ट बाजारीकरण केले जात आहे. खालील जाहीरात बघा……

ही राष्ट्रगीताची अवहेलनाच नाही का?

हा केवळ आपल्या राष्ट्रगीताचाच नव्हे तर आपला, आपल्या राष्ट्राचा, आपल्या स्वत्वाचा अपमान आहे.

आपण या साठी काय करणार आहोत? सगळ्या ब्लॉगर मित्रांना विनंती आहे, की ही माहिती आपापल्या ब्लॉगवर द्या. टाईम्स ऑफ इंडीया, रेडीयो मिरची, फिवर १०४ एफ्.एम. चा जाहीर निषेध करा. ‘टाईम्स ऑफ इंडीया’ वाचणे बंद करायला हवे…..! त्यांच्यापर्यंत हा उद्रेक पोहोचायलाच हवा. तो पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. किमान ५०% ब्लॉगर्सनी जर हा निषेध आपल्या ब्लॉगवर व्यक्त केला तरी खुप काही साधता येइल. माझी सर्व ब्लॉगर मित्रांना विनंती आहे की त्यांनी आपला हा निषेध शक्य त्या मार्गाने संबंधितांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. ब्लॉग, फेसबुक, बझ्, ट्वीटर जिथे जिथे म्हणून हा निषेध व्यक्त करता येइल तिथे तिथे करा. आपल्या मित्रांना इमेल मधुन ही माहिती पाठवा. ज्यांना ब्लॉगवर किंवा इतरत्र निषेध करणे शक्य नाही ते हिंदु जागृतीच्या या दुव्यावर जावून आपला निषेध व्यक्त करु शकतात.

from :

http://magevalunpahtana.wordpress.com

लेट्स किल गांधी

लेखक : तुषार अ. गांधी अनु. अजित ठाकूर

जर महात्मा गांधी झाले नसते तर आज मी भारताच्या या संसदेत अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून तुमच्यापुढे येऊ शकलो नसतोठ असे उद्गार ओबामा यांनी काढले तेव्हा महात्माजींच्या कार्याची व प्रभावाची आंतरराष्ट्रीय प्रचीती आपल्याला परत एकदा आली असेल.

महात्मा गांधी यांच्या हत्येला साठच्यावर वर्षे झाली. तरीही त्यांचे स्मरण आजही ताजे आहे, गांधीजींच्या संदेशाची उपयुक्तता आजही सरलेली नाही याची खात्री पटते.

गांधीजींच्या विषयी आजही जगभर आदरभाव दिसून येतो. त्यांच्यावर देशोदेशी संशोधन, लेखन चालू आहे.

गांधीजींच्या यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पौलू अजूनही आपल्याला आश्चर्यचकित करतात आणि त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात विविध यक्तींना कार्यप्रवण ठेवण्यासाठी कुठले संमोहन तंत्र वापरले याचे गूढ गडद होत जाते.

गांधीजींच्या सत्यअहिंसेच्या आग्रहाचे, सत्याग्रहाचे, असहकाराचे, आत्मक्लेशाचे, राजकारणातील आध्यात्मिकतेचे मूल्यमापन करणे आजही अवगड वाटते.

लेट्स किल गांधी या पुस्तकाचे एक वेगळेपण म्हणजे तुषार अरुण गांधी या महात्मा गांधीजींच्या पणतूने ते लिहिलेले आहे.

आपल्या पणजोबांना त्याने पाहिलेले नहते; पण त्यांचे नाव सतत तोंडी असते, त्यामुळे त्याला आपले पणजोबा होते तरी कसे याबद्दल कायम कुतूहल वाटत असे.

गांधीजींची हत्या झाली, त्याबद्दलही त्याला अनेक प्रश्न पडत. ही हत्या का झाली? कोणी केली? कशी केली? हत्येचा कट करणार्यांचे पुढे काय झाले? कोणाकोणाला शिक्षा झाली? कोण निर्दोष सुटले?

त्याच अनुषंगाने गांधींच्या हत्येचे याआधी झालेले सात प्रयत्न कसे फसले हेही जाणून ग्यावेसे वाटले.

हिंदुस्थानच्या फाळणीबद्दलही गांधीजींना दोष देण्याचा एका विशिष्ट वर्गाचा प्रयत्न असतो. त्याबाबतही वस्तुस्थिती काय आहे हे तुषार गांधींना समजावून गेण्याची गरज वाटते.

या सर्व बाबींबाबत उपलब्ध कादगपत्रे आणि पुरावे यांच्या आधारे सत्यशोधन करण्याच्या प्रयत्न लेट्स किल गांधी या पुस्तकाची निर्मिती झाली आहे.

* गांधींमुळे फाळणी झाली. गांधींनी पाकिस्तानला 55 कोटी रुपये देणे भारताला भाग पाडले.

* भारतमातेला वाचवण्यासाठी गांधींना मारणे हाच एक उपाय होता.

* हिंदूंचे नुकसान होईल अशा गांधींच्या पाकिस्तानधार्जिण्या वृत्तीमुळे चिडून नथूराम गोडसेनी हे कृत्य केले.

* मुसलमानांना गांधींजी पाठीशी घालत होते.

* गांधींनी हिंदू निर्वासितांच्या हलाखीकडे डोळेझाक करून फाळणीच्या वेळी भारतात राहिलेल्या मुसलमानांचे लाड केले.

अशी कारणे गोडसे समर्थकांनी आणि उजया विचारसरणीच्या हिंदुत्ववाद्यांनी देऊन गांधींच्या हत्येचे समर्थन करण्याचा प्रकार गेली साठ वर्षे चालू आहे. महाराष्ट्रातील हिंदुत्ववाद्यांमध्ये या मताला पुष्टी देणार्यांचे प्रमाण जास्त आहे.

पाकिस्तानची जेव्हा कल्पनाही अस्तित्वात नहती आणि पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्याचा प्रश्नच उद्भवलेला नव्हता तेहा पुण्यात गांधींच्या दिशेने एक बाँब फेकण्यात आला होता (1934). तो चुकून भोपटकरांच्या गाडीवर पडला. गांधींना काही झाले नाही. बाँब फेकणारा हिंदुत्ववादी अतिरेकी पोलिसांच्या हाती लागला नाही. या घटनेची माहिती श्रीपाद जोशी आणि आचार्य जावडेकर यांच्या पुस्तकात आली आहे. गांधींना या घटनेची माहिती नंतर देण्यात आली. ते म्हणाले, अशा वेडेपणाच्या कृत्याला सनातनी हिंदू समर्थन देत असतील यावर माझा विश्वासच नाही… लक्षावधी हिंदूंप्रमाणेच माझ्याही धर्मश्रद्धांचे रक्षण करता करता मला हौतात्म्य मिळाले तर तो माझा सन्मानच ठरेल. प्यारेलाल आणि बी. जी. तेंडुलकर यांनीही हिंदू अतिरेक्यांनीच हा बाँब फेकला होता असे नमूद केलेले आहे.

जुलौ 1944 मध्ये पाचगणीत गांधींविरुद्ध नथुराम गोडसेंनी निदर्शने केली आणि हातात कट्यार गेऊन गांधींकडे धाव गेतली. त्याला भिलारे गुरुजींनी वाटेतच आवरले. मणिभाई पुरोहितांनी त्याच्या हातातून कट्यार काढून त्याला नि:शस्त्र केले.

9 सप्टेंबर 1944 रोजी सेवाग्राममध्येही नथुराम गोडसे गांधींकडे चालला असताना त्याला आश्रमवासीयांनी अडवले. त्याच्याजवळचा जांबिया काढून घेतला.

29 जून 1946 रोजी पुण्याला जाणार्या गांधी स्पेशल गाडीला नेरळ-कर्जत दरम्यान अपघात झाला. रुळावर मोठमोठे दगड ठेवले होते. 30 जूनच्या प्रार्थना सभेत पुण्यात गांधींनी या घटनेचा उल्लेख केला.

तात्पर्य, गांधींना ठार मारण्याची हिंदू अतिरेक्यांची योजना फाळणीच्या खूप आधीपासून शिजत होती.

तुषार गांधी यांनी या 800 पृष्ठांच्या पुस्तकात गांधीजींच्या जीवनातील अखेरच्या दोन वर्षातील घटनांचा विस्तारपूर्वक मागोवा घेतला आहे.

पहिल्या 160 पृष्ठात गांधींची हत्या, ही हत्या करणार्या यक्तींची टोळी, हत्येचा कट, तपासातील गोंधळ, गांधींना पूर्वकल्पना न देता पंडित नेहरू-सरदार पटेल – मौलाना आझाद – आचार्य कृपलानी प्रभृतींनी फाळणीला दिलेला होकार याबद्दलचे तपशील दिलेले आहेत.

ई खरेदी विभागात हे पुस्तक येथे उपलब्ध आहे.

भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी कालवश

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचे निधन !

खेळविश्व -विश्वकप

नमस्कार !
आम्ही मी मराठीवर विश्वकप हा विभाग चालू केला आहे व क्रिकेट बद्दल चे लेख तेथे प्रकाशित करत आहोत, मान्यवर लेखकांना विनंती आहे की खेळविश्व विभाग समृद्ध करण्यासाठी हातभार लावावा, जे क्रिकेट खेळतात, ज्यांना आवडतं व जे लिहू शकतात त्यावर त्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे 🙂 तुमचा एखादा मित्र / मैत्रीण जर क्रिकेटवर लिहत असेल तर ती च्या / त्याच्या पर्यंत ही माहिती जरूर पोहचवा.

http://www.mimarathi.net